देवदासी प्रथा- कहाणी सुलोचनाची… भाग १

Social issues

उन्हाळ्याच्या कडक उन्हात डोक्यावर देविचा फोटो असलेली परडी घेऊन जाताना सुलोचनाला चक्कर आली आणि ती रस्त्यातच खाली कोसळली. आजूबाजूच्या लोकांनी तिला रस्त्याच्या बाजूला नेले, चेहऱ्यावर पाणी शिंपडले, जरा वेळाने ती शुद्धीवर आली. तिच्या आजूबाजूची गर्दी कमी झाली. त्याच गर्दीत असलेली मानसी मात्र तिची अवस्था बघून तिथेच थांबली, मानसीने सुलोचनाला पाणी प्यायला दिले, काही खाल्लं की नाही म्हणून चौकशी केली तर सकाळपासून पोटात काही नाही म्हणत सुलोचना डोळे मिटून बसून होती.
मानसीने तिच्या जवळचा जेवणाचा डबा सुलोचनाला दिला आणि जेवण करायला लावले.
मानसी ही एका शाळेत शिक्षिका होती सोबतच ती समाजकार्य करायची. शाळेत जाताना रस्त्यात सुलोचनाची अवस्था बघून ती तिच्या जवळ‌ थांबलेली होती.
सुलोचना नाकी डोळी नीट, चेहऱ्यावरून कळत होते की वय काही जास्त नाही. सावळा वर्ण, कपाळावर मोठं गोल कुंकू, केस कित्येक वर्षांपासून न विंचरलेले दिसत होते, त्यामुळे केसांच्या गुंता होऊन जट झालेले, अंगावर एक हिरव्या रंगाची जुनी साडी, सोबत एक देवीचा फोटो असलेली परडी.
सुलोचनाचं जेवण होत पर्यंत मानसी तिचं निरिक्षण करत होती, काय प्रकार आहे हे तिला लगेच कळाले. सुलोचना देवदासी प्रथेचा बळी असल्याचा अंदाज तिला आला. तिला योग्य ठिकाणी पोहचवायचे हे मानसीने ठरविले. सुलोचनाच्या अंगात त्राण नव्हता, जेवण करून साडीचा मळका पदर चेहऱ्यावर फिरवत परत सुलोचना डोळे मिटून भिंतीला टेकून बसली.  सुलोचनाला विचारल्यावर कळाले की तिचं जवळचं असं कुणी नाही. मानसी ने एक फोन केला आणि सविस्तर माहिती , पत्ता विचारत फोन बंद केला. . एक रिक्षा थांबवली आणि सुलोचनाला‌ सोबत घेऊन ती एका आश्रमात पोहोचली. तिथल्या एका डॉक्टरांच्या मदतीने सुलोचना ची तपासणी केली, तिला खूप अशक्तपणा आला होता. मानसीने प्रेमळ वागणूक दिली, जेवायला दिले‌ त्यामुळे तिच्यावर विश्वास ठेवून सुलोचना त्या आश्रमात गेली. डॉक्टरांनी सुलोचनाला काही औषधे देऊन आराम करायला लावला. आश्रमात अनेक वयोगटातील स्त्रिया होत्या. त्यांच्या मदतीने सुलोचनाला एका बेडवर झोपवून दिले. तिला आरामाची खूप गरज होती. मानसीने शकुंतला बाईंना घडलेली घटना सांगितली त्यावर तिची काळजी आम्ही घेऊ, ती आता इथेच राहील, तुम्ही काळजी करू नका असं तिथल्या शकुंतला बाईंनी म्हंटल्यावर मानसी निश्चिंत झाली.
शकुंतला बाई आणि त्यांच्या काही सहकारी देवदासी प्रथेचा बळी ठरलेल्या स्त्रियांसाठी, पिडीत महिलांसाठी हा आश्रम चालवायच्या. त्यांची पुर्ण काळजी घेत एक लघुउद्योग तिथल्या महिलांच्या मदतीने चालवायच्या, त्यातून मिळणारे उत्पन्न आश्रयासाठी उपयोगी पडायचे. शकुंतला बाईंचे पती त्यांना मदत करायचे.
मानसी शाळेसाठी आश्रमातून परत निघाली मात्र सुलोचनाचा विचार तिच्या डोक्यातून जात नव्हता. उद्या सकाळी आपण सुलोचनाला‌ भेटायला जायचे असं ठरवून ती शांत झाली. सुलोचना कोण आहे, तिच्या सोबत काय झाले अशा अनेक गोष्टी मानसीला‌ जाणून घ्यायच्या होत्या.
दुसऱ्या दिवशी ठरविल्या प्रमाणे मानसी सुलोचनाला भेटायला आश्रमात पोहोचली. गेल्या गेल्याच सुलोचना काही महिलांसोबत एका झाडाखाली बसून आश्रमाचं निरीक्षण करत होती. मानसी दिसतात तिने हलकेच स्मित हास्य करत मानसीकडे बघितले. मानसीने तिच्या तब्येतीची चौकशी केली, आज सुलोचना ला जरा बरं वाटतं आहे ऐकून मानसीला समाधान वाटले. शिवाय आज सुलोचनाचे धुळीने माखलेले शरीर स्वच्छ दिसत होते, अंगावर दुसरी नीटनेटकी साडी दिसत होती.
सुलोचना म्हणाली “ताय, तुम्ही कोण कुठच्या, माह्या देवीच्या रूपात धावत आल्या पा मदत कराया. काल माह्या जीवचं काय झालं असतं तुम्ही नसत्या तं.”
मानसीने तिला धीर देत सांगितले तू आता इकडे तिकडे भटकायच नाही, इथेच राहायचं, हेच तुझं कुटुंब. सुलोचनाला ऐकून बरं वाटलं. होकारार्थी मान हलवून तिने ते मान्य केले.
मानसीने तिची विचारपूस केली तेव्हा सुलोचनाच्या डोळ्यात पाणी आले आणि म्हणाली “ताय, मले लहानपणीच माय बापानं देवाच्या पदरात सोडलं. चौदाव्या वर्षी गावा बाहेरच्या देवळात देवासंग लगिन लावून दिलं आणं मंग आता तिथंच राहाचं सांगून ते गेले, अजून नाही गवसले. देवदासी हाय म्या. नंतर त्या माणसानं माह्या आयष्याची राखरांगोळी केली ताय. यीट आल्यावर सोडलं मले वार्‍यावर. ” एवढं बोलून सुलोचना ढसाढसा रडू लागली. रडतचं घडलेली हकीकत सविस्तर सांगायला सुरुवात केली.

देवदासी हा काय प्रकार आहे, सुलोचनाची सविस्तर कहाणी काय आहे हे जाणून घेऊया पुढच्या भागात. तोपर्यंत stay tuned.

कथा कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की कळवा. मला फॉलो करायला विसरू नका.

पुढचा भाग लवकरच.

आपल्या देशात अनेक कुप्रथा आहे, अशीच एक प्रथा म्हणजे  देवदासी प्रथा. देवदासी प्रथेत बळी पडलेल्या स्त्रियांमध्ये गरीब आणि दलितांचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमाभागातील देवदासींची संख्या फार मोठी आहे.  याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया पुढच्या भागात.

©2019 लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.

नावासह शेअर करायला हरकत नाही.

– अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed