रीमा आई वडीलांना एकुलती एक मुलगी, गव्हाळ वर्ण असलेली पण नाकी डोळी नीटस, उंच बांधा, आकर्षक शरीरयष्टी, काळेभोर लांबसडक केस, जरा मेकअप केला की एखाद्या अभिनेत्रीला मागे टाकेल असं तिचं सौंदर्य. पण या सौंदर्यावर ‘कोड’ पसरलं आणि परिस्थिती बदलली.
रीमा लहानपणापासून नृत्य कलेत तरबेज. जणू नृत्य आणि मॉडेलिंग तिला जन्मताच मिळालेली देणगी. कुठलाही क्लास न लावताच टिव्हीवर बघून, इंटरनेटवर बघून ती स्वतः नृत्य शिकली. भरतनाट्यम असो वा हिपहॉप , तिला कुणीही मागे टाकू शकत नव्हते. त्यामुळे लहानपणापासूनच अनेक कार्यक्रमांमध्ये तिला बक्षिस मिळाले. वयाच्या अगदी पाचव्या वर्षी ती टिव्हीवर एका डान्स शो मध्ये झळकली. शाळेत इयत्ता तिसरीत असताना तिच्या पोटावर एक डाग दिसायला लागला. डॉक्टरांना दाखवल्यानंतर कळाले की तो एक त्वचारोग आहे ‘कोड’ म्हणून ओळखला जाणारा. ते ऐकताच रीमाच्या आई बाबांना काळजी वाटली. शरीरावर इतरत्र कुठेही ते पसरायला नको म्हणून विविध शहरांमध्ये तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू झाले. पण ते कोड मात्र आता चेहऱ्यावर सुद्धा दिसायला लागले. रिमाचे मैदानी खेळ बंद झाले कारण सूर्यकिरणांमुळे पुन्हा त्याची ‘रिअॅक्शन’ यायची.
शाळेतही रिमाला मित्र मैत्रिणी सोबत खेळायला घेत नसे. तिच्या आजूबाजूला बसायला टाळत असे, त्यामुळे तिचा आत्मविश्वास कमी होऊ नये म्हणून सतत शाळा बदलायला लागत होती. नातेवाईक सुद्धा घरी यायला टाळायचे, रीमाला आई बाबांना कार्यक्रमात बोलवायला टाळायचे, त्यांना वाटायचं रिमामुळे अख्ख्या खानदानाला लोकं नाकबोट लावतील, आमच्या मुला मुलींच्या लग्नासाठी अडचणी येतील. आई बाबांनी मात्र या गोष्टींची पर्वा केली नाही उलट रिमाला खूप हिम्मत दिली, नृत्य कला मागे पडायला नको म्हणून बाबा अनेक स्पर्धांमध्ये तिचे नाव नोंदवायचे, तिला नृत्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. कोड शरीरावर सर्वत्र पसरले नसले तरी चेहऱ्यावर, पोटावर असलेले कोडाचे डाग मात्र जायला मार्ग मिळत नव्हता.
असाच शाळा बदलत बदलत शाळेचा प्रवास संपला आणि कॉलेज सुरू झाले. कॉलेजमध्ये परिस्थिती वेगळी नव्हती. तिचं सौंदर्य अप्रतिम असलं तरी कोड असल्याने तिला बर्याच गोष्टी पाहून वंचित ठेवले जायचे. सहसा कुणी मैत्री करायला टाळायचे, तिला आता ह्या गोष्टींची सवय झाली होती.
रीमा हार मानणारी नव्हती , तिने गॅदरींग मध्ये आपल्या नृत्याविष्काराने, मॉडेलिंग मधल्या अदा , कौशल्य यामुळे अख्या कॉलेजमध्ये वाहवा मिळवली. हळूहळू तिचा मित्र परिवार वाढला.
मॉडेलिंग हे रिमाचे लहानपणापासून स्वप्न होते, पण मॉडेलिंग क्षेत्रात सौंदर्य अतिशय महत्त्वाचा घटक आहे तेव्हा आपल्या चेह-यावर असलेल्या कोड मुळे आता आपलं स्वप्न हे स्वप्नच राहिल असं तिला वाटत होतं.
तिचे कौशल्य बघून आई बाबा तिला नेहमी प्रोत्साहन देत असे. मॉडेलिंग क्षेत्रात सुद्धा आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, तू प्रयत्न करणे सोडू नकोस असं नेहमीच तिला सांगत असे.
तिने फॅशन शोमध्ये मॉडेलिंग साठी लागणारे फोटो शूट करून घेतले, अनेक फॅशन डिझायनर ला तिचे फोटो पाठवले. कुणा कडूनही काही प्रतिसाद येत नव्हता. रीमा जरा उदास झाली पण हिम्मत हारली नाही, प्रयत्न करत राहीली. काही महिन्यांनी तिला एका फॅशन शो साठी ऑडीशनला बोलावले गेले, तिची परफेक्ट फिगर, मॉडेलिंग कौशल्य यामुळे तिने तिथे ऑडीशनला आलेल्या प्रत्येक मॉडेलला मागे टाकलं. एका प्रख्यात फॅशन डिझायनरच्या ब्रॅंड साठी तो फॅशन शो होता आणि रिमा त्यासाठी सिलेक्ट झाली. रीमाचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिचं लहानपणापासूनचं स्वप्न आता सत्यात उतरणार होते.
ठरल्याप्रमाणे फॅशन शो झाला, त्यातले रीमाचे फोटो भराभर इंटरनेटवर पसरले. जगभरात ती प्रसिद्ध झाली. ज्या ब्रॅंड साठी तिने हा शो केला होता त्यांचीही जगभर प्रसिद्धी झाली. त्यानंतर अनेक ऑफर्स येऊ लागल्या.
मॉडेलिंग मध्ये करीयर करायचे तिचे स्वप्न पूर्ण झाले. सोबतच स्वतः ची एक डान्स अकॅडमी तिने नृत्य कौशल्याच्या जोरावर सुरू केली त्यातही तिला भरभरून प्रतिसाद मिळाला.
एका मोठ्या डान्स शो साठी तिला परीक्षक म्हणून निमंत्रित केले तेव्हा तिथल्या मुलाखतीत तिने स्वतःच्या जीवनातील प्रवास सांगताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. आई बाबांची मान अभिमानाने उंचावली.
परिस्थितीवर मात करून कौशल्याच्या आणि महत्वाकांक्षेच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी करणारी रिमा जगभरात अनेकांचे प्रेरणास्थान बनली.
कोड येणे हे नैसर्गिक आहे शरीरात काही कारणांमुळे झालेल्या बदलामुळे कोड येते, अशा वेळी त्या व्यक्तीला तसेच घरच्यांना बराच मनस्ताप सहन करावा लागतो. लग्नाच्या वेळी अडचणी येतात कारण बाह्य सौंदर्याला जास्त महत्त्व दिले जाते. पण अशा व्यक्ती बरोबर बोलायला टाळणे, संबंध तोडणे, त्यांच्या पासून दूर राहणे मात्र अयोग्य नाही का.
कॅनडातील विनी हार्लोने केलेले फोटोशूट सध्या चांगलेच चर्चेत आहे. कोड असलेली ही मॉडेल, तिचे फोटो इंटरनेटवर सध्या व्हायरल झाले आहे. यातूनच प्रेरीत होवून मी लिहीलेली रीमाची ही एक काल्पनिक कथा आहे.
कथा कशी वाटली हे नक्की कळवा आणि याविषयी तुमचं मत मांडायला विसरू नका.
– अश्विनी कपाळे गोळे
Comments are closed