निर्णय चुकले की आयुष्य चुकत जाते..

Inspirational-Social issues

समिधा आणि अजय, कॉलेजमध्ये एकत्र शिकायला होते. समिधा देखणी, अतिशय उत्साही, मेहनती आणि मनमिळावू मुलगी. कुणालाही काही अडचण असो, ती मदतीला तत्पर असायची, त्यामुळे सगळ्यांची लाडकी. अजयला तिचा हाच गुण खूप आवडायचा. अजय म्हणजे शांत, संकोची स्वभावाचा आणि हुशार मुलगा. समिधा त्याला सुरवाती‌ पासूनच खूप आवडायची पण तिला अचानक प्रेमाची कबुली दिली तर ती ते स्विकारेल की नाही या भितीने तो काही बोलला नाही. दोघांची चांगली मैत्री होती पण समिधाच्या मनमिळावू स्वभावामुळे तिचे बरेच मित्र मैत्रिणी होते. अजयला मात्र समिधा जवळची मैत्रीण, बाकी काही मोजकेच मित्र. कॉलेज संपत आले तेव्हा शेवटच्या दिवसात मोठी हिम्मत करून अजयने समिधाला प्रपोज केले, तिने त्यावेळी काहीच उत्तर दिले नाही, अजय जरा नाराज झाला. पण कॉलेज नंतर योगायोगाने नोकरीसाठी दोघेही एकाच शहरात आले, परत त्यांच्या भेटी गाठी सुरू झाल्या. अजय समिधाच्या प्रेमात आकंठ बुडाला होता, समिधा लाही आता अजय आवडायला लागला, अजयने परत एकदा तिला विचारले असता तिने लगेच होकार दिला. समिधाच्या घरी मात्र तिच्यासाठी स्थळ बघण्याची तयारी सुरू झाली, समिधाने घरी अजय विषयी सांगितले पण आंतरजातीय प्रेमविवाह तिच्या वडीलांना मान्य नव्हता. तिने खूप समजविण्याचा‌ प्रयत्न केला पण घरी ते मान्य नव्हते. इकडे अजयच्या घरीही तिचं परिस्थिती. अशा परिस्थितीत अजय काही निर्णय घेत नव्हता पण समिधाला इतकंच म्हणायचा की “तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही, काही झालं तरी लग्न तुझ्याशीच करणार.” समिधाचीही तिचं मनस्थिती होती. कितीतरी महीने झाले पण दोघांच्याही घरचे त्यांच्या लग्नाला तयार नव्हते. शेवटी समिधा आणि अजयने कोर्ट मॅरेज करायचे ठरवले. मित्र मैत्रिणींच्या मदतीने सगळी तयारी झाली. तारीख, वेळ निश्चित करण्यात आली,  समिधा ठरल्याप्रमाणे मैत्रिणी सोबत रजिस्ट्रेशन ऑफिसला आली पण अजय काही आला नाही, त्याचा फोनही लागत नव्हता, किती वेळ त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्याचा मॅसेज आला, “घरच्यांना धोक्यात ठेवून मी लग्न करू शकत नाही. तू मला विसरून जा. त्यातच आपलं भलं आहे.”
त्याचा असा मॅसेज वाचून समिधा हादरली, आई वडिलांचा विरोध पत्करून त्याच्या प्रेमापोटी सगळं सोडून ती आली होती आणि अजयने मात्र तिचा विश्वासघात केला. समिधाचे आई वडील राहायचे त्या गावात अशी बदनामी झाली की समिधाने पळून जाऊन दुसऱ्या जातीच्या मुलाशी लग्न केले.
झाल्या प्रकाराने समिधाच्या वडिलांना धक्का बसला, यापुढे आमच्याशी तुझ्याशी काही संबंध नाही असे बोलून त्यांनी तिला कायमचे पोरके केले. समिधा मुळे आपल्याला मान खाली घालायची वेळ आली, तिच्यामुळे गावात अपमान झाला तेव्हा आता तिला आता माफी नाही अशी तिच्या वडिलांची भूमिका झाली होती. समिधा पूर्ण पणे एकटी पडली होती. मित्र मैत्रिणींकडून कळाले की घरच्यांच्या दबावाखाली येऊन अजयने असा निर्णय घेतला, पण मग समिधाच्या प्रेमाचं काय, तिचा विश्वासघात केला त्याच काय..अशे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले.
माहेरी स्थान नाही आणि प्रेमाने पाठ फिरवली अशा परिस्थितीत स्वतः ला सावरणे तिच्या साठी कठीण झाले होते. ती सतत शक्य त्या मार्गाने अजय सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होती पण काही फायदा नव्हता, इकडे आई वडिलही तिच्याशी बोलायला, तिची अवस्था समजून घ्यायला तयार नव्हते. अशात ऑफिसमध्ये सुद्धा तिचं मन लागत नव्हतं, किती तरी दिवस ती एकटीच घरात रडत बसून राहिली. झाल्या प्रकारामुळे समिधा खचून गेली होती, सतत एकच विचार तिच्या मनात येत होता, “अजयवर इतका विश्वास न ठेवता आई वडिलांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता तर आज परिस्थिती वेगळी असली असती.”
या सगळ्याचा तिच्या मनावर खूप परिणाम झाला, तिने स्वतःला दोष देत आत्महत्येचा प्रयत्न केला, मित्र मैत्रिणींमुळे तिचे प्राण वाचले पण एका चुकीच्या निर्णयामुळे आयुष्य चुकत गेले. पुढे स्वतःला‌ कसं बसं सावरत ती जगत होती, आता प्रेम या गोष्टीवरचा तिचा विश्वास उडाला होता, अशातच तिची नोकरीही गेली. ती मानसिक आजाराची बळी ठरली, आता महीलाश्रम हाच तिचा शेवटचा आधार बनला. जेव्हाही तिला भूतकाळ आठवायचा तेव्हा एकच विचार मनात यायचा, ” तेव्हा विचार पूर्वक निर्णय घेतला असता तर आज परिस्थिती वेगळी असली असती.”

हि कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, पण वास्तविक आयुष्यात अशा घटना‌ घडताना दिसतात. आयुष्यात एखादा निर्णय चुकला की पुढचे आयुष्य चुकतच जाते. तेव्हा आयुष्याचे निर्णय काळजीपूर्वक घेणे गरजेचे असते.

© अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed