लग्नातली बेडी – भाग २ (अंतीम भाग )

Love Stories-Relations-Social issues

मागच्या भागात आपण पाहीले की नैना आणि राजच्या लग्नात एक मुलगी पोलिसांसोबत येते. राजवर गुन्हा दाखल केला असून त्याच्या विरूद्ध अटक वॉरंट आहे असंही पोलिस सांगतात. राजच्या वडिलांनी पोलिसांना विनंती करत त्या मुलीकडून राज वरच्या आरोपाविषयी ऐकायचं आहे म्हणून तिला बोलण्याची एक संधी दिली. आता पुढे.

ती तरुणी म्हणाली, “सांगते ना…ऐकायचं ना तुम्हाला सत्य..ऐका तर मग… माझं नावं रश्मी……”
( रश्मीच्या तोंडून तिची कहाणी खालीलप्रमाणे )
रश्मी एक साधारण कुटुंबातील मुलगी, दिसायला खूप सुंदर नसली तरी एक प्रचंड आत्मविश्वास, हुशार, बुद्धीमत्ता यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसायचं. बुद्धीमत्तेच्या जोरावर तिने नोकरीत एक वेगळीच ओळख बनविली होती. एका कॉन्फरन्स साठी बर्‍याच कंपनीतर्फे प्रतिनिधी पाठविले होते त्यातच राज आणि रश्मीची ओळख झाली. रश्मी तिच्या कंपनीची मार्केटिंग हेड म्हणून प्रतिनिधित्व करत होती.
रश्मीचे प्रेझेन्टेशन बघताच त्या कॉन्फरन्स रूम मध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला, प्रत्येकाने तिचं कौतुक केलं. राज सुद्धा तिथे उपस्थित होताच. तिचा आत्मविश्वास, हुशारी बघता तोही तिच्यावर इंप्रेस झाला. आज पहिल्यांदाच राज चे प्रेझेन्टेशन रश्मी पुढे फिके पडले. त्याचा स्वाभिमान दुखावला गेला पण त्याने तसं न दाखवता इतरांबरोबर रश्मीचे खूप कौतुक केले. नेहमी राजच्या कंपनीला मिळणारा कॉन्ट्रॅक्ट यावेळी रश्मीच्या कंपनीला मिळाला. राजने खूप प्रयत्न केले तो कॉन्ट्रॅक्ट स्वतः कडे घेण्यासाठी पण त्याला अपयश आले. त्याक्षणी राजने ठरवले रश्मी मुळे झालेल्या अपमानाचा बदला घेण्याचे. रश्मीला मात्र यातले काही माहिती नव्हते.
राजने रश्मीचे कौतुक करत मैत्रीचा हात पुढे केला. त्याच्या गोड बोलण्यावर, हुशारी वर एकंदरीत त्याच व्यक्तीमत्व बघता रश्मीने त्याच्यावर विश्वास ठेवून मैत्री स्वीकारली पण तिला कुठे माहीत होते या गोड बोलण्यामागे एक राक्षसी चेहरा दडलेला आहे.
रश्मी कंपनीच्या कामात पारंगत असली तरी राजला ओळखण्यात ती चुकली.
दोघांची मैत्री बहरत होती. प्रोफेशनल लाईफ वेगळं आणि मैत्री वेगळी असं‌ म्हणत राज तिला त्याच्या जाळ्यात ओढत होता. त्याच एकंदरीत व्यक्तीमत्व बघता तिही त्याच्याकडे आकर्षित झाली.
त्याचं गोड बोलणं, तिचं भरभरून कौतुक करणं, मैत्रीच्या नात्याने स्पेशल वागणूक देणं तिलाही आवडायला लागलं. दोघांची मैत्री चांगलीच रंगली, एक दिवस राजने तिला प्रपोज केले.तू मला होकार दिला तरी करीअर तुझा वैयक्तिक प्रश्न आहे, तू तुझी कंपनी लगेच सोड, मला जॉइन हो वगैरे मी नाही म्हणणार हेही सांगितलं. रश्मी आता पूर्णपणे गोंधळली, तिलाही आता राज आवडायला लागला होताच. तिने भावनेच्या भरात त्याला होकार दिला, दोघांचे प्रेमसंबंध हळूहळू फुलत होते. या दरम्यान कधीच राज कंपनीचा, कॉन्ट्रॅक्ट चा विषय काढत नव्हता त्यामुळे कुठली शंका येणे तिला शक्यच नव्हते.
एकदा दोघेही डिनर साठी एकत्र गेले, राजच्या आग्रहाखातर तिने राज सोबत थोडे फार ड्रिंक्स घेतले. राजला मनातल्या भावना ती नव्याने सांगू लागली, “राज, मला खूप आवडतोस तू‌. तुझ्यासोबत खूप छान वाटत रे..घरी आई आणि मी दोघीच असतो..बाबा गेल्यापासून माझं जीवन म्हणजे आई, मी आणि माझी नोकरी पण तू माझ्या आयुष्यात आला तेव्हा पासून वेगळाच उत्साह वाटतो मला मा़झ्या जीवनात….”
राजने ही तिला प्रतिसाद देत रश्मी चा हात हातात घेऊन, ” रश्मी, मलाही तू खूप आवडतेस, लवकरच मी आपल्या विषयी घरी सांगून लग्न करायचं म्हणतोय..आय लव्ह यू रश्मी..”
दोघांचा डिनर झाल्यावर रश्मी म्हणाली,
“राज, अरे असं ड्रिंक्स घेऊन घरी गेले तर आईला नाही आवडणार, मला तू मैत्रिणीकडे सोडतोस का”
“रश्मी, अगं मीसुद्धा असा घरी गेलो तर बाबांना विचित्र वाटेल, ड्रिंक्स पार्टी केली की बहुधा मित्राकडे थांबतो मी…आज आपण हॉटेल वरच थांबूया….तू आईला कळव मैत्रिणी कडे थांबणार आहेस म्हणून..”
“राज, नको अरे..आपण असं एकत्र हॉटेल वर.. नको मी जाते मैत्रिणी कडे..”
“रश्मी माझ्यावर विश्वास नाही का तुझा..मी रूम बुक करतो.. सकाळी सोडतो तुला घरी.. विश्र्वास नसेल तुझा तर मग काय म्हणणार ना मी…”
“राज अरे विश्वास आहे…पण…बरं ठीक आहे… थांब आईला कळवते..”
दोघेही त्या दिवशी एकत्र एका हॉटेलवर थांबले.. दोघेही भविष्याची स्वप्ने रंगवत एकत्र वेळ घालवत होते. भावनेच्या भरात दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले, प्रेमाची एक मर्यादा त्यांनी ओलांडली. रश्मी झोपल्यावर राज ने दोघांचे एकत्र असे काही फोटो काढले, तिच्या मोबाईलवर कंपनीचे इमेल होते, त्याचा वापर करून रश्मीला फसवले.
रश्मीच्या कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट रश्मीने राज कडून पैसे घेऊन राज च्या कंपनीला विकला अशी परिस्थिती रश्मीच्या बॉस समोर तयार केली, रश्मीने कंपनीत विश्वासघात केला, रश्मी मुळे कंपनीचा मोठा कॉन्ट्रॅक्ट हातचा गेला असा तिच्यावर आळ आला. रश्मी आणि राजचे पार्टीचे चिअर्स करतानाचे फोटो राजने एकाच्या मदतीने तिच्या बॉसला पाठवले, या सगळ्यामुळे रश्मी ची नोकरी गेली.
हा सगळा प्रकार राज ने केला हे लक्षात येताच रश्मी ला मोठा धक्का बसला. तिने त्याला भेटून जाब विचारला तेव्हा कुत्सितपणे हसत रश्मी ला हरवल्याचा आनंद व्यक्त केला.
“राज, तू असं कसं वागू शकतोस, प्रेम केलंय आपण एकमेकांवर. मी तुला माझं सर्वस्व अर्पण केलं तुझ्यावर विश्वास ठेवून आणि तू मात्र विश्वासघात केला माझा. का केलंस तू असं, काय चुकलं माझं..बोल राज बोल…” रश्मी रडकुंडीला येऊन बोलत होती.
राज जिंकल्याचा आनंद चेहऱ्यावर आणत, “रश्मी, आठवते ती कॉन्फरन्स, ज्यात आपण पहिल्यांदा भेटलो. तुझ्यामुळे माझा कॉन्ट्रॅक्ट गेला होता, मी हरलो होतो. नाही सहन झाला मला तो अपमान. तेव्हाच ठरवलं होतं तुझा बदला घेण्याचं ”
“राज, किती नीच आहेस रे.. अहंकार दुखावला म्हणून एका मुलीच्या भावनांशी खेळला तू..माझी चूक नसताना माझ्यावर कंपनीत आरोप झाले, माझी नोकरी गेली. तुला काय वाटलं मी शांत बसेल..सोडणार नाही मी तुला राज..”
इतकं बोलून रश्मी निघून गेली.
तिने पोलिसांकडे तक्रार केली पण पुराव्याअभावी काही करता येणार नाही असंच कळाल शिवाय त्या रात्री त्याने जबरदस्ती केली नव्हती तेव्हा तोही गुन्हा आहे असं म्हणता येणार नाही असंच तिला जाणवलं. तिला आता स्वतः चा राग येऊ लागला, इतकी मोठी चूक कशी झाली आपल्या हातून, कसं बाहेर पडावं यातून असा विचार ती करत होती.
तिने फसवणूक केल्याची तक्रार महिला आयोगाकडे केली, राजला याची माहिती मिळाली.
रश्मी मुळे आपली बदनामी होणार असं चित्र दिसताच राजने तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्याची सुपारी दिली. तिच्या घरी फोन करून आईला आणि तिला धमकी दिली.
रश्मीने आधीच तक्रार केली होती त्यामुळे तिच्या जीवाला धोका आहे हे लक्षात घेऊन एक जण तिच्या सुरक्षेसाठी आजुबाजूला होता. त्याच्यामुळे रश्मी वाचली आणि हल्ला करणारा पकडला गेला.
कंपनीत रश्मी ने विश्वासघात केला नसून राज ने मोबाईल मधून डाटा चोरी करून तिला फसवले याचे काही पुरावे तिने जमविले. महिला आयोगाने तिची बरीच मदत केली.
इकडे राज मात्र लग्नाची तयारी करत होता. पैसे देऊन रश्मी चा काटा काढला की कुणाला काही कळणार नाही शिवाय पैशाने सगळं सेटल करू असा विचार करून राज निर्धास्त होता. रश्मी एकटी किती धडपड करेल स्वतः ला सिद्ध करायला असाच खोटा विश्वास त्याला होता पण रश्मी हार मानणारी नव्हती. स्वतः ला सिद्ध करण्याचे सगळे प्रयत्न तिने केले आणि राज ला त्याबाबत काही खबर लागू दिली नाही.

आजही पोलिसांकडे जाताना तिच्या बाइक ला टक्कर देत तिला मारण्याचा प्रयत्न केला गेला, ती पडली, जखमी झाली. कुणीतरी तिला दवाखान्यात पोहोचविले, पोलिसही त्याठिकाणी पोहोचले. आता मात्र राज पैशाच्या जोरावर हद्द पार करीत होता.
राज ज्या प्रकारे रश्मीच्या आयुष्याशी खेळला, त्या सगळ्याचा बदला तिला घ्यायचा होता. आज तो दिवस आला जेव्हा पुराव्यासह ती त्याच्यापर्यंत पोहोचली.

सगळी घटना‌ ऐकताच लग्नमंडपात सगळ्यांना मोठा धक्का बसला. वरवर साधा, सोज्वळ दिसणारा राज असं काही करू शकतो यावर कुणाचा विश्वास बसत नव्हता.
सगळं ऐकल्यावर जेव्हा राजच्या वडिलांनी त्याला विचारले, “राज हे सगळं खरं आहे का..?”

त्यावर तो निशब्द झाला.
आता आपली सुटका नाही. रश्मीने अख्ख्या लग्नमंडपात सगळ्यांसमोर अपमान‌ केला हे बघून त्याला प्रचंड राग येत होता पण आता परिस्थिती त्याच्या हाताबाहेर गेली होती.

वडिलांनी त्याचा चेहरा बघूनच त्याचा गुन्हा ओळखला आणि जोरदार चपराक मारत पोलिसांना म्हणाले, ” घेऊन जा ह्याला माझ्या नजरेसमोरून..”

राजच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आले, त्यांनी व
रश्मी ची माफी मागितली, आणि म्हणाले, “माझा मुलगा इतका मोठा डाव खेळत होता पण मला मात्र थोडीही खबर लागू दिली नाही..रश्मी तू आधीच मला सगळं सांगितलं असतं तर इतक्या दूर हे प्रकरण गेलं नसतं, तुझी मी नक्कीच मदत केली असती. पण माफ कर माझ्या मुलामुळे तुला खूप काही सहन करावं लागलं.”

आज लग्नाच्या बेडीत अडकणारा राज पोलिसांच्या बेडीत अडकला.

राज मुळे आज घराण्याचा मोठा अपमान‌ झाला होता‌ पण नैना एका खोट्या माणसासोबत लग्नाच्या बेडीत अडकण्यापासून वाचली होती.

समाप्त..!!

कथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

नावासह शेअर करायला हरकत नाही.
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या फेसबुक पेजला लाईक करा. लिंक खालीलप्रमाणे

https://www.facebook.com/Marathi-Blogs-By-Ashvini-377934079713104/

© अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed