पाणी मिळेल का पाणी..

Inspirational-Social issues

रवी नामक एक‌ गृहस्थ दुचाकीवरून जाताना रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्याश्या हॉटेलवर थांबून हॉटेल वाल्याशी संवाद साधत होता.

“दादा, जरा पाणी मिळेल का प्यायला..”

हॉटेल वाला – “हो मिळेल ना, किती पाहिजे.. अर्धा ग्लास ५ रूपये,  एक ग्लास १० रूपये..पाणी बॉटल ४० रूपये..”

“अहो, मी पाणी मागतोय, कोल्ड ड्रिंक्स किंवा चहा कॉफी नाही…पाण्याची इतकी किंमत… ”

“दादा, अहो किंमत तर करावीच लागेल ना‌ पाण्याची… सगळीकडे दुष्काळ पडला आहे बघा… दूर दूर वरून आम्ही पाणी‌ आणतो…या कडक उन्हात पाणीच मिळत नाही जवळपास… १०-१० किलोमीटर वरून पाणी आणावं लागतं..तुम्हाला काही खायचं असेल तर सांगा, नाश्ता आहे आमच्याकडे तयार…पाणी फ्री बरं का‌ नाश्ता केला तर…”

“दे बाबा एक प्लेट समोसा, ग्लासभर तरी पाणी मिळणार ना फ्री त्याच्यासोबत..घशात कोरड पडली रे…”

रवी समोसा खाऊन पाणी प्यायला आणि परतीच्या वाटेला निघाला.
वाटेत तो विचार करू लागला “हॉटेल वाला जे बोलला, त्यात खरंच तथ्य आहे..किती पाणीटंचाई आहे काही ठिकाणी..दूर दूर पर्यंत पाण्यासाठी भटकावे लागते, आंघोळ तर लांबच पण पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळत नाही.. महाराष्ट्रात अशी परिस्थिती बर्‍याच ठिकाणी आहे…सहज उपलब्ध होते म्हणून आपल्याला पाण्याची किंमत नाही.. मिळतंय म्हणून आपण पाणी किती वाया घालवतो.. ज्याला टंचाई माहीत आहे, त्यालाच पाण्याची किंमत कळते.. पाणी वाचविण्यासाठी प्रयत्न केले नाही तर आता अनुभवलेली परिस्थिती काही वर्षांनी सर्वत्र दिसेल… कोल्ड ड्रिंक्स सारखे पाणी सुद्धा किंमत मोजून विकत घ्यावे लागेल…आताही ते मिळतेच पण ते फिल्टर केलेले… साधं पाणी पाणपोई किंवा इतर ठिकाणी उपलब्ध तरी होते…”

खरंच विचार करण्याजोगे आहे, नाही का?

मनुष्य पाणी विकत तरी घेईल पण पशू पक्ष्यांचे काय ?
कडक रखरखत्या उन्हात एक वेळ जेवण नाही मिळाले तर चालेल पण पाणी मात्र गरजेचे आहे , मग तो मनुष्य असो वा पशू पक्षी..
वेळीच काळजी घेतली नाही तर दुष्काळग्रस्त भागात जसं दूरदूरपर्यंत चालत जाऊन पाणी आणावं लागतं तशी परिस्थिती सर्वत्र दिसायला वेळ लागणार नाही.

आपल्याकडे पाणी उपलब्ध आहे म्हणून वाया न घालवता काटकसरीने वापरले तर खरंच फायद्याचे आहे. घराबाहेर, आजुबाजूला प्राणी पक्षी यांच्यासाठी पाणी ठेवले तर त्यांना पाण्याविना तडफडत मरणाची वेळ येणार नाही.
दरवर्षी किती तरी जीव पाण्याविना आपला जीव गमावतात, मग ते पशू पक्षी असो किंवा मनुष्य..

तेव्हा वेळीच काळजी घ्या. प्रत्येकाने पाणी जपून वापरण्याचे मनावर घेतले तर किती पाणी वाचू शकते विचार करा?

भविष्यासाठी एक पाऊल पुढे उचलून वेळीच काळजी घेतली नाही तर पुढच्या काही वर्षांत आपल्याला ही म्हणावं लागेल “पाणी मिळेल का पाणी…”

प्रत्येक चांगल्या गोष्टींची सुरवात स्वतः पासून करायला पाहिजे म्हणतात ना, चला तर मग पाणी जपून वापरण्याच्या , पशू पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करा.
ज्यांनी हा प्रयत्न आधीच सुरू केलाय त्यांचं खरंच कौतुक ?

अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed