रविवार असल्याने आज प्रिया घरीच होती. सायंकाळी चहाचा कप हातात घेऊन प्रिया बाल्कनीत जाऊन बसली तितक्यात दारावरची बेल वाजली. आता यावेळी कोण बरं आलं असेल असा विचार करत दार उघडले तर समोर एक मोठा हार्टच्या ♥️ आकाराचा गुलाबांच्या फुलांचा गुच्छ घेऊन कुणीतरी उभे होते. चेहऱ्यापुढे तो गुच्छ धरल्यामुळे कोण आहे हे तिला बघताक्षणी कळाले नाही.
पुढच्या काही क्षणातच मनिष ने तो गुच्छ बाजुला करत तिला विश केले, “हॅपी व्हॅलेंटाईन डे स्वीटहार्ट…?”
मनिष आठवडाभरासाठी कंपनीच्या कामानिमित्त बाहेरगावी गेलेला होता.
प्रिया मनिषला असं अचानक परत आलेला बघून मोठ्या आनंदाने थॅंक्यू सो मच म्हणाली पण तिच्या लक्षात आलं की आज तर व्हॅलेंटाईन डे नाहीये. क्षणभर तिला शब्द सुचत नव्हता, जरा गोंधळून त्याच्या हातातला गुच्छ हातात घेत ती म्हणाली, “किती गोड सरप्राइज..तू असा अचानक आलास परत…तू तर दोन दिवसांनंतर येणार होतास ना…आणि हे काय आज कुठला व्हॅलेंटाईन डे आहे..भर पावसाळ्यात ?…”
मनिष घरात येत बॅग बाजूला ठेवून प्रिया ला मिठीत ओढुन म्हणाला , “हे काय, इतक्या लवकर विसरलीस आजचा दिवस. मागच्या वर्षी आजच्या दिवशीच तर आपली पहिल्यांदा भेट झालेली. मग आपल्यासाठी आजचा दिवसच व्हॅलेंटाईन डे आहे की नाही.”
प्रिया जरा लाजतच त्याला उत्तरली, “हो आठवतोय ना…तो पाऊस..ती आपली पहिली भेट त्या कॅफे मध्ये.. हॅपी व्हॅलेंटाईन डे अॅंड हॅपी अॅनिव्हर्सरी टू..बरं तू लवकर कसा काय आलास..”
मनिष तिला चिडवत म्हणाला, “का? नको होतं का यायला मी…काम लवकर संपलं म्हंटलं बायकोला सरप्राइज द्यावं..खूश होईल बायको पण ही तर उलट विचारतेय राव..”
प्रिया त्याला घट्ट मिठी मारत म्हणाली, “असं का म्हणतोय, तू लवकर आला याचा आनंदच आहे मला.. तुझ्याशिवाय हे घर खायला उठत होतं एकटीला. आता असं एकटीला सोडून नको जाऊस परत कुठे.”
मनिष तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला, “आता आलोय ना मी. आय लव्ह यू..आय मिस्ड यू सो मच..चल मस्त तयार हो डिनर ला जाऊया बाहेर..”
मनिष आणि प्रिया यांचं नुकतंच लग्न झालेलं. रेशीमबंध नावाच्या एका वधू वर सूचक मंडळातून दोघांच्या घरच्यांची ओळख झाली आणि त्यांनी मनिष प्रिया ची भेट घडवून आणली. प्रिया आयटी कंपनीत नोकरीला, दिसायला सुंदर, गोरा वर्ण, सुडौल बांधा, शोभेसा हेअरकट. मनिष सुद्धा त्याच क्षेत्रात चांगल्या पदावर नोकरीला, देखणा, उंचपुरा राजबिंडा.
पहिल्यांदा भेटायचं ठरलं तेव्हा एका कॅफे मध्ये ऑफिसनंतर दोघे भेटलेले. त्या दिवशी धो धो पाऊस सुरू होता. प्रिया कशीबशी रिक्षा शोधून कॅफे मध्ये पोहचली तर मनिष आधीच तिची वाट बघत बसलेला होता. दोघांनी एकमेकांचे फोटो बघितले होते त्यामुळे त्या कॅफे मधल्या गर्दित त्यांना एकमेकांना शोधायला वेळ लागला नाही. प्रिया समोर आली तशीच मनिषची नजर तिच्यावर स्थिरावली. लाल रंगाचा स्लीवलेस कुर्ता, मोकळे केस, चेहऱ्यावर हलकासा मेकअप, अगदी कुणी अप्सरा नजरेसमोर आल्याचा भास मनिषला झाला. ती जसजशी त्याच्या दिशेने येत होती तसंच मनिषच्या हृदयाचे ठोके वाढत होते. ती जवळ येताच हाय म्हणाली तसाच तो भानावर आला. दोघांनी औपचारिक ओळख करून घेत जरा वेळ गप्पा मारल्या, सोबतीला कॉफी होतीच.
मनिषला प्रिया पहिल्या भेटीतच आवडली. जितकं सुंदर तिचं रूप तितकंच प्रेमळ, मृदू बोलणं त्याला मनातून भावलं.
बराच वेळ झाला पण पाऊस काही थांबत नव्हता. आता घरी निघायला हवं म्हणून दोघेही कॅफेच्या बाहेर आले पण इतक्या पावसात घरी कसं जायचं म्हणून प्रिया जरा विचारात पडली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत मनिष तिला म्हणाला, “इफ यू डोन्ट माईंड, मी तुला घरी सोडतो. इतक्या पावसात एकटी जाणार तरी कशी.”
प्रिया सुरवातीला नको म्हणाली पण उगाच पावसात भिजत रिक्षा शोधल्या पेक्षा मनिष चा प्रस्ताव उत्तम आहे असा विचार करत ती त्याच्या सोबत तिच्या घरी जायला निघाली. मनिषने कार काढली, प्रियाच्या मनात जरा वेगळेच भाव होते. असं लग्नाच्या निमित्ताने त्याला पहिल्यांदाच भेटल्यावर सोबतच जायचं म्हणजे तिला जरा अवघडल्या सारखे वाटले. तसा तिलाही तो पहिल्या भेटीतच आवडला होता. त्यांचं आकर्षक व्यक्तिमत्त्व, बोलण्यातला आत्मविश्वास तिला त्याच्याकडे आकर्षित करत होता.
भर पावसात असं मस्त वातावरणात एकत्र जाताना दोघांच्याही मनात लड्डू फुटत होते, जरा वेळ काय बोलावं दोघांनाही कळेना. ती शांतता जरा दूर व्हावी म्हणून मनिष ने रेडिओ सुरू केला तर त्यावर गाणेही तसेच सुरू होते,
“टिक टिक वाजते डोक्यात धड धड वाढते ठोक्यात..
कधी जुनी कधी नवी संपते अंतर झोक्यात…
टिक टिक वाजते डोक्यात धड धड वाढते ठोक्यात…
नाही कधी सरी तरी भिजते अंग पाण्याने सोचा तुम्हे पलभर भी बरसे सावन जोमाने,
शिंपल्याचे शो पीस नको जीव अडकला मोत्यात… टिक टिक वाजते डोक्यात धड धड वाढते ठोक्यात…”
मनिष ने रेडिओ चॅनल बदलत प्रिया सोबत बोलण्याचा प्रयत्न केला. तिला अवघडल्या सारखे नको वाटायला म्हणून उगाच ऑफिस, काम असं काही तरी बोलत संभाषण सुरू केले. जरा वेळ गेला की परत दोघेही गप्प..मग मंद आवाजात गाण्यांचे सुर कानावर पडले की जणू आपल्यासाठीच गाणं लागलंय असा विचार मनात येऊन दोघेही लाजत, मनोमन आनंदी होत प्रवास करत होते.
प्रियाच्या घराजवळ पोहोचणार होते तितक्यात मनिष तिला म्हणाला, “प्रिया तुझ्या मनात काय आहे माहीत नाही पण मला तू पहिल्या भेटीतच आवडली. तुला वाटेल हा किती उतावळा, लगेच होकार दिला पण तुला हरकत नसेल तर पुढचे काही दिवस आपण जसं जमेल तितकं भेटायचं का म्हणजे आपल्याला एकमेकांविषयी अजून जास्त माहीत होईल, स्वभाव जरा तरी कळेल. पण हो तुला मी आवडलो असेल तरचं..”
प्रियाला त्याच म्हणणं पटलं होतं पण तरी ठीक आहे मी तसं विचार करून कळवते म्हणत ती निघाली. तिला घरी सोडून परत जाताना मनिष एकटाच मनोमन आनंदी होऊन हसत स्वत:शीच बोलत होता. रोमॅंटिक गाणे गुणगुणत होता. काही तरी वेगळंच वाटलं होतं त्याला तिला भेटल्यानंतर जे सगळं तो पहिल्यांदाच अनुभवत होता.
प्रिया हो म्हणेल की नाही हा विचार मनात आला की जरा निराश व्हायचा. रात्रभर तिच्याच विचारात तो नकळत झोपी गेला. तिचा चेहरा मात्र सतत त्याच्या नजरेसमोर दिसत होता.
दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये पोहोचताच त्याला प्रियाचा फोन आला, तिचा होकार ऐकून तो आनंदाने मनोमन वेडापिसा झाला. मनातच गाण गुणगुणायला लागला,
“पहला पहला प्यार है…पहली पहली बार है..जान के भी अनजाना कैसा मेरा यार है..”
झालं पुढचे काही दिवस दोघांच्या भेटी गाठी झाल्या. एकमेकांविषयी एक ओढ निर्माण झाली, दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पुढच्या काही महिन्यांनी दोघांचे लग्न झाले. अगदी परफेक्ट कपल अशी त्यांची एक ओळख निर्माण झाली होती.
आज दोघांच्या भेटीला एक वर्ष पूर्ण झाले होते. पहिल्यांदा भेटलो तो दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे, प्रपोज केले तो दिवस प्रपोज डे, तिला पहिल्यांदा गुलाबाचे फूल दिले तो रोझ डे असे मनिषचे मत. म्हणूनच आजचा दिवस त्याला खास बनवायचा होता.
दोघेही बाहेर जायला तयार झाले. प्रियाने मस्त ब्लॅक वनपीस घातला, हलकासा मेकअप केला. त्याच्या सरप्राइज मुळे एक वेगळंच तेज तिच्या चेहऱ्यावर दिसत होते. तिला तयार झालेलं बघताच त्याला पुन्हा एकदा त्यांची पहिली भेट आठवली आणि तो म्हणाला, “ब्युटिफुल, यू आर लूकींग सो हॉट..”
ती लाजतच त्याला उत्तरली, “थॅंक्यू. निघायचं? ”
तो मस्करी करत म्हणाला, “तसं तर आता मूड बदलला माझ्या इतक्या सुंदर बायकोला बघून पण आता जावं लागेलच ना..?”
दोघेही कॅंडल लाइट डिनर साठी छानशा रेस्टॉरंट मध्ये गेले. तिथलं वातावरण अगदीच रोमॅंटिक होतं, मेणबत्तीच्या मंद प्रकाशात प्रिया अजूनच उठून दिसत होती. सोबतीला रोमॅंटिक म्युझिक सुरू होते. दोघांनी एकत्र कपल डान्स केला नंतर डिनर केला. डिनर करून मस्त लॉंग ड्राईव्ह ला जाऊन उशीरा दोघेही घरी आले. प्रिया आज खूप आनंदी होती. एखाद्या स्वप्नासारखं सगळं अनुभवल्या सारखं वाटत होतं तिला.
घरी येताच मनिष ने तिचा हात हातात घेत तिला स्वतः कडे ओढले तशीच ती लाजून चूर झाली. तिच्या हृदयाची धडधड वाढली, चेहऱ्यावरचे भाव बदलले. मनिष एकटक तिचं रूप, तिचे भाव टिपत अजूनच तिच्याकडे आकर्षित होत होता. दोघेही फक्त नजरेनेच बोलत होते आणि नजरानजर होताच ती लाजत होती. त्याने तिला अजूनच जवळ ओढले तसंच दोघांच्याही मनात एकच गाणे सुरू झाले,
” बाहो के दरमिया दो प्यार मिल रहे हैं,
जाने क्या बोले मन,
डोले सुन के बदन धड़कन बनी ज़ुबा…”
ती सायंकाळ, ती रात्र, त्यातला प्रत्येक क्षण दोघांसाठीही अविस्मरणीय होता.
अशी ही दोघांची गोड प्रेमकथा कशी वाटली हे नक्की कळवा ?
मी लिहिलेली ही प्रेमकथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.
© अश्विनी कपाळे गोळे
फोटो- गूगल साभार
.
Comments are closed