रहस्य त्या तीव्र वळणावरचे.. ( रहस्यकथा )

Horror stories

लग्नानंतर पहिल्यांदाच आम्ही पतीराजांच्या आजोळी गेलेलो.
राज्य महामार्गाला लागूनच वसलेले एक गाव, महामार्गाच्या आजूबाजूला शेती, जवळच वस्ती. आजोळी घरच्या शेतात मोठमोठ्या विहीरी, गर्द हिरवी आंब्याची झाडे, जवळच नविन झालेलं एक भलं मोठं धरण असा निसर्गरम्य परिसर. मोठ्या उत्सुकतेने आम्ही सगळे घरापासून दुचाकींवरून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात गेलो. लहानपणापासून राहणं, शिक्षण हे बर्‍यापैकी शहरी वातावरणात झाल्याने इतक्या वर्षांनी शेतात फिरायला जायचा मोठा उत्साह होता मनात. शेतात सगळीकडे मनसोक्त फिरून, रानमेवा गोळा करून परतीला निघालो. शेताच्या रस्त्यात महामार्गावर एक तीव्र वळण होते. परतीच्या वाटेवर वळणाच्या आधी अंदाजे पाचशे मीटरवर एका बाबांची ( पूर्वी त्या गावात असलेले एक साधू ) समाधी होती. परत येताना त्या समाधीचे दर्शन घेतल्याशिवाय परत यायचे नाही असं जातानाच घरून सांगितले गेले होते. काय बरं कारण असेल , असं आवर्जून सांगण्यामागे असा विचार मनात आलेला.
परत येताना सगळेच बाबांच्या समाधीवर थांबून दर्शन घेतले आणि पुढे घरी जायला‌ आम्ही निघालो. दर्शन घेतानाच मला घरच्यांकडून कळाले की जो कुणी या समाधीचे दर्शन न घेता पुढे जातो त्याचा हमखास वळणावर अपघात होतो. गावातील कित्येक लोकांनी त्या वळणावर जीव गमावला आहे. ऐकून जरा विचित्र वाटले,‌पण पुढे प्रत्येकाने एक एक किस्सा सांगायला सुरुवात केली. एक किस्सा असा की, एकाने दर्शन घेतले नाही आणि तसाच पुढे गेला तर भरदिवसा वळणाच्या जवळच माकडाने झाडावरून त्याच्या दुचाकीवर उडी टाकली आणि तो इसम जागेवरच ठार झाला. मागून येणाऱ्या एका ट्रकवाल्याने तो अपघात पाहिला आणि गावकऱ्यांना कळवले. पण माकडाचे उडी मारणे आणि त्या दुचाकीचे येणे हा एक वाईट योगायोग असू शकतो ना.. असं मनात आलं. असो..
गावात सगळ्यांना त्या वळणाचा एक धाक होता, त्या वळणावर मृत्यू झालेल्यांचे आत्मे भक्ष शोधतात पण बाबांचे दर्शन घेतले की बाबा त्या आत्म्यांपासून  संरक्षण करतात असा गावकऱ्यांचा विश्वास होता. 
त्या वळणाचे अनेक किस्से ऐकल्यावर एखाद्याला खरंच विश्र्वास बसेल असं सगळे सांगत होते. ऐकून भयानक वाटले आणि विचारचक्र सुरू झाले की काय रहस्य असेल त्या वळणाचे, बाबांच्या समाधीचे.??
घरी आल्यावर त्याच चर्चा सुरू होत्या तेव्हा कळाले की हे सगळे अपघात रात्रीच्या वेळी होतात (आत्मा रात्री भक्ष शोधतो), त्यामुळे सहसा रात्री त्या वळणावरून यायला गावकरी घाबरतात, शक्यतो टाळतात. माकडाच्या त्या अपघातानंतर तर बाबांचे दर्शन घेतल्याशिवाय येतच नाही.चुकून पुढे आले तरी मागे जाऊन दर्शन घेऊन परत जातात. हे सगळं ऐकून खूप आश्चर्य वाटले, काय प्रकार असेल हा, काय रे रहस्य असेल हे विचारचक्र सुरू. ??
काही दिवसांनी गावावरून आम्ही परत आलो तेव्हा पतीराजांना त्या वळणाच्या रहस्याविषयी विचारले तेव्हा कळाले, तो महामार्ग असल्याने गाड्यांची वर्दळ सतत असतेच शिवाय भरधाव वेगाने गाड्या जातात. बरंच अंतर सरळ रस्ता असताना मध्येच अचानक हे वळण लागतं तेव्हा बर्‍याच वाहकांना वळणाचा अंदाज येत नसावा.  महामार्गावर रात्री काळाकुट्ट अंधार, त्यात ते तीव्र वळण त्यामुळे भरधाव वेगाने येताना वळणाचा अंदाज आला नाही की रात्री बरेच अपघात त्याठिकाणी होतं आले आहेत. योगायोगाने वळणाच्या आधी पाचशे मीटरवर  बाबांची समाधी, मग समाधीवर थांबून पुढे निघालं की सुरवातीला गाडीचा वेग जरा कमी असतो आणि ते तीव्र वळण सावधपणे पार केलं जातं. हे वास्तविक कारण आहे पण गावकऱ्यांनी या बाबांच्या समाधीचं आणि वळणाचं एक रहस्य निर्माण करून अफवा‌ पसरविल्या. अफवांमुळे का होईना पण ज्यांना माहीत आहे ते वाहक समाधीवर थांबून पुढे निघतात आणि परत निघताच सुरवातीला गाडीचा वेग कमी असल्याने अपघात टळतात.
वैज्ञानिक रित्या विचार केला तेव्हा त्या वळणाचे रहस्य उमगले.

जुन्या अनेक अंधश्रद्धा लोकं अजूनही पाळतात, पण प्रत्येक अंधश्रद्धेच्या मागे एक वैज्ञानिक कारण हे असतेच. असंच हे वळणाचे रहस्य आहे.

तुमच्या माहितीत अशे रहस्य असलेले किस्से असतील तर नक्कीच कमेंट मध्ये शेअर करा.

© अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed