Breast Abscess- स्तनपान करताना येणारी मोठी समस्या- एक थरारक अनुभव

Parenting

    आई होणं हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभव आहे. नऊ महिने पोटात वाढवून बाळ जन्माला आले की बाळाला बघून सगळ्या गोष्टींचा विसर पडतो.स्तनपान म्हणजे आई आणि बाळ यांच्यातील अतुट नातं, आईच्या स्पर्शाने बाळाला एक प्रकारे सुरक्षित वाटत असते, आईची उब मिळाली की बाळाला शांत आणि सुरक्षित जाणिव होते.

अशा या सुंदर अनुभवात breast Abscess सारखी समस्या आली की तो अनुभव अतिशय painful असतो, आई आणि बाळ दोघांनाही या गोष्टीचा त्रास होतो. असाच एक painful अनुभव मी शेयर करते आहे.

बाळासोबत छान वेळ घालवताना भराभर दिवस जात होते. एक दिवस अचानक सकाळी उजव्या Breast मध्ये दुखायला लागले, अंगात ताप आलेला होता. गरगरल्या सारखे वाटत होते, मळमळ आणि उलटी सुद्धा सुरू होती. अचानक अशे काय झाले कळायला मार्ग नव्हता कारण बाळंतपण झाल्यामुळे घरीच, बाहेर जाणं, बाहेर खाणं सगळं बंद. माझी मुलगी तेव्हा फक्त चार महिन्यांची, मला क्षणभरही सोडून वेगळी कधी नव्हतीच.

वेळ न घालवता जवळच्या डॉक्टरांकडे गेले, त्यावेळी सासरी खेडेगावात खूप काही तज्ज्ञ डॉक्टर नव्हते आणि शहर अगदी दहा किलोमीटर अंतरावर असले तरी उन्हाळ्याच्या रखरखत्या उन्हात बाळाला सोडून अथवा घेऊन जाणं जरा कठीणच वाटले. गावातील डॉक्टरांकडे गेले, त्यांच्या म्हणण्यानुसार उन्हामुळे असं झालं आहे हे सांगून त्यांनी ताप कमी होण्यासाठी औषधे दिली आणि आराम करण्याचे सुचवले. Breast मध्ये दुखत होते त्यासाठी जरा शेक देऊन मालीश करायला सांगीतले. सांगितल्या प्रमाणे पाच दिवस औषध आणि बाकी काळजी घेतली पण त्यामुळे तात्पुरता आराम मिळाला. अचानक आहारात बदल झाला, जेवणाची इच्छा होत नव्हती पण बाळासाठी म्हणून जेवण सुरू होते. कदाचित ताप असल्यानं असं होतं आहे असे समजून आठवडा गेला आणि आम्ही आमच्या घरी पुण्यात आलो. प्रवासानंतर रात्री अंगात परत खूप ताप भरला, अशक्त वाटू लागले. स्तनातील वेदना वाढत होत्या, ताप आणि त्या वेदना यामुळे रात्र जागून काढली. सकाळी लगेच Gynaec कडे गेले, तपासणी केल्यानंतर कळाले की स्तनामध्ये इन्फेक्शन झाले आहे, त्यामुळे अंगात ताप आलेला आहे. त्यासाठी अॅंटीबायोटिक्स दिली आणि स्तनात गाठ जाणवत असल्याने स्तनाचे स्कॅनींग करायला सांगीतले. पुढचे पाच दिवस औषध घेत असताना वेदना कमी होत नव्हत्या त्यामुळे स्कॅनींग करायचे ठरले. 

स्कॅनींगमध्ये कळाले की स्तनामध्ये गाठ होऊन पस सुद्धा झालेला आहे. त्यामुळे स्तनावर लालसरपणा आला असून अंगात ताप आहे. स्कॅनींगचे रीपोर्ट ब्रेस्ट स्पेशालीस्टला दाखवताच तिने आॅपरेशन करून लवकरात लवकर पस काढण्याचा सल्ला दिला. दुसऱ्या दिवशी सकाळीच जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन आॅपरेशन करायचे ठरले. या सगळ्यात माझ्या सोबत बाळालाही त्रास सहन करावा लागत होता. माझ्या दुखण्यामुळे तिला लवकरच फाॅर्मुला मिल्क सारखे टॉप फिडींग सुरू करावे लागले.

वेळ न घालवता दुसऱ्या दिवशी सकाळी मी आॅपरेशन साठी हाॅस्पीटलला दाखल झाले. या सगळ्यात माझ्या मनात सतत विचार येत होता तो म्हणजे मला स्तनांचा कर्करोग तर झाला नसेल. मला काही झाले तर माझ्या बाळाचं कसं होणार. डॉक्टर समजूत काढत असली तरी मला मात्र अशा अनेक वाईट विचारांनी घेरले होते, पहील्यांदाच मी आणि माझं बाळ एकमेकींपासून वेगळे राहणार होतो. मी २४ तास हाॅस्पीटलला असताना माझ्या बाळाची काळजी मला जास्त त्रास देत होती. 

तिची सुद्धा वेगळी अवस्था नव्हती, सतत रडून मला माझी आई पाहिजे या भावनेने ती सगळीकडे मला शोधत होती.

ठरल्याप्रमाणे आॅपरेशन झाले, इन्फेक्शन परत होऊ नये म्हणून अशा केस मध्ये टाके देत नाही, त्यामुळे पाच ते सहा आठवडे जखम भरून येईपर्यंत ड्रेसिंग करावे लागणार होते. जखमेतला पस तपासणीसाठी पाठविण्यात आला, सुरवातीला जखम मोठी आणि खोल असल्याने दररोज ड्रेसिंग करताना तिव्र वेदना व्हायच्या. माझ्या साठी हा एक अतिशय वेदनादायी अनुभव होता.

या तीन आठवड्यात वजन अचानक पाच किलो कमी झाले. अशक्तपणा आला, बाळ माझ्यावर अवलंबून असल्याने स्वत: कडे मी आता नीट लक्ष देऊ लागली. पस तपासणीनंतर कळाले की स्तनामध्ये इन्फेक्शन जास्त प्रमाणात झाले त्यासाठी दहा दिवस दररोज दोन वेळा इंजेक्शन घ्यावे लागणार. पस रिपोर्ट वरून ब्रेस्ट अॅब्सेस आणि कॅन्सर यामध्ये फरक आहे, हे मला डॉक्टरांनी पटवून दिले तेव्हा मला खात्री पटली.

सतत हाॅस्पीटलच्या चकरा मारून वैताग आला होता पण अर्थातच काही पर्याय नव्हता.

 या सगळ्यात बाळाकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी शक्य ते प्रयत्न सुरू होते. हळूहळू जखम भरून येत होती, तब्येतीत सुधारणा होत गेली. या सगळ्यात माझ्या दुखण्यामुळे घरी सगळ्यांनाच मानसिक, शारीरिक त्रास होत होता. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन, औषधे न मिळाल्याने तसेच स्तनातील वेदनांकडे दुर्लक्ष झाल्याने माझ्यावर ही वेळ आली होती. 

स्तनात दूध साठू नये म्हणून काळजी घेणे किती आवश्यक आहे हे मला जाणवत होते. 

माझ्या अनुभवावरून मी नविन आई होणाऱ्या प्रत्येक स्त्रीला सांगू इच्छिते की स्तनामध्ये दुध साठवून राहणार नाही याची काळजी घ्या, काहीही त्रास झाला तर दूर्लक्ष न करता त्वरीत उपचार करून घ्या.

-अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed