जुळून येती रेशीमगाठी (एक प्रेमकथा)- भाग २

 

मागच्या भागात आपण पाहीले की अनघाला मुलगा बघायला यायचं ठरलं होतं. ठरल्याप्रमाणे मुलगी बघण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अनघा आईने वाढदिवसाला घेतलेला लाल पिवळ्या रंगाचे कॉम्बिनेशन असलेला पंजाबी ड्रेस घालून तयार झाली. आईच्या सांगण्यावरून कपाळावर इवलिशी टिकली लावली. ती कधीच मेकअप करायची नाही आणि आजही नाही पण तिचं नैसर्गिक सौंदर्य आज अजूनच उठून दिसत होतं.
उंच बांधा, चेहऱ्यावर आत्मविश्वास, गव्हाळ वर्ण, बोलके डोळे, नाजूक ओठ, चिरेदार नाक आणि त्यावर तिला केसांचा बॉयकट अगदी शोभेसा दिसायचा.
ठरलेल्या वेळेत मुलगा , आई‌ वडील, सोबत अनघाची मावशी असे सगळे घरी आले.
अनघा अजून मनातून या गोष्टींसाठी तयार नव्हती तेव्हा ती आईचं मन राखायला आज सगळं करत होती.
अनघाला मावशी बाहेर सगळ्यांना भेटायला घेऊन आली. अनघाची ओळख सगळ्यांशी करून दिली.
मावशी म्हणाली “हा रितेश, सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, दोन वर्षांपासून कंपनीतर्फे  प्रोजेक्टसाठी अमेरिकेत राहायला आहे.”
अनघाने रितेश‌कडे बघितले आणि दोघांची नजरानजर झाली, अनघाने स्मितहास्य केले.
रितेश उंच पुरा, रूबाबदार, डोळ्यांवर चष्मा, दाढीची फ्रेंच कट, एकंदरीत देखणा. अनघा अधूनमधून त्याच्या कडे बघत होती आणि तिला लक्ष्यात आले की रितेश एकसारखा अनघाला बघतो आहे. तिचे लक्ष गेले की तो दुसरीकडे बघायचा आणि परत अनघाकडे.
ते पाहून अनघाला वाटले ह्याला जर आपण आवडलो असेल तर काही खरं नाही, आई लगेच मागे लागेल लग्न ठरवायच्या. अनघाच्या मनात वेगळेच विचार सुरू होते. तितक्यात रितेश चे बाबा म्हणाले ” तुम्हा दोघांना काही बोलायचे असेल तर एकांतात बोला. ”
ते‌ ऐकताच मावशी दोघांना घेऊन अनघाच्या खोलीत गेली. तिथेच दोघांसाठी कॉफी पाठवली आणि मनसोक्त गप्पा मारा म्हणत बाहेर निघून आली. रितेशची नजर काही केल्या अनघाच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती, न राहावून अनघा हसत  म्हणाली “हॅलो जेंटलमॅन, इतकं काय निरिक्षण करत आहेस.”
त्यावर रितेश म्हणाला “You are beautiful”
अनघा पहिल्यांदा जरा लाजली आणि स्वतःला सावरत म्हणाली “हे बघ, मला आता लग्न करायचं नाही, आईच्या आग्रहाखातर मी आजच्या भेटीसाठी तयार झाली. तू नाही म्हणून सांग ना‌ तुझ्या घरच्यांना. माझं करिअर सेट होत पर्यंत मी काही लग्न वगैरे नाही करणार. माझं लहानपणापासून स्वप्न आहे वाइल्ड लाइफ फोटोग्राफर बनण्याचे. असं अर्ध्यावर सोडून मला‌ लग्नाच्या भानगडीत नाही पडायचं. प्लीज तू नकार दे मला.”
रितेश तिच्या बोलण्याने जरा‌ गोंधळला पण तिचा हा स्पष्टवक्तेपणा, तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठीची जिद्द बघून अजूनच तिच्याकडे आकर्षित झाला.
रितेश अनघाची मज्जा घेत म्हणाला “तू किती सॉलिड आहेस गं, मनातलं भराभर बोलून मोकळी झाली, I liked it ha… पण मला तू आवडली आहेस मग मी का नकार देऊ, तुला मी नसेन आवडलो तर तू नकार दे हवं तर.”
अनघाला ते ऐकून जरा मनात चिडचिड झाली, त्याला समजावत ती म्हणाली”अरे , कसं सांगू तुला, माझा छंद, माझं स्वप्न, करीअर एकच आहे वाइल्ड लाइफ फोटोग्राफी. ते पूर्ण होत पर्यंत मी लग्न करणार नाही. तू होकार दिला तर आई मावशी माझं काही ऐकणार नाही, सतत मागे लागतील लग्न लावून देण्याच्या आणि मग मला माझ्या करीअर कडे तितकं लक्ष देता येणार नाही,समजून घे ना”
अनघा चिडली हे लक्षात येताच रितेश म्हणाला “बरं, मी काय म्हणतो, आपण मित्र तर बनू शकतो ना. मी सांगतो घरी लगेच लग्न करायचं नाही आणि पुढच्या सुट्टीला आल्यावर बघू म्हणून. मग तर झालं…मी खूप मुली बघितल्या पण तुझ्या सारखी तूच..I am impressed अनघा.”
अनघा ते ऐकून खूश झाली. दोघांची मैत्री झाली आणि ठरलं की घरच्यांशी बोलून लगेच लग्न करायचं नाही असं सांगायचं.
दोघांनी मस्त गप्पा मारल्या, रितेश तिला म्हणाला ” तू आता फोटोग्राफी साठी जाशील तेव्हा मी सोबत आलो तर चालेल तुला. मी फक्त नोकरी नोकरी आणि नोकरी यातच वेळ घालवतो. पण असा वेगळा अनुभव घ्यावा वाटतो तुला बघुन, चालेल ना‌ मी आलो तर.”
अनघा त्याला घेऊन जायला तयार झाली आणि सांगितलं की उद्या सकाळी सहा वाजता तयार रहा‌, मी घ्यायला येईल तुला.

रितेश आणि अनघा खोली बाहेर येताच दोघांच्याही घरच्यांनी एका होकारार्थी अपेक्षेने त्यांच्या कडे बघितले. रितेश चे बाबा लगेच म्हणाले ” काय मग रितेश, कशी वाटली अनघा.”
रितेश म्हणाला ” बाबा घरी गेल्यावर बोलू आपण. आता नको.”
अनघाच्या आईला जरा काळजी वाटली, मनोमन त्या विचार करू लागल्या नक्कीच अनघाने काही तरी म्हंटलं असेल. कित्येक वेळा सांगितलं हिला लगेच अटी घालू नकोस.
काही वेळाने मुलाकडची मंडळी परत निघून गेली तोच आई अनघाला ओरडली ” अनू, तू काय सांगितलं रितेश ला.. काही बोलली की नुसत्या अटी घातल्या..लग्न न करण्याच्या..”
अनघा काहीच बोलली नाही..
तिकडे वाटेतच रितेशने घरच्यांना सांगितले की ” मी लग्न करेल ते अनघाशीच..मला ती पसंत आहे..पण लगेच लग्नाला ती तयार नाही.. आपण तिला जरा वेळ देऊया..”  त्याच्या आई बाबांना पटलं नाही ते म्हणाले ” तयार का नाही.. आणि कशावरून वेळ दिल्यावर ती तुझ्याशी लग्न करेन.. तिने सांगितले का तिला तू पसंत आहे म्हणून..”
रितेश म्हणाला ” बाबा अहो असं सांगितलं नाही पण मला खात्री आहे जरा वेळ मी तिच्या सोबत घालवला, मैत्री करून एकमेकांना समजून घेतलं तर ती मला नकार नक्कीच देणार नाही.”
दुसऱ्या दिवशी सकाळी अनघाने रितेश तिच्या सोबत येणार असल्याचे आईला सांगितले आणि त्याला घ्यायला ती निघाली.
आईला मनातून आनंदही झाला, चला गाडी जरा रुळावर येत आहे, हळूहळू बदलेल तिचं मन आणि होईल लग्नाला तयार असं स्वतःशी बोलत त्या कामात व्यस्त झाल्या.
रितेश पहाटेच उठून तयार..अनघा सोबत जंगल सफारी, फोटोग्राफी..तो खूप आतुर झाला होता. अनघा घराबाहेर आली आणि रितेशला फोन केला, रितेश लगेच बाहेर आला..अनघाचा जीन्स टी शर्ट, जॅकेट मधला लूक, तिची बाइक ( स्कुटी), डोक्यावर हेल्मेट बघून जरा वेळ न्याहाळत बसला.
अनघा त्याला म्हणाली, हे घे हेल्मेट आणि बस पटकन. उशीर होईल.
तिच्या बोलण्याने तो भानावर आला आणि म्हणाला “मी चालवू का बाइक.”
अनघा त्याला चिडवत गालात हसत म्हणाली “नको, जंगलाच्या रस्त्यावर तुला नाही जमणार चालवायला.. शिवाय सवय तुटली असेल ना आता गाडी चालवायची..”
रितेश मागे बसला आणि दोघेही निघाले. काही अंतरावर खूप सारी झाडं, बाजूला एक तळं , पक्ष्यांचा किलबिलाट अशा ठिकाणी ते पोहोचले. अतिशय रम्य वातावरण , गार वारा..रितेश पहिल्यांदा हे अनुभवत होता.
अनघा सांगत होती,  सकाळी इथे काही पक्षी येतात त्यांचे फोटो काढायचे आहेत मला, सहसा ते पक्षी फारसे दिसत नाही. माझ्या प्रोजेक्ट साठी नक्कीच उपयोगी पडेल ‌
ती तिचा लांब लेन्स असलेला कॅमेरा सेट करत रितेश सोबत बोलत होती आणि रितेश त्या रम्य वातावरणाचा आनंद घेत होता, अनघाची फोटो घेण्याची एकाग्रता, तिचा तो अंदाज सगळं न्याहाळत होता.
काही वेळ व्यस्त असलेली अनघा म्हणाली “चल आज इतकेच बस..मस्त फोटो मिळालेत बघ…” आणि रितेशला फोटो दाखवू लागली. मग दोघांनी त्यांच्या मैत्रीचा पहिला एकत्र फोटो त्या ठिकाणी काढला.
ते पक्षांचे अप्रतिम फोटो बघून रितेशला तिचं खरंच कौतुक वाटलं. तिला त्याने प्रश्न केला “तू अशी एकटी फिरतेस नेहमी कि सहकार्‍यांसोबत.. एकटीला भिती नाही वाटत का..”
अनघा हसत म्हणाली “कधी सहकारी असतात कधी एकटीच..अरे मी कराटे चॅम्पियन आहे.. शिवाय मार्शल आर्ट ही शिकले. सोबत फर्स्ट एड किट सुद्धा असते, कधी काही किरकोळ दुखापत झाली तर उपयोगी पडते.
रितेश तिच्यावर अजूनच फिदा झाला आणि तिला चिडवत म्हणाला ” बापरे, म्हणजे अकेली लडकी देख के मैने कुछ किया तो मैं पूरा कामसे गया मग तर…?”
दोघेही त्यावर हसले.
ती म्हणाली ” चल इथे काही अंतरावर एक धाबा आहे, मस्त मिसळ पाव खाऊन मग पुढे जाऊ.”
ओके मॅडम म्हणत रितेश अनघाच्या मागे निघाला.
अनघा सोबत असं मस्त निसर्ग सौंदर्य न्याहाळत फिरायला, वाइल्ड लाइफ फोटोग्राफी विषयी जाणून घ्यायला रितेश ला मजा येत होती.
रोज काही वेळ अनघा सोबत घालवायचं असं त्याचं दोन आठवडे रूटीन झालं होतं. तो दिवसेंदिवस अनघाच्या प्रेमात पडत होता. रितेश ला आता सुट्टी संपल्याने परत जावं लागणार होतं.
अनघा मात्र अजूनही त्याला एक मित्र मानत होती. तिचं सगळं लक्ष सध्या करीअर वर होतं.

अनघा आणि रितेशची मैत्री प्रेमात बदलेल का.. अनघा रितेश सोबत लग्नाला तयार होईल का हे जाणून घेऊया पुढच्या म्हणजेच अंतिम भागात.

क्रमशः

पुढचा भाग लवकरच….

हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा 

©अश्विनी कपाळे गोळे

लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही.

 

5 thoughts on “जुळून येती रेशीमगाठी (एक प्रेमकथा)- भाग २”

  1. Ujwala Ravindra Rahane

    खुप छान तिन्हीही भाग एकापाठोपाठ वाचून काढले. मस्त खुप चुलभुल मुलींच्या रेशीमगाठी जुळल्या छान!

Comments are closed.

Free Email Updates
We respect your privacy.