सावरी सखी ( प्रेमकथा ) – भाग पहिला

Love Stories-Relations

नेत्रा लहानपणापासून अनाथाश्रमात वाढलेली. दिसायला अगदीच साधारण, काळी सावळी पण उंच पुरी सुडौल बांधा असलेली. अभ्यासात हुशार, प्रेमळ, सोज्वळ स्वभावाची आणि त्यामुळेच अख्या  अनाथाश्रमात प्रत्येकाचे मन तिने जिंकले होते. सगळ्यांची लाडकी नेत्रा, प्रेमाने तिला सगळे तिथे ताई म्हणायचे. आपले आई-वडील कोण आहेत, आपण इथे कशे आलो याविषयी अनेक प्रश्न नेत्राला पडायचे पण कधी कुणाला विचारण्याची हिंमत झाली नाही. अनाथाश्रमाच्या मुख्य सविता ताई म्हणजेच माई तिच्या साठी आई समान होत्या तर अख्खा आश्रम तिचं कुटुंब.

बारावीमध्ये ती चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झाली. पुढे संगणक शाखेत पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. कॉलेजचा पहिलाच दिवस होता तो. नेहमीप्रमाणेच अगदी साधा पिवळसर रंगाचा पंजाबी ड्रेस घालून तयार झाली आणि माईंचा आशिर्वाद घेऊन कॉलेजला निघाली. जुलै महिना असल्याने जरा पावसाचे चिन्ह दिसत होतेच. लगबगीने बस स्टॉपवर येऊन उभी राहिली. बस स्टॉपवर दोन लहान मुले बाजूला खाली फुटपाथवर बसून खेळत होते आणि त्यांची आई तिथे उभ्या असलेल्या लोकांना गुलाबाची फुले विकत घेण्यासाठी विनवण्या करत होती. यावरच त्यांचं पोट भरत असं एकंदरीत परिस्थिती पाहता नेत्राला लक्षात  आलं. तिला त्या मुलांकडे बघून वाईट वाटत होते, मनात काही तरी विचार करत तिने स्वतः जवळचा जेवणाचा डबा त्या लहान मुलांना दिला आणि ती मुलेही अगदी त्यावर तुटून पडली. ते बघताच त्यांच्या आईच्या डोळ्यात चटकन पाणी आलं आणि तिने एक गुलाबाचे फुल नेत्राला आग्रहाने दिले.

हा सगळा प्रकार बसस्टॉपवर उभा असलेला प्रत्येक जण बघत होता. त्या गर्दीत राघव सुद्धा उभा होता. त्याला नेत्रा विषयी एक वेगळाच अभिमान वाटला, कौतुकही वाटले. तिच्या प्रेमळ स्वभावाची जाण त्याला त्या क्षणभरात झाली‌. त्याचे डोळे तिच्यावरच स्थिरावले.

काही वेळातच बस आली आणि नेत्रा बसमध्ये चढली. योगायोगाने नेत्रा आणि राघवला आजुबाजूला जागा मिळाली. नेत्राचे कौतुक करण्याच्या उद्देशाने राघव म्हणाला , “हाय, मी राघव. तुम्ही खरंच खूप छान काम केलं आज..त्या भुकेल्या मुलांना डबा दिला तेव्हा त्या मुलांच समाधान बघता खरंच खूप छान वाटलं. तुमचं खरंच खूप कौतुक वाटलं..आपणही काही मदत करावी म्हणून मी दोन पिवळ्या गुलाबाची फुले त्या बाईंकडून घेतली पण आता या फुलांचा तुम्ही स्वीकार केला तर मला आनंदच होईल. फक्त तुमचं कौतुक म्हणून माझ्याकडून हि भेट समजा.”

नेत्राला त्याच्या बोलण्याने जरा अवघडल्या सारखे वाटले. ती त्याला म्हणाली, “माफ करा पण आपली काही ओळख नसताना मी या फुलांचा स्वीकार करू शकत नाही..”

त्यावर तो म्हणाला, ” असो… काही हरकत नाही..पण गैरसमज नको..मला खरंच कौतुकास्पद वाटलं तुमचं वागणं म्हणून म्हंटलं शिवाय मी एका मुलाखतीला जातोय तिथे फुले घेऊन कसा जाऊ हाही प्रश्न आहेच..”

ते ऐकताच मनोमन विचार करत नेत्रा म्हणाली, “ठिक आहे द्या मग मला ती फुले.. गरज नसताना त्या माऊली ला मदत व्हावी म्हणून घेतलीत ना फुले..मग तुमचं सुद्धा कौतुकच म्हणावं लागेल.. तुमच्या मुलाखतीसाठी खूप शुभेच्छा ?..”

तिचं बोलणं, तिचं वागणं बघता राघवच्या मनात तिच्याविषयी एक वेगळाच आदर निर्माण झाला. दोघांनी स्टॉप येत पर्यंत गप्पा मारल्या.

कॉलेजचा पहिला दिवस नेत्रा साठी खास होता.सगळा नविन अनुभव, नविन विश्व. आश्रमात परत आल्यावर तिने माईंजवळ दिवसभराच्या सगळ्या आठवणींची उजळणी केली. त्यात राघव विषयी सांगताना का कोण जाणे पण एक आनंदाची लहर तिच्या चेहऱ्यावर झळकली, ते भाव माईंनी अलगद टिपले. माईंना जरा काळजी सुद्धा वाटली पण आपली नेत्रा समजुतदार आहे, विचारी आहे शिवाय ती आपल्या पासून काही लपवत नाही याची त्यांना खात्री होती.

दोन दिवसांनी सकाळी परत बस स्टॉपवर तिला राघव भेटला, पेढ्यांचा डबा तिच्यासमोर देत तिला म्हणाला, “मिस नेत्रा, तुम्ही माझ्यासाठी लकी ठरलात..मला नोकरी मिळाली.. तुमच्याशी गप्पा मारून फ्रेश मूडमध्ये मुलाखत दिली आणि निवड झाली..थ्यॅंक्यू.. प्लीज पेढा घ्या ना..”

नेत्राने त्याचे अभिनंदन केले आणि म्हणाली, “माझ्या मुळे नाही तुम्ही तुमच्या जिद्दीने, मेहनतीमुळे निवडले गेले..”

राघव तिच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत होता. काळी सावळी असली तरी किती सुंदर व्यक्तीमत्व आहे हे असा विचार करत तो एकटक तिला बघत होता. दोघांची नजरानजर झाली तशीच ती लाजली.

राघव एका मध्यमवर्गीय कुटुंबातील हुशार मेहनती मुलगा. पिळदार शरीरयष्टी, सावळा वर्ण, उंच पुरा रूबाबदार.

दोघांची त्या बस स्टॉपवर अधून मधून भेट व्हायची. हळूहळू मैत्री झाली.

आजकाल नेत्राच्या वागण्यात बोलण्यात जरा वेगळा बदल माईंना जाणवत होता. ती एका वेगळ्या विश्वात वावरत होती. आनंदी राहत होती, आपण कसं दिसतोय, कॉलेजला जाताना नीट तयारी केली की नाही अशा छोट्या-छोट्या गोष्टींकडे नेत्रा बारकाईने लक्ष देऊ लागली होती.

माईंना हा बदल आवडत होता पण नेत्रा प्रेमात तर पडली नसेल ना की कॉलेज मध्ये इतर मुलींमध्ये आपणही नेटकं दिसावं म्हणून हा बदल झाला याचा अंदाज त्यांना बांधता येत नव्हता. हल्ली तिच्या बोलण्यात राघवचा उद्धार हा असायचाच.
पहीलाच मित्र होता तो तिचा शिवाय वयाच्या ज्या टप्प्यावर नेत्रा होती त्यामुळे माईंना तिची काळजी वाटू लागली. तिच्याशी यावर बोलावं का असा विचार त्यांच्या मनात सुरू होता.

इकडे दोघांची मैत्री छान रंगली होती. एकमेकांची ओढ निर्माण झाली होती. राघवला नेत्राने ती अनाथ असल्याचे सांगितले होतेच पण त्याला त्याची काही अडचण नव्हती. तो तिच्या प्रेमात पडला होता. मनापासून त्याला ती पहिल्या भेटीतच आवडली होती.

एक दिवस त्याने बस स्टॉपवरच्या त्या माऊली कडून लाल गुलाबाचे फुल नेत्राला देत आपले प्रेम व्यक्त केले. तिलाही सगळं हवंहवंसं वाटत होतं पण आपण अनाथ आहोत तेव्हा राघवचे आई वडील आपला स्वीकार करतील का या विचाराने ती निराश झाली. राघव वर तिचेही प्रेम होतेच, त्याच्या सोबत संसार करण्याचे स्वप्न ती बघत होती. पण त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला तरी पुढे काय..हे संसाराचं स्वप्न वास्तव्यात उतरू शकणार की नाही याची तिला भिती वाटत होती.

याविषयी माईंसोबत बोलावं का असंही तिला वाटत होतं.

राघव तिच्या उत्तराची वाट बघत होता पण नेत्रा मात्र विचारांच्या गर्दीत अडकली होती.

आता नेत्रा पुढे काय करेल ? दोघांच्या नात्याचे भविष्य काय असेल हे जाणून घेऊया पुढच्या म्हणजेच अंतिम भागात.

पुढचा भाग लवकरच.

काय मग उत्सुकता वाढली की नाही, कथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.
मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

© अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed