रीयाने आनंदात अमेयला फोन केला आणि तिचं लग्न ठरल्याची बातमी अगदी उत्साहाने सांगितली. जय म्हणजेचं रीयाच्या होणार्या नवर्याचे अगदी मनापासून वर्णन करताना तिचा आनंद अमेयला तिच्या बोलण्यात जाणवत होता. तिच्या अपेक्षेप्रमाणे जय तिच्यासाठी किती परफेक्ट आहे हे ती उत्साहाने सांगत होती. अमेय शांतपणे सगळं ऐकत होता, काय बोलावे त्याला सुचत नव्हतं, मनापासून तुझं अभिनंदन, तू खूश आहे हे ऐकून छान वाटले एवढंच तो बोलला. रीयाला त्याच्या बोलण्यात आज खूप फरक जाणवला. रीयाने विचारले, ‘”काय झालं अमेय, तू आज इतका शांत कसा , नेहमी तर माझी खिल्ली उडवत असतोस. मी किती अल्लड आहे हे मला पटवून देत असतोस, आज मी इतकी छान बातमी सांगितली पण तू मात्र आनंदी नाही असं वाटत आहे मला. सांग ना काय झाले, तू माझ्यासाठी खूश आहेस ना”.
“रीया अगं मी तुझ्यासाठी खरंच खूप खुश आहे, तुला हवा तसा जोडीदार तुला मिळाला हे ऐकून खरंच छान वाटले मला. तुझं जय बद्दलच वर्णन ऐकून तू आता अल्लड नसून मॅच्युअर झाली आहे हे मला जाणवलं. पण माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आता माझ्यासोबत जास्त बोलू शकणार नाही, माझे चांगले वाईट अनुभव, माझी प्रेमप्रकरणं आता मी कुणाजवळ सांगणार, छोट्या छोट्या गोष्टींवरून कुणाची खिल्ली उडवणार मी म्हणून जरा उदास झालो एवढंच.” अमेय बोलला.
अमेयचं उत्तर ऐकून रीयाला काय बोलावे कळत नव्हते, काही क्षण शांतता पसरली. एकीकडे आनंद तर एकीकडे मैत्री आता जरा कमी होणार म्हणून उदासीनता अशी दोघांची मनस्थिती झाली.
आपली मैत्री अशीच राहणार असं म्हणत रीयाने शांतता दूर करण्याचा प्रयत्न केला पण त्यावर अमेय तिला समजूत सांगत म्हणाला “रीया अगं तुझ्या आयुष्यात आता एक स्पेशल व्यक्ती आहे तो म्हणजे जय, तुझ्या आयुष्यातील पहिलं प्रेम, पूर्ण आयुष्य तुम्ही एकत्र घालवणार आहे, आपल्या दोघांना माहित आहे की आपण खूप छान मित्र आहोत पण सगळ्यांना अशी मैत्री पटेल असं नाही. मी तुला आता डिस्टर्ब करणार नाही, जय आणि तू हे दिवस खूप एंजॉय करा. आपल्या मैत्रीमुळे त्याला उगाच काही गैरसमज नको. अधूनमधून आपण बोलायला हरकत नाही पण नको तू छान वेळ दे त्याला, समजून घे जय ला आणि हो कधीही माझी आठवण आली, काहीही मदत लागली तर बिंदास सांग मला.” अमेयचं हे बोलणे ऐकून रियाने हो..चालेल.. बाय.. टेक केअर म्हणत फोन ठेवला.
रीया आणि अमेय शाळेपासून चांगले मित्र मैत्रीण. अमेय अतिशय बिंदास मनमोकळ्या स्वभावाचा, बडबडा, नेहमी हसत खेळत, कॉमेडी मूड मध्ये असणारा पण सगळ्यांना मदत करायला तयार. रीया अगदी अल्लड, शांत, साधी भोळी मुलगी. रीयाला मित्र मैत्रीणी मोजकेच होते पण त्यात अमेय तिचा चांगला मित्र होता. त्याची सगळी प्रकरणं, मज्जा मस्ती तो तिला सांगायचा. रीया किती साधी भोळी आहे, तिला कुणी किती सहज फसवू शकतं ही जाणीव तिला करून द्यायचा. अमेयची गर्लफ्रेंड उच्च शिक्षण घेण्यासाठी विदेशी गेलेली त्यामुळे त्यांचं फार काही बोलून होत नसे पण तिची आणि अमेयची लव स्टोरी, त्यांची भांडणं, सरप्राइज अशे चांगले वाईट अनुभव तो रिया जवळ शेअर करायचा. रीया अमेय मुळ माणसं ओळखायला शिकली होती, कुठल्याही परिस्थितीत आनंदी कशे राहायचे हे तिला अमेय मुळे कळाले होते. इतके चांगले मित्र मैत्रीण असून एकमेकांचा आदर त्यांना होता, पवित्र अशी त्यांची मैत्री होती.
फोन ठेवल्यानंतर रीया विचार करू लागली की मुलगा मुलगी ह्यांच्यात मैत्रीचं नातं नसू शकते का. लग्न होणार म्हणून अशी मैत्री अचानक कमी, का तर उगाच नवर्याला गैरसमज नको, तिला जरा विचित्र वाटले. आता आधी सारखा वेळ मित्र मैत्रीणी सोबत घालवता येणार नाही हे मान्य कारण आता नवं आयुष्य सुरु होणार, प्रायोरिटी बदलणार पण नविन आयुष्यात अशा मैत्रीमुळे गैरसमज नको हे तिला काही पटत नव्हते. ज्या पवित्र मैत्रीमुळे ती खरं जीवन जगायला शिकली, माणूस ओळखायला शिकली, कुणी आपली सहज फसवणूक करू शकते पण अमेय मुळे असं काही झालं नाही, बर्याच नविन गोष्टी अमेय मुळे आपल्याला कळायला लागल्या हे ती कधीच विसरू शकत नव्हती. असं हे नातं अनोळखी का आहे याचे उत्तर मात्र तिला मिळत नव्हते.
तुमच्या मते या अनोळखी नात्याबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्की कमेंट मध्ये लिहा.
– अश्विनी कपाळे गोळे
Comments are closed