एक वाडा झपाटलेला ( भयकथा)

Horror stories

संपतराव पाटील म्हणजे गावातील प्रतिष्ठित माणूस, गावाच्या मधोमध भला मोठा वाडा, कामाला चोवीस तास गडी माणसं, इतक्या मोठ्या वाड्यात संपतराव, पत्नी सीमा, दहा वर्षांची मुलगी शालिनी , लहान भाऊ गणेश आणि खाटेवर आजारी संपतरावांची आई राहायचे. सोबतीला आई साहेबांच्या सेवेत कमला असायचीच.
गावात त्यांची शेती होती आणि गणेश शेतीच्या कामाचा हिशोब बघायचा, सीमा वाड्यावर काय हवं नको, गडी माणसांचा पगार असं सगळं गृहखाते बघायची.
आता संपतरावांना गणेशाच्या लग्नाचे वेध लागले होते, आपल्या कुटुंबाला शोभेल अशा घराण्यातील मुलीच्या ते शोधात होते. वाड्यावर जशी गणेशच्या लग्नाची चर्चा सुरू झाली तेव्हा पासून सगळ्यांना काही ना काही विचित्र जाणवत होते. एकदा रात्री सीमाला उशीरा पर्यंत झोप लागत नव्हती. तिला वाड्याच्या मधोमध असलेल्या अंगणात कुणाच्या तरी चालण्याचा आवाज आला, तिने खिडकीतून डोकावून पाहिले तर कुणीच दिसले नाही. परत जाऊन झोपली तर लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. वाड्यात तर लहान बाळ नाही मग हा आवाज कुणाचा. सीमा जरा घाबरली, तिने संपतरावांना‌ उठवले. संपतरावांनाही त्या बाळाच्या रडण्याचा आवाज आला. दोघांनी बाळूला हाक मारली, बाळू म्हणजेच वाड्याच्या अंगणात आउटहाऊस मध्ये राहणारा गडी. बाळू धावतच बाहेर आला, लाइट लावून सगळ्यांनी आजूबाजूला बघितले पण कुणीच नव्हते. नंतर सगळे जाऊन झोपले की परत बाळाच्या रडण्याचा आवाज आला. काही केल्या सीमाला झोप लागत नव्हती.
दुसऱ्या दिवशी सीमाच्या मनात सतत विचार येत होता की रात्री कुणाचा आवाज असेल, शिवाय कुणी तरी चालण्याचा भासही झाला होता. काय प्रकार आहे हा.. परत रात्री उशिरा जेवण झाल्यावर अंगणात फेरफटका मारताना सीमाला कुणी तरी आपल्या मागे उभं असल्याचा भास झाला. मागे वळून पाहिले तर कुणीच नव्हते, परत समोर वळताच एक केस मोकळे असलेला, कपाळावर मोठं लाल कुंकू, भले मोठे डोळे एकटक सीमा कडे बघत असलेला चेहरा दिसला. सीमा घाबरून ओरडली, चक्कर येऊन पडली.
सीमाच्या ओरडण्याने सगळे धावत बाहेर आले, काही वेळाने सीमा शुद्धीवर आली, घाबरलेल्या अवस्थेत तिच्या तोंडातून शब्द निघत नव्हता. कोण बाई होती ती, का अशी बघत होती अशा अनेक प्रश्नांनी सीमाला भंडावून सोडले. गणेशने डॉक्टरांना बोलावले, त्यांनी सीमाला आराम करायला सांगितला.
औषधी घेऊन सीमा झोपली. काही वेळाने झोपेतच तिला जाणवले की कुणी तरी अंगावरचे पांघरुण ओढत आहे, सीमाने झोपेतच पांघरूण परत अंगावर घेतले. पुन्हा कुणी तरी पांघरूण ओढायला लागले, सीमा आता घाबरली, घाबरतच डोळे उघडले तर परत तोच चेहरा दिसला आणि क्षणात अदृश्य झाला.. सीमाला घाम फुटला, तोंडातून शब्द निघत नव्हता, घाबरून ती इकडे तिकडे बघायला लागली. तितक्यात तिची मुलगी शालिनी तिथे आली, “आई, काय झालं तुला.. अशी का करते आहे..आई रात्री कोण होतं तुझ्या सोबत अंगणात..”
सीमा घाबरून शालिनी कडे बघत म्हणाली “म्हणजे तुलाही दिसली‌ ती…”
शालिनी म्हणाली, “मला अंधारात कोण आहे दिसत नव्हते पण तुझ्या सोबत एक बाई फिरताना दिसत होती.. कोण होती ती..”
सीमा आता‌ अजूनच घाबरली.. मनात विचार करू लागली..कुणी तरी आपला‌ पाठलाग करत आहे.. तेही साधंसुधं कुणी नाही..भूत पिशाच्च बाधा आहे हा… माझ्या कडून काय पाहिजे असेल..का दिसत असेल मला..
नंतर रोज रात्री अंगणात कुणाच्या तरी चालण्याचा भास.. लहान बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागले..कुणाला कधी आपल्या मागे कुणी उभे असल्याचे जाणवायचे तर कधी किंचाळी ऐकू यायची. काय होते आहे कळत नव्हतं.
संपतरावांनाही आता भिती वाटत होती, त्यांनी गणेशला‌ खोलीत बोलावले आणि वाडयात पूजा ,शांती करण्याचा विचार ऐकवला. उद्याच पंडीतजींना बोलावून पूजा करून घ्यायची असं ठरलं, तितक्यात जोरात वारा सुटला, वाड्याच्या दारं खिडक्या जोराजोरात वाजू लागल्या, एक भयंकर विकट हास्य ऐकू येवू लागले.. अचानक वातावरण बदलले.. शालिनी धावत येऊन आईच्या कुशीत शिरली.. तिकडे आजी ओरडायला लागली पण ती काय बोलते आहे कळत नव्हतं.. जणू कुणी आजीचा गळा‌ दाबत आहे असा आवाज येत होता.. सगळे पळत आजीच्या खोलीत गेले तर आजीच्या सेवेत असलेली कमला बेशुद्ध पडली होती आणि आजी गळा आवळल्या सारखा झाल्याने तडफडत होती… कुणालाही काही कळण्याच्या आत आजीने जीव सोडला..परत ते विचित्र हास्य ऐकू आले.. हळूहळू बंद झाले.. वाड्यातले सगळे जण झाल्या प्रकाराने घाबरून गेले होते आणि आजीच्या जाण्याने सगळे हादरले होते..
सकाळी आजीच्या जाण्याची बातमी भरभर गावात पसरली..पूर्ण गाव वाड्या बाहेर जमले.. अंत्य संस्कार आटोपले..कमला अजूनही धक्क्यातून सावराली नव्हती..न‌ राहावून तिने सीमाला सांगितले, “ताई, काल कुणी तरी मोकळे केस.. विचित्र हास्य असलेली बाई आजीच्या खोलीत आली होती..चेहरा काही दिसत नव्हता. काही केल्या बटन‌ दाबूनही लाइट लागत नव्हता..वारा‌ इतका‌ होता की दारा खिडक्यांच्या आवाजाने माझा आवाज तुमच्या पर्यंत पोहोचत नव्हता…मला जोरात काही तरी झटका बसला आणि मी खाली पडली..ती बाई आजी जवळ जाऊन सूड घेणार सूड घेणार म्हणत होती…तिनेच आजीला मारलं.. “
सीमाला काही सुचत नव्हते..काय प्रकार आहे हा..कुणाचा सूड..कशाचा बदला..कोण आहे ती बाई… सगळे विधी आटोपून घरी आल्यावर सीमाने आणि कमलाने संपतरावांच्या कानावर ही गोष्ट टाकली..ते ऐकताच संपतराव घाबरले.. गणेशला बोलावून दोघे काही तरी बोलायला लागले..
आता संध्याकाळ झाली की वाड्यात सगळ्यांना भिती वाटत होती…
परत रात्री अंगणात चालण्याचा आवाज.. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला.. मधेच ते भयानक हास्य ऐकू यायचे.. रात्रभर सगळे एका खोलीत बसून राहिले.. कुणालाही डोळा लागला नाही.. सकाळी गणेशने पंडित बोलावून वाड्याची शांती करायचे ठरवले..परत भर दिवसा तो सुसाट वारा सुटला.. वाड्याच्या खिडक्या उघड बंद होत आवाज करू लागल्या… सगळीकडे धूळ पसरली….
काही वेळाने वातावरण परत शांत झाले.. पंडितजींनी सगळा प्रकार अनूभवताच प्रश्न केला, “घरात कुणाच्या हाताने काही विपरीत घडले का.. कुणी तरी अदृश्य पणे वास करत आहे वाड्यात.. वाडा झपाटलेला आहे त्या शक्तीने..आज‌ रात्री पूजा करून शांती करू नाही तर सगळ्यांच्या जीवाला धोका आहे..”
त्यावर गणेश आणि संपतराव म्हणाले “काही विपरीत घडले नाही.. तुम्ही पूजेची तयारी करा..”
ठरल्याप्रमाणे रात्री पूजेची तयारी झाली..
एक‌ मोठा हवन‌ पेटविला गेला.. वाड्यात सगळीकडे एक सुरक्षा रेषा आखली गेली..सगळ्यांच्या हातात सुरक्षेसाठी एक एक मंतरलेला धागा बांधला गेला.. एकंदरीत सगळ्यांना भिती वाटत होती.. काही वेळ मंत्र,हवन करून आत्म्याला बोलावणे करणारे मंत्र पंडितजींनी म्हणायला सुरुवात केली, परत तो सुसाट वारा, दार खिडक्यांच्या आदळण्याचा आवाज आला..विकट हास्य ऐकू येऊ लागले..सूड घेणार..सोडणार नाही म्हणून एक किंचाळी ऐकू आली..त्या किंचाळी ने गणेश आणि संपतराव घाबरले.. एकमेकांकडे बघू लागले.. पंडितजी मंत्र म्हणत त्या आत्म्याला मुक्त करण्यासाठी प्रयत्न करू लागले..प्रश्न करत म्हणाले”कोण आहेस तू..कुणाचा सूड घेण्यासाठी आलीस इथे.. काय पाहिजे तुला.. “
परत एक विकट हास्य ऐकू आले.. गणेशला गळा आवळल्या सारखे वाटायला लागले..त्याने हातात पाहिजे तर सुरक्षा धागा सुटून बाजूला पडला होता..सोड मला सोड.. गणेश विनवण्या करू लागला.. पंडितजी त्या आत्म्याला वश करण्यासाठी प्रयत्न करत होते पण फायदा होत नव्हता.. तेव्हा पंडीतजी म्हणाले “गणेश काही पाप घडलं असेल तर कबूली दे, तुझा जीव धोक्यात आहे..”
संपतराव सुद्धा पार घाबरले.. गणेश कसाबसा गळा सोडवत म्हणाला, “कुसूम मला‌ माफ कर…मी पाप केलं आहे..जीव नको घेऊ माझा….”
ते ऐकताच सगळं वातावरण बदललं.. कोण ही कुसूम सगळ्यांना प्रश्न पडला..
पंडीतजींच्या सांगण्यावरून गणेश सगळं प्रायश्चित्त करत बोलू लागला.
कुसूम ही गावातील एक तरूणी, शेतात कामाला यायची, गणेश शेतीचे सगळे व्यवस्थापन बघायचा..एकदा‌ कुसूम ला पैशाची अडचण होती..तिची आई आजारी होती, तेव्हा तिने गणेश जवळ मागणी केली.. गणेशने तिला मदत केली.. नंतर काही कारण काढून तिला‌ शेतातल्या दोन खोल्यांच्या घरात बोलावून तिच्यावर जबरदस्ती केली.. परिस्थितीचा फायदा घेऊन तिच्यावर आपल्या शरीराची भूक भागवण्याचा प्रकार सुरू केला… तिला आईच्या उपचारासाठी पैसे द्यायचा…ती बिचारी गरीब घरची, बदनामीच्या भितीने गप्प राहिली..एक‌ दिवस संपतराव शेतावर आले, त्यांना हा प्रकार कळाला.. आधी गणेशकडे रागाने बघितले आणि नंतर त्यांनीही तिचा फायदा घेतला..ती झाल्या प्रकाराने हादरली, परत शेतात यायचं तिनं बंद केलं, तिच्या आईचं आजारपणामुळे निधन झालं, तेव्हा गणेश आणि संपतराव तिला भेटायला गेले तेव्हा कळाले की कुसूम गरोदर आहे.. कुसूम संपतरावांना‌ म्हणाली, “माझं गणेश सोबत लग्न लावून द्या, झालं गेलं विसरून मी नांदायला तयार आहे.. शिवाय माझ्या पोटात तुमच्या घराण्याचा अंश वाढत आहे..”
आम्ही यावर विचार करतो असं सांगून दोघे निघाले. कुसूम मुळे आपली बदनामी होणार तेव्हा तिचा काटा काढायचा असा बेत आखला. तिला शेतातल्या घरी बोलावले, ती‌ एका आशेवर त्या ठिकाणी आली. दोघांनी मात्र तिचा काटा‌ काढला, तिचा गळा आवळून खून केला, शेताजवळच एका ठिकाणी तिचा मृतदेह दफन केला. गावात अशी बदनामी झाली की आईचं निधन होताच कुसूम कुणातरी सोबत पळून गेली.. या गोष्टीला सहा महिने सुद्धा झाले नव्हते तोच इकडे वाड्यावर गणेशच्या लग्नाची गोष्ट सुरू झाली आणि कुसुमचा आत्मा बदला‌ घेण्यासाठी वाड्यात आला.. सत्य ऐकताच सीमाला मोठा धक्का बसला.. ती रडतच म्हणाली “कुसूम तुला न्याय मिळणार.. अपराध्यांना शिक्षा मिळेल..तू कुणाचा जीव घेऊ नकोस.. माझ्यावर विश्वास ठेव..”
सगळं वातावरण शांत झालं, सीमाने पोलीसांना बोलावले,‌ गणेश आणि संपतरावांना अटक झाली. कुसूमचा‌ दफन केलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि त्यावर विधी युक्त अंत्य संस्कार केले गेले.
गणेशला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तर संपतरावांना दहा वर्षांचा तुरुंगवास.
आता वाड्यात सीमा, शालिनी, कमला आणि गडी माणसं असायचे. सगळा व्यवहार सीमाच बघायची. आता कुणालाही काही भास होत नव्हता, त्या झपाटलेल्या वाड्यात वास करणार्‍या आत्म्याला शांती, मुक्ती मिळाली होती.

ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, कुठल्या गोष्टीशी काही संबंध वाटल्यास केवळ योगायोग समजावा ?
भयकथा लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न तेव्हा मत मांडायला विसरू नका ?

अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed