प्रेमकथा

Love Stories

अर्णव रात्री ऑफीसमधून घरी येत होता. कामामुळे ऑफीसमध्ये उशीर झाल्याने बाहेर सगळीकडे शांतता पसरली होती. रस्त्यावर फारशी वर्दळ नसल्याने तो जरा वेगात गाडी चालवत घरी निघाला. अचानक कुणीतरी रस्ता ओलांडताना मधे आले, त्यानं कशीबशी गाडी थांबवली पण धक्क्याने ती व्यक्ती खाली पडली. तो घाबरला, गाडीबाहेर येऊन बघतो तर एक तरुणी बेशुद्ध पडली होती. मागुन येणारी एक गाडी सुद्धा मदतीला थांबली. त्यांच्या मदतीने तो तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. अर्णव खुप घाबरला होता. तो रात्री तिच्याजवळच थांबला. ती अजून शुद्धिवर आली नव्हती. ती दुसरी कुणी नसुन त्याची कॉलेज मधली मैत्रीण आभा होती. आभा दिसायला सुंदर, आकर्षक, हुशार, आत्मविश्वासी, बिंदास, श्रीमंत घरची एकुलती एक लाडकी, मोकळ्या मनाची. काॅलेजला दोघे सोबतच शिकायला होते. अर्णव गरीब घरातील साधा, शांत, मेहनती, लाजाळू स्वभावाचा मुलगा. त्याला आभा पहिल्या भेटीपासूनच खूप आवडायची.तो तिच्यावर खुप प्रेम करायचा पण कधी तिच्यावरचे प्रेम व्यक्त केले नव्हते. त्याला भीती होती की आभाला हे आवडले नाही तर दोघांची मैत्री संपेल शिवाय तो लाजाळू स्वभावाचा. कॉलेज संपल्यावर काही कारणाने दोघे फार काही संपर्कात नव्हते पण अजूनही तो तिला विसरला नव्हता. दोघांच्या अशा अपघाती भेटीमुळे तो हैराण झाला होता. रात्री इतक्या उशिरा ती कुठे निघाली‌ होती. तिला काय झाले असेल असा विचार करत तो तिच्या जवळ ती शुद्धीवर येण्याची वाट पाहत बसला होता. रात्र कशी गेली त्याला कळाले नाही.काही तासानंतर ती शुद्धिवर आली. समोर अर्णवला बघून तिला आश्चर्य वाटले. ती हाॅस्पीटलमधे कशी आली, काय झाले हे तिला काही आठवत नव्हते. त्याने तिला नंतर सगळं सांगतो असं म्हणतं धीर दिला आणि तिच्या घरी कळवावे म्हणुन घरचा फोन नंबर वगैरे विचारला. काही न बोलता ती फक्त रडू लागली. तिच्या चेहऱ्यावर एक निराशा, अस्वस्थता पसरली. त्याला काही कळेना. तितक्यात डॉक्टर तपासणी करायला आले. काही औषधे लिहून दिली, कशी घ्यायची ते समजून दिली. आता तीला घरी घेऊन जायला हरकत नाही असं सांगितलं. त्याने तिचा घरचा पत्ता विचारला, ती पुन्हा रडू लागली, माझं या जगात कुणीच नाही, मी कुठे जाणार मला माहित नाही. ते ऐकून त्याला काही समजत नव्हतं की काय झालं, आभा अशी का बोलत आहे. काहितरी वाईट झाल्याची जाणीव त्याला झाली. तीला आपल्या घरी घेऊन जायचे त्याने ठरवले, तसा प्रस्ताव तिने नाकारला. तो आई-वडीलांसोबत राहायचा, ती खूप साधी माणसं, गरीब परिस्थितीतून वर आलेलं कुटुंब. अर्णवच्या नोकरी मुळे आता सगळं छान झालेलं होतं. तिला घरी घेऊन जायला आई बाबांची हरकत नसावी हे त्याला माहीत होते. बराच वेळ तिची समजूत काढून तो तिला घेऊन घरी जायला निघाला. रात्री काय झाले ते वाटेतच त्यानं तिला सांगितले.

ती स्तब्ध होऊन फक्त ऐकत होती. 

त्याच्या मनात तिच्याविषयी अनेक प्रश्न गोंधळ घालत होते. ती जरा बरी झाली की मग विचारावं असे म्हणतं त्यानं स्वतःला धीर दिला. 

दोघे घरी आले, त्याने घडलेली हकीकत आई बाबांना सांगितली. ती सावरेपर्यंत आपण तिची काळजी घेऊ असं आईकडुन ऐकाल्यावर त्याला खूप समाधान वाटले. ती आधीची आभा राहिली नव्हती. तीला खुप मोठा धक्का बसला आहे याची जाणीव त्याला झाली होती. ती अबोलपणे एकटक कुठे बघत राहायची. अर्णव आणि त्याच्या घरचे तिची सगळी काळजी घेत होते. ती अजुनही सावरली नव्हती. अर्णवची तिच्याविषयीची काळजी, त्याचं प्रेम त्याच्या आईला जाणवत होतं. तिला हसवण्याचे, सावरण्याचे सगळे प्रयत्न तो करत होता. 

एका रात्री अचानक ती दचकून जागी झाली आणि रडू लागली. ते सगळे जागे झाले. ती खूप घाबरलेली होती. अर्णवच्या आईने तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि तिला जवळ घेतले. त्या प्रेमळ स्पर्शाने ती मोकळी झाली, तिला पाझर फुटला आणि ती घडलेली हकीकत सांगू लागली.

आभा नोकरीवर असताना तिच्या आई वडिलांसोबत काही दिवस सुटृीचा आनंद घ्यायला कोकणात जायला निघाले होते. काही दिवस आनंदात घालवून परत येताना भयंकर अपघात झाला, आभा कशीबशी वाचली पण तिचे आई-वडील जागेवरच गेले. त्यांच्या अशा जाण्याने ती खूप हादरली होती, पुर्णपणे एकटी झाली होती. जीवनातला आनंद एका क्षणात नियतीने हिरावून घेतला होता.

स्वतःला कसंबसं सावरून ती नोकरी करत होती. मित्र-मैत्रिणी मध्ये ती आता जास्त रमत नव्हती. 

अशा परिस्थितीत आॅफीसमधला एक मित्र तेजस, हा तिला आधार देत होता. कामात तिचं लक्ष लागत नव्हतं ,मनस्थिती ठिक नसल्याने कामात तिच्याकडुन झालेल्या चुका त्याने सांभाळून घेतल्या होत्या. तो तिला आधार देत असल्याने ती त्याच्याजवळ आपलं मन मोकळं करायची. त्याच्या सहवासात ती एकटेपण विसरून जायची. 

एक दिवस त्याने तिला लग्नासाठी मागणी घातली. त्याची झालेली मदत, काळजी अशी एकूण परिस्थिती पाहून ती लग्नाला तयार झाली. त्यांच्यामुळे आपण सावरलो या भावनेने ती त्याच्यात गुंतली, प्रेमात पडली. दोघांनी लग्न केले. ती आनंदात होती. सगळें छान चालले होते.

काही दिवसांनी तो काही कामानिमित्त बाहेर गेला, एक आठवड्यानंतर येणार‌ होता. पण तो गेल्यानंतर त्याचा फोन नाही, दहा दिवस झाले अजून तो आला नाही. ती घाबरली, बरेवाईट विचार तिच्या मनात येऊ लागले. 

काय करायचे तिला काही सुचत नव्हते. 

आॅफीसमधून माहिती काढली तेव्हा कळले की तो दोन आठवडे रजेवर गेला आहे. तो खोटं का बोलला‌ तिला कळत नव्हतं. 

आॅफीसच्या कामात तिचं लक्ष लागत नव्हतं. ती घरी गेली, त्याचं कपाट उघडून काही माहिती मिळेल या हेतूने कपाटात सगळं शोधू लागली. त्यात तिला एक फोटो सापडला. तो बघून पुन्हा ती हादरली. तो त्याच्या लग्नाचा फोटो होता, त्याचं आधीच लग्न झालेलं होतं. त्याने तिला फसवले होते. तिच्यासाठी हा जीवनातला दुसरा मोठा धक्का होता. 

त्याची रजा संपल्यावर तो परत आला. तीने त्याला जाब विचारला, ती त्याच्यावर भयंकर संतापली होती. आभाला सगळं कळलं असं त्याच्या लक्षात आलं, त्यानी सांगितलं, त्याचं आधीच लग्न झालेलं होतं, शिवाय त्याला तीन वर्षांचा एक मुलगा सुद्धा होता. आभाला खोटं सांगून तो त्यांना भेटायला गावी गेला होता. आभा सोबत त्याने फक्त तिच्या सौंदर्याकडे आकर्षित होऊन हव्यासापोटी लग्न केले होते, तिच्या परिस्थितीचा फायदा घेतला होता.

हे ऐकून ती हादरली, त्यांच्या लग्नाचा काही पुरावा नसल्याने ती काही करू शकत नव्हती. ती हतबल झाली होती. त्या रात्री ती स्वतःला संपवायला निघाली होती पण नियतीने तिची अर्णव सोबत गाठ घातली. हे सगळं ऐकून अर्णव आणि त्याच्या आई बाबाला धक्काच बसला.

अर्णवच्या आईने तिला धीर दिला, तिची समजूत काढली, तिला शांत केले. तू एकटी नाही, आम्ही तुझ्या सोबत आहोत, अर्णव धीर देत बोलला. 

अर्णवचं आजही आभावर तितकंच प्रेम होतं. त्याच्या आईलाही ते माहीत होतं. आभा हळूहळू सावरू लागली पण तीचा आत्मविश्वास खुप कमी झाला होता. कुणावरही तिचा विश्वास राहिलेला नव्हता.अशा परीस्थितीत अर्णवच्या कुटुंबाने तिला सावरले होते. त्यांची काळजी,प्रेम तिला जगण्याची नवी उमेद देत होते. अर्णवने अजूनही त्याच्या प्रेमाबद्दल तिला काही सांगितले नव्हते. 

काही दिवसांनी तो तिला बाहेर फिरायला घेऊन गेला आणि गिफ्ट म्हणून त्याने त्याची काॅलेजला असताना लिहिलेली डायरी दिली. घरी आल्यावर तीने ती डायरी वाचली, त्यात त्याने आभावरच्या प्रेमाबद्दल लिहिले होते.

तिच्या डोळ्यात अश्रू आले पण चेहऱ्यावर एक वेगळेच भाव होते. त्याचं तिच्यावर खुप प्रेम होतं आणि आहे हे तिला जाणवलं. अर्णवने केलेल्या मदतीत कुठलाच स्वार्थ नाही हे तिला कळाले होते. 

अर्णवला त्याचं खरं प्रेम आयुष्यात आल्यामुळे तो खूप आनंदी होता. आपल्यावर इतका जिवापाड , निरागस, निस्वार्थी भावनेने प्रेम करणारा अर्णव आयुष्यात आल्यामुळे ती सुखावली होती. तीने आयुष्यात खूप काही सहन केलं होतं पण नियतीने तिच्यावर जिवापाड प्रेम करणा-या अर्णवला तिच्या आयुष्यात आणले होते. अर्णवच्या प्रेमाने तिला जिंकलं होतं. 

Comments are closed