साथ लाभली वृद्धाश्रमाची…

Parenting-Relations-Social issues

Momspresso नी दिलेल्या “एक वेळ अशी येते जेव्हा शब्दांची नाही तर सोबतीची गरज असते” या विषयाला अनुसरून एका स्पर्धेसाठी मी लिहिलेला हा एक लेख आहे.

साठे आजींच्या आकस्मिक मृत्यू नंतर आजोबा अगदी एकटे पडले. साठे आजी आजोबा म्हणजे अगदी हसमुख, प्रेमळ जोडपं. दोघांची सत्तरी जवळ आलेली पण एकमेकांची थट्टा मस्करी मात्र अगदी लहान मुलांप्रमाणे.? एक दिवसही आजी आजोबांचे एकमेकांशिवाय काही पान हलत नव्हते. आजी जरा‌ कुठे बाहेर गेल्या की आजोबा घड्याळाकडे टक लावून बसायचे, कुणी मस्करी करत विचारलं की ,”आजोबा, किती काळजी करता हो आजींची, या वयात कुठे जाणार त्या पळून..येतीलच की घरी..?” त्यावर आजोबा म्हणायचे, “पळून जाणार नाही हो पण ती घरात नसली की घर कसं खायला‌ उठत बघा..ती प्राण आहे ह्या घराचा..”?
आजी आजोबांचे प्रेम बघितले की खरंच खूप छान वाटायचे.
साठे आजी आजोबांना दोन मुले, एक‌ मुलगी. सगळे लग्न होऊन आपापल्या संसारात व्यस्त. दोन्ही मुले नोकरीनिमित्त शहरात राहायला. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीला सगळे गावी एकत्र यायचे. आजी आजोबा वर्षातून एकदा मुलांकडे जायचे. शहरी जीवन, बंदीस्त घर अशी सवय नसल्याने असेल किंवा मुलांच्या संसारात आपलं ओझं नको या विचाराने असेल पण आजी आजोबांना मुलांकडे काही करमत नसे.‌ दोघेही आयुष्यात खूप आनंदी होते.
अशाच आनंदाला, आजी आजोबांच्या प्रेमाला कुणाची तरी नजर लागली. अचानक एके दिवशी आजींना‌ हार्ट अटॅक आला आणि नियतीने त्यांना आजोबांजवळून हिरावून घेतले. आजीच्या अशा  आकस्मिक मृत्यूने आजोबा पार हादरले, आजीला बिलगून एखाद्या लहान बाळाप्रमाणे रडू लागले. “तू अशी मला‌ सोडून कशी गेलीस गं, तुला माहितीये ना तुझ्या शिवाय हे घर किती खायला उठत…माझा जराही विचार नाही केलास तू.. अशी अचानक साथ सोडली माझी…का गेलीस तू मला सोडून… सांग‌ना‌का गेलीस मला एकट्याला सोडून…?” या आजोबांच्या बोलण्याने उपस्थित प्रत्येक जण त्या दिवशी अश्रू गाळत होता.
दोन्ही मुले, सुना , मुलगी, जावई, नातवंडे सगळे आजोबांना या धक्क्यातून सावरायला मदत करीत होते, आजीच्या जाण्याने घरातला प्रत्येक जण खूप दुखावला होता पण आजोबांची अवस्था बघून स्वतः चे दु:ख लपवून आजोबांना हिम्मत देत होते.
मुलांच्या आग्रहाखातर आजोबा मोठ्या मुलाकडे रहायला गेले. मुलगा सून आणि एक नातू अशा त्या त्रिकोणी कुटुंबात आजोबांची भर पडली. मुलगा सून दोघेही नोकरीला, नातू शाळेत..आज़ोबा दिवसभर घरात एकटे.. काही दिवस कसेबसे काढले पण आता मात्र आजोबांचं त्या घरात काही मन लागेना… एकटेपणा, क्षणोक्षणी आजीच्या आठवणी त्यांना व्याकूळ करीत असे, मुलांना‌ सुनेला तेच ते मनातलं दुःख किती सांगायचं, आपल्यामुळे त्यांचा आनंद का हिरावून घ्यायचा असा विचार करणार्‍या आजोबांनी वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतला, लहान मुलाने, मुलगी जावयाने आमच्या घरी या म्हणत मनाचा मोठेपणा दाखवला‌ पण आजोबांना‌ मात्र कुणावर आपला भार टाकायचा नव्हता.
आजोबांना या क्षणी कुणाच्याही सहानुभूतीच्या शब्दांची नाही तर एका सोबतीची गरज होती, अशी एक साथ हवी होती जी त्यांचं आजी गेल्यावरच दु:ख समजून घेईल, अशा जीवनाची साथ हवी होती जिथे मनातलं दुःख लपवत मनात आठवणींनी झुरत न‌ जगता , मनातले भाव व्यक्त करीत जगता येईल.. आजोबांनी निश्चय केला पुढचं आयुष्य वृद्धाश्रमात घालविण्याचा.
मुलं, इतर नातलग म्हणायचे, ” आम्ही असताना‌ तुम्ही वृद्धाश्रमात जाणार, लोकं नावं ठेवतील आम्हाला.. आम्हाला काही अडचण नाही.. तुम्ही इथेच रहा.. ”
आजोबा म्हणायचे ,”वृद्धाश्रमात काय घरचे सांभाळत नाही म्हणून जातोय मी असं नाही रे…मी पूर्वी यायचो तसा येत जाईल अधून मधून.. तुम्हीही येत जात रहा..आपण दिवाळीला एकत्र यायचो तसं आताही येऊच पण नेहमीसाठी नका बंधनात ठेवू रे मला..”
आजोबांच्या बोलण्याने प्रत्येकाला कळून चुकले होते की ” आपण कितीही शाब्दिक आपुलकी दाखविली तरी आजोबांना एका सोबतीची गरज आहे, वृद्धाश्रमात त्यांच्या वयोगटातील अनेक वृद्ध होते..त्यांच्या सोबत काही काळ का होईना पण आजोबांना आजी नसल्याच्या दु:खाचा विसर पडे..त्यांचे त्या ठिकाणी बरेच मित्र मंडळ जमले.. एकमेकांच्या थट्टा मस्करी तर कधी जोडीदाराच्या आठवणी, कधी सुख दुःख वाटून घेत तर कधी भजन कीर्तन अशात आजोबा गुंतून गेले…आजी गेल्यानंतर जी सोबत त्यांना हवी होती ती या वृद्धाश्रमाने‌ त्यांना दिली.”

असं म्हणतात की तरूणपणापेक्षाही उतारवयात नवरा बायकोला‌ एकमेकांच्या सोबतीची खूप गरज जाणवते, इतक्या वर्षांचा संसार, आयुष्यात आलेले सुख दुःख वाटून घेत, मुलांच्या जबाबदार्‍या सांभाळत एकत्र आयुष्य जगताना एकमेकांची खुप सवय झालेली असते.
मुलं मोठी झाली, त्यांच्या संसारात गुंतली की आता आपण जबाबदारीतून मुक्त झालो, आता आपल्या दोघांचं आयुष्य जगायचं असाच विचार कदाचित येत असावा‌ त्यावेळी मनत. पण अशा या आयुष्याच्या वाटेवर जेव्हा जोडीदार एकटं सोडून जातो तेव्हा कशी अवस्था होत असेल ना‌ मनाची.
तारूण्यात एक वेगळी उमेद असते, आई वडील, मुलं, प्रेम अशी जवळची नाती सोबतीला असतात शिवाय अंगात ताकद असते लढण्याची, पण उतारवयात जेव्हा असा एकटेपणा येतो त्या क्षणी कसं वाटतं असेल ते ज्याचे त्यालाच माहीत.
इतक्या वर्षांच्या आठवणी, एकमेकांची‌ सवय, एकमेकांचा आधार अशा परिस्थितीत एकटेपणा आला‌ की नकोस वाटत असेल ना‌ आयुष्य..अशा वेळी शब्दांनी सांत्वन करणारे सगळेच असतात पण खरी  गरज असते सोबतीची.
अशाच परिस्थितीत साठे आजोबांना साथ मिळाली वृद्धाश्रमाची, तिथल्या त्यांच्या वयोगटातील व्यक्तींची….
वृद्धाश्रमाविषयी अनेक गैरसमज आहेत पण घरी कुणी सांभाळ करीत नाही म्हणून वृद्धाश्रमात जातात असंच नसून कधी कधी सगळे जवळ असूनही एकटेपणा वाटतो तेव्हाही साथ लाभते वृद्धाश्रमाची…तिथल्या मित्र मंडळाची…..

या लेखातील विचार प्रत्येकाला पटतीलच असे नाही, याविषयी प्रत्येकाचे मत हे वेगळे असूच शकतात. ?

लेखणाचे अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही ?

© अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed