तू तू मैं मैं पण तरीही तू आणि मी ( प्रेमकथा ) – भाग दुसरा ( अंतिम)

Love Stories-Relations

मागच्या भागात आपण पाहीले की शिवानी आणि रोहित दोघे फॅमिली फ्रेंड असून घरच्यांच्या मदतीने दोघे लग्नाच्या विचाराने एकमेकांना भेटण्याचे ठरते. रोहीत वेळेत न पोहोचल्याने शिवानी रागारागाने घरी निघून जाते. त्याच्या फोनला सुद्धा उत्तर देत नाही. आता शिवानी चा राग शांत करण्यासाठी रोहीत मनात काही तरी प्लॅनिंग करायचे ठरवतो. आता पुढे.

रोहीतने शिवानीला फोन मेसेज करून बोलण्याचा खूप प्रयत्न केला पण ती उत्तर देत नव्हती. रोहीतला ती आवडत असल्याने तिच्यासाठी काही तरी खास प्लॅनिंग करायचा विचार करताना त्याला आठवण झाली त्यांच्या कॉमन फ्रेंड रेश्मा ची. रोहीतने रेश्माला फोन करून तिला भेटायला बोलावले शिवाय हेही सांगितले की आपण भेटणार आहोत याविषयी शिवानीला सांगू नकोस. रेश्मा आणि शिवानी एकाच ऑफिसमध्ये नोकरीला, शिवानी मुळे रोहीत आणि रेश्मा यांची मैत्री झालेली.
रेश्मा शिवानी ला म्हणाली, “शिवानी अगं आज मला जरा काम आहे, मी जरा लवकर निघते ऑफिसमधून.”

इतकं बोलून गडबडीत रेश्मा मोबाईल डेस्क वर सोडून वाॅशरूम मध्ये फ्रेश व्हायला निघून गेली. तितक्यात रेश्माच्या मोबाईल वर रोहीतचा फोन येताना शिवानीने बघितले तसाच तिचा पारा चढला. काही तरी गडबड नक्कीच आहे म्हणून रेश्मा आज लवकर निघण्याच्या तयारीत आहे हे लक्षात घेऊन शिवानी तिच्या मागोमाग निघाली.

रेश्मा एका कॉफी शॉप मध्ये गेली तिच्या मागोमाग शिवानीही गेली, बघते तर काय रोहीत आधीच त्या कॉफी शॉप मध्ये बसलेला होता. ते बघून शिवानीला खूप चिड आली, त्या दिवशी तासभर वाट बघत बसून सुद्धा रोहीत आला नाही आणि आज रेश्माला भेटायला आधीच तयार. रेश्मा सुद्धा खोटं बोलली , ती रोहीतला भेटायला येणार आहे हे मला मुद्दाम सांगितले नाही तिने. नक्कीच दोघांचं काही तरी चाललंय म्हणूनच रोहीत मला भेटायला आला नसावा असा तर्क काढून शिवानी पाणावलेल्या डोळ्यांनी तिथून निघाली. आज कधी नव्हे ते रोहीत ला रेश्मा सोबत बघून शिवानीला खूप वाईट वाटले होते. रडकुंडीला येऊन रिक्षा पकडून ती घरी निघाली. रोहीत आपल्याशी असा वागूच कसा शकतो हा विचार करत ती मनोमन त्याच्या साठी झुरत घरी पोहोचली.

घरी आल्यावर शांतच होती ती..आई बाबांशी काही न बोलता सरळ खोलीत निघून गेली. आज तिला काही तरी गमावल्या सारखे वाटत होते. फ्रेश व्हायला बाथरूम मध्ये गेली आणि एरवी इतकी बिनधास्त राहणारी शिवानी आज ढसाढसा रडली. आपण रोहीतला दुसऱ्या मुलीसोबत बघू का शकत नाही हा प्रश्न तिला आज सतत विचार करायला भाग पाडत होता. आपण रोहीतच्या प्रेमात पडलो आहे हे तिला आज कळून चुकले पण रोहीत मात्र रेश्माला भेटायला गेला हे आठवून ती परत मनोमन खूप रडली. तिच्या मनात मोठा गोंधळ उडाला होता.
इकडे रोहीत आणि रेश्मा यांनी मिळून शिवानीचा राग शांत करण्याचा प्लॅन बनविला.

आता शिवानी ऑफिसमध्ये रेश्माला टाळायला लागली, काय झालं ते मात्र रेश्माला कळत नव्हते. ती शिवानी सोबत बोलण्याचा प्रयत्न करत होती पण शिवानीला रोहीत सोबतच आता रेश्माचाही राग आला होता. आपल्या रोहीतला हिने आपल्या पासून दूर केले असा गैरसमज करून ती रेश्माचा राग करत होती.

पुढच्या काही दिवसांत शिवानीचा वाढदिवस होता. दरवेळी अती उत्साहाने वाढदिवसाची वाट बघणारी शिवानी यावेळी जरासुद्धा उत्साहात नव्हती. आई बाबांना ते जाणवले, त्यांनी विचारण्याचा प्रयत्न केला पण शिवानीने काही सांगितले नाही. रोहीत ने आधीच त्याच्या प्लॅनिंग विषयी शिवानीच्या आई बाबांना सांगितले होते.

शिवानीसाठी आईने एक ड्रेस आणला जो रोहीत ने त्याच्या आवडीने घेऊन आई बाबांच्या मदतीने तिला दिला आणि हेही सांगितले की मी हा ड्रेस दिला हे न सांगता वाढदिवसाच्या दिवशी ठरलेल्या ठिकाणी तिला घेऊन तुम्ही या.

वाढदिवसाच्या दिवशी शिवानी मुळीच आनंदात नव्हती. ऑफिसमध्ये जायचा मूड नाही म्हणत ती खोलीत एकटीच पडून होती. आज रोहीत ने शुभेच्छा द्यायला फोन सुद्धा केला नाही याचं तिला आज जास्तच वाईट वाटलं. भेटण्याच्या दिवसांनंतर दोन दिवस सोडले तर मागच्या दोन आठवड्यात रोहीत ने ना फोन केला ना मेसेज, तो आता रेश्मा मध्ये अडकला आहे मला विसरला असा समज करून घेत शिवानी खूप रडली.

आई बाबांना तिची घालमेल कळाली पण रोहीतच्या प्लॅनिंग नुसार सायंकाळ पर्यंत शिवानी ला काही सांगायचं नाही म्हणून ते गप्प बसले. तिला हसायचा प्रयत्न करत शिवानीच्या बालपणीच्या आठवणी काढून तिचा मूड बदलण्याचा प्रयत्न करू लागले.

आईने सायंकाळी जबरदस्तीने शिवानीला तो ड्रेस घालून तयार व्हायला लावले. आपण बाहेर डिनर साठी जातोय असं सांगून तिला रोहीत ने सांगितलेल्या ठिकाणी तिघेही पोहोचले.
बघते तर काय एका हॉटेलमध्ये एक हॉल मस्त सजवून तयार केलेला होता. दारावर स्वागताला लाल फुगे वापरून तयार केलेला मोठा हार्ट ♥️, आत सगळीकडे लाल रंगाचे फुगे, लाल गुलाबांच्या फुलांचे गुच्छ लावलेले होते. एका प्रोजेक्टर वर हॅपी बर्थडे शिवानी असं झळकत होतं पण आजुबाजूला त्या हॉलमध्ये कुणीच नव्हतं मग ही तयारी केली कुणी असा प्रश्न शिवानीला पडला. जरा आत गेल्यावर एका टेबलावर गुलाबांच्या पाकळ्यांचा मधोमध मोठा केक ठेवलेला होता, सगळीकडे मेणबत्त्यांचा अंधूक प्रकाश पसरला होता. मंद आवाजात गाणे सुरू होते,

“बार बार दिन यह आये, बार बार दिल यह गाये तू जिये हज़ारों साल, यह मेरी आरज़ू है Happy Birthday to you…..”

इतकं रम्य रोमॅंटिक वातावरण, इतकी सुंदर तयारी कुणी केली असावी. आई बाबांचा तर प्लॅन नाही ना हा असा विचार करून ती बाजुला बघते तर दोघेही गायब…आता त्या हॉलमध्ये ती एकटीच होती…आई बाबा कुठे गेलेत म्हणून तिने हाक मारली पण कुणीच उत्तर दिले नाही….ती पुढे केक ठेवलेल्या टेबलाकडे चालत होती तितक्यात समोरून कुणी तरी येताना दिसले. अंधूक प्रकाशामुळे चेहरा दिसत नव्हता पण हा रोहीत आहे हे तिने लगेच ओळखले.
जसजसे दोघे जवळ आले तसंच तो रोहीत असल्याची खात्री पटली.

तो शिवानी समोर आला, तिचं रूप बघता त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर स्थिरावली. सुंदर लाल काळा वन पीस, हलकासा मेकअप, ते कुरळे केस तिला शोभून दिसत होते.
अंधूक प्रकाशातही तिचा चेहरा तेजस्वी दिसत होता. तो समोर येऊन तिचा हात हातात घेऊन म्हणाला, “हॅपी बर्थडे शिवानी… खूप सुंदर दिसते आहेस…”
ती काही न बोलता त्याच्याकडे बघत होती आणि तो बोलत होता, ” शिवानी, माझ्यावर खूप रागावलीस ना…भेटली तर नाहीस पण फोन सुद्धा उचलला नाहीस माझा… म्हणून हा प्लॅन केला तुला भेटून हा क्षण खास बनविण्याचा..आय लव्ह यू शिवानी.. माझ्याशी लग्न करशील…”

ते ऐकताच तिचे डोळे भरून आले आणि तिला रेश्मा आठवली. ती त्याला म्हणाली, “पण तुला तर रेश्मा आवडते ना..त्या दिवशी बघितलं मी तुम्हा दोघांना एकत्र..”

तो हसू आवरत म्हणाला , “अगं वेडाबाई, तू बोलत नव्हतीस म्हणून तुझा राग शांत करायचा प्लॅन बनवायला रेश्मा ची मदत घेतली मी… बाकी काही नाही… तुला तर माहीत आहे ना मला तू आवडतेस… माझं प्रेम आहे शिवानी तुझ्यावर…सांग ना लग्न करशील माझ्याशी..” असं बोलून तो एखाद्या सिनेमातल्या हिरो सारखा गुडघ्यावर बसून हात पुढे करत तिला मागणी घालत होता.

ती तिचा हात त्याच्या हातात देत मानेनेच होकार देत म्हणाली, “थॅंक्यू सो मच रोहीत…आय लव्ह यू टू… खूप मिस केले मी तुला..रेश्मा सोबत बघून तर मनातून खूप दुखावले होते मी..माझा रोहीत माझ्यापासून दूर गेला ही कल्पनाच सहन होत नव्हती मला..तू माझा आणि फक्त माझा आहेस रोहीत…आय लव्ह यू…”
ती इतकं बोलून त्याला बिलगली. त्याने तिला मिठीत घेत उत्तर दिले, ” यू आर क्रेझी..मी फक्त तुझाच आहे..पण हा अशी रागावत जाऊ नकोस..किती झुरलो मी तुझ्यासाठी…”

दोघेही हसले तितक्यात हॉलमध्ये लाइट लागले आणि टाळ्या वाजवत हॅपी बर्थडे शिवानी म्हणत दोघांचे आई बाबा, काही मित्र मैत्रिणी त्यांच्या दिशेने आले. मोठ्या फुग्यातून गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव रोहीत शिवानी वर झाला. सगळं एखादं स्वप्न असल्यासारखं ती बघत होती. सगळयांना तिथे बघून ती लाजतच रोहीतला बघत होती..

दोघे लहानपणापासून तू तू मैं मैं करत टॉम अँड जेरी सारखे भांडत असले तरी आज फक्त तू आणि मी ? अशा एका गोड प्रेमाच्या ब़धनात अडकले. घरच्यांना सुद्धा खूप आनंद झाला.

शिवानीने केक कापला, प्रोजेक्टर वर दोघांच्या नटखट फोटोंचा स्लाइड शो सुरू होता. आता सगळ्यांच्या आग्रहाखातर हातात हात घेऊन दोघे डान्स करायला लागले,

“सोनियो, ओ सोनियो
तुम्हे देखता हूँ, तो सोचता हूँ, बस यही
तुम जो
मेरा साथ दो
सारे गम भुला के
जी लूं मुस्कुरा के ज़िन्दगी
तू दे दे मेरा साथ
थाम ले हाथ
चाहे जो भी हो बात
तू बस दे दे मेरा साथ
तू दे दे मेरा साथ
थाम ले हाथ
चाहे जो भी हो बात
तू बस दे दे मेरा साथ…..”

अशी गोड सुरवात झाली दोघांच्या नात्याची. शिवानी आणि रोहित यांच्या प्रेमाची गोष्ट कशी वाटली हे नक्की कळवा ?

माझी ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही ?.

© अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed