कॉफी आणि बरंच काही… गोष्ट एका प्रेमाची… भाग ३ ( अंतिम )

Love Stories

मागच्या भागात आपण पाहीले की ऑफिस मध्ये उशीर झाल्याने आणि पाऊस सुरू असल्यामुळे अविनाश अदितीला घरी सोडतो म्हणाला, जरा आढेवेढे घेत ती त्याच्या सोबत जायला तयार झाली. दोन वर्षांनंतर आज ते भेटलेले. आता पुढे.

दोघेही पार्कींग कडे निघाले. अदितीला जरा अवघडल्या सारखे वाटत होते पण अविनाश तिला कंफर्टेबल करण्याचा प्रयत्न करीत होता. कार मधून दोघेही निघाले, रेडिओ वर मंद आवाजात गाणे सुरू झाले,

“तेरे बिना जिया जाए ना…

बिन तेरे…तेरे बिन….साजना

सांस में सांस आये ना…”

अदितीने चॅनल बदलले..

दुसऱ्या चॅनल वर गाणे लागले,

“बहुत प्यार करते है…तुमको सनम…”

अदितीला जास्तच अवघडल्यासारखे वाटले आणि तिने रेडिओ बंद केला.

अविनाश तिची घालमेल बघत होता, तो लगेच म्हणाला, “आपल्या सिच्युएशन वर गाणे लागताहेत असं वाटतंय ना..”

अदिती त्यावर काही बोलली नाही, नजर चुकवत इकडे तिकडे बघत विषय बदलण्याचा प्रयत्न करू लागली.

अविनाश – “अदिती, मी खूप मिस केले गं तुला दोन वर्ष..तू अचानक पूर्ण पणे संपर्क तोडला माझ्याशी तेव्हा मी खूप झुरलो तुझ्यासाठी..एका सहकार्‍याकडून तुझी चौकशी केली, तू स्वतः ला कामात झोकून घेतलं असं कळालं..तुझी कंपनीतील प्रगती ऐकून आनंदी झालो पण तू माझ्या पासून दूर जातेय हा विचार सहन होत नव्हता गं मला.. असं वाटत होतं यावं, भेटाव तुला पण कुठलही नातं तुझ्यावर लादायचं नव्हतं मला.

दोन वर्षांनंतर आज आपली भेट झाली, अख्खा दिवस तुला भेटण्यासाठी तळमळत होतो पण तू कामात गुंतलेली बघून डिस्टर्ब नाही केलं तुला शिवाय तू आज मला बघून काय प्रतिक्रिया देशील याचीही खात्री नव्हती. खूप छान वाटतंय आज तुझ्यासोबत…भावना आवरू नाही शकलो मी.. म्हणून सगळं बोलून गेलो…”

अदिती त्याचं बोलणं ऐकून रडायला लागली जणू दोन वर्ष मनात दाबून ठेवलेल्या भावना अश्रू रूपात बाहेर पडत होत्या. ती अशी रडताना पाहून अविनाश ला अपराधी वाटू लागले तो गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून तिची समजुत काढत म्हणाला, 

“अदिती, तुला दुखवायचं नाही गं..सो सॉरी..मी नको होतं असं सगळं अचानक बोलायला…माफ कर मला.. प्लीज रडू नकोस..शांत हो…”

अदिती त्यावर उत्तरली,

 “तुला काय वाटतं रे..मी खूप निर्दयी आहे..तुला दोन वर्ष अवघड गेली पण इकडे माझं काय.. कितीही आवरलं स्वतः ला तरी एक दिवस असा नव्हता की तुझी आठवण आली नसेल. मीही तितकीच झुरले तुझ्यासाठी फक्त मला व्यक्त होता येत नव्हतं. तुझ्याशी संपर्कात राहीले तर अजूनच गुंतल्या जाईल मी तुझ्यात असं वाटायचं म्हणून टाळत आले तुला..तू कदाचित वेळेनुसार मला विसरशील.. तुझं आयुष्य आनंदाने जगशील असं वाटलं होतं..तू गेल्यावर हा पाऊस, ती कॉफी सुद्धा नको वाटायची मला..कारण त्यात आपल्या अनेक आठवणी दडलेल्या होत्या. आज तू समोर दिसताच वाटलं मोकळं करावं मन, सांगावं तुला की माझंही तितकंच प्रेम आहे तुझ्यावर पण हिम्मत होत नव्हती माझी.. इतक्यात आई बाबांनी काही स्थळ आणले माझ्यासाठी तेव्हा खूप गरज वाटली होती मला तुझी.. दुसऱ्या कुणाचा विचार करूच शकत नव्हते मी..आई बाबांनाही कळाल होतं माझ्या मनात काही तरी गोंधळ उडाला आहे पण कसं विचारावं कदाचीत त्यांना सुद्धा कळत नव्हतं..अगदी वेळेत परत आलास तू…आज तू व्यक्त झालास आणि मी कमजोर पडले.. आवरले नाही मला अश्रू… तेव्हाही आवडायचा तू मला पण मन मानत नव्हतं.. आजही आवडतोस, हवाहवासा वाटतो तुझा सहवास..आय लव्ह यू अविनाश…”

अविनाश अदितीचा हात हातात घेत म्हणाला ” आय लव्ह यू टू अदिती..आजचा दिवस खुप खास आहे माझ्यासाठी…चल पुढे कॉफी शॉप आहे..आपला हा आनंद साजरा करायलाच पाहिजे ना…”

अदितीने गोड स्माइल देत होकार दर्शविला आणि तिच्या गालावरची खळी बघून अविनाश अजूनच घायाळ झाला.

दोघांनीही मस्त कॉफी घेतली, अविनाश ने अदितीला घरी सोडले. वाटेत मंद आवाजात गाणे सुरू होते,

“पहला नशा, पहला खुमार नया प्यार हैं नया इंतज़ार करलूँ मैं क्या अपना हाल ऐ दिल-ए-बेक़रार मेरे दिल-ए-बेक़रार तू ही बता……”

दोघांच्याही भावना आज नकळत बाहेर पडल्या आणि त्यांच्या प्रेमाची गोड सुरवात झाली.

हि कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविकतेशी संबंध आढळल्यास केवळ योगायोग समजावा ?

कथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

लेखणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही ?

© अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed