शाळेच्या परिक्षेचा शेवटचा दिवस, उड्या मारत घरात पाऊल टाकताच स्कूल बॅग सोफ्यावर फेकून निधी आनंदाने आईला बिलगुन म्हणाली “आई, आज मस्त काही तरी बनव रात्री जेवायला. मला आता सुट्टी..आज आमची लास्ट डे पार्टी होती क्लास मध्ये.. आम्ही मस्त गेम्स खेळलो..टीचर सोबत फोटो काढले.. खूप खूप मज्जा आली..आता दोन महिने अभ्यास नाही..शाळा नाही.. मज्जाच मज्जा..????”.
आई मनात पुटपुटली “तुमची मज्जा..आमची सजा..?..बरं आता मस्त फ्रेश होऊन ये..आराम कर जरा वेळ..”
नेहमी फ्रेश हो म्हणत अर्धा तास जायचा, आज मात्र पाच मिनिटांत मॅडम कपडे बदलून फ्रेश होऊन तयार.
निधी- “आई, माझा व्हिडिओ गेम कुठे आहे गंं, तू म्हणाली होतीस परिक्षा संपली की काढू.”
आई – “अगं, आताच घरी आलीस, जरा खाऊन घे, आराम कर..दोन महिने आहेत खेळायला.”
निधी – ” नको आज आम्हाला शाळेत स्नॅक्स होता ना, भूक नाही.. झोप पण नाही आली..सांग ना कुठे आहे व्हिडिओ गेम.. “
आई – ” बाबा आल्यावर काढायला सांगते रात्री..आता नको..”
निधी – “असं काय करतेस गं, तूच म्हणाली होती परिक्षा संपली की काढू..बरं मग मी रिमा कडे जाऊ खेळायला..”
आई – ” अगं, सायंकाळी जा खेळायला..आता जरा आराम कर..”
निधी – ” काय गं आई ..हे नको ते नको.. सुट्टीची मजा घेऊ दे मला. “
नंतर निधी टिव्हीवर कार्टून बघत बसलेली…
आई – ” निधी जरा आवाज कमी करशील का टिव्ही चा..”
आईच्या डोक्यात विचार आला.. आजच सुट्टी सुरू झाली की इतका गोंधळ.. पुढचे दोन महिने काही खरं नाही..
रात्री बाबा घरी आल्यावर तर विचारायलाच नको..आई जेवायला आज हे बनव.. नाश्त्याला ते बनव.. सकाळी आईची ड्युटी स्विमींग ला घेऊन जाणे..नंतर घरकाम..बाहेर उन्हामुळे दिवसभर घरात टिव्हीचा, व्हिडिओ गेमचा आवाज..सोबत कुणी ना कुणी मित्र मैत्रिणी..मग निधीच्या खाण्या पिण्याच्या डिमांड.. एक मिनिट दुपारी आराम नाही..
पूर्ण घर डोक्यावर घेऊन निधी सुट्टीचा पुरेपूर आनंद घेत होती.
सायंकाळी पाच वाजले की एक सेकंद इकडे तिकडे न होऊ देता खेळायला बाहेर.. नंतर सात वाजले तरी घरात यायचं नावं नाही..
घरी आल्यावर फ्रेश होऊन जेवण झाले की बाबांसोबत मस्ती.. दोघांची बडबड..बाबा दिवसभर घरी नसतात मग आल्यावर काय करू नी काय नको…आई मात्र कधी एकदा जाऊन झोपते अशा विचारात..
निधी शाळेत गेली की आईला जरा स्वतः साठी वेळ मिळायचा.. घरातील काम आवरले जायचे..आता मात्र दिवसभर आईचे काम काही संपत नाहीत.. त्यात निधी मॅडम रात्री सुद्धा लवकर झोपायचे नावं घेत नाही..आई गोष्टी सांग ना..आताच काय झोपते..बाबा चला ना हे खेळू..ते खेळू..मग निधी आणि बाबांचा लुडो, बुद्धीबळ, सापसिडी तर कधी पेंटिंग असा काही ना काही कार्यक्रम उशीरा पर्यंत सुरू.. आईनेही झोपायचे नाही..?
बाबांनी मग काही दिवस सुट्टी घेतली आणि फिरायला जायचा बेत आखला, तर आठवडाभर आधी निधीची तयारी..आतुरता..तिथे गेल्यावर असं करायचं तसं करायचं.. प्लॅनिंग ची मोठीं यादी तयार आणि आईने ती यादी दररोज ऐकायची.
आई बिचारी मनात विचार करत बसायची , का शाळेला इतक्या सुट्ट्या देतात.. घरात किती पसारा झालाय.. मैत्रिणींना ही भेटले नाही मी इतक्यात..सगळा वेळ निधीच्या मागे.. निधीची परिक्षा संपली आणि माझी सुरू झाली..?
निधीच्या आई सारखी सगळ्या आयांची परिक्षा असते, मुलांची उडालेली झोप आणि अर्थातच आईची सुद्धा..दिवस भर घरात गोंधळ.. टिव्हीचा आवाज.. भावंडांची भांडणे.. अरे शांत बसा, भांडू नका अशी आईची कमेंटरी ..नोकरी करणारी आई असेल तर वेगळी काळजी..डे केअर अथवा मावशी जवळ सोडून जात असेल तर सुचनांची यादी.. आईने सुट्टी घ्यावी म्हणून मुलांची चिडचिड..खाण्या पिण्याच्या डिमांड..हा क्लास तो क्लास.. नेऊन सोडा.. घेऊन या.. रात्री उशिरापर्यंत मस्ती.. आणि बरंच काही.. बिचारी थकलेली आई?
© अश्विनी कपाळे गोळे
Comments are closed