आई, बाळ आणि नोकरी

Parenting

सरकारी नियमानुसार ६ महीने maternity leave. ऐकुनच छान वाटले जेव्हा बाळ होणार म्हणून रजेवर जायची वेळ जवळ आली. एकूण परिस्थिती बघून अपेक्षित तारखेच्या तीन आठवडे आधी रजा सुरू झाली आणि मग उत्सुकता लागली बाळाच्या येण्याची. आपले बाळ कसे दिसत असेल, कधी त्रास होऊ लागला तर काय करायचे अशा प्रश्नांचा गोंधळ मनात सुरू झाला.

काही दिवसांतच एका गोंडस बाळाचे आगमन झाले. आई झाल्याचा आनंद, तो सुखद अनुभव शब्दात मांडता येणार नाही. बाळाच्या सहवासात दिवस कसे भराभर जात होते, रोज काहीतरी नवीन अनुभव. बाळाच्या झोपच्या वेळेनुसार आईची दिनचर्या ठरलेली. सहा महिन्यांची रजा संपत आली. बाळासाठी अजून एक महीनाभर रजा वाढवून मिळाली तेव्हा खूप छान वाटले. बघता बघता ती सहा महिन्यांची झाली.

सुट्टी कशी संपत होती कळत नव्हतं. निरागस, गोंडस , सुंदर चेहऱ्याला न्याहाळत दिवस कधी मावळतो कळत नव्हतं. हळूहळू नोकरीवर परत रूजू होण्याची वेळ जवळ येत होती, तसतशी मनात हुरहूर लागायला सुरु झाली. मी आॅफिसला गेल्यावर बाळ कसे राहणार. नोकरीत जरा ब्रेक घ्यावा का अशे अनेक विचार मनात गोंधळ उडवू लागले. नवर्‍याशी त्याबाबत चर्चाही केली. आपण नोकरी केली तर बाळाचे भविष्य उज्ज्वल बनविण्यासाठी मदतच होईल. शहरातील वाढता खर्च, महागडे शिक्षण यासाठी दोघांनीही नोकरी केली तर फायद्याचे आहे हा विचार करून आॅफिसला रुजू व्हायचे ठरवले. सासुबाई आणि मदतीला बाई घरी असल्यामुळे जरा निश्चिंत होते पण शेवटी आईचं मन. प्रत्येक नोकरी करणारी स्त्री या परीस्थितीतून जाते.

सुरवातीला आॅफिसमध्ये सतत कानात तिचे बोबडे बोल गुंजन करायचे , डोळ्यांपुढे तिचं हसणं, तो निरागस चेहरा, अवतीभवती सगळीकडे तिचं निरीक्षण सुरू असतानाचे तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव एक क्षणही दूर जात नव्हते.. या सगळ्यात कामात काही लक्ष लागत नव्हते. आईसाठी खरंच ही द्विधा मनस्थिती असते.त्यात घरी आपुलकीने बाळाची काळजी घेणारी व्यक्ती असेल तर जरा समाधान वाटते. शरीराने आॅफिसला असले तरी मन मात्र घरीच, बाळाच्या विचारात गुंतलेले. मग फोनमध्ये तिचे फोटो बघून चेहऱ्यावर एक स्मितहास्य, अधूनमधून फोनवर तिची विचारपूस.

सुरवातीला आॅफिसला फार काम नसल्याने लवकर घरी यायला मिळायचं. घरी आले की ती अगदी दिवसभर आई दिसत नसल्याने आईला एकही क्षणही आईला सोडत नाही. घरी आल्यावर बाळाची ती गोड मिठी, तिचं हसणं खूप काही सांगून जाते. 

प्रत्येक आईसाठी खरंच हा एक वेगळाच अनुभव असतो. 

अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed