चिंब भिजलेले…(प्लॅटफॉर्मवरची लव्ह स्टोरी )

नैना धावपळ करीत रेल्वे प्लॅटफॉर्म वर पोहोचली पण बघते तर काय पावसामुळे प्लॅटफॉर्म गर्दीने इतके भरलेले की आता आठ वाजताची लोकल मिळण्याचे काही चिन्ह दिसत नव्हते. नैना ने चौफेर नजर फिरवली तर जो तो घरी पोहोचण्यासाठी लोकल येण्याच्या दिशेने बघत स्वतःची बॅग, पर्स सांभाळत लोकल पकडण्याच्या तयारीत. संततधार धो धो पाऊस सुरूच त्यामुळे वातावरण थंडगार झालेले.

सकाळपासून हा मुंबईतला मुसळधार पाऊस जरा सुद्धा थांबण्याचे नाव घेत नव्हता. नैना मनातच पुटपुटली, “तरी आई सकाळी म्हणाली होती..आज सुट्टी घे.. खूप पाऊस आहे..उगाच निघाले या पावसात बाहेर…आज तर इतकी गर्दी आहे की रात्र इथेच काढावी लागेल की काय देव जाणे…ऑटो, कॅब करावी तर तेही धोक्याचे..त्यात पैसै किती घेतील याचाही नेम नाही..”

तितक्यात लोकल येण्याची अनाउन्समेंट झाली आणि नैना भानावर आली. आजुबाजूने जो तो लोकल पकडण्याच्या नादात धक्के खात पुढे जात होता..बघता बघता लोकल आली आणि अर्धी गर्दी कशीबशी आत शिरून प्लॅटफॉर्म जरा श्वास घेण्या इतके मोकळे झाले…आईला एकदा फोन करून कळवावे म्हणून फोन हातात घेतला पण तो कधीच डिस्चार्ज होऊन बंद पडला होता. आता काय करावे, आई काळजी करेल म्हणून गोंधळलेली नैना काळजीत पडली. तितक्यात कुणीतरी आवाज दिला, ” हाय मिस नैना…”

नैना दचकून बघते तर तिच्याच ऑफिसमधला सुहास. तसं एकाच ऑफिसमध्ये असून कामाव्यतिरिक्त फारसं बोलणं कधी झालं नव्हतं त्याच्याशी पण आता या परिस्थितीत तो दिसताच कोण जाणे पण जरा बरं वाटलं आणि ती चेहऱ्यावर हास्य आणून म्हणाली, “हाय सुहास..तू इथे..”

सुहास – “हो..मी रोज इथूनच जातो पण जरा उशीरा..आठच्या लोकलला गर्दी होते म्हणून नऊच्या सुमारास निघतो पण आज पावसामुळे आधीच आलो..”

नैना – “बरं एक ना..मला एक मदत हवी आहे..तुझ्या फोन वरून मी घरी फोन करून कळवू का उशीर होईल म्हणून.. नाही तर आई बाबा काळजी करत बसतील.. प्लीज”

सुहास लगेच खिशातला मोबाईल काढून तिला देत , “हो नक्कीच..प्लीज काय त्यात ..”
नैना ने आईला फोन करून परिस्थिती कळविली शिवाय ऑफिसमधला सहकारी सोबत आहे तेव्हा काळजी करू नकोस असंही सांगितलं..”

तितक्यात दुसरी अनाउन्समेंट झाली, ” आठ वाजून वीस मिनिटांनी येणारी लोकल आज पावसामुळे उशीरा…”

“अरे बापरे.. उशीरा म्हणजे आता किती उशीरा काही खरं नाही.. रद्द सुद्धा होऊ शकते..” नैना काळजीच्या सुरात पुटपुटली.

सुहास तिला धीर देत म्हणाला, “डोन्ट वरी मिस नैना..मी आहे तुमच्या सोबतीला.. काही तरी मार्ग काढू आपण.. तुम्ही सुखरूप घरी पोहोचल्या शिवाय मी नाही जाणार घरी..मग तर झालं..”

रेल्वे रुळावर पाणी साचल्याने आता कदाचित आजची रात्र प्लॅटफॉर्म वर काढावी लागते की काय अशी शंका नैनाला सतत येत होती.

जरा विचारात मग्न असतानाच सुहास तिला म्हणाला, “इफ यू डोन्ट माईंड , आपण चहा घेऊया..तो तिकडे एक स्टॉल आहे..”

पावसात भिजून अंगात थंडी भरलेली असताना चहा ला ना काही कसं म्हणणार ना…नैना ने मानेनेच होकार दिला आणि जरा भूक सुद्धा लागली आहे..चहा सोबत वडापाव सुद्धा घेऊ म्हणत दोघेही त्या चहा स्टॉल च्या दिशेने निघाले.

सुहास स्टॉलवर वडापाव चहा सांगत असताना नैना त्याची पाठमोरी आकृती न्याहाळत होती. पावसाचे थेंब अंगावर पडल्याने ओल्या झालेल्या शर्ट मुळे त्याची पिळदार शरीरयष्टी स्पष्ट दिसत होती.

ऑफिसमध्ये नविन रूजू झालेला सुहास सगळ्या मुलींचा क्रश होता, नैना सुद्धा त्याच्या आकर्षक दिसण्यावर भाळली होतीच पण कामा व्यतिरिक्त दोघांचे फारसे कधी अवांतर बोलणे झाले नव्हते. तो अतिशय हुशार, कामात एकनिष्ठ मुलगा. ऑफिसमध्ये सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारा , मदतीला धावणारा…त्याच्या सोबत अशा वातावरणात आज अडकल्याने नैना मनातून अस्वस्थ असली तरी एक आनंदाची लहर तिच्या मनात होतीच.

सुहास वडापाव घेऊन येताच ती भानावर आली, त्याच्या हातातून वडापाव घेताना त्याच्या बोटांचा झालेला स्पर्श तिला जाणवला तशीच कोण जाणे ती स्वतःशीच लाजली.

तो तिच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत होता. दिसायला सुंदर, चाफेकळी नाक, गोरा वर्ण, उंच बांधा, लालचुटुक ओठ, मोकळे खांद्यापर्यंत केस, वार्‍याच्या झोताने मधूनच गालावर स्पर्श करणारी केसांची बट, पावसात भिजून थंडीमुळे अंगावर आलेला काटा सुद्धा सुहासच्या नजरेतून सुटला नाही. गर्द निळ्या रंगाचा कुर्ता पावसाने जरा भिजल्याने अगदी तिला चिकटून बसला होता, तिचा सुडौल बांधा, अर्धवट भिजलेली ती आज नेहमीपेक्षा जास्तच आकर्षक दिसत होती. कितीही मनाला आवरलं तरी सुहास ची नजर तिच्यावर स्थिरावत होती. दोघांची नजरानजर झाली की नैना मनोमन लाजत होती.

खरं तर पहिल्यांदा नैनाला बघितलं त्या क्षणी ती त्याला आवडली होती पण ऑफिसमध्ये रूजू होऊन त्याला जास्त दिवस काही झाले नव्हते आणि मैत्री करण्याचा चान्स काही मिळाला नव्हता. आज मात्र तिच्या सहवासात त्याला मनोमन आनंद झाला होता.

वडापाव चहा संपवून दोघेही एका बेंचवर जाऊन बसले. रात्रीचे अकरा वाजले होते पण एव्हाना त्यांच्या मार्गाने जाणारी एकही लोकल आली नव्हती. प्लॅटफॉर्म वर अजूनही बरेच प्रवाशी होते. नैनाला मात्र सुहासच्या सहवासात असल्याने सुरक्षीत असल्यासारखे वाटत होते. दोघांनी पहिल्यांदाच अशा मनसोक्त गप्पा मारल्या, एकमेकांविषयी जाणून घेतले. आजुबाजूच्या पावसाचा आवाज, गर्दीतल्या लोकांचा कलकलाट याचा त्यांना काहीही फरक पडत नव्हता.

जणू आजचा हा पाऊस दोघांची भेट घडवून यावी म्हणूनच बरसला होता…

जरा औपचारिक गप्पा मारल्यावर तिने अचानक विचारले , “काय मग तू इतका हॅंडसम, तुझी गर्लफ्रेंड तर नक्कीच असणार..”

तिच्या अशा प्रश्नाने तो जरा चकित झाला पण हसत उत्तरला, “कॉलेजमध्ये होती..पण ब्रेकअप झालं..आता तर लग्न सुद्धा झालं तिचं..तिच्या घरी चालणार नव्हतं लव्ह मॅरेज.. त्यामुळे कॉलेज संपलं आणि आमचं अफेअर पण संपलं.. ”

ते ऐकताच का कोण जाणे पण नैनाला हायसे वाटले..चला म्हणजे आपल्याला चान्स आहे असा विचार करत ती स्वतःशीच हसली.

त्यानेही तिला जरा घाबरतच विचारले, ” व्हाट अबाऊट यू…. तुमच्या आयुष्यात कुणी स्पेशल पर्सन आहे..?”

ती म्हणाली, “नाही… स्पेशल असा कुणी नाही… म्हणजे ज्याला मी आवडायची तो मला आवडत नव्हता आणि जो मला आवडायचा त्याला दुसरी कुणीतरी आवडायची. आणि हो..असं तुम्ही आम्ही नको म्हणू मला प्लीज.. खूप मोठी असल्यासारखं वाटतं…तूच म्हण..”

“ओके मिस नैना…” एक गोड स्माइल देत सुहास बोलला.

दोघेही एकमेकांना बघत हसले. दोघेही अगदी खूप जुने मित्र असल्यासारखे गप्पांमध्ये रंगले होते.

या क्षणी नैनाच्या मनात एकाच गाण्याने ताल धरला होता तो म्हणजे,

” या रिमझिम झिलमिल पाऊसधारा तनमन फुलवून जाती …..
सहवास तुझा मधुमास फुलांचा गंध सुखाचा हाती….
हा धुंद गार वारा, हा कोवळा शहारा… उजळून रंग आले, स्वच्छंद प्रितीचे…..

चिंब भिजलेले, रूप सजलेले बरसूनी आले रंग प्रितीचे………”

पुन्हा एकदा एक अनाउन्समेंट झाली आणि कितीतरी वेळ वाट बघितल्यावर एक लोकल येणार असल्याचं कळालं.

सुहासच्या मदतीने दोघेही गर्दीतून  मार्ग काढत कसेबसे लोकल मध्ये चढले. रात्रीचे साडेबारा वाजले होते. गर्दीत इतरांच्या धक्क्यातून नैनाला वाचवायला सुहास आपल्या दोन्ही हातांचे जणू सुरक्षाकवच बांधले होते. तिला सुद्धा त्याचं असं तिची काळजी घेणं आवडलं होतं. काही वेळाने लोकलमधील गर्दी कमी झाल्यावर दोघांना बसायला जागा मिळाली.

ती त्याला म्हणाली, ” थॅंक्यू सो मच..आज तू नसतास तर माझ्या जीवात जीव राहीला नसता..काळजीपोटी घरी आई बाबा आणि इकडे मी…खरंच खूप थॅंक्यू…”

तो त्यावर हसत म्हणाला,
“ओह…. formality…Come-on नैना…we are friends now..no sorry and no thank you…आणि हा…बरं झालं आज पावसात अडकलो आपण… मैत्री तर झाली… ऑफिसमध्ये तर कामामुळे बोलायला वेळ नसतो…आज पावसामुळे इतक्या गप्पा मारल्या आपण… नाही का…”

तिनेही गोड स्माइल देत त्याला प्रतिसाद दिला आणि म्हणाली…” खरंच …नको असताना पाऊस सुद्धा आज हवाहवासा वाटला…फक्त तुझ्यामुळे…”

ते ऐकताच सुहासच्या मनात लड्डू फुटला..

पुढचे स्टेशन आले, नैना उतरणार होती. सोबतच सुहास उतरला…त्याच स्टेशन तसं अजून एक स्टेशन पुढे पण इतक्या रात्री हिला एकटी कशी सोडणार ना…

त्याने स्टेशन बाहेर एक रिक्षा केली..नैना ला घरी सोडले आणि त्याच रिक्षातून तो घरी निघाला…

रात्री उशिरापर्यंत आज पहिल्यांदाच अशी ती अडकली होती तेही सुहासच्या सहवासात… काही केल्या तिला झोप लागत नव्हती…फोनवर त्याचा  पोहोचल्याचा मेसेज आला तसाच तिने रिप्लाय केला, “ग्रेट, गूड नाईट…उद्या भेटू…बाय..”

रात्रभर त्याच्याच विचारात ती गुंतलेली. सकाळी अर्धवट झोपेतून उठून ती ऑफिसला जायला तयार झाली..आई म्हणाली, ” अगं काल इतकी उशीरा आलीस…आज जाऊ नकोस…” पण सुहासला भेटल्याशिवाय आज तिला काही चैन पडणार नव्हते..पटकन आवरून ती आईला म्हणाली, “आई आज हाफ डे घेते…जास्त उशीर नाही करत पण काम आहे अगं..जावंच लागेल….”

आता सुहास आणि नैना यांची ऑफिसमध्ये चांगलीच गट्टी जमली, सोबतच चहा, नाश्ता , लंच…परत येताना एकाच वेळी एकाच लोकल मध्ये.. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते..पण अजून कुणी प्रेम व्यक्त केलं नव्हतं…

असंच एक दिवस लोकल लेट झालेली…दोघेही लोकलची वाट बघत बसलेले…परत तशाच मनसोक्त गप्पा….सोबतीला पाऊस…गार गार वारा…सुहासने तिला त्या क्षणी प्लॅटफॉर्मवर प्रपोज केले… गुलाबांच्या फुलांऐवजी चहाचा कप तिच्या हातात देत तो म्हणाला,

“नैना, ती रात्र आठवते तुला..पहिलीच एकांत भेट आपली… त्यापूर्वी ओळख असून अनोळखी होतो आपण..तो पाऊस..तो गार वारा…याच ठिकाणी एकत्र चहा वडापाव खात आपल्या मैत्रीचा प्रवास सुरू झाला…तू खूप खास मैत्रीण आहेस माझी… खूप आवडतेस मला…आय लव्ह यू नैना…”

ती जणू याच शब्दांची वाट बघत होती…तशा‌ तर एकमेकांच्या भावना त्यांना कधीच कळाल्या होत्या पण आज शब्दातून व्यक्त झाल्या होत्या…

तिनेही लगेच लाजून उत्तर दिले “आय नो सुहास…आय हॅव सेम फिलिंगझ् फॉर यू..आय लव्ह यू टू…”

पुढचे काही सेकंद दोघेही स्तब्ध होऊन नजरेने बघत होते, ती लाजत होती आणि तो तिला न्याहाळत होता…

अशीच सुरवात झाली त्यांच्या प्रेमाच्या नात्याला…हे नातं हळूहळू बहरतचं गेलं…. दोघांनी एकत्र संसार थाटला…

आता जेव्हाही पाऊस येतो…. त्यावेळी दोघांनाही आठवण होते त्या प्लॅटफॉर्म ची जिथे त्यांच्या प्रेमाला  सुरूवात झाली…

आणि मग मनात अजूनही तेच गाणं गुणगुणायला होतं…

“चिंब भिजलेले, रूप सजलेले बरसूनी आले रंग प्रितीचे………”

ही प्रेमकथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

मी लिहीलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

© अश्विनी कपाळे गोळे

(फोटो गूगल वरून )

Comments are closed.

Free Email Updates
We respect your privacy.