प्यार हुआ चुपके से ( प्रेमकथा) – भाग ३

Love Stories

दादाला संपदाची अवस्था बघवत नव्हती. लवकरच काही तरी करायला पाहिजे असा विचार करून अजितला भेटायचं दादाने ठरवलं. संपदाला याविषयी काही कळायला नको म्हणून पुरेपूर काळजी घेतली. तिच्या आई बाबांना वाटलं परिक्षा जवळ आली म्हणून अभ्यासाच्या काळजीने संपदा गप्प गप्प असेल, पण इकडे तिच्या मनात बराच गोंधळ उडाला होता. आता पुढे.

दादाने अजितचा फोटो नंबर मिळवून त्याला कॉल केला आणि भेटण्यासाठी एका ठिकाणी बोलावले, हेही सांगितले की याविषयी संपदाला काही कळायला नको. दादाच्या फोन नंतर अजित जरा घाबरलेला, त्याला बर्‍याच शंका मनात येऊ लागल्या, दादाला आमचं प्रेम प्रकरण माहीत झालं असेल आणि चिडून मला दम द्यायला तर बोलावलं नसेल ना, माझं सैराट मधल्या प्रिंस दादा सारखा तर वागणार नाही ना संपदाचा दादा अशे अनेक बरेवाईट विचार अजितला हैराण करू लागले. संपदाची परिक्षा संपेपर्यंत तिला त्रास द्यायला नको, डिस्टर्ब करायला नको म्हणून तिच्याशी मोजकेच बोलणे सुरू होते.
जे होईल ते होईल पण आता दादाला भेटायचं, त्यांना संपदाचा हात लग्नासाठी मागायचा असं ठरवून ठरल्याप्रमाणे अजित दादाला भेटायला गेला.
एका छोट्याशा हॉटेल मध्ये दोघे भेटणार होते, अजित पोहोचला आणि दादाला कॉल केला तर तो आधीच पोहोचला होता, एका टेबलावर अजितची वाट बघत होता. अजित जरा संकोचाने जवळ गेला, भेटला आणि दोघांनी मस्त चहा कॉफी मागवली. दादाने अजितचा गोंधळ ओळखला, त्याला शांत करत म्हणाला, ” अरे , तू इतका संकोचाने बोलू नकोस, मी सहज भेटायला आलो आहे. काळजी करू नकोस, मला तुझ्यावर राग वगैरे नाही. आता माझ्या बहिणीची आवड कशी आहे, मलाही कळायला नको का..? तू हवं तर एक मित्र म्हणून बोल माझ्याशी..”
दादाच्या बोलण्याने अजितला जरा धीर आला.. पुढे अजित विषयी जाणून घेण्यासाठी दादाने गप्पा सुरू केल्या. अजितच्या प्रत्येक वाक्यात संपदा विषयीचं प्रेम दादाला जाणवतं होतं. आपल्या बहिणीची निवड योग्य आहे याची दादाला खात्री होत होती. दादाने अजितला विचारले, “तुझे आई बाबा संपदाला स्विकारतील का, जर त्यांना मान्य नसेल तर काय..”
अजित त्यावर म्हणाला, ” माझ्या आईवडिलांना मी एकुलता एक, माझं मन आतापर्यंत त्यांनी खूप जपलं, माझ्या आवडीनुसार शिक्षण, नोकरी, इतर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले तेव्हा या लग्नाला नकार देतील असं वाटत नाही मला, आणि संपदा इतकी गुणी मुलगी आहे, गोड स्वभाव, निरागस आहे ती, तिला भेटल्यावर माझे आई बाबा नाही म्हणतील असं वाटतं नाही मला..तरी जर ते तयार नसतीलच तर मी खरंच पूर्ण प्रयत्न करेन त्यांची समजूत काढण्याचा.. काही झालं तरी संपदा शिवाय आयुष्य मी नाही जगू शकत दादा.. आमचं लग्न नाही झालं तर तिच्या जागी मी कुणाचाही आयुष्यभर स्विकार करणार नाही..लग्नच करणार नाही..”
दादाला अजितचे बोलणे फिल्मी वाटत असले तरी त्यामागच्या भावना मात्र खर्‍या आहे हे जाणवले. लवकरच संपदाची परीक्षा संपली की आमच्या घरी मी तुम्हा दोघांच्या लग्नाविषयी बोलतो असं दादाने म्हणताच अजित आनंदी झाला. मीही आई बाबांना याविषयी कल्पना देतो आणि पुढे घरच्यांना भेटायचं ठरवूया असंही अजितने सांगितलं. सगळं सूरळीत होत पर्यंत या विषयी संपदाला कळायला नको असं दादाने अजितला सांगितले.

दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला, अजितला आता एक आशेचा किरण दिसला. काही दिवसांतच अजितने घरी संपदा विषयी सांगितले, आई बाबांना अजितच्या वागण्यातून संशय आला होता पण तो स्वतः हून सांगेपर्यंत काही विचारायचे नाही असं त्यांचं ठरलं होतं. आई बाबांनी संपदा विषयी सगळी चौकशी केली, फोटो बघितला. संपदाच्या घरच्यांनी पुढाकार घेतला तर आमची काही हरकत नाही हेही सांगितले. ते ऐकताच अजितचा आनंद गगनात मावेनासा झाला. आई बाबा इतक्या सहज तयार झाले म्हणताच अजितला सुखद धक्का बसला. आता प्रश्न होता संपदाच्या घरच्यांचा, त्यांनी पुढाकार घेतला तर संपदा कायमची माझी होणार म्हणून अजित नकळत अनेक स्वप्न रंगवायला लागला.
इकडे दादाने आईला याविषयी कल्पना दिली पण असं प्रेमविवाह आपल्या कुटुंबात कुणाचाच नाही रे.. नातलग काय म्हणतील म्हणत आईने विषयाला वेगळं वळण दिलं. बाबांना हे मान्य होणार नाही, प्रेमविवाह तोही आंतरजातीय..नको आपण बाबांना नको सांगायला..उगाच चिडतील ते..संपदा समजदार आहे.. समजून सांगू आपण तिला असं म्हणत आईने अप्रत्यक्षपणे या लग्नाला नकार दिला.
दादा आईला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता, ” आई, अगं अजितला भेटलो मी, चांगला मुलगा आहे तो.. शिवाय संपदावर खूप प्रेम आहे त्याच..सुखात राहील आपली चिऊ.. बाबांशी बोलून तर बघू.. आंतरजातीय विवाह म्हणजे काही गुन्हा नाही.. संपदाला कुणीही पसंत करेन पण ती त्याचा मनापासून स्विकार करेल असं वाटत नाही मला..आई बाबांना दुखवायचे नाही म्हणून तडजोड करत लग्न करेन ती पण प्रेम करेलच असं नाही..अजितला विसरणे कठीण जाईल तिला.. इतक्यात तू बघितले असशील कशी गप्प गप्प असते ती..अजित विषयी घरी कसं सांगायचं याच विचाराने हैराण झाली आहे ती.. शेवटी तिचं सुख महत्वाचं..आपण सगळी चौकशी करून अजितच्या घरच्यांना भेटून सगळ्यांना मान्य असेल तर दोघांचा विचार करून लग्न लावून द्यायला काय हरकत आहे. नातलग बोलतील ते किती दिवस.. जातीतल्या मुलाशी लग्न केले तरी काही ना काही उणीव काढून सुद्धा बोलतातच.. इतरांच्या बोलण्याचा विचार बाजूला ठेवून एकदा संपदाचा विचार कर आई..तू हो म्हणालीस तर बाबांशी बोलू आपण..”
दादाचं बोलणं संपते तितक्यात बाबांचा मागून आवाज आला, “माझी मुलं इतकी मोठी झाली कळालेच नाही रे मला..मी तुम्हा दोघांचं सगळं बोलणं ऐकलं..माझी मुलं चुकीच्या मार्गाने जाणार नाही याची खात्री होती मला..संपदा असं अचानक कुणाच्या प्रेमात पडेल असं वाटलं नव्हतं, मी अजूनही लहानच समजत आलो तुम्हा दोघांना..तू आईला जसं समजून सांगितलं त्यावरून बहिणींचं आयुष्य सुखी करण्यासाठीची तुझी धडपड, तिच्या विषयीचं प्रेम बघून मला खरंच अभिमान वाटला आज तुझा..” बाबांचं बोलणं ऐकून दादा बाबांच्या मिठीत शिरला..बाबा तुम्ही परवानगी द्याल ना संपदा अजितच्या लग्नाला..
संपदा आपल्याला हट्ट करून लग्न लावून द्या असं कधीच म्हणणार नाही..पण मला तिची घालमेल कळत होती बाबा.. म्हणून मी अजितला भेटलो.. नकार द्यावा असा नाहीच तो..घरी बोलणार आहे तो संपदा विषयी..बाबा आता सगळं तुमच्यावर अवलंबून आहे..
बाबा यावर जास्त काही बोलले नाही..संपदा ची परीक्षा संपली की बघू..अजितच्या घरी तयार असतील तर आपण विचार करू म्हणाले.
काही वेळाने अजितचा दादाला फोन आला, त्यांचे आई बाबा लग्नाला तयार आहे हे मोठ्या आनंदाने त्याने सांगितले. आता सगळे वाट बघत होते संपदा ची परीक्षा संपण्याची. अजितच्या घरी काही अडचण नाही हे दादाने बाबांच्या कानावर टाकले.
शेवटचा पेपर संपल्यावर संपदा घरी आली, पुढे अकाऊंटींग मध्ये करीयर करण्याविषयीची इच्छा बाबांना तिने बोलून दाखवली. आमचा तुला पूर्ण पाठिंबा आहे असं बाबांनी म्हंटल्यावर तिला हायसे वाटले.
बाबांनी संपदा जवळ अजितचा विषय काढला, तिला ऐकताच धक्का बसला, बाबांच्या मिठीत शिरून ती रडकुंडीला आली.. काय बोलावे तिला काही कळेना.. बाबांनी तिला विचारले, “अजित सोबत लग्न करण्याविषयी काय मत आहे तुझं..”
“बाबा, तुम्हाला कसं कळलं.. म्हणजे मी सांगणार होतेच पण…..बाबा तुम्ही रागावले का माझ्यावर….” असं तुटक तुटक बोलत संपदा गोंधळली..
दादा‌ आणि आई तिथे होतेच..बाबा हसून म्हणाले, ” अगं, रागवत नाही आहे.. विचारतोय मी तुला.. लगेच लग्न करायचं नाही म्हणत पण तुझ्या मनात काय आहे ते जाणून घ्यायचं आहे आम्हाला..”
संपदा स्वतःला सावरत कसंबसं बोलून गेली,” बाबा‌, अजित आणि माझं एकमेकांवर प्रेम आहे.. त्याने लग्नासाठी मागणी घातली होती पण तुम्ही तयार असाल तरच हो म्हणेल मी असंच सांगितलं मी त्याला..मला तुम्हाला दुखवायचं नाही बाबा..”
बाबा म्हणाले, “तुला पुढे तुझं करिअर करायचं आहे.. स्वतः च्या पायावर उभं राहायचं आहे.. पुढे कधी चुकून वाईट प्रसंग आलाच तर स्वावलंबी असणं गरजेचं आहे.. लग्नाचं म्हणशील तर मी अजितच्या घरच्यांना भेटायला तयार आहे..”
बाबांचं म्हणनं ऐकताच सगळ्यांना आनंद झाला..
दादाने अजित विषयी घरी कसं कळाल याची पूर्ण गोष्ट संपदाला सांगितली..
अजित आणि दादा यांनी दोन्ही कुटुंबे एकत्र भेटण्याचा कार्यक्रम ठरविला.. एकंदरीत परिस्थिती पाहता दोघांच्याही घरी सगळे त्यांच्या लग्नाला तयार झाले..संपदाला शिक्षण, करिअर याबाबतीत आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे अजितच्या घरच्यांनी बोलून दाखवले.
आपण सगळं स्वप्न तर बघत नाही ना‌ असा भास अजित आणि संपदाला होत होता.
इतक्या सहजपणे सगळं जुळून येणं म्हणजे नशिबच असं दोघांनाही वाटत होतं.
दादा नसता तर आपण कधीच बाबांशी या विषयावर बोलू शकलो नसतो असं संपदाच्या मनात आलं, दादामुळे अजित आयुष्यभरासाठी आपला होणार, दादाचे आभार मानावे की काय करावं संपदाला सुचत नव्हतं.. दाराकडे पाहून त्याच्या मिठीत शिरून तिचे आनंदाश्रु भराभर वाहू लागले..त्यावर तिला दादा भाऊक होत म्हणाला, “अगं वेडाबाई, आज लग्नाची बोलणी आहे.. सासरी जायला वेळ आहे अजून..आता पासून रडते की काय..सांगू का अजितला..संपदाला नाही यायचं तुझ्या घरी म्हणून..??”
दादाच्या बोलण्याने रडतच हसू आलं तिला..अजितने ही दादाला मिठी मारत मनापासून आभार मानले..दादा माझ्या आयुष्यात इतका सुंदर दिवस तुमच्यामुळे आला असं म्हणताना अजितचे डोळे आनंदाने पाणावले होते..

अशा प्रकारे दोघांच्या प्रेमकथेचा गोड शेवट आणि संसाराकडे सुंदर वाटचाल सुरू झाली..

ही कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा ??

नावासह शेअर करायला हरकत नाही ?

© अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed