दिसतं तसं नसतं..

Love Stories

   रीमाच्या शेजारी एक नवविवाहित जोडपे राहायला आले. बिल्डिंग मध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेतील असे हे जोडपे अनघा आणि अनिकेत. अनघा अतीशय सुंदर, उंच सडपातळ बांधा, गोरा वर्ण ,नक्षिदार डोळे, छानसा तिला शोभेसा हेअरकट. अनिकेत सुद्धा एकदम रूबाबदार देखणा , अगदीच हॅंडसम.रीमा‌ एक गृहिणी, नवरा आणि दोन मुलांबरोबर आनंदात राहत होती. चांगली शिकलेली होती पण मुलांमुळे नोकरी करत नव्हती. अनघाचे राहणीमान, तिचं स्वतंत्र जीवन बघून रीमाला नेहमी अनघाचा हेवा वाटायचा. अनघा किती लकी आहे, तिचा नवरा तिला कसं छान नेहमी फिरायला घेऊन जातो. दोघांचे जीवन कसे राजा राणी सारखे आहे.

अनिकेत अनघाला नेहमी बाहेर घेऊन जात असे, सोबतच नेहमी बाहेर पडायचे आणि सोबतच घरी यायचे. शेजारी कुणाशी त्या दोघांची फार काही ओळख नव्हती. रीमाला खूप वेळा वाटायचं की अनघाची ओळख करून घ्यावी पण तसा योग आला नाही. रीमा सतत नवर्‍याला अनघा अनिकेतचं उदाहरण देऊ लागली. तुम्ही मला मुलांना वेळ देत नाही, बाहेर घेऊन जात नाही अशा कारणांवरून रीमा नवर्‍याशी भांडण करायची. 

एक दिवस अचानक सकाळी अनघाचा रडण्याचा आवाज येवू लागला. अनिकेत चिडून बोलत होता आणि अनघा जोरजोरात रडत होती. रीमाला जरा विचित्र वाटले, अचानक असे काय झाले असेल, अनघा का इतकी रडत असेल , आपण जाऊन बघावे का असा विचार रीमा करु लागली. उगाच त्यांच्या घरगुती भांडणात तू डोकावू नको असं बोलून रीमाच्या नवर्‍याने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण रीमा अस्वस्थ होती. नेहमी आदर्श वाटणारी अनघा आज काही तरी अडचणीत आहे अशी शंका रीमाला आली. 

नंतर बाहेरून कुलूप लावून अनिकेत बाहेर निघून गेला. रीमाला काही सुचत नव्हतं, आतून येणारा रडण्याचा आवाज अजूनही येत होता.

काही वेळ न राहवून रीमाने कि मेकरला बोलावून अनघाचे दार उघडले, आपण अशे दुसऱ्यांच्या घरात हस्तक्षेप करणे योग्य नाही हे कळत असूनही रीमा घरात गेली. 

रीमा आणि अनघाची फक्त येता जाता नजरानजर व्हायची तेवढीच ओळख होती पण रीमाला बघताच अनघाने तिला मिठी मारली आणि ती ढसाढसा रडू लागली. ताई मला अनिकेतच्या तावडीतून सोडव म्हणत विणवनी करू लागली.

अनघाला शांत करून काय झाले ते विचारले तेव्हा कळाले की अनघा कॉलेजला अनिकेतची ज्युनिअर, त्यांचा प्रेमविवाह झाला. दोघांच्या घरी लग्नाला विरोध असल्याने त्यांनी पळून जाऊन लग्न केले, त्यामुळे दोघांच्याही घरच्यांनी संबंध तोडले.

 अनिकेत एक बिझनेस करायचा, त्याच्या हुशारीमुळे बिझनेस चांगला सेट झालेला. अनघाचे सौंदर्य बघून अनिकेत तिच्या बाबतीत over possessive झाला, तिला दुसऱ्या कुणी पसंत केले तर अनघा मला सोडून तर जाणार नाही ना असा संशय तो घेऊ लागला, ती जास्त कुणाशी बोलली तर त्याला आवडत नसे, त्यामुळे आॅफिस आणि बाहेर सगळीकडे तो तिला घेऊन जायचा. त्याच्या मनाविरुद्ध काही अनघाने केलेले त्याला आवडत नसे म्हणूनच इच्छा असूनही ती कुणाशीही ओळख करून घेत नव्हती. अनिकेत शिवाय कुणी जवळचं नसल्याने ती तो म्हणेल ते ऐकायची. तिचं स्वातंत्र अनिकेतने हिरावून घेतला.

अाज सकाळी अनघा आई होणार हे तिला कळाले आणि आनंदात तिने अनिकेतला सांगितले, त्याला खूप आनंद होईल असे तिला अपेक्षित होते पण अनघा आई होणार हे ऐकून तो चिडला आणि म्हणाला आपण डॉक्टर कडे जाऊन abortion करून येऊ, इतक्या लवकर मुलं नको. अनघाला आश्चर्य वाटले, तिला मुल हवं असल्याने abortion करायला तिने नकार दिला. अनघा ऐकत नाही हे बघून त्याला खूप राग आला आणि त्याने तिच्यावर हात उचलला. नेहमी तो तिला धाकात ठेवायचा.आई झाली की एकटेपणा दूर होईल, आई होण्याचा सुंदर अनुभव अनुभवायला ती उत्सुक होती. अनिकेत मात्र अतिशय चिडलेला होता, त्याला अनघाचा हा निर्णय मान्य नव्हता. तिच्याशी भांडण करून तो घराला कुलूप लावून बाहेर निघून गेला होता.

अनघाने आता पर्यंत खूप काही सहन केले होते, मन मोकळं करायला तिला कुणी नव्हते पण आज रीमा जवळ व्यक्त झाल्याने अनघाला समाधान वाटले. रीमाने तिला शांत केले, तुला काहीही मदत करायला मी तयार आहे हे सांगितले शिवाय अनिकेतला समजून सांगण्याचा प्रयत्न करू असा धीर दिला. रीमाने अनघाची समजूत काढली, असं दडपणाखाली आयुष्य जगू नकोस, खंबीर हो, अन्याय सहन केला तर आयुष्यभर सुख मिळणार नाही. अनघालाही ते पटले. 

अनघाला शांत करून, खाऊ घालून ती झोपली तेव्हा रीमा तिच्या जवळ बसुन विचारांमध्ये गुंतली. 

वरवर बघून अनघाचा हेवा वाटणार्‍या रीमाला आपल्या नवर्‍याचा खूप अभिमान वाटला, त्याचा आपल्यावर किती विश्वास आहे, किती स्वातंत्र्‍यात आपण जगतो आहे, आपला नवरा किती समजूतदार आहे या गोष्टीचा विचार करून ती खरंच भाग्यवान आहे ही जाणीव तिला झाली. उगाच वरवर बघून आपण नवर्‍याशी भांडण केले याचे तिला वाईट वाटले. लगेच तिने नवर्‍याला sorry म्हणायला मेसेज केला.

 खरंच नेहमी जे आपल्याला दिसतं , ते तसंच असतं असं नाही. 

अश्विनी कपाळे गोळे

Tags:

Comments are closed