मैत्री बनली जगण्याची उमेद…

Inspirational-Relations-Social issues

सुनंदा काकू म्हणजेच सदैव हसतमुख चेहरा. काका काकू आणि मुलगा असं त्रिकोणी कुटुंब. काकूंचा एकुलता एक मुलगा सुजय, वय वर्षे अठ्ठावीस. एका मोठ्या आयटी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी. आता आपल्या मुलाच्या लग्नाचे स्वप्न काका काकू बघत होते. अगदी उत्साहाने नातलगांना सांगत होते, “आमच्या सुजय साठी साजेशी मुलगी सुचवा बरं का..”

काकू सोसायटीच्या भजन मंडळात अगदी उत्साही व्यक्ती त्यामूळे त्यांच्या बर्‍याच मैत्रिणी होत्या. काका रिटायर्ड झालेले. एकंदरीत सुखी कुटुंब.
या आनंदात वावरणाऱ्या सुखी कुटुंबावर एक दिवस अचानक मोठे संकट कोसळले. ऑफिसमधून परत येताना सुजयला अपघात झाला. डोक्याला जबर मार लागला आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. काका काकूंना हा धक्का पचविणे अशक्य झाले होते.

सुजयच्या लग्नाचे स्वप्न बघणार्‍या काका काकूंना त्याचे अंतिम सोपस्कार पार पाडावे लागले. काकू रडून मोकळ्या व्हायच्या पण काका मात्र मनातच कुढत काकूंना आधार देत होते. या घटनेला महिना होत नाही तोच या सगळ्या धक्क्यामुळे काकांना हार्ट अटॅक आला, तोही इतका तीव्र की त्यांनीही क्षणभरात या जगाचा निरोप घेतला. आता मात्र काकू पूर्णपणे मोडून पडल्या. आता कुणासाठी जगायचे म्हणत अन्न पाणी सोडण्याचा विचार करत होत्या. नातलग काही दिवस राहून परत गेले, घरी कुणी ना कुणी असेपर्यंत त्यांनी कसाबसा धीर ठेवला. नंतर मात्र त्या एकट्या पडल्या, रात्र रात्र जागून फक्त मुलगा आणि नवर्‍याच्या आठवणीत रडायचं इतकंच काय ते सुरू होत. अशामुळे काकूंच्या तब्येतीवर चांगलाच परिणाम होत होता. या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांना त्यांच्या मैत्रिणींनी खूप मदत केली. काकूंना एकटे सोडणे धोक्याचे आहे म्हणून आळीपाळीने एक एक मैत्रीण त्यांच्या सोबतीला असायच्या. भजन मंडळात त्यांना बळजबरीने घेऊन जायच्या.या सगळ्यामुळे काकू काही क्षण का होईना पण दु:खातून बाहेर यायच्या.

काकूंना या सगळ्या धक्क्यामुळे झोपेच्या गोळ्या खावून झोपण्याची वेळ आलेली. सततच्या विचारचक्रामुळे त्यांना झोपच लागेना. काकूंच्या मैत्रीणी त्यांना शक्य तो प्रयत्न करत धक्क्यातून सावरायला मदत करत होत्या. कधी भजनात व्यस्त ठेवायच्या तर कधी कुठे बाहेर फिरायला घेऊन जायच्या. असंच एकदा सगळ्या एका अनाथाश्रमात गेल्या. तिथल्या मुलांना मायेची किती गरज आहे हे लक्षात घेऊन काकूंनी स्वतः ला त्या मुलांच्या सेवेत व्यस्त करून घेतले. काकांची पेंशन मिळायची शिवाय काकूंच्या नावाने काही पैसा होताच. त्या सगळ्याला एक वाटा काकू अनाथाश्रमात, गरजूंना दान करण्यात वापरायच्या.

अधूनमधून नातलग ये-जा करायचे. अशातच वर्ष गेलं. आज काकूंच्या सुजयला जाऊन एक वर्ष पूर्ण झाले. त्याच्या स्मृती प्रित्यर्थ काकूंच्या मैत्रीणींनी गरजूंना दान धर्म करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सुजयला श्रद्धांजली अर्पण करत काकू म्हणाल्या , “आज मी जीवंत आहे हे फक्त आणि फक्त माझ्या या मैत्रीणींमुळे, त्या नसत्या तर कदाचित माझं आयुष्य मी कधीच संपवलं असतं. आता मनावर दगड ठेवून मी जगते आहे. सुजय आणि रावांच्या आठवणी मनात अमर आहेत. पूर्वी झोपेच्या गोळ्या न खाता मला झोपच येत नव्हती पण आता मात्र मला ह्या गोळ्यांची गरज नाही तेही फक्त माझ्या ह्या सख्यां मुळे. या माझ्या जीवलग सख्यांनी मला जगण्याची नवी उमेद निर्माण करून दिली.”

हे सगळं बोलताना काकू आणि त्या ठिकाणी असलेला प्रत्येक जण अश्रू गाळत होता.

ही कथा एका सत्य घटनेवर आधारित असून ह्यातला काही भाग काल्पनिक आहे.

खरंच आहे ना, मैत्रीच्या नात्यात वय , धर्म, जातपात अशा गोष्टी कवडीमोल असतात. एकेकाळी नातलग पाठ फिरवतिल पण मैत्री मात्र सदैव पाठीशी उभी राहते‌.

हि कथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

© अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed