Extramarital Affair – भाग १

Love Stories

“सुजय, मला एक संधी दे ना रे..मी खरंच चुकले अरे.. भावनेच्या भरात वाहवत गेले…एकदा माफ कर ना‌ रे मला.. माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर…प्लीज सुजय..एकदा संधी दे मला…” आभा रडत रडतच सुजय ला नातं टिकवण्यासाठी एक संधी मागत होती.
सुजय (भावनिक होऊन राग व्यक्त करत) उत्तरला- “प्रेम..‌…माझ्यावर… आणि तुझं..ते असतं तर अशी वागली नसती आभा तू….माझ्या भावनेचा एकदा तरी विचार केलास असं वागताना..हे सगळं करताना‌ कधी माझा चेहरा तुझ्या नजरेसमोर कसा नाही आला… विश्वासघात केला तू…एकदा विचार कर .. तुझ्या जागेवर मी असतो.. असं वागलो असतो तर तू मला संधी दिली असतीस..कुठे कमी पडलो गं मी…आपल्या संसारासाठीच तर सगळी धडपड करतोय ना…तुला कुठल्या गोष्टीची कमतरता भासू नये, तुझ्या आवडीनुसार जगता यावं यासाठी शक्य तो प्रयत्न करतो… कोणतीही गोष्ट करायला नाही म्हणालो का मी तुला आता पर्यंत…पण तू मात्र माझा जराही विचार केला नाहीस…धोका दिला तू मला..माझ्या प्रेमाला…”
आभा ( अपराधी भावनेने रडत ) – ” सुजय, मी चुकले..मी खरंच अपराधी आहे तुझी..माझी चूक मी मान्य करते…पण असं म्हणू नकोस रे…मला‌ एक संधी दे..मी वाहवत गेले रे.. माझं त्याच्याकडून खेळताना होणारं‌ कौतुक, दिसण्यावरून होणारी माझी स्तुती, रोज छान छान कॉंप्लीमेंटस ऐकून मी भारावून गेले होते… नकळत मला‌ एक वेगळीच ओढ लागली होती…त्याचा सहवास हवाहवासा वाटायला लागला होता..पण हे एक आकर्षण होतं सुजय… विश्वास ठेव माझ्यावर…तुझा‌ विचार मनात येत नव्हता असं नाही रे..मलाही कळत होतं, आमच्या नात्याला काही भविष्य नाही..क्षणिक सुखाच्या मोहात अडकले होते रे मी…तू इथे नसताना‌ एकटी पडायचे.. त्याच्या सोबत एकटेपणाचा विसर पडला…वाहवत गेले मी भावनेच्या भरात..पण मला माझी चूक कळते आहे सुजय…मला‌ प्लीज माफ कर..” (एवढं बोलून आभा ढसाढसा रडायला लागली)
आभा इतकी चुकिची वागली असली तरी तिला असं रडताना‌ पाहून सुजयला‌ खूप वाईट वाटत होतं.. स्वतःच्या भावनांना सावरत आभाला जड अंतःकरणाने तो म्हणाला, “आभा, तू शांत हो… चूक तुझी नाही..मीच कमी‌ पडलो तुझ्यावरचं प्रेम  व्यक्त करण्यात.. पण प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते गं… तोंडभरून स्तुती केली, छान छान बोललं तरच प्रेम व्यक्त होतं का..तुला बॅडमिंटन खेळण्याची आवड आहे म्हणून तुला स्पोर्ट्स क्लब जॉइन करायला लावला ना‌ मी..ते प्रेम नाही…तुला फिरायला आवडतं म्हणून वर्षातून दोनदा तरी आपण नवनव्या जागी ट्रिप काढतो..तुला शॉपिंग करायला‌ आवडते म्हणून मी महीन्याला एक‌ वेगळी रक्कम तुला देतो मनसोक्त शॉपिंग कर……हवं ते घे म्हणत… तुला हॉटेलिंग आवडतं म्हणून शहरातलं प्रत्येक हॉटेलमध्ये आपण डेट वर गेलो…तुला कधी ताप आला तरी रात्र रात्र झोप लागत नाही मला..मी बिझनेस टूर वर असलो तरी तुझा चेहरा सतत डोळ्यापुढे असतो माझ्या..हे प्रेम नाही…मनात भावना महत्वाच्या की फक्त शब्दांनी स्तुती केलेली महत्वाची हे तूच ठरव..तुला माझ्या प्रेमावर शंका‌ असेल तर तुझा निर्णय घ्यायला तू मोकळी आहेस..”
“असं म्हणू नकोस सुजय…मी चुकले रे… माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर..पण तुझ्या बिझनेस ट्रिप..मिटिंगस.. आठवडा आठवडाभर टूर..या सगळ्यामुळे मला खूप एकटं वाटू लागलं होतं…तशातच आमची मैत्री झाली…मला‌ तुला दुखवायचं नव्हतं रे पण माझ्याकडून नकळत सगळं घडलं.. विश्र्वास ठेव माझ्यावर…”
” कसा विश्र्वास ठेवू आभा… ‘कालची रात्र मी कधीच विसरू शकत नाही..तू खूप सॉलिड आहेस…आय लव्ह यू..’ असाच मेसेज आला ना‌ सकाळी तुला मनिष चा… चुकून मला तो दिसला म्हणून हे उघडकीस आलं..तुझ्या वागण्यातला बदल मला‌ जाणवत होता पण विश्वास होता माझा तुझ्यावर, मी विचारण्याचा प्रयत्न केला पण तू काही सांगत नव्हतीस..आज मला कळालं..तुला माझ्या जवळ यायला का आवडत नव्हतं इतक्यात..तू मला धोका देत होतीस आभा…मला खरंच विश्र्वास बसत नाहीये..नवरा बायकोचं नातं एका विश्वासावर, प्रेमावर अवलंबून असतं..पण आता आपल्या नात्यात एक तडा गेला आहे..तो‌ कसा भरून काढायचा ..तूच सांग..मी माफ करेनही पण माझ्या मनावर जी जखम झाली ती तर‌ कायमची राहील ना… त्याच काय…बोल आभा बोल.. ”
आता मात्र आभा निशब्द झाली…

आभा दिसायला सुंदर, मध्यम बांधा, चाफेकळी सारखे नाक, कुणीही बघता क्षणी मोहात पडेल असं सौंदर्य..सुजय हुशार, देखणा, मनमिळावू मुलगा…
सुजय आणि आभाचे वडिल चांगले मित्र त्यामुळे आधीपासूनच दोघांची मैत्री होती..सुजयला‌ आधी पासूनच आभा आवडायची..त्याने प्रपोज केल्यावर जास्त आढेवेढे न घेता तिने होकार दिला..दोघांचे लग्न झाले.. लग्नापूर्वी सुजय तिला भेटायचा, दोघे खूप फिरायचे.. सिनेमा.. शॉपिंग… स्पेशल वागणूक यामुळे आभा खूप आनंदी होती… सुजयची नोकरी मार्केटिंग क्षेत्रात असल्याने त्याला बरेचदा वेगवेगळ्या शहरात, कधी परदेशात बिझनेस टूर वर जावं लागायचं. या सगळ्यामुळे लग्नानंतर मात्र हवा तितका वेळ तो आभाला देऊ शकत नव्हता. शिवाय सुजय जरा अबोल त्यामुळे प्रत्येक गोष्ट शब्दांत सांगायचं त्याला फारसं जमत नव्हतं. प्रेम मनात असल पाहिजे, वरवर बोलून व्यक्त केले तेच प्रेम असतं असं नाही अशा‌ विचारांचा तो.
आभाला बॅडमिंटन खेळण्याची आवड लहानपणापासूनच होती, एकटेपणा जाणवायला‌ नको म्हणून सुजय च्या सांगण्यावरून आभाने परत स्पोर्ट्स क्लब जॉइन केला, तिथे तिची ओळख मनिष सोबत झाली.
मनिष अगदी चार्मिंग पर्सनालिटी, दिसायला हिरो, पिळदार शरीरयष्टी, बोलण्यात गोडवा, अगदी सहज कुणीही प्रेमात पडेल असाच.
पहिल्या दिवशी आभा बॅडमिंटन खेळायला गेली, तेव्हा योगायोगाने मनिष सुद्धा खेळण्यासाठी पार्टनर शोधत होता.. तेव्हाच पहिल्यांदा दोघे एकमेकांच्या समोर आलेले..मनिष ची पिळदार शरीरयष्टी, खेळण्याची, बोलण्याची स्टाइल बघून आभा त्याच्याकडे बघतच राहिली. खेळून झाल्यावर मनिष आभाला हात पुढे देत म्हणाला, “हाय, मी मनिष, रोज येतो खेळायला.. तुम्ही आज पहिल्यांदाच? बाय द वे, तुम्ही खूप छान खेळता… जितक्या सुंदर दिसता तितक्याच छान बॅडमिंटन खेळता..? आय होप यू डोन्ट माईंड..”
आभाला त्यावर काय बोलावे सुचेना, हसतच हात पुढे देत ती म्हणाली,”थॅंक्यू सो मच..मी आभा..आजच पहिला दिवस क्लब मधला.. पूर्वी कॉलेजमध्ये असताना खेळायचे पण आज खूप दिवसांनी खेळले.. तुम्ही सुद्धा खूप छान खेळता.. बरं ज्यूस घ्यायचा का…इथे बाजुला ज्युस सेंटर आहे..मला‌ खरंच गरज आहे.. खूप दिवसांनंतर खेळले ना..”
“ऑफ कोर्स..चला‌ जाऊया.. तुम्ही इतक्या प्रेमाने ऑफर केल्यावर नाही कसं म्हणायचं..? ” -मनिष .
दोघेही ज्युस पिण्यासाठी निघाले.. ज्युस घेताना पूर्ण वेळ मनिष आभाच सौंदर्य न्याहाळत होता.. त्याच असं एकटक बघणं बघता आभा म्हणाली, “हॅलो मिस्टर मनिष, असं काय बघताय मला.. माझं लग्न झालं आहे बर‌ का..???”
जरा भानावर येत मनिष म्हणाला,
“ओह..रिअली ..तुमने तो‌ मेरा दिल तोड दिया… अरे खरंच वाटत नाही तुझं लग्न झालं आहे..असो… तुम्हीं खूप छान दिसता.. कसं मेन्टेन केलंस मॅडम.. नाही म्हणजे लग्नानंतर मुली जरा जाड होतात.. तुम्ही मात्र अगदी वेल मेन्टेन..क्या राज है..”
“अरे, प्लीज राज वगैरे काही नाही..एकच वर्ष झालं आमच्या लग्नाला.. आणि अजून एक असं तुम्ही आम्ही नको..तू‌ म्हणं मला सरळ..”
“ओके मॅडम..तू‌ पण मला तू म्हणं मग.. फ्रेंड्स…” असं म्हणत मनिषने फ्रेंडशिप साठी हात पुढे केला..
एकमेकांच्या नजरेत बघून दोघांनी हात मिळवून फ्रेंडशिप मान्य केली.

पुढे आभा आणि मनिषचे नाते कसे बहरत जाते, त्याचा आभा आणि सुजय च्या संसारावर काय परिणाम होतो, सुजय आभाला माफ करेल का..अशे अनेक प्रश्न पडले असणार ना तुम्हाला..?
तर पुढे काय होते हे जाणून घेऊया पुढच्या म्हणजेच अंतिम भागात.
पुढचा भाग लवकरच…

हि कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविकतेशी संबंध आढळल्यास केवळ योगायोग समजावा.

कथेचा हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा ?

© अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed