तेरा साथ है तो… ( प्रेमकथा )

Love Stories-Relations

अमनचे काम आज जरा लवकर संपले आणि शैलजाला सरप्राइज द्यावे म्हणून नेहमीपेक्षा लवकर घरी आला. दारावरची बेल वाजवली पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. शैलजाला फोन लावला तरी‌ काही प्रतिसाद नाही. अमनला जरा काळजी वाटली आणि लक्षात आले की घराची एक चावी आपल्याजवळ आहे. नशिबाने लॅचलॉक केले असेल तर आत जाऊन तरी बघता येईल काय झाले. अमनने चावी लावून दार उघडले, योगायोगाने आतून कडी लावलेली नव्हती. बेडरूममधून शंकर महादेवन यांचे breathless गाणे कानावर पडत होते तेही जरा मोठ्या आवाजात.

” कोई जो मिला तो मुझे ऐसा लगता था जैसे मेरी सारी दुनिया में गीतों की रुत और रंगों की बरखा है खुशबू की आँधी है महकी हुई सी अब सारी फ़ज़ायें हैं बहकी हुई सी अब सारी हवायें हैं खोई हुई सी अब सारी दिशायें हैं बदली हुई सी अब सारी अदायें हैं………”

अमन बेडरूमच्या दिशेने निघाला, हळूवारपणे दार ढकलत आत डोकावून बघतो तर काय शैलजा क्लासिकल नृत्य करण्यात इतकी एकाग्र झालेली होती की बेल वाजलेली, दार उघडलेले काहीच तिला कळाले नाही.

पहिल्यांदाच तिला इतकं अप्रतिम नृत्य करताना बघून अमनला आश्चर्याचा धक्का बसला, तिला डिस्टर्ब न करता तो तिच्या अदा न्याहाळत बसला. गाण्याच्या शेवटी एक गोल गिरकी घेताना शैलजाला अमन‌ दिसताच ती दचकून जवळजवळ किंचाळी दाबत जरा घाबरतच म्हणाली, “अमन‌ तुम्ही कधी आलात..किती घाबरले मी असं अचानक तुम्हाला बघून..आवाज‌ तरी द्यायचा…”

तिच्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव बघत अमन‌ हसतच म्हणाला , “अगं हो‌ हो..शांत हो..बस जरा..किती दचकलीस…आणि‌ मी बराच वेळ बेल वाजवली पण कदाचित गाण्यामुळे तुला आवाज‌ ऐकू नाही आला.. आणि काय बघतोय मी…किती अप्रतिम नृत्य करत होतीस ‌अगदी तल्लीन होऊन..हि कला तुझ्यात आहे हे कधी सांगितलं नाही तू…”

शैलजा गाणे बंद करीत त्याची नजर चुकवत म्हणाली, “लहानपणापासूनच खूप आवडायचं मला भरतनाट्यम पण…….. आज अचानक सामान आवरताना हे गाणं कानावर पडलं आणि पाय कसे थिरकायला लागले कळालच नाही मला… परत परत तेच गाणं लावून मी थिरकत गेले.. सॉरी मला‌‌ बेल वाजलेली कळालच नाही…”

अमन – “अगं सॉरी काय त्यात… आणि काय म्हणत होतीस लहानपणापासून भरतनाट्यम आवडते पण…..पुढे काही बोलली नाही..पण काय शैलू…”

शैलजा – “काही नाही असंच… बरं मी पाणी घेऊन आलेच…” असं म्हणत ती बेडरूम मधून बाहेर जायला निघाली तसंच अमनने तिचा हात धरला आणि स्वतः कडे तिला खेचत म्हणाला, “पण काय…बोल ना राणी… काही तरी सांगणार होतीस पण बोलली नाही तू…”

शैलजा स्वतःला त्याच्यापासून दूर होत विषय बदलत म्हणाली, “बरं ते जाऊ द्या…आज लवकर आलात तुम्ही.. काही खास…”

अमन‌ तिला चिडवत म्हणाला, “माझ्या खास बायकोसाठी खास वेळ द्यावा म्हंटलं.. म्हणून आलो लवकर.. सरप्राइज द्यायचं म्हणून घाईघाईने आलो पण तुझी नृत्यकला बघून मलाच सरप्राइज मिळाले…”

शैलजा- “बरं तुम्ही फ्रेश होऊन या..मी पाणी चहा आणते..”

शैलजा किचनमध्ये गेली तसाच अमन पटकन फ्रेश होऊन तिच्या मागोमाग हॉलमध्ये आला. दोघांनी एकत्र बसून चहा घेताना अमन म्हणाला, “बरं मला सांग काय सांगणार होतीस तू भरतनाट्यम विषयी..तू सांगेपर्यंत मी विचारणार बरं का…”

शैलजा एक गोड स्माइल देत म्हणाली, “ऐकायचं ना तुम्हाला, ऐका तर मग ? अरे मला खूप आवडायचं भरतनाट्यम …तेच काय कुठलाही नृत्यप्रकार मी पटकन शिकायची, टिव्हीवर बघून अगदी हुबेहूब नृत्य करायची, लहान होते ना तेव्हा त्यामुळे सगळेच भरभरून कौतुक करायचे. शाळेत बरेच बक्षिसे पटकावली नृत्य स्पर्धेत पण जशी वयात आली तसंच घरच्यांनी माझे नृत्य बंद केले, जरी शहरात शिकले तरी आम्ही गावात राहायचो ना..बाबा गावचे प्रतिष्ठित नागरिक, ते म्हणायचे पोरी बाळीला असं नाच गाणं शोभत नाही, गावातील लोकं नावं ठेवतील. त्यांना वाटायचं मुलीला नावं ठेऊन आपला मान कमी नको व्हायला. तरीही छंद म्हणून मी त्यांच्या लपून कॉलेजमध्ये असताना एक नृत्याचा परफॉर्मन्स दिला, सगळ्यांनी खूप वाहवा केली. कुणीतरी ही गोष्ट बाबांच्या कानावर टाकली, ते इतके चिडले, खूप खूप बोलले. मी कुठला गुन्हा केल्यासारखे वाटले तेव्हा मला.. त्यानंतर कधी नृत्य करण्याची हिंमतच झाली नाही माझी पण आज काय झालं कुणास ठाउक..नकळत थिरकली मी कित्येक वर्षांनी.. खूप छान वाटलं असं मनसोक्त नाचताना…एक वेगळाच आनंद मिळाला मला…”

हे सगळं सांगताना शैलजा च्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास, तेज सोबतच जरा नाराजी स्पष्ट दिसत होती. तिच्या मनातली सुप्त इच्छा तिने अमनला सांगितल्यावर तिला मनोमन समाधान वाटले.

अमन आणि शैलजाच्या लग्नाला चार महिने झालेले. शैलजा लग्नापूर्वी गावातील शाळेत शिक्षीका होती. दिसायला साधारण, सुडौल बांधा, लांबसडक केसांची वेणी तिला शोभून दिसायची. अमनच्या मामे भावाचे लग्न होते त्यातच ह्या दोघांचे लग्न ठरले. अमन कंपनीत नोकरीला, उंच पुरा, रूबाबदार व्यक्तीमत्व असलेला.

ज्या लग्नात दोघांची भेट झाली ते लग्न म्हणजेच अमनच्या मामे भावाचे आणि शैलजाच्या चुलत बहिणीचे. त्यामुळे करवली म्हणून शैलजा‌ नवरी‌ सोबत होती, तेव्हाच अमनच्या आई बाबांनी तिला अमनसाठी पसंत केले. अमनने पहिल्यांदा लग्नात शैलजाला बघितले त्यावेळी तिने केशरी रंगाची हिरवे काठ असलेली जरी काठी साठी नेसली होती. हलकासा मेकअप, वेणीवर गुंफलेला गजरा, चंद्रकोर टिकली तिच्यावर शोभून दिसत होती.  सगळ्यांच्या नजरा तिच्यावर होत्या. एक गोड हास्य चेहऱ्यावर ठेवून आत्मविश्वासाने ती सगळीकडे वावरत होती. अमनला त्याक्षणीच ती आवडली. अमनच्या घरच्यांनी शैलजा कडे लग्नाची मागणी घातली आणि घरच्यांच्या संमतीने दोघांचे लग्न ठरले. दोघेही आनंदाने नांदत होते. दिवसभर घरी न बसता जवळपासच्या शाळेत नोकरी करावी म्हणून तिचे अर्ज देणे, नोकरी शोधणे सुरू होतेच.

आज अमनला तिच्या छंदा विषयी माहिती झाले, त्याला खूप आनंदही झाला, आपली बायको एक उत्तम नृत्यांगना आहे हे त्याला कळाले शिवाय तिला तिचा छंद जोपासायला जमले नाही याची खंतही वाटली. आता मात्र शैलजा ची इच्छा पूर्ण करण्याचे त्याने मनोमन ठरवले.
अमनचे कुटुंब आधुनिक विचाराचे त्यामुळे त्यांना शैलजा विषयी, तिच्या नृत्याविषयी ऐकून आनंदच होईल याची त्याला खात्री होती. अमनने शैलजा ला डान्स क्लास सुरू करण्याचा प्रस्ताव सांगितला. तिला ती कल्पना आवडली पण परत घरच्यांचे काय , त्यांना हे पटेल का म्हणत तिने प्रश्न केला.
अमन तिला समजावून सांगत म्हणाला, ” आता तू माझी अर्धांगिनी आहेस, तुझ्या प्रत्येक निर्णयात, कुठल्याही परिस्थितीत मी तुझ्या सोबत आहे. डान्स क्लास घेणे शहरात काही वावगे वाटत नाही. तू खूप छान प्रगती करशील त्यात ह्याची मला खात्री आहे…”

अमनचा विश्वास बघता तिने होकार दिला आणि शैलजाच्या डान्स क्लास चे प्लॅनिंग, तयारी दोघांनी सुरू केली. सुरवातीला घरी आणि काही दिवसांनी सोसायटीच्या जवळच एक जागा भाड्याने घेऊन तिथे मस्त डान्स स्टुडिओ तयार केला. ती इतकी अप्रतिम शिकवायची त्यामुळे तिला भराभर चांगला प्रतिसाद मिळाला. अमनने तिला मोठमोठ्या डान्स शो साठी आॅडीशन विषयी सुद्धा सांगितले. एक ग्रुप तयार करून तिने स्वत:च्या ग्रुपचे नाव त्या शो साठी नोंदविले. बाबांचा अजूनही ते पटत नव्हते पण अमन मुळे ते‌ काही बोलत नव्हते.
शैलजाचा ग्रुप त्या शो साठी निवडला गेला, त्या शो चे प्रक्षेपण टिव्हीवर होणार होते. ही बातमी ऐकून शैलजाचा आनंद गगनात मावेनासा झाला, तिचं एक स्वप्न पूर्ण झालं होतं. लहानपणी टिव्हीवर डान्स शो बघताना आपणही कधीतरी अशा शो मधून टिव्हीवर यावं असं तिला खूप वाटायचं, ती सुप्त इच्छा आज‌ अमनमुळे पूर्ण होत होती.

तिने अमनला फोन करून ही गोड बातमी सांगितली. सायंकाळी तो घरी येताच तिने त्याला कचकचून मिठी मारली, तिच्या डोळ्यातले आनंदाश्रु अमनच्या शर्टवर टपकत होते. तिचा आनंद बघून अमनला खूप हायसे वाटले, तो तिची मस्करी करत म्हणाला, “मॅडम, नाही जायचं तर नका जाऊ शो साठी पण रडायचं कशाला..माझे शर्ट भिजवले राव तू…”

ती हसतच जरा बाजुला होत म्हणाली, “आनंदाश्रु आहेत हो ते..आज‌ माझं खूप मोठं स्वप्न पूर्ण झालं..फक्त तुमच्यामुळे….कसे आभार मानू तुमचे…”

अमन जोरात हसत म्हणाला, “आभार… अरे पगली हक है तेरा… कर्तव्य आहे माझं तुझी इच्छा पूर्ण करण्याचे…आभार कसले त्यात…आता मस्त शो साठी तयारीला लाग… आणि हो आज मस्त सेलिब्रेशन करूया…मलाही डान्स शिकव जरा…..”

अमन‌ फ्रेश होऊन आला, शैलजा ने दोघांसाठी मस्त कॉफी बनविली. अमनने बाहेरून जेवण मागवले आणि रोमॅंटिक गाणे लावले. कॉफी घेत एकमेकांच्या डोळ्यांत बघत त्यांनी आनंद व्यक्त केला. अमनने तिचा हात पकडून तिला उभे करत कपल डान्स करायला सुरु केले..गाणेही तसेच सुरू होते…

“अब मुझे रात दिन तुम्हारा ही ख्याल है
क्या कहूँ प्यार में दीवानों जैसा हाल है
दीवानों जैसा हाल है तुम्हारा ही ख्याल है…”

दोघेही एकमेकांच्या डोळ्यांत बघत डान्स करण्यात मग्न होते. मध्येच तिचं लाजणं, गोड स्माइल देणं सुरू होतं. तिची ती अदा बघून अमन तिला अधिकच जवळ खेचत तिची खोडी काढत होता, तशीच ती त्याला दूर लोटत डान्स करीत होती. तितक्यात दारावरची बेल वाजली आणि दोघेही भानावर आले. मागवलेल्या जेवणाची ऑर्डर घेऊन एकजण आलेला. दोघांनी आवडीचा मेनू मस्त एंजॉय केला.

शैलजा शो साठी जोरात तयारीला लागली होती. ग्रुपची चांगली तयारी करून घेतली. लवकरच तो दिवस आला. आज त्यांचा परफॉर्मन्स होता. शैलजा टिव्हीवर येणार म्हणून अख्ख कुटुंब आज उत्साहात. तिच्या ग्रुपचा परफॉर्मन्स अप्रतिम झाला. परिक्षकांनी त्या डान्स ग्रुपचे कौतुक करत शैलजाला स्टेजवर बोलावून प्रतिक्रिया व्यक्त करण्याची संधी दिली.
हातात माईक घेऊन तिच्या आनंदाश्रु ने परत वाट शोधली. भावनांना आवरत ती बोलू लागली, “माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते एका मोठ्या डान्स शो मध्ये परफॉर्म करण्याचे, आज माझ्या ग्रुप व्दारे मी माझं स्वप्न पूर्ण केलं..हे सगळं शक्य झालं फक्त आणि फक्त माझे पती अमनमुळे आणि माझ्या ग्रुपमधल्या शिष्यांमुळे. अमन आज इथे आले नसले तरी हा शो‌ ते बघत आहेत..मलाच मनापासून म्हणावसं वाटतं थॅंक्यू सो मच अमन… तुम्ही ग्रेट आहात…”
बाबांनी तिचा हा शो बघितला तेव्हा त्यांचे डोळे पाणावले. आपल्यामुळे तिला इच्छा दाबत रहावं लागलं, किती बोललो आपण तिला नृत्य न करण्यासाठी.. याचं त्यांना वाईट वाटलं शिवाय इतक्या मोठया शो मध्ये ती झळकली बघून तिचा खूप अभिमानही वाटला..

अमनच्या आई बाबांनी तिचे खूप कौतुक केले. आमच्या मुलीने (सुनेने )नावं कमावले असं ते अभिमानाने सांगत होते.
शैलजाच्या डान्स क्लास चे लवकरच मोठे नावं झाले. सगळी तिची इच्छा , तिचं स्वप्न अमनने पूर्ण केलं. यामुळेच दोघांचं नातं अजूनच घट्ट झालं, प्रेम वाढतच गेल. ?

खरंच नात्यात एकमेकांना समजून घेणे किती महत्त्वाचे आहे ना.जोडीदारावर विश्वास ठेवत एकमेकांच्या आवडीनिवडी जपून साथ दिली तर नातं दिवसेंदिवस बहरतचं जातं ?

दोघांची ही प्रेमकथा कशी वाटली हे कळवायला विसरू नका ??

कथा शेअर करताना‌ लेखिकेच्या नावासह करायला हरकत नाही?

– अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed