सात मुली नंतर आठवा मुलगा झाला…

Parenting-Social issues

आजच्या विज्ञान युगात आठ वेळा बाळंतपण, ऐकूनच धक्का बसतो ना…कामवाल्या मावशी अतिशय आनंदाने सांगत होत्या की माझ्या बहिणीला वारीस जन्माला आला, सात मुली नंतर आठवा मुलगा झाला.

ते ऐकून आश्चर्यने त्यांच्या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी कळत नव्हते. आजच्या काळात आठ वेळा बाळंतपण. त्या मात्र अतिशय आनंदात होत्या.

जरा वेळ विचारात गुंतून भानावर आले आणि त्यांना म्हणाले “मावशी, अहो मुलगा असो की मुलगी आजकाल इतका भेद नाही राहीला. मुलगा व्हावा म्हणून इतके वेळा बाळंतीण झालेल्या बाईची काय अवस्था झाली असेल शिवाय त्यांच्या हातात नाही ना मुलगाच व्हावा ते.”

त्यावर मावशी म्हणतात ” ताई तुम्ही सुशिक्षित, शहरात राहता म्हणून तुम्हाला तसं वाटतं. गावाकडे असं न्हाय, वारीस नसला‌ की बाईच्या जातीला लय टोमणे मारतात बघा. त्यासाठी बहीणीनं नवस केला, तेव्हा मुलगा झाला. सगळ्यात मोठ्या मुलीचं अनं आईचं बाळंतपण एकाच वेळी पाठोपाठ झालं बघा. लेकीला मुलगा झाल्यावर आईला आठवड्यानंतर मुलगा झाला. भाच्याच्या पायगुणानं मामा जन्माला आला बघा ”

मावशीचे उत्तर ऐकून धक्काच बसला, चक्कर येणेच बाकी राहिले. अजूनही अशे विचार, अशी परिस्थिती आजुबाजुला आहे हा विचार कधी केला नव्हता. त्यात सगळ्यात मोठ्या मुलीचं आणि आईचं बाळंतपण एकाच वेळी हे ऐकून तर आश्चर्याने ताणलेल्या भुवया पूर्वस्थितीत यायला बराच वेळ लागला. मावशी सगळं सहजरीत्या आनंदात सांगून गेल्या. मी मात्र अजूनही आश्चर्याच्या धक्क्यातच होते.

आई होणं हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात आनंददायी अनुभव आहे, मग मुलगा असो वा मुलगी. या सगळ्या नैसर्गिक गोष्टी असताना मुलगाच व्हावा म्हणून बाईच्या जीवाचा, तिच्या वेदनेचा विचार न ‌करता तिला मुलगी झाली म्हणून मानसिक छळ कितपत योग्य आहे. मुलगा नाही म्हणून टोमणे ऐकायचे पण ते खरंच तिच्या हातात आहे का. आठ वेळा बाळंतपण झाल्यावर तिची शारीरिक अवस्था काय झाली असेल. केवळ समाजात टोमणे नको, मुलगा होत नाही म्हणून नवरा सोडून देयील या भितीने हे सगळं सहन करणे हाच यावर उपाय आहे का.

ग्रामिण भागात अजूनही अशे विचार जिवंत आहेत. अजूनही मुलगा होत नाही म्हणून सासरी छळ, नवर्‍याने सोडून दिले असले प्रकार सुरू आहेत. ही परिस्थिती खरंच बदलायला हवी. यासाठी स्त्रीनेच पाऊल उचलायला हवे, खंबीर व्हायला हवे. अशा परिस्थितीतून गेलेल्या आईने मुलीलाही अशाच विचारांचे घडवले, अन्याय सहन करत राहिले तर ही परिस्थिती बदलणे खरंच खूप कठीण आहे.

अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed