मागच्या भागात आपण पाहीले की सुलोचनाला भेटायला मानसी आश्रमात गेल्यावर सुलोचना मानसीला तिच्या आयुष्यात काय घडले ते सांगत असते.
सुलोचना एका अतिशय गरीब घरातील मुलगी, आई वडील दुसर्यांच्या शेतात काम करून कुटुंब चालवत असतात. शेताजवळच एका छोट्याश्या झोपडीत आई वडील सुलोचना आणि दोन लहान भाऊ असे एकूण पाच जणांचं कुटुंब राहायचं. त्या गावात, आजुबाजूच्या परिसरात देवदासी प्रथा खूप वाईट प्रकारे पाळली जात असे.
देवदासी प्रथा म्हणजेच चौदा पंधरा वर्षांच्या मुलींचे लग्न देवासोबत लाऊन देतात. चोरून पुजा-याच्या घरी किंवा इतर ठिकाणी मुली सोडल्या जातात. पूर्वी मुलगी सोडतानाचा विधी हा लग्नासारखा असतो. या विधीत नव-यामुलाऐवजी बाजूला तांब्या पूजतात.
या लहान मुलीला नवंकोरं लुगडं नेसवलं जातं व लाल-पांढ-या मण्यांचं ‘दर्शन’ तिच्या गळ्यात बांधलं जातं. लग्न लागल्यावर ती नवजोगतीण तिथल्याच पाच जोगतिणींसह आजूबाजूच्या पाच घरी जाऊन जोगवा मागते.
ज्याच्या घरातील मुलगी सोडली असेल, त्यांना आपल्या जातभाईंना जेवण द्यावं लागतं. नंतर इतर जोगतिणींबरोबर हातात परडी घेऊन त्या लहान मुलीला जवळच्या पाच गावांतून जोगवा मागायला फिरवतात. यामागे कारण असे की गावांतील त्यांच्या भाऊबंधांना कळावं, त्या मुलीला देवीला सोडली आहे व लग्नासाठी तिला त्यांच्याकडून मागणे येऊ नये.
देवदासी म्हणून सोडल्या जाणा-या मुली, बरेचदा मागासवर्गातील असतात आधीच मागासलेपण त्यात अंधश्रद्धा, गरिबी ही कारणं मुली व मुले सोडायला कारणीभूत होतात. डोक्यात जट आली की, देवीचं बोलावणं आलं. मग त्यावर काही उपाय नाही, अशी समजूत मग आयुष्यभर ती जट सांभाळत जगणं, हे त्यांच्या नशिबी येतं. काही जणी लांब जट ठेवण्यासाठी पिशवी शिवून त्यात ती ठेवतात. अलीकडे निपाणी, गडहिंग्लज इत्यादी भागांत काही डॉक्टर व स्त्री संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या स्त्रियांच्या जटा सोडवून त्यांचे केस पूर्ववत केले आहेत.
देवीला मुलं-मुली सोडण्याची अनेक कारणं असतात. घरात कुणी आजारी असलं, गोठय़ात बैल मेला, अंगावर खरूज उठली व ती लवकर बरी झाली नाही, तरीही त्या मुलीला किंवा मुलाला देवीला सोडल्याची अनेक उदाहरणं आहेत. एक तर गरिबीमुळे या लोकांना डॉक्टर करणं परवडत नाही किंवा डॉक्टरपेक्षा यांचा भक्तावर जास्त विश्वास असतो. केवळ भंडारा लावून रोग बरा होतो, ही समजूत. वंशाला कुलदीपक असावा, ही पूर्वापार चालत आलेली कल्पना अनेक सुशिक्षितांमध्येही आढळून येते. मग या अशिक्षित मागासवर्गीयांमध्ये तर विचारूच नका. अनेक मुली झाल्यावरही मुलगा व्हावा, ही इच्छा. त्यासाठी पहिल्या मुलीला देवाला सोडली जाते.
अशाच प्रथेचा बळी ठरलेली मुलगी म्हणजे सुलोचना. सुलोचनाचे अशेच गावाबाहेर मंदिरात लग्न लावून दिले गेले आणि आता त्याच मंदिरात राहायचं असे सांगून तिचे आई वडील परत गेले. तिथल्या पुजार्याने तिला एका शेजारच्या गावात पाटलांकडे सोडले. तिच्या सोबत काय होते आहे तिला कळायला मार्ग नव्हता. त्या पाटलांनी तिचे हवे तसे लैंगिक शोषण केले, तिचा उपभोग घेतला, त्याच वाड्यात एका खोलीत बंद करून ठेवले. काही वर्षांनी जेव्हा अशीच अजून एक देवदासी मुलगी त्या वाड्यात आली तेव्हा सुलोचनाच्या डोळ्यांवर पट्टी बांधून तिला दूर कुठेतरी अनोळखी ठिकाणी नेऊन सोडले. तिथे तिला काही तिच्यापेक्षा वयाने मोठ्या पण अशाच देवदासी महिला भेटल्या. त्यांनी तिला एक परडी दिली त्यात देवीचा फोटो होता. ती परडी हातात देत सांगितले की आता व देवीच्या नावाने जोगवा मागायचा आणि जे पदरी पडेल त्यावर जगायचं.
तिची कहाणी ऐकून मानसीच्या डोळ्यात पाणी आले.
अंधश्रद्धेच्या नावाखाली काय काय प्रकार चालतात याची तिला खूप कीव आली. आता मात्र सुलोचना आश्रमात आली तेव्हा पुढचं आयुष्यात ती अशा गोष्टींपासून दूर राहील याचे समाधान मानसीला वाटले.
अशा देवदासी प्रथेचा बळी ठरलेल्या मुलींचे मंदिराच्या पुजार्यांकडून, बाकी लोकांकडून शारिरीक शोषण केले जाते. अशावेळी गर्भ धारणा झाली की जन्माला आलेल्या मुलीला देवदासी तर मुलाला तिथेच मंदीरात सेवेसाठी ठेवून देवाला अर्पण केले जाते.
ही अनिष्ट प्रथा आता बरीच कमी झाली असली तरी पूर्णपणे बंद झाली आहे, असं म्हणता येणार नाही. यावर सरकारने कडक कारवाई करून बंदी घातली असूनही लपून छपून ही प्रथा मागासवर्गीय, दलितांमध्ये सुरू आहेच. अनेक समाज सुधारक हे प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
कथा कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की कळवा. मला फॉलो करायला विसरू नका.
©2019 लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.
नावासह शेअर करायला हरकत नाही.
– अश्विनी कपाळे गोळे
Comments are closed