हरवलेले आईपण…( एक प्रेमकथा ) – भाग २

Love Stories

मागच्या भागात आपण पाहीले की अमन मैथिलीच्या घरी गेला हे ऐकून तिला काळजी वाटत होती की आई बाबा त्याला भूतकाळाविषयी काही सांगतील का. अशातच नकळत तिचा आणि अमन‌चा पाच वर्षांचा संसार तिच्या डोळ्यापुढे आला.
मैथिली आई वडीलांना एकुलती एक, दिसायला सुंदर, घरकामात तरबेज, शिकलेली सर्वगुणसंपन्न मुलगी. मैथिलीला नोकरी मिळाल्यापासून आई वडिलांसोबत पुण्यातच राहायची, वडील सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले. अमन आणि मैथिलीची भेट एका कंपनीच्या कॉन्फरन्स मध्ये झाली. दोघेही आपापल्या कंपनीला रिप्रेझेंट करायला आलेले. मैथिलीचे प्रेझेंटेशन, तिचं आकर्षक व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास बघून अमन तिच्या अगदी प्रेमात पडला. अशीच दोघांची ओळख झाली, हळूहळू मैत्री झाली.
अमन कॉलेजमध्ये असताना त्याचे वडील अपघातात गेले तेव्हा पासून घरी आई आणि अमन दोघेच. अमन हुशार, आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेला समजुतदार मुलगा.
मैथिलीची आणि अमनची चांगली मैत्री झाली.
त्याला मैथिली सोबत बोलायला, तिच्या सोबत वेळ घालवायला आवडू लागले. दोघांच्या भेटी गाठी सुरू झाल्या. अमन तिच्या प्रेमात पडला. एक दिवस तिला लग्नाची मागणी घातली. त्यावर काही उत्तर न देता ती म्हणाली ” अमन , मला तुझ्या सोबत आयुष्य घालवायला नक्कीच आवडेल पण त्यापूर्वी काही तरी तुला सांगायचे आहे..”
मैथिलीचं बोलणं मध्येच थांबवत अमन‌ म्हणाला “कम ऑन मैथिली, आता पण बिण काही नाही.. तुला मी आवडतो ना..तुला आवडेल ना माझ्यासोबत आयुष्य घालवायला..मग झालं..मी आजच आई सोबत बोलतो.‌‌.तुझ्या घरी आपल्या लग्ना बद्दल बोलून पुढे ठरवतो.. विश्वास आहे ना तुझा माझ्यावर..”
मैथिलीने त्यावर फक्त होकारार्थी मान हलविली.
अमनने आईला मैथिली विषयी सांगितले, आईला फोटो वरूनच ती खूप आवडली. दोघांनी मैथिलीच्या घरी लग्नाचा प्रस्ताव मांडला. आपल्या मुलीवर इतकं प्रेम करणारा मुलगा शिवाय सगळ्या गोष्टीं सुयोग्य असल्याने तिच्या आई वडिलांनी लग्नाला परवानगी दिली. लवकरच लग्नाची तारीख ठरवली.
मैथिलीला मात्र अमनला भूतकाळा बद्दल सगळं सांगायचं होतं, त्याला अंधारात ठेवून लग्न करायचं नव्हतं , त्याविषयी ती आई बाबांशी बोलली तेव्हा बाबांनी तिला खडसावले “भूतकाळ आता विसरून जा, त्याविषयी फक्त आपल्याला तिघांना माहीत आहे परत सगळ्या गोष्टींमुळे बदनामी नको.शिवाय सत्य परिस्थिती कळाल्यावर अमन लग्न करायला नाही म्हणाला तर.. त्याच्या सारखा मुलगा तुला शोधून सापडणार नाही.. भूतकाळात जे झाले तो एक अपघात होता पण त्यामुळे आता पुढचं आयुष्य त्या विचारात घालवू नकोस.”
आईला आणि मैथिलीला बाबांचं म्हणनं पटत नसतानाही त्या काही करू शकत नव्हत्या.
आता पुढील आयुष्य अमनसोबत आनंदात घालवायचं हा विचार करून मैथिली लग्नाला तयार झाली.
दोघांचे लग्न धुमधडाक्यात झाले, माहेरी सासरी मैथिलीचे खूप कौतुक झाले, या सगळ्यात ती भूतकाळात झालेल्या गोष्टी पूर्ण पणे विसरून गेली. सुरवातीचे दोन वर्ष आनंदात गेले. नंतर दोघांनाही बाळाचे वेध लागले. पण काही केल्या आनंदाची बातमी मिळत नव्हती, बर्‍याच टेस्ट केल्या, तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रयत्न केले पण काही फायदा होत नव्हता.
आता मात्र मैथिलीला भूतकाळातील गोष्टींचा त्रास व्हायचा, आपल्या चुकीमुळे अमनला आपण आनंदी करू शकत नाही हे तिला बोचत होते. सतत स्वत:ला दोशी ठरवत ती उदास राहू लागली. अमन तिला खूप समजावून सांगत होता पण तिला मात्र स्वतः आईपण हरवल्याची सल मनात बोचत होती.
अमनला आता खरं काय ते सांगून मोकळं व्हावं असं सारखं वाटत होतं पण बाबांची भिती शिवाय पुढे काय हा विचार करून ती इतके वर्ष स्तब्ध होती.
काही वेळाने अमन घरी आला. मैथिलीने घाबरतच त्याला विचारले “अमन‌ तू आई बाबांकडे गेला होता, काही काम होतं का…”
अमन हसतच म्हणाला “हो, एका मित्राचा फोन आला.. त्याला भेटायला गेलो..आई बाबा तिकडे जवळच राहतात ना म्हणून मग आई बाबांना तुझ्या बर्थडे पार्टीचे निमंत्रण द्यायला गेलो होतो, आई एकट्याच होत्या घरी. बाबा नाही भेटले.
पुढच्या आठवड्यात तुझा वाढदिवस आहे हे विसरली वाटतं माझी राणी..किती उदास असते तू हल्ली, सतत विचारात.. म्हणून म्हंटलं यावेळी बर्थडे ला छान प्लॅन करू.. आई बाबांना इकडे बोलावू..तुला फ्रेश वाटेल..पण हा त्याआधी मला एक दिवस जरा बाहेरगावी कामानिमित्त जावे लागेल.”
मैथिलीला ऐकून आश्चर्य वाटले..आनंदही झाला… अरे हा माझा वाढदिवस पुढच्या आठवड्यात..अमन किती लक्षात ठेवतो..किती प्रेम करतो माझ्यावर.. त्याला काही कळाले नाही हे बघून ती जरा शांत झाली पण भूतकाळाविषयी विचारचक्र मात्र सुरू होतेच.
काही महिन्यांपूर्वीच मैथिलीने तब्येतीमुळे म्हणून नोकरी सोडली होती. अमन कामानिमित्त बाहेर गावी गेला. घरी सासूबाई आणि मैथिली दोघीच होत्या. अमनने सासूबाईंना सांगीतल्या प्रमाणे त्या मैथिलीला वाढदिवसाचा नवीन ड्रेस घ्यायला बाहेर घेऊन गेल्या. दोघींनी छान शॉपिंग केली, काही वेळासाठी का होईना पण मैथिली आनंदात होती. ते पाहून सासूबाईंना समाधान वाटले.
घरी परत आल्या‌ त्याआधी अमन घरी तयार होता. खूप सारे गिफ्टस्, मिठाई, फुलांचा गुच्छ घेऊन तो आलेला. सगळं बघून मैथिली खूप खुश झाली. तिने पटकन अमनला मिठी मारली. त्यांचं प्रेम बघून सासुबाई मनोमन आणि गालातल्या गालात हसू लागल्या.
अमन मैथिलीला म्हणाला ” उद्या तुझ्या वाढदिवसानिमित्त मी एक मस्त सरप्राइज देणार आहे..ते बघून तू अजूनच आनंदी होशील.. कदाचित परत माझी राणी मला उदास दिसणार नाही..”
ते ऐकताच मैथिली दचकली. असं काय सरप्राइज आहे अमन… अडखळत बोलली..
ते तर उद्याच कळेल, अमन हसत म्हणाला.
रात्री काही केल्या मैथिलीला झोप लागत नव्हती. उद्या नक्की काही तरी विचित्र होणार आहे असं तिचं मन तिला सांगत होतं. अमन कडे बघून आनंद होत असला तरी एक धडधड तिला बेचैन करत होती.

अमनने मैथिली साठी काऊ सरप्राइज प्लॅन केला आहे..अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे ती परत कदाचित उदास राहणार नाही असं अमनला वाटते. या सगळ्याचा मैथिलीच्या भूतकाळाशी काही संबंध आहे का हे जाणून घेऊया पुढच्या भागात म्हणजेच अंतीम भागात.
तोपर्यंत stay tuned.

पुढचा भाग लवकरच…

कथा कशी वाटली हे नक्की कळवा.

अशाच नवनवीन गोष्टी, कथा वाचण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका ??

© अश्विनी कपाळे गोळे

लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.. नावासह शेअर करायला हरकत नाही..

Comments are closed