आई होण्याचा नाजूक अनुभव…. गरोदरपणातील काळजी

Parenting

सकाळी लवकर उठून ती लगबगीने बाथरूम मधे गेली आणि किंचित गोंधळलेल्या अवस्थेत नवर्‍याला उठवत म्हणाली “तुम्हाला या किट वर किती लाईन्स दिसत आहे?”.तो : (अर्धवट झोपेत डोळे चोळत) एकच लाइन दिसते आहे. 

ती : (पुटपुटत) मला तर दुसरी अंधुक लाईन पण दिसते आहे.. तुम्ही बघा ना नीट.

तो : एक काम कर, ती किट ठेव जरा वेळ बाजूला आणि झोप. उठल्यावर बघू आपण परत. आता तरी मला एकच लाइन दिसते आहे.

एवढे बोलून त्याने तिला झोपवले आणि तो परत झोपी गेला. 

काही वेळाने तो उठला आणि बघतो तर ती अजूनही किट कडे कटाक्षाने बघत बसलेली.

त्याने तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि किट कडे बघितले तर त्याला सुद्धा दुसरी अंधुक लाईन दिसत होती.

त्याच क्षणी दोघांची नजरानजर झाली आणि दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. आनंदाची एक छटा त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागली. Gynaecologist कडे जाऊन गुड न्यूज ची खात्री करून घ्यायची असे ठरले. रविवार असल्याने दोघंही जरा निवांत होते. 

आता दोघांच्या मनात एक वेगळीच उत्सुकता लागली होती. त्याने लगेच Gynaec ची अपॉइंटमेंट घेतली.

ठरलेल्या वेळी हॉस्पिटलमध्ये जाऊन check up केला, डाॅक्टरांनी ती आई‌ होणार असल्याचे सांगितले आणि काही आवश्यक सुचना दिल्या. तो अतिशय लक्ष देऊन सगळं ऐकत होता, ती मात्र आनंदाच्या भरात दुसरीकडेच हरवली होती, चेहऱ्यावर एक स्मीत करत वेगळ्याच विश्वात रमली होती. 

ठिक आहे, Again Congratulations and take care या डॉक्टरांच्या वाक्याने ती हरवलेल्या विश्वातून बाहेर आली. 

दोघेही खूप आनंदात होते, घरी येतांच त्याने तिला हळूवारपणे मिठी मारली. त्या मिठीत तिला एक काळजी, होणार्‍या बाळाचे जबाबदार वडील अशा अनेक भावना जाणवल्या. 

आई जवळ आणि सासुबाई जवळ ही आनंदाची बातमी कधी एकदा शेअर करते असं तिला झालं. आईला बातमी सांगितली त्याच क्षणापासून आईची काळजी, काय करायचे काय नाही करायचे अशी सूचनांची यादी यायला सुरुवात झाली. आई आणि सासूबाई दोघिंनीही सांगितले की लगेच ही बातमी कुणाला सांगू नकोस. सुरवातीला तीन महिने गर्भ अगदी नाजूक अवस्थेत असतो, त्यामुळे पुर्णपणे विकास होईपर्यंत कुणाला सांगत नसतात. 

नंतर Bike वर जाणं बंद झाले आणि त्याऐवजी कार चा वापर सुरू झाला. शक्यतो bike ने कुठे जाणे या अवस्थेत टाळलेले बरे असते, गेले तरी दोन पाय दोन्ही कडे टाकून न बसता एका बाजूला बसून जावे. दररोज आॅफिसला नवर्‍यासोबत जाताना दोन पाय दोन्ही बाजूला टाकून बसून जाण्याने आणि धक्क्यांमुळे एका मैत्रिणीची गर्भपिशवी चौथ्या महिन्यांतच ओपन झालेली आणि पुढे बाळ होत पर्यंत मग complete bed rest. त्यामुळे सहसा ते टाळलेले बरे. 

आहारात आता फळं, शक्य ते पौष्टिक पदार्थ असे बदल झाले. सुरवातीला दोन महिने काही जाणवले नाही पण त्यानंतर मात्र भयंकर मळमळ, उलटी, थकवा यांनी घेरले. काही खाल्लं की उलटी होणार, कशाचाही वास नको नको वाटायचा. अन्न तर नकोच वाटायचे पण बाळाचा विचार करून जे खावं वाटले ते बिंदास खायचं असं ठरवलं. 

Papaya, pineapple आणि Chinese food सोडलं तर बाकी जे खावं वाटले ते बिंदास पण प्रमाणात खाल्ले. Papaya, pineapple आणि Chinese food या अवस्थेत खायला चालत नाही पण बाकी कशानेही काही अपाय नसतो याची खात्री पटली. अर्थात सगळे पोषक रस पोटात गेलेले चांगले असतात मग ते गोड, आंबट, कडू अशे कुठलेही असो.  

गरोदरपणाचा अनुभव प्रत्येकाचा वेगळा असतो, पण ही नैसर्गिक अवस्था असते, आजारपण नाही हे लक्षात घेऊन नीट काळजी घेणे आवश्यक असते. बाळाचा पूर्ण विकास आईच्या खाण्यापिण्यावर आणि तिच्या दिनचर्येवर अवलंबून असतो, त्यासाठी योग्य काळजी घेतली तर कधीही चांगले. हंगामी फळे, ताज्या पालेभाज्या, फळभाज्या, मोड आलेली कडधान्ये, भरपूर प्रमाणात पाणी पिणे खूप फायदेशीर ठरते. 

खूप कर्कश आवाज, जास्त हळव्या करणारे कार्यक्रम अशा गोष्टी टाळाव्यात. जितकं आनंदात राहता येईल तितके चांगले. योग्य आराम, व्यायाम, चांगले साहित्य वाचन केले की मन प्रसन्न राहते आणि त्यामुळे आरोग्य चांगले राहते, या अवस्थेत अशी दिनचर्या पाळली तर फायद्याचे ठरते.

तब्येत बरी नसली तरी आई होणार म्हणून एक वेगळीच उत्सुकता मनात, माझं बाळ कसं असेल, मुलगा असेल की मुलगी असेल. या सगळ्यात पाचवा महिना संपत आला तेव्हा मळमळ उलटी थकवा दूर झाल्यासारखा वाटला, तब्येतीत सुधारणा झाली, बाळाची हालचाल सुरू झाली. बाळाची पहिली हालचाल पोटात जाणवली तो क्षण तर शब्दात मांडता येणार नाही. हळूहळू बाहेर सगळ्यांना पोटाच्या वाढत्या आकारावरून गुड न्यूज असल्याचे जाणवायला लागले. 

या अवस्थेत सगळे किती काळजी घेतात, नवरा तर अगदी फुलाप्रमाणे जपतो, काय हवं नको ते अगदी समोर नाव काढताच हजर. 

जसजसा पोटाचा आकार वाढत गेला तशा बाथरूमच्या चकरा वाढल्या. नऊ महिने कसे भराभर गेले, सातव्या महिन्यात ओटीभरण्याचा कार्यक्रम झाला, छान फोटोशूट केले, अगदी आनंदात हे दिवस गेले. 

पाच ते सात महिन्यांच्या कालावधीत अगदी छान वाटत होते. आठवा महिना सुरू झाला आणि नंतर शरीर जड वाटायला लागले, पायावर जरा सुज यायला सुरुवात झाली ,जास्त वेळ बसून नको वाटायचे त्यामुळे मध्ये जरा चालायचे. या दिवसांत जितके जास्त चालायला जमेल तितकं चांगलं पण ते प्रत्येकाच्या तब्येतीवर अवलंबून आहे. झोपताना डाव्या कुशीवर झोपणे योग्य असते पण पोटाचा वाढलेला घेर सांभाळून झोपताना जरा त्रास हा होतोच. 

या पुर्ण अनुभवात जेव्हा सोनोग्राफी मध्ये बाळाला आपण बघतो तो क्षण किती गोड असतो. कधी एकदा बाळ बघायला मिळते असं वाटतं. 

सगळ्या गोष्टी अनुभवताना दिवस भराभर गेले, जसजसा बाळ होण्याची अपेक्षित तारीख जवळ येत होती तसतशी मनात हुरहूर, अनेक प्रश्न, एक भिती अशी गोंधळलेली अवस्था झाली होती. 

अचानक काही त्रास झाला आणि ट्राफीक मध्ये अडकले तर काय, कळा नक्की कशा येतात, बाळ होताना खूप त्रास होईल का, मला सहन होईल का अशा अनेक शंका मनात असतात पण मनाची तयारी, बाळाच्या आगमनाची उत्सुकता यामुळे आपण खूप strong होत जातो. 

बघता बघता वेळ आली बाळ होण्याची, २४ तास Labour Room मध्ये कळा , OT मधल्या वेदना सहन करून एक गोंडस परी आमच्या आयुष्यात आली. मनापासून वाटायचे मला मुलगी व्हावी, तिला बघून एका क्षणात सगळ्या वेदनांचा विसर पडला. दोघेही खूप खुप आनंदी झालो.

आई होण्याचा अनुभव खूप सुंदर आहे, प्रत्येकाची गरोदरपणातील अवस्था, अनुभव हा वेगळा असतो. त्यासाठी योग्य काळजी, आनंदी मन , संयम खूप आवश्यक आहे. 

– अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed