तू दुर्गा…तू रणरागिणी… ( एक प्रेरणादायी सत्यकथा )

Inspirational-Social issues

आरती दिसायला साधारण, मध्यम बांधा, सावळा वर्ण, अभ्यासात हुशार, मनमिळाऊ स्वभावाची. वडील लहानपणीच देवाघरी गेले त्यामुळे आई आणि दोन मोठ्या भावांच्या सानिध्यात लहानाची मोठी झालेली.
दोन्ही भाऊ नोकरीला लागले तसेच योग्य स्थळ बघून आईने दोन्ही मुलांचे लग्न आटोपले. दोघेही नोकरी निमित्ताने मोठ्या शहरात‌, आपापल्या संसारात व्यस्त. त्यावेळी आरती कॉलेजमध्ये होती. दोन्ही भाऊ आपापल्या संसारात गुंतल्याने आई आणि आरती दोघींचेच विश्व. दिवाळीच्या सुट्टीत चार दिवस पाहुणे म्हणून भाऊ, भावजया, भाचे कंपनी यायची आणि पुढे वर्षभर त्यांच्या आठवणी मनात साठवून जगायचं असंच काहीसं झालं होतं आरतीच्या आईचं.

मुळात शांत स्वभाव त्यामुळे मुला सुनांवर ओझे नको म्हणून त्या काही त्यांना कुठल्याच बाबतीत काही बोलेना. बाबांची पेन्शन शिवाय दादांच्या महिन्याला येणार्‍या पॉकेट मनी मधून दोघी मायलेकी घरखर्च करायच्या. त्यातही वहिनीच्या लपून छपून दादा पैसे पाठवतो असं कळाल्यावर तर आरतीला अजूनच वाईट वाटे.

आता आरती वयात आली होती आईला वाटे आपल्या डोळ्यासमोर पोरीचे हात पिवळे झाले म्हणजे आपण डोळे मिटायला मोकळं. त्यांनी आरती जवळ तिच्या लग्नाविषयी बोलून पण दाखविले पण प्रत्येक वेळी तिचं उत्तर ठरलेलं, “मला नाही करायचं लग्न..तुला एकटीला सोडून मला नाही जायचं सासरी..”

आपण सासरी गेलो तर आईचं कसं होणार या विचाराने लग्न न करण्याचा निश्चय आरतीने केला, कारण भाऊ भावजय आईला सोबत घेऊन जाणार नाही याची तिला एव्हाना खात्री पटली होती. इकडे आईला वाटे आपण आहोत तोपर्यंत ठिक पण आपण गेल्यावर आरती एकटी आयुष्य कसं जगणार? भाऊ भावजय आरतीला प्रेम देत तिला सांभाळणार की नाही? आरतीच्या लग्न न करण्याच्या निश्चयाने भाऊ सुद्धा तिला त्याविषयी फार काही आग्रह करत नसे.

दोघीही आपापल्या हट्टाला चिकटून. आरतीला एक छोटीशी नोकरी मिळाली होती, नोकरी आणि आई असं तिचं विश्व बनलेलं. भराभर दिवस , वर्षे जात होते.
अशातच एकदा आईची तब्येत खराब झाली आणि तिला कॅन्सर असल्याचे कळाले. आईचे उपचार सुरू असले तरी तिच्या जगण्याची शक्यता कमी आहे हे डॉक्टरांकडून सुरवातीलाच कळाले होते.

आता तर आरतीने आपला निश्चय अजूनच पक्का केला. आईची सेवा करायची आणि ती हयात आहे तितके दिवस आनंदात घालवायचं असं ठरवलं. नोकरी सोडून आरतीने लहान मुलांच्या ट्युशन घ्यायला सुरुवात केली. घरीच ट्युशन घेताना आई कडेही लक्ष देता यायचे आणि थोडी फार कमाई सुद्धा व्हायची. भाऊ भावजय अधूनमधून भेटायला येत असे. आई म्हणायची आरती तू माझ्या डोळ्यांदेखत लग्न कर पण आरती काही मानत नव्हती. तू माझी काळजी करू नकोस म्हणत तीच आईची समजूत काढत होती.
असेच कसंबसं एक वर्ष‌ गेलं आणि आई आरतीला सोडून कायमची निघून गेली.

आई कुठल्याही क्षणी आपल्याला सोडून जाऊ शकते हे माहीत असले तरी ती गेल्यावर ते वास्तव स्विकारण्याची हिम्मत आरती मध्ये नव्हती. आईच्या जाण्याने ती पोरकी झाली होती, पूर्णपणे एकटी पडली होती, मनातून पार खचून गेली होती. आईच्या कितीतरी आठवणी तिच्या मनात जिवंत होत्या.
आई गेल्यावर आरतीला मोठा भाऊ आग्रह करत सोबत घेऊन गेला पण भावाच्या संसारात आपली अडचण होतेय हे तिला प्रत्येक क्षणी जाणवले. दोन भाऊ आहेत मग दुसर्‍यानेही बहिणीचा जरा भार उचलावा अशी भावजयीची प्रतिक्रिया कानावर पडताच आरतीने गावी परतण्याचा निर्णय घेतला. आपल्या राहत्या घरी आईच्या आठवणीने एक एक क्षण कठीण म्हणून आरतीने होस्टेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. गावचे राहते घर भाड्याने दिले आणि पूर्वी नोकरीला होती त्या मालकाशी बोलून नोकरी परत मिळविली.

आरती पूर्णपणे एकटी पडली होती. कधीतरी भाऊ भेटून जायचे, सोबत चल म्हणायचे पण तुमच्यावर भार नको मी इथेच बरी म्हणत ती आयुष्य जगत होती. असं खडतर आयुष्य जगताना पस्तीशीच्या उंबरठ्यावर असलेली आरती चाळीशी पलिकडची दिसायला लागली, स्वतः कडे लक्ष द्यायला तिला वेळच नव्हता. भाऊ म्हणायचे अजून वेळ गेलेली नाही, तू लग्न कर पण प्रेम, भावना सगळ्या गोष्टींचा विचार तिने कधी केलाच नव्हता आणि आता तर तिने मनातून सगळे भाव पुसून टाकले होते. तारूण्यात मनाच्या कोपऱ्यात कुठे तरी काही तरी जाणवत असेलही पण जबाबदारी पुढे तिने ते कधी अनुभवण्याचा विचार केला नव्हताच.
आई गेल्यावर एकटेपणाची भावना मनात घेऊन स्वतःचे आयुष्य संपविण्याचा विचारही तिच्या मनात आलेला पण आई नेहमी सांगायची, ” मी गेल्यावर खचून जाऊ नकोस, तू दुर्गा आहेस, तूच रणरागिणी आहेस…”
आईचे शब्द आठवून मनातल्या वाईट विचारांना लाथ मारत ती नव्याने जगायचा प्रयत्न करत होती. होस्टेलमध्ये बर्‍याच पिडीत महिला, शिकणाऱ्या अनाथ मुली होत्या. त्यांच्याकडे बघत आरती विचार करायची, ” आपल्या वयाच्या पस्तीशी पर्यंत का होईना पण आईचं प्रेम लाभलं.. दूर का असेना पण भाऊ म्हणायला भाऊ सुद्धा आहेत…कधी फोन वर चौकशी तर करतात.. इतरांच्या मानाने आपण सुखीचं आहोत..”
कशीबशी मनाची समजूत काढत ती नोकरी करत आयुष्य जगत होती. गरजूंना शक्य ती मदत करत समाजसेवा करण्याचा निर्णय तिने घेतला आणि पुढचे आयुष्य असंच समाजसेवेत अर्पण करण्याचे मनोमन ठरविले.

हा लेख सत्य परिस्थिती वर आधारित असून काही भाग काल्पनिक आहे.
आरती सारखं आयुष्य जगणार्‍या स्त्रिया म्हणजे खरंच रणरागिणी आहेत.

याविषयी तुमचं मत नक्की कळवा.

लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.
मी लिहीलेला हा लेख माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

नावाशिवाय लेख शेअर करणे हा कॉपीराइट भंग केल्याप्रकरणी गुन्हा ठरू शकतो.

© अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed