सावरी सखी ( सामाजिक प्रेमकथा ) – भाग दुसरा (अंतिम)

Love Stories-Relations-Social issues

राघवला काय उत्तर द्यावे याचा विचार करत नेत्राच्या मनात झालेला गोंधळ काही कमी होत नव्हता. काही उत्तर न देता ती कॉलेजनंतर आश्रमात परतली.

माईंना आज तिच्या वागण्यात बराच बदल जाणवला. हसत खेळत राहणारी नेत्रा आज विचारात मग्न होती, चेहऱ्यावर एक काळजी स्पष्ट दिसत होती. शेवटी न राहावता माईंनीच तिला विचारले, “नेत्रा , कशाचा विचार करते आहेस. कॉलेजमध्ये काही झालं का..चिमुकले सानू, गोलू तुला हाक मारत ताई ताई करत अवतीभवती फिरत होते पण आज पहिल्यांदाच तू त्यांना जवळ न घेता सरळ खोलीत निघून गेली. काही काळजीचं कारण असेल तर सांग मला बिनधास्त. ”

नेत्राला स्वतः च्या वागण्यातला बदल जाणवला. तिने मोठी हिंमत करून माई जवळ सगळं काही सांगायला सुरुवात केली, “माई, रागवू नका पण मी राघव विषयी बोलले ना…. त्याने त्यांचं माझ्यावर प्रेम असल्याचं सांगितलं.. तसं तो मनाने चांगला वाटला पण मला खूप घाबरल्या सारखं वाटलं माई..मनात काय चलबिचल सुरू आहे मला खरंच कळत नाही आहे..”

माई- “नेत्रा , तू नुकतीच कॉलेजला जायला लागली आहे, आयुष्याच्या नव्या वळणावर आहेस..तुला स्वतः च्या पायावर उभे राहायचे तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहे ना.. राघव तुझा मित्र आहे शिवाय तुमची ओळख काही दिवसांपूर्वी झालेली..तो तुझा पहिलाच मित्र ना..त्याच्या विषयी ही भावना‌ तुझ्या मनात निर्माण होणे नैसर्गिक आहे..हे आकर्षक आहे की प्रेम मी आता नाही सांगू शकणार..पण बाळा जरा विचार कर.. सध्या तुला तुझ्या स्वप्नांवर लक्ष केंद्रित करायचं आहे.. प्रेम, संसार या गोष्टी आयुष्यात येतातच पण त्याची एक ठराविक वेळ असते..आज तू त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला आणि पुढे काही दिवसांनी नाही पटलं तर पुढचं आयुष्य नुसतच झुरत घालवायचं नाही तेव्हा वेळीच सावर मनाला..मित्र म्हणून रहा यात माझी हरकत नाही पण प्रेम, संसार अशा गोष्टींचा विचार आता करू नकोस..तुला तो आवडतो मला कळतंय पण हे प्रेमच आहे असं नाही ना..”

    माईंच्या बोलण्याने नेत्राला मन अगदी हलके वाटले. मनातला गोंधळ बराच कमी झाला. आता या सगळ्या गोष्टींचा विचार करत अभ्यासाकडे दुर्लक्ष नको म्हणून तिने स्पष्ट काय ते राघवशी बोलायचं ठरवलं.
राघवला भेटल्यावर तिने त्याला सांगितले, “राघव, आता तरी मला उत्तर देणे शक्य नाही..मला माझ्या मनाची अवस्था कळत नाहीये..मला तू आवडतोस पण माझं तुझ्यावर प्रेम आहे असं अजून तरी ठामपणे माझं मन मानत नाहीये. मला वेळ दे. तू नोकरी करतोस.. लवकरच सेट होशील पण माझं स्वतः च्या पायावर उभे राहायचे स्वप्न माझं नसून माई, आमचा आश्रम या सगळ्यांचं आहे आणि ते पूर्ण होईपर्यंत मी याविषयी, आपल्या नात्याविषयी काहीही निर्णय घेऊ शकणार नाही. पण हा, आपण चांगले मित्र बनून नक्कीच राहू शकतो.”

नेत्राच्या बोलण्याने राघव अजूनच तिच्याकडे आकर्षित झाला. इतक्या कमी वयात इतका समजुतदारपणा बघून त्याला तिचं खरंच खूप कौतुक वाटलं. त्यानेही तिला त्यावर उत्तर दिले, “तू हवा तितका वेळ घे..मी वाट पाहीन..आपण चांगले मित्र नक्कीच आहोत..तुला काहीही मदत लागली तर मला हक्काने सांग..तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी नक्कीच मदत करेन.”

तिनेही त्यावर एक गोड स्माइल देत मैत्री स्वीकारली. मित्र बनून राहत असला तरी राघव तिच्या प्रेमात पडला होता आणि मान्य करत नसेल तरी मनाच्या कोपऱ्यात कुठे तरी नेत्रा सुद्धा त्याच्यावर जिवापाड प्रेम करत होती.

दोघांची मैत्री दिवसेंदिवस बहरतचं होती. अशातच भराभर वर्षे निघून गेली. नेत्रा कॉलेजच्या अंतिम वर्षाला होती. तिचं स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने तिची योग्य ती वाटचाल सुरू होती. राघवच्या घरी दोघांच्या मैत्री विषयी काही एक माहिती नव्हते. त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी एक साजेस स्थळ आणले आणि त्याविषयी राघवला सांगितले. या क्षणी राघवने मला हे स्थळ मान्य नाही सांगून नकार दिला पण नकार देण्यासारखे काहीच नव्हतं. मुलगी त्याच्या तोलामोलाची, सुंदर, सुशिक्षित नोकरी करणारी. त्याच्या अशा प्रतिक्रियेमुळे आई बाबांना शंका आली. त्यांनी त्याच्याशी बोलल्यावर त्यांना नेत्रा विषयी कळाले. त्यात ती अनाथाश्रमात वाढलेली म्हंटल्यावर त्याच्या वडिलांचा पारा चढला. “कोण कुठली मुलगी, प्रेम करायचं होतं तर जरा तोलामोलाची तरी बघायचं होतं..आई वडिलांशिवाय वाढलेली ती.. काही संस्कार तरी असतील का..” असं बोलून त्यांनी राग व्यक्त केला.
आईने तिचा फोटो बघताच ती म्हणाली, “कशी काय आवडली रे तुला..ना‌ रंग ना रूप.. वरून अनाथ..राघव तिला विसरून जा.. आम्ही तिचा कधीच स्वीकार करू शकत नाही..”

आई बाबांच्या बोलण्याने राघव खूप दुखावला पण त्याने विचार केला, “समाज अजूनही जात धर्म, रंग रूप या गोष्टींचा विचार करतोच..तसाच विचार आई बाबा करत आहेत.. त्यांचं चुकलं असंही नाही पण जी परिस्थिती नेत्रा वर ओढावली त्याच काय..त्यात तिची काय चूक..मला तिचं रंग रूप पाहून नाही तर तिचं प्रेमळ मन, तिची जिद्द, तिचा स्वभाव बघून ती आवडली.. वरवर पाहता प्रेम कुणीही करेल पण मन समजून घेत प्रेम केल हा माझा गुन्हा का वाटला आई बाबांना..”

आता आई बाबांची समजुत कशी काढावी म्हणून राघव काळजीत पडला‌. त्याने याविषयी नेत्रा ला काही एक सांगितले नाही. तिला तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू द्यावं म्हणून तो गप्प राहिला.

माईंना भेटून त्याने सगळी परिस्थिती त्यांना सांगितली शिवाय नेत्रा साठी त्यांच्याकडे मागणी घातली. एकंदरीत त्याची धडपड, नेत्रा विषयी आपुलकी, प्रेम बघता माईंना आता राघवची, त्याच्या नेत्रा वरच्या खर्‍या प्रेमाची खात्री पटली होती. त्या त्याला मदत करायला तयार झाल्या पण आई बाबा तयार नसतील तर नेत्रा सोबत लग्न लावून देऊ शकणार नाही हेही त्यांनी राघवला सांगितले.

त्याने आई बाबांची कशीबशी समजूत काढत एकदा त्या अनाथाश्रमात येण्यासाठी त्यांना तयार केले. आई बाबा माईं सोबत आश्रमात एका झाडाखाली खुर्चीवर बसले होते. माईंनी त्यांना नेत्राचा भूतकाळ सांगितला, “नेत्रा त्यांना एका मंदिरात सापडली. मुलगा व्हावा म्हणून पहिल्या मुलीचा बळी जाणार होती पण अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यांनी तिला वाचवले आणि आश्रमात सोडले. केवळ दोन महिन्यांची होती ती‌. जसजशी मोठी झाली तसंच अख्खं आश्रम तिने प्रेमाने जिंकले, खूप हुशार, मेहनती आहे ती.. दुर्दैव इतकंच की आई वडिलांना तिची किंमत नव्हती..मुलगा हवा होता म्हणून तिला बळी देणार होते तिचा..” त्याविषयी त्यांच्याकडे असणारे पुरावेही माईंनी दाखवले. आता राघवचे आई बाबा कितपत विश्वास ठेवतील हे त्यांच्या वर सोडले.

ते ऐकताच राघवच्या आईच्या डोळ्यात चटकन पाणी आले, नेत्रा विषयी वाईट वाटले पण अशा अनाथ मुलीला सून करून घ्यायचं हे काही त्यांना पटलं नव्हतं.

माईंनी त्यांना हेही स्पष्ट केले की, तुम्ही तयार नसाल तर तुमचे मन दुखावून ती कधीच राघव सोबत लग्न करणार नाही.
माईंनी नेत्राला बोलावून घेतले. तिला मात्र काय चाललं आहे काही कळालं नाही. ती तिथे जाताच अतिथी म्हणून आई बाबांच्या पाया पडली. त्यांचे हसतमुखाने स्वागत केले. माईंनी ओळख करून दिली तेव्हा तिला कळाले की हे राघव चे आई बाबा आहेत. ते ऐकताच ती जरा गोंधळली, अचानक ते इथे कशे आणि मग राघव कुठे आहे याचा विचार करत स्तब्ध होऊन तिथेच उभी राहिली. तिचं साधं सरळ राहणीमान, निरागस चेहरा, प्रेमळ बोली बघून आईला ती चांगली वाटली पण तिचा सून म्हणून स्वीकार करण्यासाठी मात्र अजूनही मन मानत नव्हतं.

बाबां तर अजूनही नकारावर ठाम होते. त्यांचा नकार माईंना कळाला तसंच ते गेल्यावर त्यांनी नेत्रा आणि राघव ची समजुत काढली. राघव, तुझ्या घरी ही गोष्ट स्वीकारण्यास कुणी तयार नाही तेव्हा तुम्ही दोघेही इथेच तुमच्या भावनांना थांबवले तर योग्य राहील असे सांगितले. 

नेत्रा हळवी असली तरी वास्तविकतेचा विचार करणारी होती. तिने माईंच्या बोलण्याचा आदर ठेवत राघवला भेटणे, बोलणे बंद केले. या गोष्टीचा विचार करून मनोमन तिला खूप त्रास होत होता पण चेहऱ्यावर हास्य ठेवून ती आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत होती. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत तिने पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. नोकरीचे प्रयत्न सुरू केले.

वेळेनुसार हळूहळू ती राघवला विसरण्याचा प्रयत्न करत होती पण मनोमन त्याला आठवत खूप रडतही होती.

इकडे राघव आई बाबांशी तुटक पणे वागायला लागला, आयुष्यभर लागलं करायचं नाही म्हणत आले ते स्थळ हूडकावून लावू लागला. नेत्रा ला भेटायचा खूप प्रयत्न केला पण ती त्याला प्रतिसाद देत नव्हती. मनोमन झुरत तो जगत होता. आईला त्याची ही अवस्था बघवत नव्हती पण बाबांच्या निर्णयापुढे, समाजाच्या भितीने त्या काही पुढाकार घेत नव्हत्या.

अशातच वर्ष गेले पण राघव काही नेत्राच्या विचारातून बाहेर पडला नव्हता. तिघेही रात्री जेवताना टिव्ही समोर बसले होते. एका न्यूज चॅनलवर माईंची मुलाखत सुरू होती. आश्रमाला इथवर आणण्याचा प्रवास त्या वर्णन करताना त्यांच्या बोलण्यात नेत्रा चा उद्धार सतत होत होता. आमची नेत्रा मेहनतीने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून मोठ्या हुद्द्यावर रूजू झाली हे त्या अभिमानाने सांगत होत्या. ते बघताच राघवच्या डोळ्यात आनंदाश्रु आले. माझी नेत्रा, तिने तिचं स्वप्न पूर्ण केलं असं तो रडक्या सुरात बोलून गेला. तिला माईंसोबत तिला टिव्हीवर बघताच त्याला खूप आनंद झाला. आपला मुलगा इतका हळवा झालाय हे बघताच बाबांच्या डोळ्यातही पाणी आले. आपण ज्या मुली विषयी चुकीचा विचार करत आलो तिने खरंच नाव कमावलं असा विचार बाबांच्या मनात आला. समाज, नातलग काय म्हणतील म्हणून आपल्या मुलाचं सुख आपण हिरावून घेत आहोत याची त्यांना जाणीव झाली.

एक अपराधीपणाची भावना मनात घेऊन ते काही दिवसांनी राघव सह आश्रमात आले. नेत्राच्या कर्तुत्वाचे कौतुक करत त्यांनी माईंची माफी मागितली आणि नेत्रा ला राघव साठी मागणी घातली. आता हा समाज, माझे नातलग कांहीही म्हणो पण माझ्या मुलाचा सुखी संसार आम्हाला बघायचा आहे आणि तो नेत्रा शिवाय अपूर्ण आहे हे त्यांनी माईंना सांगितले.

राघव आणि नेत्रा हे सगळं ऐकून मनोमन खूप आनंदी झाले. इतके दिवस मनात साठवलेले प्रेम, राघवच्या आठवणी नेत्राच्या डोळ्यातून अश्रु रूपात बरसायला लागल्या.तिचा बांध फुटला, राघव कडे बघत ती आनंदाने रडायला लागली. त्यानेही तिचे अश्रू पुसत हळूच तिला मिठी मारली.

माईंनी मोठ्या आनंदाने नेत्रा चे लग्न राघव सोबत लावून दिले. आपली नोकरी सांभाळत सासरी आल्यावर सुरवातीला कुरकुर करणार्‍या  नातलगांची मने नेत्राने प्रेमाने जिंकली.

आपल्या आजूबाजूला प्रेमापेक्षा जास्त समाज, नातलग , मानपान, प्रतिष्ठा या गोष्टींना महत्त्व दिले जाते. अशाच गोष्टींचा विचार करून घरच्यांचा नकार, धमक्या  बघता अनेकदा तरुण पिढी प्रेमापोटी आपले आयुष्य संपवायला ही मागेपुढे पाहत नाही. अशाच परिस्थितीतून सामाजिक सुधारणा होण्याच्या दृष्टीने ही कथा मी लिहीलेली आहे.

अशी ही आगळीवेगळी सामाजिक प्रेमकथा कशी वाटली हे नक्की कळवा ?.

लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव. मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

© अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed