उशीरा का होईना पण ती नाही म्हणायला शिकली..

Social issues

सुमित्राच्या अंगात ताप भरलेला होता, अशक्तपणा मुळे हात पाय गळल्यासारखे वाटत होते‌ पण घरात कुणी साधं तिला का झोपून आहेस हेही विचारत नव्हते. कशीबशी उठून ती पाणी प्यायली आणि  नवर्‍याला फोन केला पण त्याने सांगितले की आता दवाखान्यात येणे शक्य नाही, कामात व्यस्त आहे. इतर कुणाकडून तर अपेक्षा ठेवणे चुकीचे असा विचार करून ती एकटीच रिक्षा पकडून डॉक्टरांकडे निघाली. डॉक्टरांनी  तपासणी केली तर अंगात खूप जास्त ताप होता शिवाय तिला अशक्तपणा मुळे गरगरायला लागले होते.
घरी आल्यावर जेवण करायला स्वयंपाक घरात गेली तर लगेच तिच्या कानावर शब्द पडले ” आज एका कामाला हात लावला नाही, सगळं मला‌ एकटीला करावं लागलं.” सुमित्राने कसे बसे दोन घास खाऊन औषध घेतले आणि जाऊन अंथरूणावर पडली तोच तिच्या डोळ्यात चटकन पाणी आले, तिच्या मनात विचार आला, ” आपण घरी सगळ्यांसाठी किती झिजलो, कुणालाही गरज असो सुमित्रा तयार आणि आज आपल्यावर वेळ आली तर तब्येतीची साधी चौकशी नाही. वरून अपमानास्पद बोलून मोकळे होतात सगळे. आता बस झाल्या इतरांच्या सेवा, आता मी स्वतः साठी जगणार.. स्वतः ची काळजी घेणार.”
सुमित्रा एकोणीस वर्षांची असताना लग्न करून बापूरावांच्या आयुष्यात आली. बापूराव प्रतिष्ठित घरातले , एकत्र कुटुंबात राहणारे. तिचं सौंदर्य बघता बापूराव तिला कुठे ठेवू कुठे नाही असे अगदी फुलाप्रमाणे जपायचे. नव्या नवरीचे नवलाईचे नवं दिवस संपले आणि ती जबाबदारीच्या ओझ्याखाली अडकली. कुणालाही कुठल्या कामासाठी नाही म्हणने सुमित्राला जमत नव्हते. कुटुंबात कुठलाही सोहळा असो , कुणाचं आजारपण असो किंवा बाळंतपण असो सुमित्रा मदतीसाठी तत्पर असायची. अशा स्वभावामुळे सगळे तिची वाहवा करायचे शिवाय बापूरावांची मान अख्ख्या कुटुंबात वाढलेला बायकोच्या वाहवा मुळे अगदी ताठ असायची. सगळ्यांचं करता करता घरासाठी राबत असताना सुमित्रा आणि बापूरावांच्या नात्यात मात्र फूट कशी पडली सुमित्राला कळालेही नाही. त्यात भर म्हणजे कित्येक प्रयत्न केले तरी सुमित्राला आईपण काही लाभत नव्हते. सासूबाई ह्या त्या देवस्थानात नवस बोलायच्या, दवाखान्याच्या चकरा सुरूच पण सुमित्रा कडून आनंदाची बातमी काही मिळत नव्हती. असं करता करता लग्नाला सहा वर्षे झाली. गावातील लोक, नातलग नावं ठेवायला लागली. मग सासूबाईंनी सूर काढला बापूरावांच्या दुसऱ्या लग्नाचा, बघता बघता लवकरच अगदी मुलगी शोधून लग्न करायची तयारीच झाली. सुमित्राला ते ऐकून धक्का बसला, तिने आई वडीलांना सांगितले, त्यांची परिस्थिती जेमतेम, ते म्हणाले “अजून लहान बहीणींचे लग्न व्हायचे आहे तेव्हा तू कायमची माहेरी आली तर लोक काय म्हणतील शिवाय बहिणीच्या लग्नात अडथळा येयील.” क्षणभरात माहेरही तिच्यासाठी परकं झालं.
सुमित्राच्या आयुष्यात एका क्षणात काळोख पसरला. कुणालाही नाही म्हणने तर तिचा स्वभावच नव्हता. बापूरावांनी दुसरं लग्न करून सवत घरी आणली. लग्नानंतर दोन महिन्यांत तिला दिवस गेले, मग काय सगळ्यांनी तिला अगदी डोक्यावर घेतले, तिचे लाड पुरवले जाऊ लागले. सुमित्रा दिवसभर राब राब राबून घर सांभाळायची पण कुणीही तिच्या कडे फारसे लक्ष देत नव्हते. एखाद्या मोलकरीणी  सारखी तिची अवस्था झाली होती. बापूराव सुद्धा साधं कधी प्रेमाने बोलत नव्हते, कामापुरते काम ठेवायचे. सुमित्रा रोज रडायची, आयुष्य संपवायचा विचार करायची पण काही उपयोग नव्हता.
तिच्या सवतीचे दोन बाळंतपण तिनेच केले. अजूनही कुटुंबात कुणाला मदतीची गरज पडली की बापूराव तिला त्यांच्या घरी नेऊन सोडायचे. तिच्या स्वभावाचा फायदा घेऊन सगळ्यांचे बाळंतपण, म्हातारपणी सेवा,. लग्न असो किंवा कुठलाही सोहळा समारंभ , सगळं ओझं सुमित्रा वरच असायचं. तिची सवत सुद्धा तिला मोलकरीण समजून राबवून घ्यायची. घरात जिव्हाळा, प्रेम देणार कुणीच उरलं नव्हतं. जिथे नवराच आपला राहीला नाही तर इतरांकडून काय अपेक्षा असं समजून सुमित्रा जगत होती, माहेरी सुद्धा एक पाहुणीच. अशातच वयाची पन्नाशी जवळ आली, तब्येत आधी सारखी धडधाकट राहीली नव्हती, पण कुटुंबात अपेक्षा मात्र संपल्या नव्हत्या.  असंच आज अंगात इतका ताप असूनही साधी विचारपूस तर नाही पण कामात मदत केली नाही म्हणून तिची सवत तिला कुरकुर करत होती. औषधी घेऊन जरा वेळ सुमित्राला झोप लागली.
काही वेळाने जाग आली तर कानावर शब्द पडले ” सुमित्रा आहे ना, पाठवा की तिला.”
ते ऐकताच सुमित्रा बाहेर आली तर बापूराव,त्यांच्या आई आणि सवत बोलत होते. सुमित्राला बघताच सासूबाई म्हणाल्या “सुमित्रा, लहान काकी दवाखान्यात भरती आहे, तुला त्यांच्या जवळ जावं लागेल. एक जण बाई माणूस पाहिजे त्यांच्या सेवेत.”
त्यांचे बोलणे पूर्ण होण्याआधीच सुमित्रा म्हणाली “मी जाणार नाही, माझ्या अंगात इतका ताप, अशक्तपणा, तुम्हा कुणाला माझी अवस्था कळत नाही, माझा फक्त गरजेच्या वेळी वापर केला इतके वर्ष तुम्ही. पण आता बस..मला नाही जमणार जायला. हे तसं तर मी आधीच करायला पाहिजे होतं पण आता माझे डोळे उघडले. सूनेच्या नात्याने कर्तव्य म्हणून मी राबत गेले पण आता बस.. नाही जमणार मला.”
सगळे सुमित्राच्या चेहऱ्याकडे बघतच राहिले. सुमित्राचे हे रुप सगळ्यांनी पहिल्यांदाच पाहिले होते. उशीरा का होईना पण नाही म्हणण्याच्या कलेत सुमित्रा नैपुण्य मिळविण्याचा प्रयत्न करत होती, स्वतः साठी जगण्याची नवी उमेद तिच्या मनात नव्याने जागी झाली होती.

अशा अनेक सुमित्रा आज समाजात आहेत ज्यांना नाही म्हणता येत नाही आणि म्हणून मग सगळे फायदा घेतात. अशावेळी घरात कुणालाच आपुलकी नसेल तर त्याचा किती त्रास होतो हे सहन करणार्‍यालाच माहीत असते म्हणूनच योग्य वेळी नाही म्हणने खुप गरजेचे असते.

लेख कसा वाटला ते नक्की कळवा ?

नावासह शेअर करायला हरकत नाही. लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.

© अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed