अशीही एक सावित्री…

Relations-Social issues

“मॅडम, इधर क्या करने आयी है..अच्छे घर की लग रही..ये रेड लाइट एरिया है..पता है ना..”
एक लाल भडक लिपस्टिक लावलेली , जरा विचित्र पोझ देत उभी असलेली, तोडके कपडे घातलेली एक चाळीशीतली स्त्री सविता कडे बघत बोलली.
सविता तिच्या कडे किळसवाण्या नजरेने बघत इच्छा नसताना उत्तरली, “अहो बाई, माझा नवरा शाम, सारखा इकडे येतो असं कळालं त्यांच्या मित्रांकडून. दोन दिवस झाले घरी परतला नाही म्हणून शोधायला आली..हा बघा हा फोटो, तुम्ही बघितला का ह्याला इकडे..”
“लैला नाम है मेरा..बाई मत बोल..धंदे का टाइम है..निकल यहाँ से नहीं तो तुझे भी लेके जायगा कोई..” फोटो कडे दुर्लक्ष करत लैला सविता ला जायला सांगत होती.
“बरं लैला, एकदा बघ ना हा फोटो, ह्याला पाहिलं का इकडे तेवढं सांग मग मी निघते लगेच.. खूप काळजी वाटत आहे गंं..”
“दिखा तो कोण है ये तेरा शाम..” फोटो बघत लैला म्हणाली.
सविताने तिला फोटो दाखवला आणि आजुबाजूला कटाक्ष टाकला तर लैला सारख्या अनेक स्त्रिया तिथे खोल गळ्याचे कपडे घालून , भडक मेकअप करून विचित्र पणे इशारे करत गिर्‍हाईक शोधत होत्या. एकंदरीत परिस्थिती पाहता सविता ला भिती वाटत होती, तितक्यात लैला म्हणाली,
“ये तेरा मर्द है..इसको तो कल अस्पताल पहुचाके आये हमारे शेठ..हरामी ने बहोत दंगा किया इधर.. बहुत मार पडा इसको कल..रेश्मा के पास आता था हमेशा.. बहुत पैसा लुटाया न रेश्मा पे इसने.. शराब के नशे मे डूब पडा था तब रेश्मा के पास दुसरा गिर्‍हाइक आया..इसने रेश्मा को दुसरे के साथ देखा तो गुस्सा होकर रेश्मा पे हाथ उठा रहा था.. जैसे के इसने खरिद लिया रेश्मा को..दंगा किया बहुत..सबने इसको बहुत मार पिटा..मर जायगा ओर हम पे आयेगा कर के शेठ अस्पताल पहुचाके आये इसको..”
सविता ते ऐकताच हादरली, घाबरून शब्द बाहेर पडत नव्हता तिच्या तोंडातून. अडखळत म्हणाली, “कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे…”
लैला जरा चिडून ,”इतना बताया ना अब निकल..धंदे का टाइम है बोला ना.. बाकी का नहीं पता मेरेको..”
तितक्यात एक जण आला आणि लैला त्याला घेऊन एका लाकडी जिन्यातून आत निघून गेली.

सगळं ऐकून सविता रडकुंडीला आली होती, कुणाला विचारावं, काय करावं काही कळत नव्हतं तिला. जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये चौकशी करावी म्हणून तिथून निघाली. जाताना एक दोघांनी मुद्दाम धक्का देत ‘आती क्या मेरे साथ’ म्हंटल्यावर तिला अक्षरशः किळस वाटली. धावपळ करत त्या गल्लीतून बाहेर पडली. डोक्यावर रखरखतं उन्ह होतं, घरी पोरांना सोडून नवर्‍याच्या शोधात ती इथपर्यंत आली होती.
काय पाप केलं म्हणून हा दिवस नशिबात आला आज असा विचार करत ती चालत होती. तितक्यात सविताचा फोन वाजला. शामच्या मित्राचा फोन होता, “वहिनी, शाम हॉस्पिटलमध्ये दाखल आहे…मला तिथल्या नर्स ने फोन करून कळवलं..मी पत्ता पाठवतो तुम्ही या तिकडे..मी पण येतोच..”
सविताने रिक्षा पकडली आणि हॉस्पिटलच्या पत्त्यावर पोहोचली. चौकशी करून शाम जवळ आली, शामचा मित्र बंडूही सोबतीला आला होताच. शामच्या पूर्ण शरीरावर जखमा झाल्या होत्या, डोक्याला ड्रेसिंग केलेलं होतं, मळकट कपडे, अंगावर मारल्याचे व्रण, पट्टी बघून सविताला राग करावा की कीव करून रडावे कळत नव्हते. एकही शब्द न बोलता ती त्याच्याकडे बघत होती. शाम मात्र औषधे घेऊन झोपी गेला होता. नर्स कडून कळाले की जास्त मार लागल्याने बेशुद्ध अवस्थेत कुणी तरी आणलेलं, जरा शुद्धीवर आल्यावर बंडूचा नंबर दिला त्याने आणि आम्ही त्यांना कळवले म्हणून.
सविता बाजुला एका बेंचवर बसून शाम जागा होण्याची वाट बघत होती. डोळ्यातून अश्रु वाहून नकळत ओठांवर येऊन टेकत होते. डोक्यात अनेक विचारांचे थैमान उडत होते.
सविता आणि शामच्या लग्नाला बारा वर्षे झालेली. शामचे हार्डवेअर चे दुकान होते, बर्‍यापैकी कमाई असायची. सविता शिवणकाम करून संसाराला हातभार लावायची.
दोघ राजा राणी आणि दोन मुले असं सुखी कुटुंब होतं ते. कसा कुणास ठाऊक पण शामला दारूचे व्यसन लागले मग उशीरा घरी येणे, भांडणे अशे प्रकार सुरू झाले. मुलेही लहान, त्यांच्यासमोर उगाच तमाशा नको म्हणून सविताने त्याची खूपदा समजुत काढली. त्यानेही परत असं करणार नाही म्हणत वेळ मारली पण एक दिवस जे सविताला कळाल त्याने तिच्या पायाखालची जमीन सरकली.
शाम दुकान बंद करून बरेचदा रेश्मा कडे शरीरसुखासाठी जाऊ लागला. दारूची सवय ही कमी होत नव्हतीच. उशीरा घरी यायचा तेव्हा मुलं झोपलेली, अशावेळी त्याला बोलण्यात अर्थ नाही म्हणून मुलं शाळेत असताना जिवांचा आकांत करत सविता त्याला जाब विचारायची, म्हणायची, “काय चुकलं रे माझं, कुठे कमी पडले मी तुला समजुन घेण्यात..का जातोस त्या सटवीकडे…”
शाम मात्र काही झालं की हात उगारून तिला गप्प करत निघून जायचा आणि म्हणायचा , “मी काही करेन..तू मध्ये पडू नकोस..वीट आला तुझा, तुझ्या कटकटीचा..”
सविताला खूपदा वाटायचे सोडून द्यावं सगळं पण मुलांकडे बघून ती शांत बसायची, ते म्हणतात ना कुठल्याही स्त्रिला आपला नवरा दारू पिऊन पडला तरी चालतं पण दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडलेला मुळीच सहन होत नाही. सविताचेही असेच झाले.
ती स्वतः ची चूक शोधत रडायची, मनातल्या मनात कुढत बसायची. मुलांसाठी संसारासाठी धडपड मात्र सुरू असायची तिची.
गेले तीन वर्षे ती असंच आयुष्य ती जगत होती. आज तर हद्दच झाली होती.

काही वेळाने शाम जागा झाला आणि समोर सविताला बघून जरा बिचकला. तिच्या डोळ्यात एक प्रकारची घृणा त्याला दिसली. नजर लपवत अपराधी भावनेने तो इकडे तिकडे बघत होता. डॉक्टरांनी काही औषधे लिहून दिली, परत एकदा तपासणी करून घरी जाण्याची परवानगी दिली. बंड्याने औषधे आणून दिली आणि त्याच्या दुचाकीवर तो निघाला.
सोबतच शाम आणि सविता रिक्षातून घरी यायला  निघाले. वाटेत शाम गप्प गप्पच होता.
दोघेही घरी पोहोचलो तसेच दोन्ही मुलांनी आईला मिठी मारली आणि म्हणाले, “आई, किती वेळ वाट बघत होतो आम्ही..कुठे होतीस तू..”
दोन्ही मुले आपल्याकडे दुर्लक्ष करत आईसोबत बोलताना बघून शामला अजूनच अपराधी वाटले. त्यांचीही काय चूक, बाबांचं प्रेम अनुभवायला बाबांना वेळच कुठे होता.
सायंकाळ होत आली होती. सविताने स्वयंपाक करून जेवायला घेतले. काही न बोलता शामचे औषधे आणि ताट शाम समोर आणून दिले. तोही मुकाट्याने जेवला, औषधे घेऊन झोपी गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळीच सगळं आवरून सविता तयार झाली. मुलांसाठी, शामसाठी नाश्ता चहा  बनवून स्वतः कपाटातील जरीकाठी साडी नेसून तयार झाली. पुजेचं ताट तयार करतच होती तितक्यात शेजारच्या सुनंदाने आवाज दिला. हो आलेच गं म्हणत पटकन आवरून ती मुलांना म्हणाली, ” मी आलेच रे वडाची पूजा करून..नाश्ता करून घ्या दोघेही.. बाहेर जाऊ नका मी येत पर्यंत..”
ते ऐकताच शाम च्या मनात विचार आला, आपल्यामुळे इतका त्रास सहन करूनही सविता वटपौर्णिमेचं व्रत करून सात जन्मासाठी देवाकडे आपल्यालाच मागत असणार का….

तुम्हाला काय वाटतं सविता शाम सारखा पती  जन्मोजन्मी मिळावा म्हणून सविता वडाची पूजा करायला गेली असेल का ?

हो..अशा अनेक सविता आहेत आपल्या आजूबाजूला. ज्यांना पती कितीही त्रास देत असेल, दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडलेला असेल, तिच्याशी प्रेमाने वागत नसेल, मारपीट, शिवीगाळ करत असेल तरीही ती वटपौर्णिमा मात्र साजरी करतेच, जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी प्रार्थना सुद्धा करते.

शाम वेश्येच्या मागे लागला पण दोन दिवस घरी आला नाही म्हणून सविताने जीवाची पर्वा न करता त्याचा शोध घेतला, रेड लाइट एरिया मध्ये जाऊन काही शोध लागतो का बघितले. पोलिसांकडे गेली तर नवराच दोषी असा विचार करून त्याला स्वतः शोधून काढले. त्याच्या औषध पाण्याकडे लक्ष देत काळजी घेतली. अशाही काही सावित्री आजही आहेत.

अन्याय सहन करणे योग्य नाहीच, अन्यायाविरुद्ध आवाज आ उठवलाच पाहिजे पण काही भगिनी सविता सारख्या सुद्धा आहेच.

याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

लेखनाचे अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही.

© अश्विनी कपाळे गोळे

Tags:

Comments are closed