मनवाला आज क्लासवरून यायला उशीर झाला त्यामुळे आई सतत घराच्या आत बाहेर चकरा मारत होती. हिवाळ्याचे दिवस असल्याने रात्री आठ वाजता मध्य रात्र असल्यासारखे वाटत होते. मनवाचे बाबाही कामानिमित्त बाहेर गावी गेलेले. काय करावं आईला कळत नव्हते, नेहमी सात वाजेपर्यंत घरी येते आणि आज तासभर उशीर कसा झाला असेल शिवाय फोन स्वीचऑफ येतोय. काळजीतचं आईने मनवाच्या एका मैत्रिणीला फोन केला तेव्हा ती म्हणाली “काकू आज क्लास उशीरा संपला पण आम्ही सोबतच बस स्टॉप वर आलो. माझी बस लवकर आल्यामुळे मी निघाले, मनवा बस साठी थांबली होती. येयीलच इतक्यात काळजी करू नका.”
आईचं मन मात्र काळजीने व्याकूळ, मनवा ठिक तर असेल ना , फोन का बंद आहे, किती हा निश्काळजीपणा , उशीर होईल म्हणून कळवायचे तरी ना अशा विचाराने आई काळजीत पडली शिवाय जरा संतापलेली. तितक्यात एक रिक्षा घरापुढे थांबली, मनवा त्यातून उतरली बघून आईच्या जीवात जीव आला. पण हे काय सोबत हे कोण….
मनवा सोबत रिक्षा मधून त्रृतीयपंथी म्हणजेच दोन हिजडे उतरले बघून आईचा पारा चढला, आई दारातूनच ओरडली ” मनवा,हा काय प्रकार आहे, हे लोक इथे कशाला, तुला काही कळते की नाही. ह्यांच्या सोबत तू…शी… तुला काय हिच रिक्षा मिळाली का…” आई चिडून नको ते बोलून गेली.
मनवा आईला शांत करायचा प्रयत्न करत होती पण आई मात्र सगळ्या प्रकाराने शिवाय मनवाला उशीर झाल्याने संतापलेली होती.
ते पाहून सोबत आलेले दोघे तसेच कधी परत गेले मनवाला कळालेही नाही.
आईचं बोलणं ऐकून मनवा रडायला लागली आणि चिडून म्हणाली “आई आता गप्प बस… त्यांच्या विषयी असं बोलण्याआधी मी काय म्हणते ऐक..ते हिजडे नाही..तेच खरे हिरो आहेत..ते नसते तर आज माझ्या सोबत काय झाले असते कुणास ठाऊक.. कदाचित मी तुझ्या समोर अशी उभी नसते..”
मनवा आईच्या कुशीत शिरून हुंदके देत रडायला लागली.
काही तरी गंभीर आहे आईला लक्षात आले.
मनवाला शांत करून विचारले तेव्हा ती म्हणाली “आई, आज आमचा क्लास नेहमी पेक्षा उशीरा संपला आणि त्यामुळे माझी रोजची बस चुकली. दुसऱ्या बसची वाट बघत मी बस स्टॉप वर थांबली, सोबतच्या मैत्रिणी त्यांच्या बस आल्यावर निघून गेल्या. बस स्टॉप वर बरेच लोक होते, त्यात काही टवाळक्या करणार्या पोरांचा ग्रुप होता. मी एकटी मुलगी दिसल्यावर ते काही तरी अश्लील बोलत माझ्या आजूबाजूला उभे होते. मी ज्या बाजूला जाईल तिकडे येऊन उभे. बरेच लोक तिथे असूनही कुणी त्यांना काही बोलत नव्हते, दुर्लक्ष करत आपापल्या फोन मध्ये, काही जण दुसरीकडे बघत उभे होते. मी खूप घाबरले तशातच तुला फोन करून कळवावे म्हणून फोन काढला तर एकाने येऊन धक्का दिला, माझा फोन खाली पडला, बंद झाला.. कसाबसा उचलून बॅगेत ठेवून बस कधी येते म्हणून मी रडकुंडीला येऊन बसची वाट पाहत होते. एकाने येऊन ओढणी ओढली आणि चूकून झालं असं दाखवत पुढे गेला..त्याच्या सोबतचे त्याला वाहवा करत हसू लागले.. माझ्या फिगरवरून काही तरी अश्लील बोलायला लागले..ते सगळे नजरेने बलात्कार करत होते आई…”
बोलतानाच मनवा सगळा प्रकार आठवून रडू लागली..परत सांगायला लागली..
” तिथल्या गर्दीत सगळ्यांना कळत होते की मी घाबरली आहे.. रडकुंडीला आली आहे..पण कुणी दखल घेत नव्हते.. तितक्यात तिथून एक हिजड्यांचा ग्रूप जात होता, त्यात एकाने माझ्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले, ते सगळे जवळ आले, माझी विचारपूस केली..मी रडायला लागली..माझ्या सोबत होत असलेला प्रकार सांगितला.. एकाने जाऊन त्या ओढणी ओढणार्या मुलाच्या कानाखाली मारली. त्याची कॉलर पकडून त्याला जाब विचारला.. घाबरून ते टवाळके तिथून पळत सुटले. आजूबाजूला असलेले लोक सगळा प्रकार बघत होते पण फक्त बघ्याची भूमिका घेत उभे होते. ते मुलं पळून गेल्यावर काही लोक सांत्वन करण्यासाठी आले पण तेच लोकं आधी मात्र लक्ष नसल्यासारखे उभे होते. मी खूप घाबरले आई.. माझं रडणं थांबतच नव्हतं.. तेव्हा एकाने रिक्षा थांबवली, मला पत्ता विचारला आणि म्हणून त्यातले दोघे मला सुखरूप घरी पोहोचवायला घरा पर्यंत आले. तू मात्र त्यांना नको ते बोललीस. काही माहित नसताना त्यांचा अपमान केला..ते काही अपेक्षा न ठेवता परत गेले आई तुझं बोलणं ऐकून. त्यांचे मी साधे आभार सुद्धा मानले नाही..मी खूप घाबरले होते..ते माझ्या मदतीला आले नसते तर माझं काय झालं असतं काय माहित. आई माझी इज्जत त्यांच्यामुळे वाचली. ते हिजडे नाही तेच खरे हिरो आहेत..”
मनवाच्या बोलण्याने आईला रडू आवरले नाही.. ऐकूनच आईच्या अंगावर काटा आला.. ज्यांना आपण हिजडे म्हणून अपमानीत केले त्यांच्यामुळे आपल्या मुलीची इज्जत वाचली. त्यांचे उपकार कशे फेडायचे.. आई मनवाला कुशीत घेऊन पश्चात्ताप करत रडू लागली..मनवा सुखरूप घरी पोहोचली म्हणून मनोमन त्यांचे आभार मानू लागली.
कधी कधी आपल्याला परीस्थिती माहीत नसताना आपण कुणाला असं दुखावतो आणि नंतर पश्चात्ताप होतो.. जसं मनवाच्या आईच्या बाबतीत झालं..
जे आहे ते नैसर्गिक आहे..ते लोक त्रृतीयपंथी असले तरी एक मनुष्य म्हणून जन्माला आले आहेत.. तेव्हा त्यांच्यावर हसत त्यांची खिल्ली उडवणे, नको ते त्यांना बोलणे खरंच अयोग्य आहे…
कथा कशी वाटली ते जरूर कळवा.. शिवाय तुमचं याबद्दल मत मांडायला विसरू नका…
– अश्विनी कपाळे गोळे
Comments are closed