आधीच्या काळात स्त्रीचं अस्तित्व हे चूल आणि मूल इतकचं होतं. स्त्री म्हणजे उपभोगाची वस्तू. पुरुष प्रधान संस्कृती, अगदी कमी वयात मुलींची लग्नं व्हायची, मग सासर जसं असेल तशा परीस्थितीत तिनं राहायचं, अन्याय झाला तरी तिला सहन करण्याशिवाय पर्याय नसायचा. आजच्या काळात तर स्त्री सुशिक्षित आहे पण तरिही परीस्थिती फार काही बदलली नाही.
गावाकडचा विचार केला तर अजुनही स्त्री ही पिडीतचं आहे, तिला तिचं अस्तित्व नाही, स्वातंत्र नाही.
सुशिक्षित, नोकरी करणारी असेल तरी तिची परीस्थिती काही वेगळी नाही. आई-वडील मुलीला शिकवतात, स्वत:च्या पायावर उभे करतात हे यासाठी की तिला स्वत:चं एक अस्तित्व असावं, कशीही वेळ आली तरी ती हतबल होऊ नये. पण सासरी आली की तिथे तिच्यावर अपेक्षांचे ओझे लादले जाते. सगळ्यांचं मन जपावं, नविन घरात येताचं सून म्हणून तिने सगळी जबाबदारी समजून घ्यावी, सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या, आमच्या घरात असं आहे, तसं आहे, पुढे तुला ते करायचं आहे. तिच्या मनाची मानसिकता समजून घ्यायला मात्र कुणी तयार नसते. ज्याच्यासाठी सगळं सोडून ती आलेली असते त्याच्याही ह्याचं अपेक्षा असतात. माझ्या घरचे म्हणतील ते बायकोने ऐकावे. अशा वेळी तिच्या मनाची परिस्थिती काय होत असेल हे समजून घेणारे क्वचितचं असतात.
सासू सुद्धा कधीतरी त्याचं घरात सून म्हणून आलेली असते पण मी खूप सहन केलं आता तुला सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील. ते म्हणतात ना स्त्रीच स्त्रीची शत्रू असते, त्याची सुरुवात इथे होते. आपण जे सहन केलं ते आता सूनेने करावं, एवढेच त्यांना कळते पण आताची परिस्थिती काय आहे हा विचार कुणी करत नाही.
एखाद्या सुनेला पटत नसेल ते तिने सांगण्याचा प्रयत्न केला तर आजकालच्या मुली ऐकत नाही अशी बदनामी सासरचे करतात. नवरा बायकोला समजून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर हीने मुलाला आमच्यापासून तोडले असं म्हणायला सासरचे मागेपुढे पाहत नाही. मुलाच्या लग्नानंतर दोघांच्या संसारात जसं मुलीच्या घरच्यांनी हस्तक्षेप करू नये असे म्हणतात तोचं नियम मुलांच्या घरच्यांना का लागू पडत नाही.मुलगा आपल्याला विसरुन जातो की काय अशी शंका त्याच्या घरच्यांच्या मनात का असावी.
स्त्री कीतीही शिकली तरी नोकरी, घर , मुलबाळ, संसार सगळं सांभाळून ती जगत असताना तिचं स्वत:चं आयुष्य मात्र शेवटपर्यंत अपेक्षांच्या ओझ्याखालीचं असते. या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना तिच्या आवडीनिवडी तिच्यापासून दुरावतात, तिला हवं तसं आयुष्य ती जगू शकत नाही.
स्वत: चं मत सांगून पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर सगळे तिला दोष देतात. खरंच हे योग्य आहे का. अशा वेळी नवरा तिला समजून घेत असेल तर तिला एक वेगळाच प्रेमळ आधार असतो. कुठल्याही परिस्थितीत माहेर स्त्रीला जवळचे वाटते कारण तिथे तिला समजून घेणारी तिची माणसं असतात, तिच्या भावनांचा आदर तिथे केला जातो पण त्यातही कित्येकदा तुला तुझे माहेरचेच पाहिजे, आम्ही आवडत नाही अशे आरोप केले जातात. स्त्रीने आयुष्य असचं बंधनात जगत का राहावं. ती जर आपल्या कर्तव्यात चुकत नसेल तर अन्यायही सहन करू नये.
आयुष्य हे एकदाच मिळतं, ते असं कुणाच्या बंधनात, दडपणाखाली घालवू नये.
आजकाल चिमुकल्यांपासून ते व्रुद्ध स्त्रियांपर्यंत बलात्कारासारख्या घटना आजूबाजूला घडतात. काही लोक बदनामी नको म्हणून स्त्रीची समजूत काढून तिला गप्प बसवतात. कुणी आवाज उठवला तरी त्यावर कडक कारवाई केली जात नाही. प्रत्येक स्त्री हि आपलं आयुष्य कुठल्या ना कुठल्या दडपणाखाली जगत असते. आता गरज आहे स्त्रीने खंबीर होण्याची. स्वत:ची कंबर कसण्याची. त्यामुळे परिस्थिती पूर्णपणे बदलली नाही तरी काही प्रमाणात अत्याचार मात्र नक्कीच कमी व्हायला मदत होईल.
दुसऱ्या बाजूने विचार केला तरआजच्या आधुनिक काळात स्त्रीया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना आपल्याला दिसतात. आजची स्त्री कुठल्याच क्षेत्रात मागे नाही. पूर्वीच्या काळी नोकरी करणारी स्त्री म्हणजे सहसा शैक्षणिक क्षेत्रात म्हणजेच शिक्षिका असलेली. आता परीस्थिती बरीच बदलली आहे, अगदी चालक-वाहक महिला ते नासा मध्ये कार्यरत महिला शास्त्रज्ञ अशा अनेक क्षेत्रांमध्ये महिला उल्लेखनीय कामगिरी करताना आपल्याला दिसतात.आताच्या परिस्थितीत काही क्षेत्रात बोटावर मोजता येतील इतक्याच महिला दिसत असल्या तरी त्यांची प्रेरणा घेऊन अनेक महिला त्या क्षेत्रांकडे वळताना दिसतात. सध्या चर्चेत असलेल्या क्रिडा क्षेत्रात पी वी सिंधू, फ्रीस्टाईल पहीलवान गीता आणि बबीता फोगट अशा अनेक स्त्रीयांकडून प्रेरीत होऊन तरुणी आता अनेक नवनवीन क्षेत्रात उतरताना दिसत आहेत.
शहरी भागात बरेच कुटुंब असे आहेत जिथे पती-पत्नी दोघेही नोकरी करताना दिसतात, कुणी खाजगी कंपनीत, कुणी सरकारी नोकरीत.
आधुनिक जीवनशैली जगताना आर्थिक गरजा वाढलेल्या असल्याने, मुलांच्या वाढत्या शैक्षणिक खर्चामुळे दोघेही नोकरी करतात. पत्नीही पतीला आर्थिक हातभार लावते त्यामुळे घरात तिचे एक स्वतंत्र अस्तित्व टिकून राहते. स्त्री सुशिक्षित असेल तर त्याचा मुलांच्या संगोपनासाठी खूप फायदा होतो. मुलांच्या शाळा, बॅंकेची कामे तसेच अनेक व्यवहार ती करत असेल तर तिच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो. आजची स्त्री हि कुटुंबाचा आर्थिक भार पुरुषांच्या बरोबरीने उचलते.
काही पुरुषांना आपली पत्नी पुढे जाताना बघून तिचा अभिमान वाटतो, ते त्यासाठी तिला साहाय्य करतात. काही घरात मात्र परिस्थिती उलट आहे, पत्नी पुढे गेलेली त्यांना आवडत नाही, पुरुषांचा इगो दुखावला जातो आणि मग पतीला आवडत नाही म्हणून ती आपलं सारं कौशल्य, बुद्धीमत्ता बाजूला ठेवते. पतीच्या विरोधात जाऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला की त्यांच्या संसारात वादळ निर्माण झालेले दिसते. पुरुषांची ही कुत्सित विचारसरणी बदलायला हवी. सुशिक्षित असून स्त्री चा आदर नसेल तर अशा विचारांमुळे तो अशिक्षितच आहे असे म्हणायला हरकत नाही. पत्नीला पतीचा पाठिंबा मिळाला तर प्रत्येक स्त्री हि खूप पुढे जाऊ शकते.
आधुनिक विचार, बदलती जीवनशैली, उच्च शिक्षण यामुळे परिस्थिती पूर्णपणे बदलली नसली तरी काही प्रमाणात स्त्री-पुरुष समानता दिसत आहे. एकीकडे स्त्रीस्वातंत्र्य दिसत असलं तरी ग्रामीण भागात अजूनही परीस्थिती बदलली नाही. जोपर्यंत स्त्रीविषयी आदर निर्माण होत नाही तोपर्यंत ती स्वतंत्र होणार नाही.
स्त्री पुरुष अशी भिन्नता न करता एक व्यक्ती म्हणून प्रत्येकाने एकमेकांना बघितले तर परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही.
अश्विनी कपाळे गोळे
Comments are closed