आजची सकाळ नेहमीपेक्षा अगदीच वेगळी होती. रविवार असल्याने निनादला सुट्टी त्यामुळे मेघना जरा निवांत उठून आंघोळ करून नाश्ता चहा बनवायला ती स्वयंपाकघरात आली. निनाद अजूनही गाढ झोपेत होता. आज वातावरण जरा नेहमीपेक्षा वेगळे वाटत होते. जून महिन्याची सुरुवात त्यामुळे पावसाच्या आगमनाची चाहूल लागली होती. सकाळचे नऊ वाजले असले तरी ढगाळ वातावरण असल्याने पहाट असल्यासारखे भासत होते.
चहाचा कप हातात घेऊन ती बाल्कनीत आली तोच पहिल्या पावसात भिजलेल्या मातीचा सुगंध तिला प्रफुल्लित करत होता, लांब कुठेतरी पावसाने हजेरी लावली असावी.
नभ दाटून आले होते, मधूनच मेघगर्जना कानी पडत होती. मेघना चहाचा घोट घेत पहिल्या पावसाच्या आगमनाची चाहूल अनुभवत होती. तितक्यात निनाद तिला घरभर शोधत बाल्कनीत आला आणि मागून गुपचूप येत तिला मिठी मारत म्हणाला, “गुड मॉर्निंग स्वीटहार्ट..मी घरभर शोधलं तुला..तू मात्र इकडे…”
अचानक त्याच्या येण्याने जरा दचकून लाजतच कसाबसा हातातला कप सांभाळत ती म्हणाली, “वेरी गुड मॉर्निंग…”
पाठमोर्या मेघनाच्या खांद्यावर आपला चेहरा टेकवत त्याने विचारले, “काय मग आज पहिल्यांदा आपण असं निवांत दोघेच…वातावरण पण मस्त रोमॅंटिक झालंय ना…”
ती लाजत मुरडत त्याला बाजुला करत म्हणाली, “तुम्हाला पाऊस आवडतो का हो…”
तो त्यावर खट्याळ उत्तर देत म्हणाला , ” पावसाचं माहीत नाही पण मेघ ( मेघना ) खूप आवडते…मेघां मुळेच तर हा आनंदाचा पाऊस पडतो ना…”
ती लाजत त्याची नजर चुकवत फक्त चेहऱ्यावर हास्य आणत नभात बघत होती.
ती मान वर करून नभांकडे बघताना निनाद तिचं तेजस्वी रूप न्याहाळत होता. तिचे ओले मोकळे केस, नितळ चेहरा, ती नाजुक मान, जराही मेकअप नसताना तिचं रूप जणू कुणी अप्सरा. निनादने गिफ्ट केलेला निळसर रंगाचा छान फिटींगचा कुर्ता तिला अगदीच शोभून दिसत होता. निनाद तिचा हात हातात घेत म्हणाला , “इतका आवडतो तुला पाऊस…किती कुतुहलाने बघते आहेत आकाशात…जरा आम्हालाही बघा…”
ती हसतच त्याला बघत म्हणाली, ” खरंच खूप आवडतो मला पाऊस…बघा ना किती मस्त झालंय वातावरण….मातीचा सुगंध येतोय का तुम्हाला… खूप आवडतो मला…”
तो तिला जवळ ओढून तिची गालावर आलेली केसांची बट बाजुला करत म्हणाला , “हो येतोय ना..पण मातीचा नाही तुझ्या ओल्या केसांमधून मस्त सुगंध येतोय..”
ती खळखळून हसत म्हणाली, ” तुम्हाला मुळात पावसाचा आनंदच घेता येत नाही…”
तो त्यावर तिला चिडवत म्हणाला , “कोण म्हणतंय असं…खरं सांगू मलाही आवडतो हा पहिल्या पावसात भिजलेल्या मातीचा सुगंध..पावसात भिजायला आवडत नाही पण पाऊस बघून नक्कीच आनंद होतो… ”
ती आनंदाने म्हणाली , “खरंच…चला मग आज काही तरी खास बेत करूया या पहिल्या पावसाचा…”
तितक्यात पावसाची हजेरी लागली, रिमझिम पाऊस सुरू झाला. ती आनंदाने पावसात हात पुढे करून पावसाचे थेंब टिपण्याचा प्रयत्न करत होती. दोघांनी पहिल्या पावसाचे थेंब चेहऱ्यावर झेलत एकमेकांच्या डोळ्यांत बघितले तसच त्याने त्याच्या बोटांनी तिच्या गालावरच्या थेंबाला बाजुला करत तिच्या गालावर ओठ टेकवले. ती लाजून घरात निघून गेली.
तिच्या मनात गाण्यांचे बोल गुणगुणत होते,
“रिम झिम रिम झिम रुम झुम रुम झुम
भीगी भीगी रुत में तुम हम हम तुम
चलते हैं चलते हैं…..”
मेघना आणि निनाद एक नवविवाहित जोडपे, दोघांचं अरेंज मॅरेज.
मेघना दिसायला सुंदर, उंच कमनीय बांधा, गव्हाळ वर्ण, लांबसडक केस. लहानाची मोठी एका छोट्या शहरात झाली. वाणिज्य पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला असताना तिच्या मामांनी निनादचे स्थळ आणले.
निनाद फॉरेन रिटर्न, मॉडर्न विचारांचा, दिसायला देखणा, आयटी क्षेत्रात चांगल्या पदावर नोकरीला. त्याला मेघना फोटोत बघताक्षणीच आवडली होती. दोघांचं लग्न झालं आणि राजा राणीचा संसार सुरु झाला.
लग्नाला अजून एक महिनाही झाला नव्हता. आज पहिल्या प्रेमाचा पहिला पाऊस दोघांसाठीही खास भासत होता.
ती लाजत घरात आली तसाच निनाद तिच्या पाठोपाठ आला. ती स्वयंपाकघरात निनाद साठी चहाचा कप भरत होती. त्याने चहाचा कप हातात घेत तिच्याकडे बघितले, नजरानजर होताच ती लाजली. तिचं असं लाजणं निनादला अजूनच मोहात पाडत होतं.
जोरात मेघगर्जना झाली तशीच ती दचकून त्याच्या मिठीत शिरली. त्यानेही हातातला कप बाजुला ठेवून तिला अजून घट्ट मिठी मारली.
त्यांच्या नव्या संसारात आज पहिल्या पावसाने प्रेमाला अजूनच बहर आला होता. त्यालाही आता गाणं गुणगुणाव वाटत होतं,
” रिम-झिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन…..
भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन…..
रिम-झिम गिरे सावन …
पहले भी यूँ तो बरसे थे बादल, पहले भी यूँ तो भीगा था आंचल……
अब के बरस क्यूँ सजन, सुलग सुलग जाए मन….. भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन रिम-झिम गिरे सावन … ”
अशी बहरली त्यांच्या प्रेमाची प्रीत पहिल्या पावसाच्या आगमनाने…?
निनाद आणि मेचनाची ही प्रेमकथा कशी वाटली हे नक्की कळवा ?.
मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.
© अश्विनी कपाळे गोळे
Comments are closed