रखमाचा लढा, आर्थिक स्वावलंबनाचा धडा..

Inspirational-Social issues

रखमा उंच बांध्याची, सावळी पण नाकी डोळी तरतरीत. जशीच वयात यायला लागली, तसंच नकळत्या वयात घरच्यांनी तिचं लग्न लावून दिलं. कसं बसं आठवीपर्यंत शिकली होती ती, पुढे शिकायचं म्हणाली पण ऐकतयं कोणं. मागासलेला समाज, ग्रामीण वातावरण, मुलगी शिकली की हाताबाहेर जाते तेव्हा लवकर लग्न लावून दिलं की जबाबदारी संपली अशा विचारांचे सगळे.
कोवळ्या वयात तिच्यावर संसाराचा भार टाकला गेला.
शरद म्हणजेच रखमाचा नवरा, एका कारखान्यात कामाला. कामानिमित्त जिल्ह्याच्या ठिकाणी दोघं नवरा बायको राहायचे. रखमा जेमतेम पंधरा वर्षांची, कसं बसं घर सांभाळायची, नवर्‍याचं मन राखायची.
पुढे शिकण्याची इच्छा शरदला तिने बोलून दाखवली पण त्याला काही ते पटलं नाही. मग काय रखमाच्या पदरी आलं “रांधा वाढा उष्टी काढा..”
वयाच्या विसाव्या वर्षी दोन लेकरांची आई झाली ती. दिवसभर घरात काम, लेकरांचा सांभाळ यातच ती गुंतली.
अचानक काही कारणाने कारखाना बंद पडला आणि शरदची नोकरी गेली. दुसरीकडे काही काम मिळते का याचा शोध शरद घेत होताच पण अशातच त्याला दारूचे व्यसन लागले. हातात होतं नव्हतं सगळं त्याने दारूच्या नशेत गमावलं. घरातलं वातावरण बदललं, रोज शरदचे दारू पिऊन येणे, रखमावर सगळा राग काढत अंगावर धाऊन जाणे असले प्रकार सुरू झाले. घरात दोन वेळा जेवणाचेही वांदे होऊ लागले. शरदचे दारू पिणे दिवसेंदिवस वाढतच होते, त्यात रखमाने कामावर गेलेले ही त्याला पटत नव्हते.
रखमा शरदला समजावण्याचा खूप प्रयत्न करीत होती , मी काही तरी काम शोधते आपण दोघे मिळून यातून मार्ग काढू असंही ती अनेकदा म्हणायची पण शरदला तो अपमान वाटायचा. माणसासारखा माणूस घरात असताना बाईच्या जातीने कामाला जाऊ नये अशा कुत्सित विचारांचा शरद होता. घरात होतं नव्हतं सगळं शरद दारू पायी घालवून बसला होता, आता तर याच्या त्याच्या कडून उसने पैसे घेऊन तो घरखर्च करत होता पण पैसा नसला‌ तरी दारू मात्र पाहिजेच होती. सट्टा लावण्याचा नवा नाद त्याला लागला, काम शोधायचं सोडून तो अशा व्यसनांच्या आहारी गेला.
उसने घेतले पैसे मागायला आता लोकं घरापर्यंत येऊ लागली.
अशा वातावरणात मुलांवर काय संस्कार होतील, कसं लहानाचं मोठं करणार मी मुलांना ही काळजी तिला लागली होती.
सतत अपमान, घरात खाण्यापिण्याचे हाल, मारपीट पदरात लहान मुलं हेच सगळं रखमाच्या नशीबी आलं होतं. घरी सांगून घरच्यांची मदत तरी किती दिवस घेणार म्हणून ती घरीही कुणाला काही सांगत नव्हती. आता मात्र तिची सहनशक्ती संपली होती, मुलांच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून त्यांच्या भविष्यासाठी आपणच धडपड करायला‌ पाहिजे हे तिने ओळखलं, आता शरद वर अवलंबून न राहता आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं गरजेचं आहे हे तिला कळून चुकलं.
दोन्ही मुलं पाच वर्षांच्या आतले तेव्हा त्यांना सोडून कामावर तरी कसं जावं, दुसर्‍यांच्या घरी काम केले तर मुलांकडे लक्ष कोण देईल अशे अनेक प्रश्न तिच्यासमोर उभे होते. रात्रभर विचार करून सकाळी मुलांना घेऊन ती घराबाहेर पडली. कामाच्या शोधात इकडे तिकडे भटकली‌, परत‌ येताना‌ तिला एक पोळी भाजी केंद्र दिसले. कामाची चौकशी केल्यावर त्यांच्याकडे स्वयंपाकघरात कामाला एका व्यक्तीची गरज आहे हे कळाले. रखमाला ते काम मिळाले, सुरवातीला खूप काही पगार देणार नव्हतेच ते पण दोन वेळ मुलांच्या पोटात अन्न जाईल इतके तर नक्कीच मिळणार होते. शिवाय तिथे काम करून मुलांकडे ही लक्ष देता येणार होते. दुसऱ्या दिवशी पासूनच तिला कामावर जावे लागणार होते. रखमा काम मिळाल्याच्या समाधानाने घरी आली, शरद आधीच घरी येऊन बराच वेळ तिची वाट पाहत होता, कुठे भटकायला‌ गेली होतीस म्हणत त्याने जसा हात उचलला तसाच रखमाने त्याचा हात आज पहिल्यांदा अडवला. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचं पहिलं पाऊल तिने आज टाकलं होतं आणि त्यामुळेच अन्यायाविरुद्ध लढण्याची एक ताकदही तिला मिळाली होती.
मुलांच्या भविष्यासाठी मी काम करणार, माझ्या मुलांना खूप शिकविणार, स्वतःच्या पायावर उभं करणारं असं आज ती आत्मविश्वासाने शरदला सांगत होती.

अशा अनेक रखमा आपल्याला आजुबाजूला बघायला मिळतील. कुणी धुणे भांडी करून, कुणी स्वयंपाकाची कामं करून तर कुणी इतर काही काम शोधून अशा खडतर परिस्थितीत आर्थिक स्वावलंबनाची गरज ओळखून मुलांसाठी, संसारासाठी धडपड करतात.

हे झालं अशिक्षितता, गरिबी आणि हतबल परिस्थिती मुळे पण सुशिक्षित असून‌ श्रीमंतीत नांदत असतानाही प्रत्येकाला आर्थिक स्वावलंबन गरजेचे असतेच.
आई वडिलांची वडिलोपार्जित संपत्ती कितीही असो स्व कमाईचा आनंद हा वेगळाच असतो. नवर्‍याची कमाई करोडोंची असेल पण स्वतःच्या कष्टाच्या कमाईचे हजार रुपये सुद्धा करोडो रुपयांपेक्षा मौल्यवान वाटतात कारण त्या हजार रूपया सोबत एक समाधान, आत्मविश्वास आपण कमावला‌ असतो.
कष्टाचे फळ कधीही गोड असते, जगण्याची एक नवी उमेद, ताकदही त्याच्यासोबत आपल्याला मिळाली असते.
कुणावर कशी परिस्थिती कधी येईल हे कुणीच सांगू शकत नाही तेव्हा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणं कधीही महत्वाचं ?

याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

© अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed