तू तू मैं मैं पण तरीही तू आणि मी ( प्रेमकथा ) – भाग पहिला

Love Stories-Relations

शिवानी घरात येताच बॅग टेबलवर ठेवत होती तितक्यात आई पाण्याचा ग्लास घेऊन बाहेर आली आणि म्हणाली,
“काय गं, भेटलीस का रोहीतला…”
शिवानी चिडून म्हणाली, “आई बाबा तुम्ही म्हणाले म्हणून मी तयार झाले त्याला भेटायला पण त्याने येणार सांगितल्यावर वेळेत पोहोचायला नको होतं का..मी कधी कुणाची वाट न पाहणारी या महाशयासाठी तासभर थांबली पण तो आलाच नाही..वेटर तीन तीन वेळा विचारून गेला, मॅडम कुछ ऑर्डर देना‌ है क्या..तासाभरात दोन कप कॉफी प्यायली मी..आई, बाबा जाम डोक्यात गेलाय हा मुलगा माझ्या.. नाही जमलं यायला तर कळवायला नको का त्याने..”

बाबा शिवानी ला शांत करत म्हणाले, “अगं शांत हो..काहीतरी काम आलं असेल.. सायंकाळी गर्दी होते ना सगळीकडे, यायला वेळ लागला असेल..पण फोन करून कळवायला हवं होतं त्याने..बरं बघू आपण काय ते..तू शांत हो बघू..त्रास नको करून घेऊन स्वतः ला.”

शिवानी त्यावर काही न बोलता रागातच फ्रेश व्हायला निघून गेली.

काही वेळाने शिवानी ला रोहीतचा फोन आला पण तिने चिडल्या मुळे उत्तर दिले नाही. नंतर त्याने शिवानीच्या बाबांना फोन केला, “हॅलो, मी रोहीत बोलतोय..काका, अहो शिवानी ला भेटायच ठरलं होतं पण वेळेवर मिटिंगमध्ये अडकलो आणि उशीर झाला त्यात माझा फोन डिस्चार्ज होऊन बंद पडला त्यामुळे कळवता ही आलं नाही..मी ठरलेल्या कॉफी शॉप मध्ये पोहचलो पण शिवानी बहुतेक माझी वाट पाहून निघून गेली होती.‌.आता घरी आल्यावर फोन चार्ज केला आणि तिला फोन केला पण ती उत्तर देत नाहीये..चिडली बहुतेक माझ्यावर..”

बाबा- “हो रोहीत .. अरे ती तुझी तासभर वाट बघत होती, तू वेळेत पोहोचला नाही म्हणून जाम चिडली ती.. तुझंही काही चुकलं नाही म्हणा, येतात वेळेवर कामं..पण आता तिची समजुत कशी काढायची बघ बाबा तूच.. आम्ही समजावलं तिला पण तुझ्यावर चिडली ती..तुला तर माहीतच आहे तिचा स्वभाव..”

शिवानी आणि रोहित दोघांचे वडील बालमित्र त्यामुळे दोन्ही कुटुंबे एकमेकांना चांगले परिचयाचे. रोहीतला पूर्वीपासूनच शिवानी खूप आवडायची पण तिला सांगण्याची हिंमत त्याने केली नव्हती. शिवानी अतिशय बिनधास्त, करीअर ओरिएंटेड, जरा चिडखोर पण तितकीच प्रेमळ स्वभावाची. कुरळे खांद्यापर्यंत केस तिला शोभून दिसायचे, गव्हाळ वर्ण, मध्यम बांधा, नाकी डोळी नीटस आणि आत्मविश्वास असलेली शिवानी कुणाच्याही नजरेत बसेल अशीच.

रोहीत जरा शांत, समजुतदार, हुशार, दिसायला राजबिंडा, उंच बांध्याचा पिळदार शरीरयष्टी असलेला. कॉलेजमध्ये बर्‍याच मुली त्याच्यावर फिदा पण ह्याच्या मनात शिवानी घर करून बसली होती त्यामुळे तो कुणाला काही भाव देत नव्हता.

घरच्यांनी रोहीतच्या मनातील शिवानी विषयीच्या भावना ओळखून दोघांच्या लग्नाविषयी विचार केला. दोन्ही कुटुंबे तशी आधुनिक विचारांची. शिवानीला रोहीत आणि तिच्या लग्नाविषयी सांगितल्यावर तिला जरा विचित्र वाटले, सध्या मला लग्न करायचं नाही म्हणत तिने विषय टाळला पण आई बाबांनी तिची समजुत काढली, “रोहीत खरंच खूप चांगला मुलगा आहे, माहितीतला आहे, तुम्ही दोघे एकमेकांना लहानपणापासून ओळखता तेव्हा तुमची मैत्री लग्नात बदलायला काय हरकत आहे शिवाय आम्हाला तो पसंत आहे.. तसं तुला दुसरा कुणी आवडत असेल तर सांग असंही ते म्हणाले..”

आता आई बाबांना काय उत्तर द्यावे तिला कळेना. दुसरा कुणी आवडत नाही हो बाबा पण इतक्यात लग्न नको इतकंच म्हणणं आहे असं ती म्हणाली.

आई त्यावर म्हणाली, “अगं, आताच लग्न करायचं नाही पण तुम्ही जरा एकमेकांना भेटून याविषयी बोलले‌, अपेक्षा जाणून घेतल्या तर बरं होईल.. म्हणजे एकमेकांशी मैत्री असणे आणि त्यालाच जोडीदार म्हणून निवडणे यात फरक आहे.. तुमच्या अपेक्षा, स्वप्न, भविष्याविषयी जरा बोलून जाणून घेतलं तर काय तो निर्णय घेता येईल.. नाही पटलं तर काही जबरदस्ती नाहीच आमची..बघ विचार करून..”

शिवानी आणि रोहित फॅमिली फ्रेंड असल्याने एकमेकांना चांगले ओळखायचे. सतत भेट होत नसेल तरी भेटले की टॉम अँड जेरी सारखे भांडायचे, शिवानी चिडली की रोहीत तिची अजूनच मज्जा घ्यायचा. रोहीत भावनिक असल्याने ती कधी जास्त दुखावली जाऊ नये म्हणून तो खूप काळजी घ्यायचा. तिची बडबड ऐकायला त्याला कधीच कंटाळा येत नसे. ती अगदी बिनधास्त, मनात आलं ते बोलून मोकळं व्हायचं अशा स्वभावाची पण रोहीत अगदी विरुद्ध,समोरच्याला त्रास होऊ नये म्हणून सतत प्रयत्नशील. रोहीतला आपण आवडतो हे शिवानीला कळत होते. शिवानीला मात्र रोहीत विषयी आपल्याला नक्की काय वाटते हे स्वतः च्या मनातले भाव ओळखता येत नव्हते.
शिवानी आणि रोहित दोघेही कंपनीत नोकरीला, दोघेही चांगल्या पदावर कार्यरत तेव्हा भेटले की करीअर विषयी बोलताना त्यांना वेळ पुरत नसे. आता पर्यंत मित्र मैत्रिण म्हणुन राहिल्यावर शिवानीला रोहीत आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडताना काही कळत नव्हते, मनात नुसता गोंधळ उडाला होता.

आई बाबांची इच्छा आहे तर एकदा रोहीतला लग्नाच्या हेतूने भेटायला हरकत नाही असा विचार करून ती भेटायला तयार झाली पण रोहीतने यायला उशीर केल्याने खूप चिडली.

आता रोहित सुद्धा काळजीत पडला, शिवानीचा राग सहज शांत होणार नाही, घरी गेलो तरी ती बोलणार नाही तेव्हा काही तरी खास प्लॅनिंग करायला पाहिजे असा विचार रोहीत करू लागला.

रोहीत शिवानीचा राग शांत करायला काय करणार आणि पुढे दोघांच्या नात्याचे काय होणार हे जाणून घेऊया पुढच्या भागात ?

पुढचा भाग लवकरच.

माझा‌ लेख माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही ?

© अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed