बंध रेशमाचे… ( प्रेमकथा )

मेधा किचनमध्ये धावपळ करत विवेकचा डबा, चहा नाश्त्याची तयारी करत होती. विवेक आवरून डायनिंग टेबल कडे येत मेधा ला म्हणाला, “मेधा, झालं गं माझं.. उशीर झालाय आज जरा.. ऑफिसमध्ये नाश्ता करतो मी..चहा तेवढा आण..”
मेधा किचन मधून नाश्ता चहा ट्रे मध्ये घेऊन येत म्हणाली, “अहो, सगळं तयार आहे..पटकन खाऊन घ्या..”

विवेकची नजर मेधा वर पडली तोच क्षणभर तो तिला बघतच राहिला. न्हाऊन आल्यावरचे ते सौंदर्य अजूनही तितकेच टवटवीत, तिच्या चेहऱ्यावर लटकणार्‍या केसांची बट, ते बोलके डोळे, नाजूक गुलाबी ओठ, चाफेकळी नाक, गव्हाळ वर्ण पण नाकी डोळी तरतरीत, तिचा प्रसन्न प्रेमळ चेहरा, तिने चोपून नेसलेली लाल काळया रंगाची साडी, तिला अजूनच शोभून दिसत होती. विवेक तिला बघताच म्हणाला ” ब्युटिफुल…”

ती लाजतच हातातला ट्रे डायनिंग टेबल वर ठेवत त्याची नजर चुकवत म्हणाली, ” नाश्ता करून घ्या पटकन…चहा पण गार होईल‌…उशीर सुद्धा झालाय ना..”

विवेक मात्र अजूनही तिलाच न्याहाळत होता, तिला बघतच म्हणाला, “तू म्हणशील तर आज नाही जात ऑफिसला..काल रात्री आई बाबा भाऊ परत गेलेत..आज आपण दोघेच घरात…बोल काय म्हणतेस..नको का जाऊ मी…”

मेधा चोरून त्याला बघताच दोघांची नजरानजर झाली आणि ती लाजून चेहऱ्यावर हास्य आणून नजर दुसरीकडे फिरवत म्हणाली, “पटकन आवरा.. खूप सुट्ट्या झाल्या आहेत लग्नाच्या वेळी..”
विवेक नाश्त्याची प्लेट हातात घेत उत्तरला, “छे बुआ..तुला रोमॅंटिक होऊन विचारलं काय नी तू तर मला पळवून लावले..”

ती फक्त गालातल्या गालात गोड हसत राहिली.
चहाचा घोट घेत विवेक तिला म्हणाला , “आता आपण दोघेच असणार ना इकडे मग तू साडी ऐवजी ड्रेस घातला तरी चालेल.. तशी साडीत तू अप्रतिम दिसतेस…”
मेधाने मान हलवून त्याला ड्रेस घालण्यासाठी होकार दिला.
विवेक ऑफिसला निघाला.

मेधा आणि विवेकचे नुकतेच लग्न झालेले. मेधा ग्रामीण वातावरणात, एकत्र कुटुंबात वाढलेली. तालुक्याला तीने ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि लगेच आत्याने विवेकचे स्थळ आणले. विवेक शहरात वाढलेला, जरा मॉडर्न विचारांचा, कंपनीत चांगल्या पदावर नोकरीला. दोघे भाऊ, आई वडील असं चौकोनी कुटुंब.  शहरी वातावरण बघून त्याला नेहमी वाटायचं आपली बायको अशीच मस्त मॉडर्न असावी. मेधाचे स्थळ त्याने पहिले नाकारले होते पण आई बाबांच्या आग्रहाखातर तो कांदेपोहे कार्यक्रम अर्थातच तिला बघायला जाण्यासाठी तयार झाला. बघून यायचे आणि काही तरी कारण सांगून तिला नकार द्यायचा असं त्याने मनात ठरवलं होतं पण झालं वेगळंच.

विवेक घरच्यांसोबत मेधाला बघायला गेला. दारात रेखाटलेली अप्रतिम रांगोळी बघताच नकळत तो पुटपुटला, “व्वा..काय सुरेख रांगोळी आहे..”
मेधाचे वडील लगेच म्हणाले, “अहो विवेकराव, आमच्या मेधाने काढली आहे रांगोळी.. खूप छान रांगोळी काढते ती.. पेंटिंग सुद्धा मस्त करते…”
मेधाच्या घरच्यांनी पाहुण्यांची जोरात सरबराई केली. सगळे गप्पा मारण्यात व्यस्त असताना विवेक हॉलमध्ये लावलेल्या पेंटिंग न्याहाळत होता, मनोमन विचार करत होता “बापरे..काय कला आहे हातात…मला वाटायचं गावात राहणाऱ्या मुलींना काहीच येत नाही.. मध्येच तो स्वतः शीच हसला..”
मेधाचे वडील तिच्या आईला म्हणाले “मेधाला बोलावं अगं चहा घेऊन..” त्यांच्या बोलण्याने तो भानावर आला. इतकी सुंदर कला हातात असलेली मेधा कशी दिसते याची आता त्याला आतुरता होती. तिला नकार द्यायचा असं ठरवल्यामुळे पूर्वी त्याने तिचा फोटो सुद्धा बघितला नव्हता.

मेधा हातात चहाचा ट्रे हातात घेऊन बाहेर आली, उंच सडपातळ बांधा, गुलबक्षी रंगाची जरीकाठी अगदी व्यवस्थित नेसलेली साडी, चेहऱ्यावर जराही मेकअप नसून केवळ नैसर्गिक सौंदर्य, तेजस्वी चेहरा, अर्धवट मागे घेऊन बांधलेले केस, कपाळावर इवलिशी टिकली, कानात मोत्याच्या कुड्या, नाजुक मानेवरून खाली आलेला मोत्यांचा नेकलेस, हातात साडीला शोभेल अशा मॅचिंग बांगड्या. एखादी मराठी अभिनेत्री हिच्या पुढे फिकी पडेल अशी ती दिसत होती.
ती जशीच लाजत लाजत समोर आली तसाच विवेक तिला एकटक बघत मनातच म्हणाला, ” ब्युटिफुल.. जितकी सुंदर कला हातात तितकंच सुंदर सौंदर्य..आता नकार द्यायचा की नाही कळत नाहीये..”

घरच्यांनी मेधाला काही प्रश्न विचारले आणि दोघांना एकट्यात काही बोलायचे असेल तर अंगणातल्या बागेत बसायला पाठविले. मेधाच्या पाठोपाठ विवेक अंगणात आला. गेट मधून आत आल्यावर दोन्ही बाजूला मस्त सजवलेली बाग, मधून घरात जायला रस्ता. बागेत दोघांसाठी दोन खुर्च्या आधीच ठेवलेल्या होत्या. पूर्ण घराभोवती कुंपण त्यामुळे बाहेरून आतले सहसा दिसत नव्हते. अंगणाच्या मधोमध रांगोळी सगळं बघून विवेक परत एकदा म्हणाला, “खरंच अप्रतिम रांगोळी, पेंटिंग्ज पण मस्तच आहेत बरं का.. आणि ही बाग.. म्हणजे मला वाटलं नव्हतं गावात इतकं छान घर , बाग असू शकते..”

मेधा बागेकडे बघत म्हणाली, ” थॅंक्यू….
बाबा आणि मी मिळून ही बाग सजविली आहे..मला खूप आवडते बाग.. फुला फळांची झाडे..”

“ओह.. इंटरेस्टिंग..इतक्या प्रकारचे गुलाब तर मी पहिल्यांदाच बघतोय..मस्त मेन्टेन केली आहे खरंच तुम्ही ही बाग..आय लाईक इट..बाय द वेळ..मी विवेक.. असं म्हणत त्याने हात पुढे केला..”

तिने साडीचा पदर हातात घेत त्याच्या हाताकडे नुसताच एक कटाक्ष टाकला. त्याला ते लक्षात येताच हात मागे घेत तो म्हणाला, “ओह सो सॉरी..बरं आपण बसूया..तुम्हाला काही विचारायचं असेल मला‌ तर विचारू शकता..”
ती त्यावर लाजतच म्हणाली, “मला काही सुचत नाही आहे.. पण तुम्हाला काही विचारायचं..”

तो विचार करत म्हणाला, “खरं पाहिलं तर मलाही अशा वेळी काय बोलावं कळत नाही आहे..आता तुमचे छंद मला कळालेच आहे..बाग, रांगोळी, पेंटिंग्ज बघून.. मला मात्र यातलं काही येत नाही..पण वाचन करायला खूप आवडतं.. तुम्हाला आवडत का वाचायला..”

ती लगेच म्हणाली, ” William Shakespeare ह्यांचे बरेच novels मी वाचलेत.. हिंदी, मराठीही भरपूर साहित्य नेहमी वाचते मी..”

ते ऐकताच विवेकला अजून एक धक्का बसला..तो आश्चर्य चकित होऊन म्हणाला, “काय सांगता..तुम्ही इंग्लिश साहित्य सुद्धा वाचता.. सॉरी पण मला‌ वाटलं…”

पुढे त्याला काय म्हणायचे तिला कदाचित कळालं, ती म्हणाली, “हो मला सगळंच वाचायला आवडतं इंग्लिश, हिंदी, मराठी ..”

आता मात्र विवेकला खात्री पटली की गावात राहणाऱ्या मुलींविषयी आपला मोठा गैरसमज होता, त्यांच्यातल्या कला, हुशारीला योग्य मार्गदर्शन, संधी मिळत नसेल म्हणून कदाचित त्या मागे पडतात पण शहरात राहणारेच हुशार, कलावंत, रसिक असतात असं नक्कीच नाहीये..
दोघांनी बराच वेळ गप्पा मारल्या, मेधा लाजत लाजत एखादं वाक्य बोलत होती आणि विवेक मात्र एक एक विषय काढत गप्पा मारत होता.

आता विवेकचा नकार द्यायचा विचार बदलला. घरी आल्यावर त्याला सतत तिचा चेहरा, ती बाग, रांगोळी, पेंटिंग्ज, त्या साहित्यिक विषयावर असलेली तिची सखोल माहिती सगळं आठवत होते, खरं तर सगळं काही डोळ्यासमोर दिसत होते.
आई बाबांना त्याने त्याचा होकार सांगितला.

दोघांचे महिनाभरात लग्न आटोपले. विवेकचे आई-वडील भाऊ दुसऱ्या शहरात तर विवेक नोकरी निमित्त दुसरीकडे राहायला होता. नविन लग्नानंतर नविन घर सेट करायला म्हणून सगळेच मेधा विवेक सोबत आलेले. विवेकची सुट्टी संपली आणि तो कामावर रूजू झाला. दोन दिवसांनी आई बाबा भाऊ सुद्धा परत गेले. आता घरात दोघेच राजाराणी..आज पहिलीच सकाळ दोघांची एकत्र एकांतात… ( जी कथेच्या सुरवातीला वर्णन केली आहे )

विवेक ऑफिसला गेल्यावर मेधाने घर सजवायला घेतलं. सवयीप्रमाणे मंद आवाजात रेडिओ वर गाणे सुरू होते, त्यामुळे कसं एकटेपणा जाणवत नाही शिवाय कामाचा उत्साह टिकून राहते असं तिचं मत.
एक एक‌ गोष्ट अगदी विचारपूर्वक मांडणी  करीत तिने सर्वात आधी हॉल सजवला. तिच्या हाताने बनवलेली पेंटिंग जी रुखवंतात सोबत आणलेली ती हॉलमध्ये मुख्य भिंतीवर अगदी शोभून दिसत होती. बाल्कनीत छान बाग करायची म्हणून मनातच प्लॅनिंग सुरू होते. दिवसभर मोठ्या हौसेने घर सजविताना एक नजर मात्र घड्याळाकडे लागली होती. कधी एकदा विवेक घरी येणार असं तिला झालं होतं. सायंकाळी लवकरच स्वयंपाक आवरून फ्रेश होऊन ती विवेकची  वाट बघत होती.
दारावरची बेल वाजली तशीच ओढणी सावरत तिने दार उघडले.
तिला बघताच विवेक म्हणाला, “काय राणीसाहेब, सकाळी शब्द काढला नाही की तुम्ही ड्रेस घालून तयार…छान दिसते आहेस..”
ती लाजत थॅंक्यू म्हणाली.
हॉलमध्ये येताच विवेक म्हणाला “क्या बात है..किती छान सजवलंं तू….ती पेंटिंग बघून मला आपला कांदेपोहे कार्यक्रम आठवला… काय कला आहे तुझ्या हातात.. आणि हो भाजी एकदम झकास झालेली बरं का.. सगळ्यांनी कौतुक केलं आज भाजीचं.. आम्ही सगळे मिळून खातो ना डबा तेव्हा टेस्ट केलेली सगळ्यांनी…तितकंच मला चिडवलही..”
असं भरभरून कौतुक ऐकताना ती मनोमन खूप आनंदी होत होती. ती पाण्याचा ग्लास घेऊन त्याच्याजवळ आली तसंच ग्लास हातात घेत दुसऱ्या हाताने त्याने तिला मिठीत ओढले. ती लाजून चूर झाली.

मंद आवाजात गाणे सुरू होते,

” कुछ ना कहो, कुछ भी ना कहो
क्या कहना है, क्या सुनना है
मुझको पता है, तुमको पता है
समय का ये पल, थम सा गया है
और इस पल में, कोई नहीं है
बस एक मैं हूँ, बस एक तुम हो
कुछ ना कहो, कुछ भी ना कहो…”

असाच गोड्या गुलाबीने दोघांचा संसार सुरु झाला.
मेधा ने नोकरी करण्याची इच्छा त्याला बोलून दाखवली. त्याने तिच्यातल्या कलेचा मान राखत तिला स्वतःचे “पेंटिंग्ज क्लासेस” सुरू करण्यासाठी पुरेपूर मदत केली. हळूहळू तिला त्यात यश मिळाले, चांगला प्रतिसाद मिळाला. सोबतच तिने बनविलेल्या पेंटिंग्ज विवेकच्या मदतीने ऑनलाईन विकायला सुरुवात केली. तिचा या सगळ्यात छान वेळ जाऊ लागला शिवाय त्यातून पैसाही मिळायला लागला.

आज‌ त्यांची पहिली मॅनेज अॅनिव्हर्सरी होती. कामाच्या भाराने विवेक ला सुट्टी मिळाली नाही पण सायंकाळी लवकर घरी यायच ठरवून तो ऑफिसमध्ये गेला. परत निघताना त्याचा फोन आला तशीच मेधा सगळी तयारी नीट झाली की नाही यावर कटाक्ष टाकू लागली.  मेधाने मस्त घरात वेगवेगळ्या गुलाबांच्या फुलांचे गुच्छ, पाकळ्या, मेणबत्त्या, दोघांचे फोटो हॉल आणि बेडरूममध्ये लावून रोमॅंटिक वातावरण तयार केले. छान लाल रंगाचा लॉंग वनपीस घालून ती तयार झाली. त्याच्या आवडीचा मेन्यू बनवून डायनिंग सजवित कॅंडल लाइट डिनर ची तयारी अगदी मस्त केली.
हॉलमध्ये केक, गुलाबांच्या फुलांचा गुच्छ टेबलावर ठेवला.

बेल वाजली तशीच लाजत जाऊन दार उघडले. विवेक ला एक सुंदर अप्सरा समोर असल्याचा क्षणभर भास झाला, घरातून येणारा एक मनमोहक सुगंध दरवळत त्याला प्रफुल्लित करत होता. तो घरात येताच सगळी तयारी बघताक्षणी त्याला कौतुकास्पद शब्द सुचत नव्हते. तिच्या डोळ्यात बघत तिला सुंदर नेकलेस, गुलाबांच्या फुलांचा गुच्छ गिफ्ट देत म्हणाला ,” हॅपी अॅनिव्हर्सरी मेधा..आय लव्ह यू…”
तिने ते हातात घेत रिप्लाय दिला ,”हॅपी अॅनिव्हर्सरी..आय लव्ह यू टू…”

तो फ्रेश होऊन आला. तिच्या मेहनतीने केलेल्या सजावटीचे मनातून कौतुक केले.. दोघांनी रोमॅंटिक गाणे लाऊन मस्त कॅंडल लाइट डिनर केला.. नंतर तिचा हात हातात घेत तिला युरोप ट्रीप चे तिकीट दिले आणि म्हणाला, “लग्नानंतर सुट्टया अभावी  आपला हनीमून राहिला ना..आता जाऊयात…लवकरच तयारीला लागायचं आहे..”

तिला एखादं स्वप्न बघितल्या सारखे वाटत होते.  आनंद कसा व्यक्त करावा तिला कळत नव्हतं. त्याच्या मिठीत शिरून ती भावना, आनंद व्यक्त करीत होती. त्यानेही तिला घट्ट मिठी मारली.

त्या रोमॅंटिक वातावरणात गाणेही तसेच सुरू झाले,

” तेरे बिना जिया जाए ना ……
बिन तेरे तेरे बिन साजना ……
साँस में साँस आए ना तेरे बिना …

जब भी ख़यालों में तू आए मेरे बदन से ख़ुश्बू आए महके बदन में रहा न जाए रहा जाए ना तेरे बिना … ”

एकेकाळी नकार दर्शविण्याचे प्लॅनिंग करून मेधाला बघायला गेलेला विवेक आता तिच्या प्रेमळ रेशमी बंधनात अडकला. लग्नानंतर दिवसेंदिवस दोघांचे रेशमी बंध अजूनच घट्ट होत गेले.

अशी ही दोघांची गोड प्रेमकथा कशी वाटली हे कळवायला विसरू नका

 

कथा नावासह शेअर करायला हरकत नाही.

© अश्विनी कपाळे गोळे

Free Email Updates
We respect your privacy.