मागच्या भागात आपण पाहीले की ऑफिस मध्ये उशीर झाल्याने आणि पाऊस सुरू असल्यामुळे अविनाश अदितीला घरी सोडतो म्हणाला, जरा आढेवेढे घेत ती त्याच्या सोबत जायला तयार झाली. दोन वर्षांनंतर आज ते भेटलेले. आता पुढे.
दोन वर्षांपूर्वी अदिती मुलाखतीसाठी आलेली तेव्हा बाहेर असाच जोरात पाऊस सुरू होता, त्यामुळे तिला जरा उशीर ही झाला होता. लगबगीने ती ऑफिसमध्ये पोहोचली आणि आल्यावर कॉन्टॅक्ट पर्सन मिस्टर महेश शर्मा यांना भेटायचं आहे असं सिक्युरिटी कडे सांगितलं.
सिक्युरिटी कडून कळाले की काही तरी तातडीचे काम आल्यामुळे महेश सर आज उशीरा येणार आहेत पण त्यांनी तुम्हाला मिस्टर अविनाश यांना भेटायला सांगितले आहे. पावसात तासभर प्रवास करून भिजली जरी नसेल तरी अंगात थंडी भरलेली होती.
सिक्युरिटी ने पहिल्या मजल्यावर जाऊन उजवीकडे आत जा, तिथे तुम्हाला अविनाश सर भेटतील असं सांगितलं. जाताना अदिती विचार करत होती, “सर उशीरा येणार म्हणताहेत, आता हे अविनाश कोण बघुया.. इंटरव्ह्यू चांगला झाला म्हणजे बरे..मोठ्या हुद्द्यावर असलेल्या लोकांचे बरे बाबा.. उशीर झाला की कळवून मोकळे..आपण मात्र लगबग करत वेळेत पोहोचण्याच्या तयारीत..असो त्यांनाही कधी तरी अशाच परिस्थितीतून जावे लागले असणार..”
उजवीकडून आत आले, आता कुणाला तरी विचारायला पाहिजे अशा विचारात असतानाच तिची गाठ पडली अविनाश सोबत पण तिला कुठे मी माहित की हाच अविनाश आहे. ती त्याला म्हणाली, “Excuse me, मिस्टर अविनाश पाठक कुठे भेटतील सांगू शकता का..मी मुलाखतीसाठी आलेली आहे..”
अविनाश ने तिच्याकडे बघितले तशीच त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर स्थिरावली पण तिला न कळू देण्याच्या आवेशात तो म्हणाला, ” समोर मिटिंग रूम आहे, तुम्ही बसा तिथे.. अविनाश ला सांगतो मी तुम्ही आलात म्हणून..”
अदिती मान हलवून थॅंक्यू म्हणत मिटिंग रूम कडे निघाली. आत एका खुर्चीत बसून अविनाश सर येण्याची वाट बघत होती.
अविनाश पुढच्या पाच मिनिटात आत आला आणि हात पुढे करून म्हणाला, “हॅलो,मी अविनाश पाठक. ”
अदिती जरा गोंधळून हसू आवरत जरा घाबरत म्हणाली, “हॅलो सर, मी अदिती..म्हणजे मी तुम्हालाच तुमच्याविषयी विचारले तर..सो सॉरी..मला माहित नव्हतं त्यामुळे जरा कन्फ्युजन झालं असावं..”
“डोन्ट बी सॉरी..मिस अदिती.. होतं असं कधी कधी..”
“अदिती, आज महेश सर उशीरा येणार असल्याने तुमची मुलाखत त्यांनी मला घ्यायला सांगितली आहे..पुढचा राऊंड सर घेतील..ते येतीलच तासाभरात..” अविनाश.
अदिती -“ओके सर..नो प्रोब्लेम..”
अविनाश ने अदितीची मुलाखत घेतली, थंडी अंगात भरल्याने तिच्या अंगावर काटे उभे झाले होते आणि resume अविनाश च्या हातात देताना तिच्या हातावरचे काटे अविनाश च्या नजरेतून ते सुटले नव्हते. तिची एकंदरीत परिस्थिती पाहता तो म्हणाला, “मिस अदिती, तुम्हाला फ्रेश होवून यायचे असेल तर तुम्ही दहा मिनिटे जाऊन येऊ शकता, त्यानंतर आपण मुलाखत घेऊ. ”
“इट्स ओके सर, मी तयार आहे मुलाखतीसाठी..” असं म्हणत अदितीने त्याचा प्रस्ताव नाकारला.
अविनाश ने अदितीची मुलाखत घेतली, पाच मिनिटां पूर्वी थंडीने जरा कुडकुडत असलेली अदिती आत्मविश्वासाने उत्तर देत होती. तिची एकाग्रता, चेहऱ्यावर आत्मविश्वास, तिचे भाव टिपत अविनाश मधूनच हरवल्या सारखा होत होता. तिच्या एकंदरीत मुलाखतीनंतर तो अजूनच तिच्यावर इंप्रेस झाला. उत्तर देताना तिचा सखोल अभ्यास, प्रत्येक गोष्ट पटवून देताना तिच्या चेहऱ्यावरचे तेज त्याला भाळले. अर्धा तास कसा गेला कळाले सुद्धा नाही. नंतर अविनाश ने वेल डन मिस अदिती म्हणताच ती मनोमन आनंदी झाली. आता महेश सर आले की पुढची प्रोसेस होईल तोपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल असं अविनाश ने सांगितले.
अदिती त्यावर म्हणाली,” थॅंक्यू सर. एक विचारायचं होतं, इथे कॅन्टीन कुठे आहे..”
अविनाश-“चला मी नेतो तुम्हाला..मलाही कॉफी घ्यायला जायचेच आहे..”
अदिती आणि अविनाश एकत्र कॉफी घ्यायला ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये गेले. अदिती जरा गप्प गप्प आहे बघून अविनाश म्हणाला “तुम्ही टेंशन मुळे अशा गप्प आहात की मुळातच कमी बोलता..मला घाबरलात तर नाही ना.. मी साधा एम्प्लॉयी आहे बस.. गेल्या चार वर्षांपासून इथे नोकरीला आहे, माझं काम बघून सर काही महत्वाच्या जबाबदारी सोपवितात माझ्यावर विश्वासाने बाकी काही नाही… घाबरण्याचे कारण नाही..? तेव्हा अदितीला जरा हायसे वाटले..ती जरा का होईना पण बोलायला लागली. दोघांची ती पहिलीच भेट आणि पहिलीच एकत्र कॉफी ?
जरा एकमेकांची ओळख करून देत त्यांनी औपचारिक गप्पा मारल्या. काही वेळाने महेश सरांचा अविनाश ला फोन आला.
अदिती ला घेऊन तो महेश सरांना भेटायला गेला. अदितीची महेश सरांनी पुढची मुलाखत घेतली. तिची हुशारी , आत्मविश्वास असं एकंदरीत सगळं बघता तिला त्यांनी सिलेक्ट केले. पुढच्याच आठवड्यात तिला कंपनीत रूजू व्हायचे होते. ती अविनाश ला नोकरी मिळाल्याची बातमी आनंदाने सांगून थॅंक्यू म्हणत घरी परतली.
अविनाश ला त्या दिवसापासून अदिती चा चेहरा सतत डोळ्यापुढे दिसत होता, किती निरागस मुलगी आहे ही.. स्वभावाने शांत वाटली पण एक वेगळाच आत्मविश्वास आहे तिच्यात असा विचार करून तो स्वतः वर हसत स्वतः ला म्हणाला , “मी का इतका विचार करतोय तिचा..”
वरवर स्वतः ची समजुत काढत असला तरी मनातून ती कधी एकदा कामावर रूजू होते असं त्याला वाटत होते.
अदितीला मनासारखी नोकरी मिळाल्याने ती आणि तिच्या घरचे ही खूप आनंदी होते. आठवड्यानंतर अदिती ऑफिसमध्ये आली. पावसाळ्याचे दिवस असल्याने पाऊस हा होताच. ती आॅफिसला पोहोचली, पहिल्या दिवशी महेश सरांनी तिची टीम मध्ये सगळ्यांशी ओळख करून दिली, तिची नजर अविनाश ला शोधत होती तितक्यात अविनाश एका मिटिंगमध्यून बाहेर येताना तिला दिसला. त्याला बघताच एक गोड स्माइल देत दोघांनी हाय हॅलो केले.
अविनाश ने काही वेळाने तिला कॉफी घ्यायला येणार का विचारले आणि क्षणाचाही विचार न करता ती गेली. कॉफी तिला खूप प्रिय, त्यात असा संततधार पाऊस मग तर काय विचारायलाच नको ?
अविनाश ला त्या दिवशी कळाले अदिती आणि कॉफी मधलं प्रेम.
अविनाश ऑफिसमधला पहिलाच मित्र होता तिचा. तशी जरा अबोल असल्याने फारसे मित्र मैत्रिणी नव्हते, एकाग्रतेने आणि प्रमाणिक पणे काम करणे हे तिचं खरंच कौतुकास्पद होतं. पुढे कामात कुठे काही अडकले की अविनाश तिला मदत करायचा. आता रोजचा एकत्र कॉफीचा कार्यक्रम हा ठरलेला होता दोघांचाही. अविनाश देखणा, आकर्षक, मॉडर्न राहणीमान त्यामुळे ऑफिसमध्ये अतिशय फेमस पर्सनालीटी. अदिती ला सुध्दा मनातून आवडायला लागला होता तो पण त्याच राहणीमान, श्रीमंत घरातला मुलगा आपल्याला का म्हणून पसंत करणार तेव्हा मनातल्या भावना मनातच ठेवलेल्या बर्या या विचाराने ती अविनाश ला काही जाणवू देत नव्हती.
अविनाश ला मात्र ती पहिल्या भेटीतच आवडली होती, आता तर तिच्या सहवासात तिचं निरागस रूप, साधं राहणीमान त्याला अधिकच आवडू लागलं होतं. अदिती सारखी मुलगी आयुष्यात असतं किती सुखकर आहे हे त्याला कळू लागलं. दोघांची छान मैत्री झाली, तुम्ही आम्ही चे नाते मैत्री झाल्याने तू मी वर आले.
असेच सहा महिने गेले. आज अदितीचा वाढदिवस होता, ती मस्तपैकी तयार होऊन सगळ्यांसाठी मिठाई , नमकिन घेऊन ऑफिसला आली, बघते तर काय अविनाश आणि इतर सहकार्यांनी मिळून तिचं क्युबिकल छान सजवलंं होतं. ते बघून ती अजूनच आनंदली, हा वाढदिवस खूप खास आहे असं तिला वाटत होतं. अविनाश सोबत कॉफी घ्यायला गेल्यावर त्याने तिला छान नाजूक असं सोन्याचं ब्रेसलेट गिफ्ट दिलं आणि म्हणाला “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अदिती..तू खूप खास मैत्रीण आहेस माझी.. म्हणून तुझ्यासाठी माझ्याकडून हे खास गिफ्ट..”
अदिती त्यावर म्हणाली,” थॅंक्यू अविनाश पण असं महागडं गिफ्ट मी नाही घेऊ शकत.. प्लीज समजुन घे..आई बाबांना सुद्धा नाही आवडणार अरे.. त्यांना काय सांगणार ना मी..”
अविनाश जरा नाराज होऊन, “अगं वेडाबाई, गिफ्ट आहे ते..स्वस्त महाग असं काही नसतं.. तुझ्यासाठी खास निवडून आणलं मी..खरंच खूप आवडीने आणलं.. असं नाही म्हणून नाकारू नकोस ना.. प्लीज..”
अदितीला अविनाश चे बोलणे आज नेहमीपेक्षा वेगळे वाटत होते, त्याच्या डोळ्यात वेगळेच भाव तिला दिसत होते.. तिलाही त्याच असं खास मैत्रीण म्हणनं, वाढदिवसाचं छान सरप्राइज देणं मनापासून आवडलं होतं पण तिचं मन मात्र मानत नव्हतं. नकळत ती बोलून गेली, “इतकी खास मैत्रीण आहे का रे मी तुझी..माझा वाढदिवस लक्षात ठेवून असं दिवसभर स्पेशल वागणूक देतोय तू आज मला… सगळं असं छान वाटतंय…आजचा वाढदिवस सगळ्यात खास आहे असं वाटतंय अविनाश मला…फक्त तुझ्यामुळे..तुझ्यासारखा मित्र मिळाला याचा खूप आनंद वाटतो मला.. थॅंक्यू सो मच…”
अविनाश तिच्या डोळ्यात बघत , ” अदिती, खास मैत्रीण तर आहेच तू माझी पण त्या पलिकडे ही काही तरी वाटतयं मला..तू आवडतेस मला..”
अदितीला हे सगळं खूप हवंहवंसं वाटत होतं, तो अगदी आपल्या मनातलं बोलतोय असं वाटत होतं पण का कोण जाणे तिचं मन मात्र मानत नव्हतं..आपण अविनाश पुढे काहीच नाही..तो घरंदाज, श्रीमंत, देखणा..आपण साधारण कुटुंबात वाढलेलो शिवाय दिसायला त्याच्या मानाने साधारण असा विचार तिला त्याच्या आयुष्यात जाण्यापासून तिला अडवत होता..त्याला आपल्यापेक्षा खूप देखणी, त्याच्या तोलामोलाची मुलगी मिळेल तेव्हा वेळीच आपण थांबलेले, भावनांना आवरलेले बरे असा विचार करून ती त्याच्या विचारातून मागे फिरली आणि म्हणाली, “अविनाश, तू काय बोलतोय, अरे आपण चांगले मित्र आहोत पण… नाही अविनाश आपण इथेच थांबलेलं बरं..”
अविनाश नाराज होऊन, “अदिती तुला दुखवायचं नाही गं, पण का कोण जाणे आज नकळत मनातलं सगळं बाहेर आलं..But I really mean it..मला मनापासून आवडतेस तू…”
त्यावर अदिती निरूत्तर होती, त्याने दिलेलं गिफ्ट सुद्धा तिने नाकारलं.
अचानक अदितीच्या वागण्यातला बदल त्याला जाणवू लागला. ती शक्य तितकं त्याला टाळायचा प्रयत्न करत होती, मनातून तिलाही तसं वागायला आवडत नव्हतं पण तरीही त्याला टाळत तिने स्वतःला कामात झोकून दिलं. अविनाश ला सगळं खूप विचित्र वाटलं, मनोमन तो खूप दुखावला गेला होता. शक्य तो प्रयत्न करून तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होता, आता एकत्र कॉफी सुद्धा कधीतरीच त्यांच्या नशीबी यायची. अविनाश ने विचारल्यावर ती इतकंच म्हणायची, मला आता तरी करीअर वर लक्ष द्यायचे आहे..तू माझा विचार करू नकोस…
अविनाश तिला समजवायचा प्रयत्न करत म्हणायचा “अदिती, तू हवा तितका वेळ घे..तू माझं प्रेम स्विकारावे असा हट्ट नाही माझा पण असं टाळून मला दुखवू नकोस गं..आपण मित्र म्हणून तर राहूच शकतो ना..”
तिलाही त्याच पटत होतं पण आता मैत्री सुद्धा पूर्वीप्रमाणे राहीली नव्हती. अविनाश ला दुखवायला नको म्हणून ती न चुकता त्याच्या सोबत कॉफी घ्यायला जायची पण पूर्वीसारखा संवाद राहीला नव्हता.
इतर सहकार्यांचीही दोघांविषयी काही तरी कुजबुज सुरु झाली होती.
अविनाश ला त्याच्या कामातील हुशारी मुळे प्रमोशन मिळाले. दुसऱ्या एका टिम मधून एक नविन प्रोजेक्ट UK मध्ये सुरू होणार होता आणि त्यासाठी अनुभवाच्या जोरावर योग्य व्यक्ती म्हणून अविनाश ची निवड झाली. दोन वर्षांसाठी अविनाश UK ला जाणार होता. ते कळाल्यावर अदितीला मनोमन आनंद तर झालाच पण तो सोबत नसणार म्हणून एक अस्वस्थताही वाटू लागली.
अविनाश ची अवस्था सुद्धा अशीच झाली होती. एकीकडे UK ला जाण्याची संधी, प्रमोशन याचा आनंद तर दुसरीकडे अदितीला सोडून जावं लागणार म्हणून वेगळीच अस्वस्थता. परत येईपर्यंत अदिती च्या मनात काय असणार, दुर गेल्यावर तिचं मन बदलेल का, तिला माझ्या प्रेमाची जाणीव होईल का अशे अनेक विचार त्याच्या मनात गोंधळ घालत होते.
अविनाश साठी जाण्यापूर्वी सगळ्यांनी छोटीशी पार्टी ठेवली होती, त्या पार्टीत अविनाश आणि अदिती वरवर आनंदी वाटत असले तरी मनातून एकमेकांसाठी झुरत होते.
अदिती माझ्या संपर्कात राहशील ना..I will really miss you.. specially will miss our coffee..” असं तिला म्हणताच तिच्या डोळ्यात त्याला अश्रू दिसले. कसं बसं अश्रु आवरत ती हसून म्हणाली ,”All the best अविनाश..I will miss you too..”
अविनाश ठरलेल्या दिवशी UK ला रवाना झाला.
अदिती त्याची आठवण काढून खूपदा रडायची, तिला मनांतून वाटायचं त्याला फोन करावा, त्याचा फोन मेसेज आला की बोलावं, मन हलकं करावं पण स्वतःच्या भावना आवरत ती त्याला टाळत होती. सध्या कामाचा व्याप वाढलाय, नंतर बोलते म्हणत वेळ मारायची. हळूहळू त्याला पूर्णपणे टाळायला सुरू केले तिने. असं कुणाला दुखावणे योग्य नाही हे कळत असून भावना आवरण्याच्या नादात ती असं वागायला लागली. मनात रोज आठवण काढून , जुन्या आठवणी, सोबतचे क्षण आठवायची आणि मग अचानक भानावर येत स्वतः ला दुसरीकडे गुंतवू पाहायची. असेच दोन वर्ष गेले.
आज अविनाश आणि अदितीची पुन्हा भेट झाली.
मागच्या भागात पाहिल्याप्रमाणे दोघे एकत्र घरी जायला निघाले.
पुढे अदिती आणि अविनाश यांच्या नात्यांचं काय होणार हे जाणून घेऊया पुढच्या म्हणजेच अंतिम भागात. ?
कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा ?
लेखणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही ?
© अश्विनी कपाळे गोळे
Comments are closed