नकारात्मक विचार.. जीवघेणे परीणाम-भाग २

Parenting-Social issues

अनन्याला  नकारात्मक विचारातून बाहेर काढण्यासाठी शक्य ते प्रयत्न राघव करत होता.
गरोदरपणात तिसऱ्या त्रैमासिकित जास्त काळजी घ्यायला हवी पण अनन्या मात्र दिवसेंदिवस खचून जाऊ लागली, वेडेवाकडे विचार करू लागली. तिला बाळाची हालचाल जरा कमी वाटली की रडायला लागायची, माझ्या बाळाला काही झालं नाही ना म्हणून सतत आईला प्रश्न विचारायची. जरा पोटात पाठीत दुखले तरी घाबरून रडायची, मग डॉक्टर कडे घेऊन गेल्या शिवाय पर्याय नसायचा. एक एक दिवस आता अवघड जाऊ लागला.
कशातच तिचं मन लागत नव्हते, सतत नकारात्मक विचार, चिडचिड सुरू असायची.
अशातच एक दिवस अचानक तिला अस्वस्थ वाटू लागले, शतपावली करताना चक्कर आली आणि ती खाली पडली. नशिबाने आई  आणि राघव सोबतच होते. त्यांनी लगेच तिला हाॅस्पीटलमध्ये घेऊन गेले तर अनन्याचं ब्लडप्रेशर खूप वाढलेले होते आणि त्यामुळे तिला चक्कर आली होती. अजूनही ती पुर्णपणे शुद्धीत नव्हती. डॉक्टरांनी तिला अॅडमीट करून घेतले. ब्लडप्रेशर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले, या सगळ्या प्रकाराने अनन्या अजूनच नकारात्मक होत गेली आणि त्यामुळे तिला अस्वस्थ वाटू लागले, ब्लडप्रेशर वाढले. डॉक्टर त्यांच्या परीने प्रयत्न करत होते.
बाळाच्या हृदयाचे ठोके कमी होत चालले होते शिवाय अनन्याची परिस्थिती नाजूक झाली होती. सगळ्यांना काळजी वाटत होती. ब्लडप्रेशर कंट्रोल करण्याचे सगळे उपाय डॉक्टर करत होते शिवाय बाळ आणि आई सुखरूप राहण्याचे प्रयत्न सुरू होते. अनन्याला अतीदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. सहा तास होत आले तरी काही सुधारणा होत नव्हती. अशातच अचानक अनन्याला परत चक्कर आली आणि तिची शुद्ध पुर्णपणे हरपली, थोडा वेळात ती शुद्धीवर आली पण बाळाच्या हृदयाचे ठोके मात्र थांबले होते, सातव्या महिन्याच्या अखेरीस उच्च रक्तदाब ( हाय ब्लडप्रेशर) मुळे बाळाने जन्माला येण्याआधीच या जगाचा निरोप घेतला होता.
राघव तसेच घरी सगळ्यांनाच हा मोठा धक्का होता.
अनन्याच्या जीवाला सुद्धा धोका होता. ती नकारात्मक विचारांच्या आहारी जाऊन उच्च रक्तदाबाच्या वेढ्यात अडकली होती, अस्वस्थ होती. अशावेळी बाळाला जास्त काळ पोटात ठेवणे धोकादायक ठरू शकते त्यामुळे इंजेक्शन व्दारे कृत्रिम कळा आणून नैसर्गिक रित्या बाळाला बाहेर काढले गेले.
जे काही झाले ते अतिशय धक्कादायक होते, टेंशन, नकारात्मक विचार, चिडचिड , मनात सतत दडपण यामुळे इतका मानसिक व शारीरिक त्रास अनन्याला आणि सोबतच घरी सगळ्यांनाच झाला होता.
अनन्याला यातून सावरण्यासाठी वर्ष लागले. पण तिला समजून चुकले होते की सगळं सुरळीत चालू असताना एका व्यक्तीच्या सांगण्यावरून नकारात्मक विचार करून इतक्या वर्षांनी लाभलेलं मातृत्व ती गमावून बसली होती.
यातून सावरण्यासाठी घरी सगळ्यांनी अनन्याला खूप मदत केली.
सुदैवाने पुढे दोन वर्षांनी अनन्या आणि राघव च्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाची बातमी आली, त्यांच्या जीवनात एका गोंडस बाळाचे आगमन झाले.

या कथेतून हाच संदेश द्यायचा आहे की “नकारात्मक विचार किती जीवघेणे ठरू शकतात, नकारात्मकता जवळ बाळगू नका. कुठल्याही परिस्थितीत सकारात्मक राहून शांतपणे सामना केला तर योग्य मार्ग नक्कीच मिळतो.”
माझ्या या लेखातून कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास क्षमा असावी. नकारात्मकता दूर करणे हाच हेतू यामागे आहे.

अशाच कथा वाचत राहण्यासाठी मला फॉलो करा.
कथा आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका. नावासह शेअर करायला हरकत नाही.

– अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed