भूलभुलैया ( लघुकथा )

Horror stories

गौरी नेहमीप्रमाणे सकाळी उठून फिरायला निघाली. दररोज सकाळी सहा ते सात मॉर्निंग वॉक हे ठरलेलेच. सोसायटीच्या जवळ एक बाग होती,‌तिथे दहा राऊंड मारले की योगा‌ करून सात वाजता घरी परत असा हा मॉर्निंग वॉक चा कार्यक्रम असायचा. त्या दिवशी मात्र काही तरी वेगळंच घडलं. गौरी बाहेर पडली तेव्हा छान गार वारा सुटला होता, “अहाहा! किती रम्य वातावरण आहे.”?? असं मनात पुटपुटत ती बागेच्या दिशेने निघाली. सोसायटी आणि बागेच्या मधल्या रस्त्यावर दोन्ही बाजूला हिरवी झाडे, सकाळी फिरणार्‍यांची वर्दळ असायची.
आज सोसायटीच्या गेट बाहेर येताच गौरीला ते रम्य वातावरण जरा‌‌ भयानक झालेलं जाणवलं. ?झाडांवर पक्ष्यांची किलबिल नसून वादळ आल्यावर असतो तसा झाडांच्या फांद्या एकमेकांवर घासून निघणारा आवाज जाणवला. इतक्या अलगद वार्‍याने असा भयानक आवाज कसा याचं तिला आश्चर्य वाटलं पण दुर्लक्ष करून ती पुढे निघाली. एक किलोमीटर अंतरावर असलेली बाग आज जरा‌ जास्तच दूर आहे असं वाटायला लागलं, शिवाय रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. आज असं काय वाटतं आहे, किती भयाण शांतता पसरली आहे असं मनात विचार करत ती चालत होती.. कितीतरी दूर गेली तरी बाग‌ काही येत नव्हती. घड्याळात पाहिलं तर सहाच वाजलेले. असं कसं होऊ शकतं, मी सहा वाजता घरून निघाली आणि अर्धा तास तरी चालत आहे पण बाग कशी येत नाही, घड्याळ सुरू असूनही सहाच कशे वाजलेत. मोबाईल मध्ये वेळ बघितली तर त्यातही सहाच वाजलेले. आज कुणीच फिरायला कसं आलं नसेल. अशा विचारात ती चालत होती, जरा थकवा आला पण घाबरल्या मुळे थांबण्याची हिम्मत होत नव्हती. आता पुढे न जाता घरी परत जाऊया असा विचार करून ती मागे फिरली तर मागे वेगळंच चित्र. ती ज्या रस्त्याने आली तो हा रस्ता नव्हताच, एक कच्चा रस्ता ज्याच्या आजूबाजूला जीर्ण वृक्ष, अंधूक प्रकाश, शंभर मीटर पेक्षा पुढे दृष्टी जाणार नाही इतकाच प्रकाश, वार्‍याचा तो भयानक आवाज त्या भयाण शांततेचा भंग करत होती.
आता गौरी अजूनच घाबरली, काय करावं काही सुचत नव्हतं. घरी फोन करून नवर्‍याला‌ बोलावून घेऊ असा विचार करून फोन बघते तर फोन मध्ये नेटवर्क कव्हरेज नव्हतं. आता गौरीची धडधड वाढली, ती झाल्या प्रकाराने अक्षरशः रडकुंडीला आली. पुढे जावं की मागे तिला काही सुचत नव्हते.
दोन पावलं पुढे जायची परत मागे यायची. अजूनही घड्याळ बघितले तर सहाच वाजलेले होते. हा काय प्रकार आहे, कशी बाहेर पडणार मी आता‌ विचारात असतानाच नवर्‍याने तिला हलवून उठवले आणि म्हणाला, ” गौरी, सहा वाजलेत, फिरायला जायचं नसेल तर अलार्म तरी बंद कर. कधी पासून वाजतोय तो. “
गौरी दचकून उठली, घामाघूम झाली होती ती. उठल्यावर तिला जाणवलं की जे काही अनुभवलं ते एक भयानक स्वप्न होतं, बाजूला ठेवलेले घड्याळ बघितले तर सहा वाजले होते. अलार्म बंद करून मोबाईल बघितला, त्यातही सहाच वाजलेले होते. जे काही बघितले, स्वप्नात अनुभवले ते आठवून आज मात्र मॉर्निंग वॉक ला जायची गौरीची हिम्मत होत नव्हती.?

कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविकतेशी संबंध आढळल्यास केवळ योगायोग समजावा ? कथा वाचल्या बद्दल धन्यवाद ?

आपला अभिप्राय नक्की कळवा ?

© अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed