सिक्रेट सुपरस्टार- एक काटेरी प्रवास

Inspirational-Parenting

सोहम, एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा. सोहम, आई वडील ,बहीण आणि एक भाऊ असं पाच जणांचं कुटुंब. वडील सरकारी नोकरीत कामाला. सोहम सगळ्यात मोठा मुलगा, देखणा, गोरापान, अभ्यासात हुशार पण वयानुसार मात्र त्याचा आवाज पुरुषांसारखा बदलला नाही. वयात आल्यावर सोहम मध्ये बदल होईल म्हणून सुरवातीला कुणी फारसं लक्ष दिलं नाही. शाळेत मात्र त्याला या गोष्टींमुळे सगळे चिडवायचे, त्याच्या आवाजाची नक्कल करायचे.
बारावीच्या परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले, चांगल्या कॉलेजमध्ये पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला पण त्याच्या नाजूक, अगदी मुली सारख्या आवाजामुळे त्याला परत चीडवणे, आवाजाची नक्कल करणे या गोष्टी सुरू झाल्या. सोबतच्या मुलांमध्ये बरेच बदल झालेले त्याला जाणवत होते, त्यांच्या आवाजात बदल झाले होते मग आपल्या आवाजात का बदल होत नाही‌ म्हणून सोहम सतत आई जवळ रडायचा, कॉलेजमध्ये जायला टाळायचा. या प्रकारामुळे त्याचं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. सोहम मध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला होता. सोहमची आर्थिक परिस्थिती साधारण त्यामुळे मुलांनी चांगले शिकून स्वतःच्या पायावर उभे व्हावे हे वडीलांचे स्वप्न. सोहमच्या वडिलांचा स्वभाव रागीट, कडक होता त्यांच्यापुढे आईचे काही चालत नव्हते.
सोहम आता बाहेर जायला टाळायचा, कुठल्या कार्यक्रमात जाणे, मित्रांमध्ये जाणे त्याने बंद केले, कॉलेजमध्येही कधी तरीच जायचा, त्यामुळे अभ्यासात तो मागे पडत होता. या प्रकारामुळे सोहमचे वडील त्याचावर खूप चिडायचे.
पदवी परीक्षेत कसा बसा तो उत्तीर्ण झाला. पदवीधर झाला असला तरी नोकरीचं काय, वडीलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठा मुलगा अपयशी ठरला म्हणून वडिल सगळा राग सोहमवर काढायचे.
या सगळ्या प्रकाराने आईचा जीव तीळ तीळ तुटत होता. बाहेर गेलो की कुणी आवाजावरून पुरुषत्व ठरवतील, चिडवतील म्हणून दिवसभर सोहम घरात असायचा. घरातही बहीण भावांशी वडीलांशी बोलणे टाळायचा. एकटाच एका खोलीत स्वत:च्या विचारात उदास पडून असायचा सोबतीला मंद आवाजात रेडिओ सुरू असायचा.
असंच रेडिओ ऐकताना आईच्या डोक्यात एक कल्पना आली, तिने आपल्या भावाला म्हणजेच सोहमच्या मामाला फोन केला. मामा शहरात नोकरीला होता. त्याला सोहमच्या परीस्थिती बद्दल माहिती होते. आई आणि मामाचे बोलणे झाल्यावर मामा लगेच येत्या शनिवारी सोहमला सोबत घेऊन जायला आला. जरा हवापालट होईल शिवाय शहरात तुला कुणी ओळखत नाही तेव्हा चिडवायचा प्रश्न नाही म्हणून सोहमची समजुत काढून त्याला सोबत घेऊन गेला. वडिलांना सोहम असल्याने नसल्याने काही फरक पडत नव्हता, आपली दोनचं मुलं आहेत असं मानून ते चालले होते. त्यामुळे त्यांनी सोहमला मामासोबत जाण्यासाठी विरोध करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.
सोहम मामासोबत शहरात आला, कित्येक दिवसांनी तो बाहेर मोकळ्या हवेत वावरत होता, बाहेरच जग बघत होता. मामा त्याला अगदी मित्राप्रमाणे वागणूक देत त्याचा न्यूनगंड दूर करण्याचा प्रयत्न करत होता.  सोमवारी मामाने सुट्टी घेतली आणि सोहमला घेऊन एका कंपनीत गेला. ते होते रेडिओ रेकॉर्डींग आॉफिस. मामाचा एक मित्र तिथे काम करायचा. तिथलं वातावरण, काम करायची पद्धत सगळं सोहमला दाखवून दोघे घरी आले. मामाने सोहमची समजुत काढली आणि पटवून दिले की रेडिओ स्टेशन वर काम केले तर देवाने तुला दिलेल्या नाजूक, सुरेख आवाजाने तू सगळ्यांना जिंकू शकतो. जगाला कुठे कळणार की जो स्त्रीचा आवाज रेडिओ वर आपण ऐकतो आहे तो एका पुरूषाचा आहे.
नोकरी मिळेल शिवाय तुझी ओळख ही सोहम नसून शिवानी म्हणून पुढे आणू. सोहमला ते पटले पण‌ हे खरंच इतके सोपे आहे का, पण प्रयत्न करायला हरकत नाही ना म्हणून मामाने सोहमची मानसिक तयारी केली. सोहमनेही त्यासाठी रेडिओ जॉकी होण्यासाठी लागणारी माहिती नेटवरून मिळवली आणि प्रॅक्टीस सुरू केली. लहानपणापासून घरात रेडिओ ऐकायची सवय असल्याने सोहमला ते इंटरेस्टिंग वाटले.
मामाच्या मित्राच्या मदतीने बाॅसला पूर्ण परीस्थिती सांगितली आणि दोन दिवसांनी सोहमला इंटरव्ह्यू साठी बोलावले गेले.
सोहमला “रेडिओ जॉकी” म्हणून नोकरी मिळाली. आई आणि मामा सोडून घरात कुणालाही हे माहीत नव्हते. आॅफिसमध्ये याविषयी गोपनीयता ठेवण्यासाठी बॉस कडून आदेश दिले गेलेले होते. लवकरच त्याने सगळ्यांना आपलसं केलं.
सोहम मुळातच हुशार, त्याचा गमावलेला आत्मविश्वास मामा मुळे आणि नोकरी मुळे परत आला. नोकरीच्या ठिकाणी बाकी सहकारी सुरवातीला त्याला हसायचे पण त्याची हुशारी, त्याच्यातला आत्मविश्वास, त्याचा प्रेमळ स्वभाव बघून सगळ्यांना त्याच्या कर्तुत्वाचा अभिमान वाटला. लवकरच तो फेमस “रेडिओ जॉकी शिवानी” म्हणून प्रसिद्ध झाला. बेस्ट रेडिओ जॉकी म्हणूनही त्याला अवार्ड मिळाला.
वडीलांनी सोहमचा विषय कधीच सोडला होता पण आई मात्र लपून छपून सोहम सोबत फोनवर बोलायची. त्याच्या रेडिओ वरच्या आवाजाचं कौतुक करायची.
एकदा सामान आवरताना सोहमला एक डायरी दिसली त्यात घरात एकटा बसून असताना त्याने लिहिलेल्या बर्‍याच कविता, गाणे होते. त्याच्या डोक्यात एक कल्पना आली, एक गिटार विकत घेतली. मामाच्या मदतीने सुट्टीच्या दिवशी सोहमने लिहिलेल्या गाण्यांचे दोघे मिळून रेकॉर्डींग करायचे. सोहमने गायलेल्या गाण्यांचा एक ऑडिओ अल्बम बनवून इंटरनेट वर टाकला आणि अल्बम ला नाव दिले ‘सिक्रेट सुपरस्टार’. त्याच्या गाण्यात इतका दर्द, शब्दात अनेक भावना होत्या. इंटरनेट वर तो अल्बम वार्‍या सारखा पसरला. जो तो त्या गाण्यांचा फॅन झालेला.  हे सिक्रेट फक्त मामा भाच्यालाच माहित होते.  हा सिक्रेट सुपरस्टार कोण हे जाणून घेण्यासाठी सगळ्यांना उत्सुकता लागली होती.
एकदा रेडिओ स्टेशनच्या आॅफिसमध्ये स्वतः चे गाणे गुणगुणत असताना एका सहकार्‍याने म्हणजेच साहीलने बघितले, त्यातलं एक शब्द न शब्द अगदी हुबेहूब सिक्रेट सुपरस्टार सारखा सोहम गातोय ऐकून सहकार्‍याला शंका आली. जेवायला बसल्यावर साहीलने सिक्रेट सुपरस्टार अल्बमचा विषय काढला, सगळ्यांनी खूप वाहवा केली.   साहिल सोहमच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत होता, ती चर्चा ऐकून सोहमला मनोमन किती आनंद झाला हे त्याने ओळखले.
संधी बघताच सोहमला भेटून साहिल म्हणाला ” सोहम, तू जगासाठी सिक्रेट सुपरस्टार, रेडिओ ऐकणार्‍यांसाठी शिवानी आहे पण आमचा सगळ्यांचा सच्चा यार आहे. ”
सोहमला ऐकून धक्का बसला, ह्याला कसं कळाल की सिक्रेट सुपरस्टार माझा अल्बम आहे. साहिलने सगळा किस्सा सोहमला सांगितला, जेवताना जेव्हा सगळे सिक्रेट सुपरस्टार विषयी बोलत होते तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर जे समाधान, जो आनंद होता त्यावरून माझी शंका खरी ठरल्याचे साहिलने सांगितले.
साहिल म्हणाला ” सोहम, जगभरात सिक्रेट सुपरस्टार च्या गाण्यांचे चाहते आहेत, तेव्हा तू तुझी ओळख आता जगासमोर आणली तरी चाहत्यांचं प्रेम कमी होणार नाही शिवाय तुझ्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल.”
सोहमला मात्र भिती वाटत होती की खरी ओळख जगासमोर आली तर आता पर्यंत मिळालेली सिक्रेट सुपरस्टारची प्रसिध्दी , सगळ्यांच्या आवडत्या रेडिओ जॉकी शिवानी चे नाव खराब तर होणार नाही ना. लोकांना सत्य परिस्थिती समजली आणि कुणी ते चुकीचं ठरवून फसवणूक समजून स्विकारले नाही तर काय होईल. घराण्याचे नाव खराब होईल म्हणून आहे तेच ठिक आहे या विचाराने तो साहिलला उत्तर न देता निघून गेला.
साहिलने खरं काय ते इतर सहकार्‍यांना सोबत बॉसला सांगितले, सिक्रेट सुपरस्टार दुसरी कुणी नसून आपली शिवानी म्हणजे आपला सोहम आहे हे ऐकून सगळ्यांना आनंद झाला शिवाय आश्चर्याचा धक्का बसला. सगळ्यांना खूप अभिमान वाटला.
बॉसने सगळ्यांना एकत्र बोलावले, त्यात सोहम होताच. सगळ्यांनी सोहमचे खूप कौतुक केले, बॉसने अनाउन्समेंट केली की आपण आपल्या चॅनल तर्फे सिक्रेट सुपरस्टारची म्युझिक कॉंसर्ट  करायची आहे आणि त्यातून सोहमची ओळख जगासमोर आणून त्याचा मान त्याला मिळवून द्यायचा. सोहमला ऐकून धक्का बसला पण बॉसने त्याला विश्वासात घेतले , कुठल्याही परिस्थितीत आम्ही तुझ्या सोबत असेन असे आश्वासन दिले. रेडिओ चॅनल वरून सिक्रेट सुपरस्टार च्या म्युझिक कॉंसर्ट ची जाहिरात सुरू झाली. अवघ्या तीन दिवसांत सगळे तिकीट विक्री झाले.
ठरल्याप्रमाणे सिक्रेट सुपरस्टार जगासमोर आला, फिमेल व्हाॅइस मधला ‘ सिक्रेट सुपरस्टार’  अल्बम एका पुरुषाचा आहे ऐकून सगळयांना आश्चर्याचा धक्का बसला, पण सोबत सोहमची वाहवा झाली, न्यूनगंड दूर करून परिस्थिती वर मात देत मिळवलेली प्रसिध्दी बघून सोहम जगभरात अनेकांचे प्रेरणास्थान म्हणून सोहम प्रसिद्ध झाला.

त्याचा हा काटेरी प्रवास एका मुलाखतीत सांगताना आई, मामा आणि माझ्या सहकाऱ्यांमुळे मी सुपरस्टार झालो हे ऐकून आईच्या डोळ्यातील आनंदाश्रू ओठांवर आले. वडिलांना सोहमचा खूप अभिमान वाटला, ते त्याला भेटायला गेले, माझ्या मुलाने माझी मान अभिमानानं उंचावली असं म्हणताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या, त्यांनी कित्येक वर्षांनी सोहमला मिठीत घेतले. आपण किती वाईट वागणूक दिली सोहमला म्हणून पश्चात्तापाने ते सोहमला कवटाळून रडायला लागले.

काही गोष्टी या माणसांमध्ये नैसर्गिक असतात त्या बदलता येत नसेल तरी परिस्थिती वर मात करून योग्य मार्ग नक्कीच काढता येतो. कुठल्याही गोष्टीचा न्यूनगंड न बाळगता प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळते.

याविषयी तुमचं मत नक्की कळवा. लेख आवडला असेल तर नावासह शेअर करा.

लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.

©अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed