नमस्कार, मी प्रेरणा. एक पूरग्रस्त महीला.
खरं तर कुठून सुरुवात करावी कळत नाहीये. मी अनुभवलेला महापूर म्हणजे एक भयाण वास्तविक अनुभव आहे. आठवडाभरापासून संततधार पाऊस सुरू होता. घरी मी, माझे पती, दोन मुलं आणि सासू सासरे असे एकूण सहा जण. आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात आनंदाने राहायचो. गावातचं आमचे किराणा दुकान, त्यावरच सगळा संसाराचा गाडा चालतो. पावसामुळे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. पंचगंगा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे हे एव्हाना कळाले होतेच पण ही नदी आमची देवता धोक्याची पातळी ओलांडून असं रौद्र रूप धारण करून आमचे अख्खे संसार एका क्षणात स्वतःच्या पोटात सामावून घेईल असं मुळीच वाटलं नव्हतं. पाहता पाहता आजुबाजूच्या गावात पाणी शिरायला सुरवात झाली, काहींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. आम्ही सगळी परिस्थिती टिव्हीवर बघून घाबरलो होतो. नंतर लाइट नसल्याने काय चाललंय काही कळत नव्हतं. आमच्यावर कुठल्याही क्षणी ही परिस्थिती ओढाविणार हे माहित होते. रात्र रात्र झोप लागत नव्हती. कधीही आपल्याला इथून सुरक्षित ठिकाणी जावं लागेल म्हणून आम्ही सतर्क होतोच पण आतापर्यंत पै पै साठवून उभ्या केलेल्या ह्या घराचं काय? मोठ्या उत्साहाने घरात एक एक वस्तू घेतली, संसार सजविला पण आता जीवाची पर्वा करत घराचा विचार न करता सगळं सोडून कुठल्याही क्षणी जावं लागणार होतं. ही वेळ यायला फार काही उशीर लागला नाही. अचानक आमच्या गावातही पाणी शिरले, लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची धडपड सुरू झाली, बरेच बचाव कार्य करणाऱ्या तुकडीची पथके सुरक्षा जॅकेट, बोट घेऊन गावात पोहोचले. आमचं किराणा दुकान आधीच पाण्याखाली गेले होते. इतका सगळा किराणा माल आता कवडीमोल झाला होता, ज्यावर संसार अवलंबून तेच क्षणात वाहून गेले. आम्ही आहे त्या अवस्थेत सुरक्षा पथकाच्या मदतीने एका शाळेत पोहोचलो. घर असं नजरेपुढे पाण्याखाली जाताना बघून अंतर्बाह्य रडू फुटले होते पण त्या क्षणी घरातल्या प्रत्येकाचा जीव जास्त महत्वाचा होता. घरी परत कधी येणार याची शाश्वती नव्हती शिवाय परत आल्यावर घराची काय अवस्था झालेली असेल याचा विचारही करवत नव्हता.
गेल्या दोन दिवसांपासून लाइट नव्हती त्यामुळे फोन बंद, कुणाशीही काही संपर्क नाही. नातलग सगळे काळजीत पडले होते. शाळेत आसरा घेतलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. तीस वर्षांनंतर अशी परिस्थिती आमच्या गावावर आली होती तिही जास्त भयाण स्वरूपात. काही ठिकाणांहून खाण्यापिण्याचे पॅकेट, ब्लॅंकेट, कपडे अशी मदत मिळत होती. घरात सगळं असूनही आज आमचा संसार उघड्यावर आला होता. यापेक्षा मोठे दुःख काय असणार ना….आपला जीव वाचला याच समाधान मानावं की आल्या परिस्थितीवर रडावं अजूनही काही कळत नाहीये. हा महापूर, पंचगंगेचे रौद्र रूप कधी शांत होणार माहीत नाही. सतत देवाचा धावा करत आम्ही सगळे परिस्थिती शांत व्हावी म्हणून प्रार्थना करत आहोत. एक एक क्षण आता जड जात आहे. हा सगळा अनुभव खूप भयंकर आहे, होतं नव्हतं सगळं क्षणात नष्ट झालं. परिस्थिती शांत झाल्यावर नव्याने सुरुवात करणेही आता खूप जास्त अवघड आहे.
या सगळ्यात दोष तरी कुणाला द्यावा.
या पुरामुळे कितीतरी मुक्या प्राण्यांना, पक्षांना जीव गमवावा लागला. गुरे ढोरे हंबरडा फोडत काही तरी सांगू पाहत आहेत, सगळीकडे नुसताच हाहाकार पसरलाय.
आता फक्त देवाकडे आम्ही एकच प्रार्थना करतोय की पावसाला, नदीच्या प्रवाहाला शांत करत आमचं आयुष्य आम्हाला परत दे. आम्हाला आमच्या घरी जाऊ दे. ही परिस्थिती पूर्ववत कधी होणार माहीत नाही पण जे काही आम्ही अनुभवतोय ते खरंच खूप भयानक आहे. निसर्गाचे हे रौद्र रूप असं उघड्या डोळ्यांनी पाहणे, अनुभवणे फार अवघड आहे.
खरंच किती भयानक आहे ना सगळं. आयुष्यभर राबून उभा केलेला संसार क्षणात पाण्याखाली जाताना बघून काय वाटत असेल या सगळ्यांना .
आपला अख्खा महाराष्ट्र ओल्या दुष्काळाचा शिकार बनला आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थिती तर अधिकच भयानक आहे. अनेक बचाव पथक, नागरिक या परिस्थितीत मदतीला तत्पर आहेत. शक्य ती मदत करत प्रत्येक जण एकमेकांना आधार देत आहे. जे प्रत्यक्षात या परिस्थितीत अडकले त्यांच्या मनाचा विचार केला तर खरंच खूप वाईट वाटतंय.
अशा परिस्थितीत आपण प्रत्येकाने शक्य ती मदत केली तर खारीचा वाटा उचलल्या सारखे होईल.
हा लेख लिहिण्यामागे हेतू म्हणजेच आपल्या आजूबाजूला ओढावलेल्या या संकटाची तीव्रतेची जाणिव प्रत्येकाला होत आपल्याकडून शक्य ती मदत आपण करावी.
© अश्विनी कपाळे गोळे
Comments are closed