रसिकाचा अरसिक शशी..( एक प्रेमकथा )

Inspirational-Love Stories

“रसिका, मला यायला रात्री उशिर होईल गं, जेवणासाठी वाट बघत बसू नकोस..सध्या खूप काम आहेत ऑफिसमध्ये.. निघतोय मी..” (शशिकांत गडबडीत तयार होऊन ऑफिसमध्ये जायला निघताना रसिकाला सांगत होता)
“शशी, अरे नाश्ता करून जा ना.. झालाचं आहे तयार..काल रात्रीही उशीरा आलास.. खाऊन गेलास तर बरं वाटेल रे मला..” (रसिका स्वयंपाकघरात नाश्ता बनवत शशी सोबत बोलत होती)
“नको गं, मी निघतोय.. रश्मीचा फोन येऊन गेला, क्लायंट येत आहेत मिटींगसाठी शिवाय नवीन ऑफिसच्या उद्घाटनाचा दिवस जवळ येत आहे, बरेच काम राहिलेत अजून. चल भेटूया रात्री..बाय..”
इतकं बोलून शशी निघाला.
रसिका जरा निराश होऊन चहाचा कप हातात घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि बाल्कनीतल्या झुल्यावर चहा घेत बसली. तिच्या मनात बर्‍याच गोष्टी थैमान घालत होत्या. ती चहाबरोबरच विचारचक्रात गुंतली.
किती बदलला आहे शशी, पूर्वी मी प्रेम केलं तो हाच शशी आहे ना..सतत ऑफिस, क्लायंट, मिटिंगमध्ये गुंतलेला असतो..एक प्रसिद्ध उद्योगपती म्हणून नावाजलेला शशी एक पती म्हणून मात्र औपचारिक वागतो हल्ली..पूर्वीचे ते दिवस आठवले की कसं छान वाटत.. असं वाटत नको तो पैसा, नको ती प्रसिद्धी.. दोघांना एकत्र वेळ मिळत नसेल..संवादच होत नसेल तर काय फायदा ह्या संपत्तीचा..सगळं मातीमोल आहे..
विचारचक्र सुरू असतानाच दारावरची बेल वाजली आणि रसिका भानावर आली. कामवाली मावशी “गुड मॉर्नींग ताई” म्हणताच रसिकाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.
“काय मग ताई आज कोणतं पेंटिंग करणार तुम्ही…आधी तुमची पेंटिंग ची खोली‌ आवरते… तुम्ही म्हणालात ना‌ काल, खूप सारे पेंटिंग करायचे आहे..आर्डर का‌‌ काय आली आहे..”
रसिका आनंदी चेहऱ्याने मोठ्या उत्साहाने उत्तरली, “तुला‌ किती लक्षात राहतं गं मावशी, काल सहज म्हणून बोलले मी‌ तुझ्याजवळ..पण खरं आहे ते एक ऑर्डर आली आहे.. एकाच वेळी वीस वेगवेगळ्या पेंटिंग्ज ची.. तसं झालं आहे बर्‍यापैकी फ्रेम करून तयार आहेत पण देण्यापूर्वी फिनीशींग करते आज..आणि हो तुझे काम आटोपले की मला‌ पेंटींग्ज च्या पॅकिंग साठी मदत कर..” – रसिका.

“ताई तुमच्यासाठी काय पण बघा…चला‌ मी आवरते पटापट..” असं म्हणत मावशी कामाला लागली.

मावशीचं बोलणं रसिकाला खूप कौतुकास्पद वाटलं..इथे साधं माझ्या पेंटिंग च्या खोलीत शशी कधी डोकावत सुद्धा नाही..तुला‌ आवडतं तर तू कर पण मला‌ ह्या सगळ्यात काही रस नाही म्हणणारा शशी आणि एक हि कलेविषयी फारसं काही माहीत नसताना भरभरून कौतुक करणारी, नवीन ऑर्डर आली की माझ्या इतकीच उत्सुक असलेली‌ ही मावशी किती जमीन आसमानचा फरक‌ आहे दोघांमध्ये..असो,  चला‌ आज ऑर्डर पिक-अप साठी येणार आहे..पटापट‌ सगळं तयार करूया..( मनात असं सगळं पुटपुटत रसिका तिच्या आवडत्या पेंटिंग साठी स्पेशल तयार केलेल्या खोलीत गेली आणि सगळ्या पेंटिंग्ज कडे एक नजर फिरवत मनोमन आनंदी होत कुठे काही कमी जास्त वाटत नाही ना हे न्याहाळू लागली.)

शशीकांत आणि रसिका, दोघांची ओळख दोघांच्या एका कॉमन मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीत झाली. रसिका‌, त्यावेळी फाइन आर्ट्स मध्ये पदवी अभ्यासक्रमाला होती, दिसायला सुंदर, टपोरे डोळे, नाजूक अंगकाठी, उंच बांधा, आकर्षक दिसणारी रसिका पाहताक्षणी शशीला आवडली. दोघांची ओळख मैत्रीत आणि नंतर प्रेमात बदलली. पाच वर्षें दोघांचे प्रेमप्रकरण सुरू होते.
शशी‌ एमबीए करून वडिलांचा व्यवसाय बघायचा. अचानक आई वडिलांच्या अपघाती निधनानंतर घरची , व्यवसायाची सगळी जबाबदारी शशीवर येऊन पडली. शशी रुबाबदार, हुशार, आत्मविश्वासू तरुण..कमी वयात मेहनतीने घरचा व्यवसाय मोठ्या पातळीवर आणला…एक यशस्वी उद्योजक, प्रसिद्ध उद्योगपती म्हणून नावाजलेला. या सगळ्यात रसिका प्रत्येक वेळी त्याच्या साथीला होती. तिने स्वत:च आयुष्य जणू शशीला अर्पण करून टाकलं होतं. रसिका मुळे तो आई वडिलांच्या अपघाती मृत्यू नंतर सावरला, दोघांनी वर्षभराने लग्न केले.
शशी घरचा श्रीमंत त्यात एकुलता एक, आता तर यश , श्रीमंती त्याच्या पायाशी लोळण घेत होती. तेव्हा नोकरी करण्याची गरज नाही, हवं तर आपल्या ऑफिसमध्ये तू मला मदतीला ये असं तो रसिकाला सांगत असे पण तिचं स्वप्न वेगळं होतं. तिला तिच्यातल्या कलागुणांना वाव द्यायचा होता, अप्रतिम पेंटिंग करणारी रसिका, तिला स्वतः चा असा एक पेंटिंग स्टुडिओ उभारायचा होता, आपणही एग्झिबिशन मध्ये आपल्या कलेचं प्रदर्शन करावं, पेंटिंग घ्या माध्यमातून एक नवी ओळख बनवावी असे सुंदरसे स्वप्न होते तिचे.
शशीच्या आयुष्यात त्याला प्रोत्साहन देत, घर सांभाळताना तिचं स्वप्न मात्र मागे पडलं. शशी दिवसभर कामात व्यस्त, रसिका घरी एकटीच त्यामुळे वेळेचा सदुपयोग घेत घरीच काही तरी सुरवात करावी म्हणून एका खोलीत तिने पेंटिंग करायला सुरुवात केली, शशीला सरप्राइज द्यायचं म्हणून मोठ्या कौतुकाने पहिले पेंटिंग आणि तयार केलेली खोली दाखवली. पण शशी मात्र अरसिक , त्याने फार काही प्रतिक्रिया दिली नाही, तुला हवं ते तू कर, मला या सगळ्यात मला फारसा रस नाही, असं म्हणत रसिकाचा हिरमोड केला.
रसिकाला त्या क्षणी फार वाईट वाटले, आपल्याला व्यवसायातील काही माहीत नसताना‌ शशीला पाठिंबा दिला, आपलं स्वप्न बाजुला ठेवलं पण आज माझ्या कलेचं साधं कौतुक करायलाही नको‌ वाटलं शशीला. काही असो , मी माझं स्वप्न पूर्ण करणार..असा निश्चय करून रसिकाने अप्रतिम अशा‌ अनेक पेंटिंग्ज बनविल्या, शक्य त्या प्रकारे जाहिरात करून, काही वेबसाइट्स वर पेंटिंग्ज विकायला सुरुवात केली. तिच्या पेंटिंग्जला भराभर मागणी सुरू झाली. शशीला याविषयी काही माहितीच नव्हते, वेळच नव्हता त्याला‌ सगळं जाणून घ्यायला असं म्हणायला हरकत नाही ?
पूर्वी छोट्या मोठ्या ऑर्डर यायच्या पण आज सगळ्यात मोठी अशी ऑर्डर डिलीव्हर होणार होती.
मावशीच्या मदतीने सगळं पॅकिंग करून तयार‌ केले, काही वेळाने दोघेजण आले, लाख रुपयांचा चेक रसिकाच्या हातात देत ऑर्डर घेऊन गेले. आपल्या कलेचं रूपांतर‌ चक्क व्यवसायात झालं यावर तिचा विश्वास बसत नव्हता.
डोळ्यात आनंदाश्रु होते, पण आनंद वाटून घेणारा नवरा मात्र यात रस घेत नाही याची खंतही होतीच.
अशेच दिवस जात होते, रसिका तिच्या कलेत व्यस्त तर शशी व्यवसायात. रसिकाला आता चांगला प्रतिसाद मिळायला लागला होता.
एके दिवशी शशी नेहमीपेक्षा लवकर घरी आला, “रसिका, आज मी खूप खुश आहे..उद्या आपल्या नवीन ऑफिसचा उद्घाटन सोहळा आहे..किती‌ मेहनत घेतली मी आजच्या दिवसासाठी.. सकाळी मस्त तयार हो‌ बरं…मी गिफ्ट केलेली‌ गुलबक्षी रंगाची साडी नेस उद्या.. सकाळी लवकरच निघाव लागेल आपल्याला..” असं म्हणत तो खोलीत निघून गेला.
शशी कसाही वागला तरी रसिका त्याला कधी दुखवत नसे, स्वभावच नव्हता तिचा तो..
रात्री कितीतरी वेळ शशी त्याच्या यशाचे कौतुक रसिकाला सांगत होता, तिही चेहऱ्यावर हास्य आणून त्याला दाद देत होती.
सकाळी दोघेही तयार झाले, गुलबक्षी रंगाच्या साडीत रसिकांचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं, जसा शशी तिच्यासमोर आला तसाच म्हणाला, ” ब्युटिफुल… किती सुंदर दिसते आहेस तू..मला‌ आपली पहिली भेट आठवली आज तुला असं सजलेलं बघून..”
आज चक्क स्वारी तारिफ करताहेत म्हंटल्यावर रसिकालाही छान वाटलं, लाजून नजरेनेच खूप काही बोलून गेले दोघेही..?
“चला, उशीर होत आहे…” असं रसिका म्हणताच शशी भानावर आला, दोघेही निघाले.
ऑफिसमध्ये पोहोचताच रसिकाला आश्चर्याचा धक्का बसला, “अय्या, हि सगळी पेंटिंग्ज जी काही दिवसांपूर्वी मी डिलीव्हर केली ती इथे… म्हणजे ती मोठी ऑर्डर ज्या ऑफिससाठी होती ते हेच ऑफिस..” रसिकाला क्षणभर काहीच कळत नव्हते.. शशीला यातलं काही माहिती नाही आणि सांगायलाही नको असं विचार करत असतानाच शशी रश्मी ला घेऊन आला रसिका सोबत ओळख करून द्यायला. रश्मी रसिकाला बघताच आश्चर्याने “मॅम, तुम्ही..म्हणजे सर रसिका मॅम तुमच्या मिसेस..”
शशी गोंधळलेल्या अवस्थेत, “रश्मी, तू कशी ओळखतेस रसिकाला…म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच भेटत आहात…रसिका ही, रश्मी माझी असिस्टंट..हिनेच सगळं सजावट, आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे..पण तुम्ही एकमेकींना कशा‌ ओळखता..”
“सर, आपल्या ऑफिससाठी पेंटिंग्ज सिलेक्ट केल्या मी, त्या सगळ्या मॅम कडूनच घेतल्या आहेत.. अप्रतिम कलाकार आहेत मॅम..पण मला खरंच माहीत नव्हतं की या तुमच्या मिसेस आहेत..”
हे ऐकताच शशीला आश्चर्याचा धक्का बसला.. म्हणजे रसिका तू इतकी मोठी कलाकार झालीस आणि मला कळाले सुद्धा नाही..मीच मुळात रस घेतला नाही..खरंच मला अभिमान वाटतो आहे तू माझी अर्धांगिनी असल्याचा..( रसिकाकडे अपराधी नजरेने बघत शशी मनोमन सगळं बोलत होता.)

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ऑफिसचे उद्घाटन झाले, सगळ्यांनी ऑफिस बघताना‌ सजावटीला लावलेल्या पेंटिंग्ज चे भरभरून कौतुक केले.. रसिकाच्या म्हणण्यावरून रश्मी आणि शशी ने तिथे उपस्थित कलाकाराविषयी कुणालाही काही सांगितले नाही..रसिकाला प्रसिध्दीची हाव‌ नव्हती..आपल्या कलेचं इतकं कौतुक होताना‌ बघूनच ती सुखावली होती.. पण सगळ्यांकडून बायकोने केलेल्या त्या अप्रतिम पेंटिंग्ज चे कौतुक बघता आज शशी अजूनच तिच्या प्रेमात पडला..त्याची चुक त्याला आपसुकच समजली…आपण रसिकाला गृहित धरून चाललो.. तिच्यातल्या कलेला प्रोत्साहन देण्याऐवजी अरसिक भावना दाखवली याच त्याला खूप वाईट वाटलं.

परत येताना दोघे एकमेकांच्या नजरेत बघून खूप काही बोलत होते.. रेडिओ वर त्याच क्षणी गाणं सुरू झालं “तू जहा जहा चलेगा..मेरा साया.. साथ होगा…मेरा साया….मेरा‌ साया…”?

कथा कशी वाटली हे नक्की कळवा ??
नावासह शेअर करायला हरकत नाही.

अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed