वडिल

Relations

“आई असते जन्माची शिदोरी,जी सरतही नाही आणि उरतही नाही”तसेच वडील म्हणजे ते , जे म्हणतात “सोड ती चिंता सारी, आनंदात रहा तू बाळा, तुला असं उदास बघून मला लागत नाही डोळा”.

हे अगदी खरं आहे. आपल्या मुलांच्या आनंदात वडीलांचे सुख असते. कुटुंबाला आनंदात ठेवण्यासाठी वडील सतत धडपडत असतात. ऊन पाऊस कशाचही विचार न करता रोज घराबाहेर पडतात. पैसा कमावण्यासाठी कितीही कष्ट करावे लागले तरी ते कुटुंबप्रमुख म्हणून आयुष्यभर झटत असतात.

कुटुंबाच्या दैनंदिन गरजा, मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद, घर, गाडी अशा अनेक जबाबदारी सतत त्यांच्या डोळ्यासमोर असते. आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी सतत ते प्रयत्नशील असतात. बायकोला, मुलांना कशाचीही कमी पडू नये म्हणून स्वत: साठी ते कधी काही घेणार नाही.

मुलांच्या संगोपनात आईचा वाटा मोठा असला तरी त्यांच भविष्य उज्ज्वल बनविण्यासाठी वडीलांचा मोलाचा वाटा असतो. ते व्यक्त करत नसेल पण वडिलांचा मुलांवर जास्त जीव असतो. त्यात जर ते मुलीचे वडील असेल तर ती सासरी जाताना सगळ्यात जास्त हळवे वडीलच होतात. प्रत्येक मुलीचं पहिलं प्रेम हे तिचे वडील. मुलांसाठी ते हिरो असतात, एक आदर्श असतात.

आई जन्म देते, वेदना सहन करते पण त्याच वेळी अगदी भावुक होऊन आई आणि बाळ सुखरूप असू दे म्हणून प्रार्थना करतात ते वडील. बाळाला बघून त्यांना जबाबदारीची जाणीव होते, त्याच्या उज्वल भविष्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. चांगल्या शाळेमध्ये मुलांना टाकायची धडपड ते करतात. उच्च शिक्षणासाठी सगळी तरतूद ते करून ठेवतात.

त्यांच्या खांद्यावर बसून आपण हे नविन जग बघतो. अगदी सुरक्षा कवचाप्रमाणे ते आपल्या पाठीशी उभे असतात. कितीही मोठे संकट आले तरी वडील पाठीशी तटस्थ उभे राहतात, हिंमत न हारता संकटांना सामोरे जातात.

स्वतः बसमधून प्रवास करतील पण मुलांना गरजेनुसार ते गाडी घेऊन देणारच. स्वतः फाटके चप्पल बूट शिवून घालतील पण मुलांना नीटनेटकेच ठेवणार. स्वतः टपरा मोबाईल वापरून, मुलांना महागडा मोबाईल घेऊन देतात.

ज्या घरात वडील नाही त्या घरात मुलांवर कमी वयात सगळी जबाबदारी पडते, सतत वडिलांची कमी भासते. वेळ आली की वडील आई होऊन मुलांचे संगोपनही करतात.

खरंच वडील कुटुंबाचा मोठा आधार असतात, कुटुंबाला कवच असतात, त्यांचे मजबूत हात सतत कुटुंबाच्या रक्षणासाठी, आनंदासाठी तत्पर असतात.

अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed