नवरा बायको, म्हणतात ना एका संसार रुपी रथाची दोन चाके आहेत. खरंच आहे ते. नविन लग्न झाल्यावरचा तो हवाहवासा वाटणारा एकमेकांचा प्रेमळ सहवास. त्याने केलेलं तिचं कोतुक, मग ते जेवण बनवण्यावरुन असो किंवा तिच्या दिसण्यावरुन. त्यावर तिचं लाजणं. प्रत्येक गोष्टीचा दोघांचा पहिला अनुभव न विसरता येणारा. किती गोड असतात ते दिवस. या नात्यात वेगळाच गोडवा असतो. नविन घरात तोच एक अगदी जवळचा, हक्काचा वाटतो. आयुष्यात त्याच्या असल्यानं किती सुरक्षित वाटत असतं. तिचं सगळं विश्व त्याच्या अवतीभवती असतं. एकमेकांच्या आवडीनिवडी, सवयी समजून घेणं, त्यात साम्य असले तर होणारा तो आनंद. जीवनातील सुंदर अनुभव असतो तो.
तेव्हा सगळं अगदी गोडगोड असतं. सुरुवातीच्या काही वर्षांत सगळं छान छानच असते.
हळूहळू जबाबदारी दिसू लागते. एकमेकांच्या सवयी आवडेलच याची खात्री नसते, मग सुरू होते तू तू मी मी पण तरीही तू आणि मी. एकमेकांकडून नकळत अपेक्षा वाढतात, पूर्ण होत नसेल तर चिडचिड होते. पण प्रेम मात्र कमी होत नसते. दोघांच्या भांडणात, रुसवा फुगवा दूर करण्यात एक मज्जाच असते.
भांडण झाले की समजूत काढायची जबाबदारी त्याचीच असते. हळूहळू मुलांच्या येण्याने एक वेगळाच आनंद, प्रेम दोघांमध्ये असतं. मुलांचे संगोपन करण्यात, घर, नोकरी सांभाळण्यात ती खूप थकून जाते पण तिचे कष्ट बघून त्याने प्रेमाने मिठी मारली की ती सगळं विसरून जाते. आई म्हणून संस्कार, मुलांची देखरेख ती करत असेल तरी त्यांच्या भविष्याची काळजी त्याला असतेच. त्यासाठी कुठे गुंतवणूक करावी, घरखर्च, बायको मुलांची हौसमौज करत तो सगळा गाडा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्नशील असतो. दोघांनी एकमेकांना समजून घेणं, प्रेम, विश्वास जपणं तितकंच महत्त्वाचं असतं. खुप गोड असं हे दोघांचं नातं असतं. या सगळ्यात दोघांचं नातं घट्ट होत जातं, प्रेम वाढतच असतं. दोघांनीही एकमेकांची खुप सवय झाली असते. दोघांचे एक सुंदर नाते निर्माण झालेले असते.
त्याच्याशिवाय ती आणि तिच्याशिवाय तो अपूर्णच असतात. दोघांनीही समजून घेवुन विश्र्वासानं हे नाजूक जन्मभराचं नातं जपण्याची गरज असते. जसजसे वय वाढत जाते, मुले मोठी होतात तसतशी एकमेकांची जास्त गरज भासू लागते. संसाराचा गाडा सुरळीत चालवायला खरंच दोघांचीही गरज असते.
अश्विनी कपाळे गोळे
Comments are closed