विश्वासघात की फसवणूक? गोष्ट एका लग्नाची- भाग पहिला

Relations-Social issues

    मोनिका ची आई हॉस्पिटलमध्ये मोनिकाच्या बेड शेजारी पाणावलेल्या डोळ्यांनी बसलेली होती. औषधांमुळे मोनिकाला झोप लागली होती. तितक्यात मयंक तिला भेटायला आला तशीच मोनिकाची आई त्याला म्हणाली, “खबरदार मोनिकाच्या आसपास दिसलास तर… माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळताना लाज नाही वाटली… विश्वासघात केला तू…आता यापुढे तिला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस.. तुझ्यामुळे तिच्यावर ही वेळ आली आहे..”

ते ऐकताच मयंक काहीही न बोलता तिथून निघून गेला.

आई मोनिकाच्या केसांवरून हात फिरवत पाणावलेल्या डोळ्यांनी विचारात बुडाली.

    मोनिका अतिशय हुशार, आत्मविश्वासाने वडिलांचा मुंबई सारख्या शहरातील व्यवसाय अगदी सहजपणे सांभाळून शिक्षण पूर्ण करणारी. व्यवसायातील महत्वाच्या कामांमध्ये वडीलांना तिचा मोठा आधार वाटायचा. आई वडिलांना एकुलती एक, दिसायला सुंदर, वयाच्या मानाने तिला व्यवसायातील उत्तम ज्ञान होते. अगदी महत्वाचा निर्णय ती मोठ्या चतुराईने घेत असे. अशा या मोनिकाच्या लग्नाचा विचार आता आई वडिलांच्या मनात सुरू झाला.

    मोनिका शी याविषयी बोलल्यावर तिने एकच अट घातली ती म्हणजे, ” मुलगा हा मुंबईत नोकरी करणारा असावा, म्हणजे वडीलांना व्यवसायात मदत करता येईल शिवाय आई वडीलांकडे लक्ष सुद्धा देता येईल..”

     मोनिकाच्या आई वडीलांना ही हे पटलं होतं. लहानपणापासून ती वडिलांसोबत त्यांच्या कामात शक्य तसा हातभार लावायची त्यामुळे तिच्या शिवाय एकट्याने या भल्या मोठ्या व्यवसायाची धुरा सांभाळणे त्यांनाही अवघडच होते.

       आता तिच्या अटी लक्षात घेऊन वर संशोधन सुरू झाले. जे स्थळ यायचे त्यांना आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेली मोनिका सहजच पसंत पडायची. अशातच मयंकचे स्थळ आले. तो मूळचा मुंबईचा नसला तरी कॉलेज, नोकरी सगळं मुंबईत झालेले शिवाय दोघेही एकाच वयाचे. मयंक दिसायला देखणा, चांगल्या पदावर नोकरीला, शांत स्वभावाचा  त्यामुळे पहिल्या भेटीतच तिला तो बर्‍यापैकी आवडला. मग पुढे अजून जरा भेटून बोलून निर्णय घ्यावा असं तिने मनोमन ठरवलं. त्यालाही पहिल्या भेटीतच ती आवडली. तिच्या अटीनुसार तो सुयोग्य वाटल्याने तिने पुढाकार घेत पुढे गाठी भेटी घडवून आणल्या.

   त्याच्याशी बोलून तिला तो अगदी साधा सरळ, शांत स्वभावाचा वाटला. आता गोष्टी पुढे न्यायला हरकत नाही असंही तिला जाणवलं पण त्याचा हा शांत, जरा अबोल स्वभाव तिच्या अगदीच विरूद्ध त्यामुळे तिला जरा वेगळे वाटले पण प्रत्येकाचा स्वभाव असतो शिवाय नातं अजून नविन आहे तेव्हा वेळेनुसार तो मोकळा बोलेल असा विचार करून तिने लग्नाला होकार दिला.
   त्याच्याकडून तर सुरवातीपासूनच होकार मिळाला होता त्यामुळे काही प्रश्नच नव्हता. दोघांचं लग्न ठरलं. तिला अगदी मनाप्रमाणे मुलगा मिळाल्याने ती अगदीच आनंदात होती. आता एकाच शहरात आहे म्हंटल्यावर वारंवार भेटी गाठी होणार म्हणून ती अजूनच सुखावली. लग्न ठरल्यानंतर एकमेकांना ओळखण्याची एक ओढ, उत्सुकता, आकर्षक अशा अनेक भावनांनी तिच्या मनात गर्दी केली. अशीच अवस्था त्याचीही असेल असेच तिला वाटलेले. तिच्या बिनधास्त, बोलक्या स्वभावामुळे तिनेच पुढाकार घेत त्याला फोन, मेसेज वरून त्याच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. तिच्या पुढाकाराला तोही अगदी छान प्रतिसाद द्यायचा तेव्हा त्याच्याविषयी कुठली शंका मनात येणे शक्यच नव्हतं.
  लग्नाला अजून दोन महिन्यांचा अवधी होता तेव्हा मधल्या काळात दोघांच्या भेटी, संवाद हा सुरू होताच. पण या दरम्यान प्रत्येक वेळी भेटण्यासाठी तिच पुढाकार घ्यायची, तिला ही गोष्ट जरा खटकली पण त्याच्या शांत स्वभावामुळे कदाचित तो स्वतःहून भेटण्यासाठी काही बोलत नसावा किंवा आपणच पुढाकार घेतोय तेव्हा त्याला संधी मिळत नसावी असंही तिला वाटलं. भेटल्यावर त्याची अगदी छान वागणूक असल्याने तिने मनात कधी फार शंका निर्माण होऊ दिली नाही. भेटल्यावर त्याच्या वागण्या बोलण्यातून काही वेगळे तिला कधी जाणवलं नाही. दोन महिन्यांत लग्नाची खरेदी, सगळी तयारी ह्यात भराभर वेळ निघून गेली. मुंबईत मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये दोघांचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. सगळेच अगदी उत्साहात, लग्न सोहळ्यात कशाचीच कमी नव्हती.
   लग्नात पाठवणी झाल्यावर मुंबईतल्या त्याच्या फ्लॅटवर दोघेही गेले. सोबतीला पाहुणे मंडळी होतीच. मनाप्रमाणे सगळं झाल्याने मोनिका खूप आनंदी होती. मयंकच्या फ्लॅट वर दुसऱ्या दिवशी लग्नानंतर सत्यनारायण पुजा करण्यात आली आणि पहिल्या रात्रीची तयारीही.
   लग्न म्हंटलं की दोघांच्याही मनात प्रेमाचा एक वेगळाच बंध निर्माण होऊन मीलनाची ओढ लागलेली असते. नैसर्गिक भावनाच आहे ती पण या ओढी सोबतच मनात भिती, हुरहूर सुद्धा असते. मोनिका चेही तेच झाले. आत्मविश्वासाने व्यवसाय सांभाळणारी मोनिका आज लाजून, घाबरून सजविलेल्या खोलीत बसून मयंकची वाट बघत होती. नाईलाजाने तो खोलीत आला तसंच तिची धडधड वाढली, मयंक प्रेमळ नजरेने आपल्याला बघून अलगद मिठीत घेईल , छान काही तरी रोमॅंटिक बोलेल असेच काहीसे तिला वाटलेले पण घडले काही तरी भलतेच. त्याने खोलीत येताच तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि म्हणाला , “छान दिसते आहेस…आजचा दिवस खुप खास आहे ना पण मोनिका मला जरा वेळ हवा आहे.. खूप दगदग झाली ना मागच्या काही दिवसात..तू सुद्धा दमली असशील ना ..आराम कर..‌मलाही खूप झोप येत आहे… मागच्या काही दिवसात झोपच झाली नाही..”

   त्याचं असं बोलणं तिला खटकलं पण कदाचित मयंक ला वेळ हवा आहे, तो आता या सगळ्याला मानसिकरीत्या तयार नाही, शारिरीक थकवा जाणवत असेल त्याला असा बराच विचार करून तिने अंगावरचे दागिने काढले, साडी बदलून ती झोपण्याचा प्रयत्न करत होती. मनात एक प्रकारची हुरहूर तिला जाणवत होती पण पुढच्या दोन दिवसांनी दोघेही हनीमून साठी मलेशिया ला जाणार होते. तिथे दोघांना छान एकांत मिळेल अशा सुखद भावनेने ती आजच्या रात्रीचा फारसा विचार न करता झोपी गेली.
  व्यवसायातील महत्वाचे, अवघड निर्णय अगदी सहजपणे, मोठ्या आत्मविश्वासाने घेत असली तरी मनात मयंक विषयी प्रेम, एक नाजुक भावना तिच्या मनात होती. आता तिच्या मनाला आतुरता लागली होती ती म्हणजे हनीमून ला जाण्याची. या सगळ्यात त्याच्या मनात काय चाललंय हे मात्र तिला ओळखता आले नाही.

   मोनिका आणि मयंक यांच्या नात्यात पुढे नक्की काय होते, मयंक काही लपवत तर नाहीये ना. जशी मोनिकाला मयंकची ओढ वाटते आहे तशीच त्याला मोनिकाची ओढ जाणवत असेल का?
मोनिका हॉस्पिटलमध्ये कशी? तिची आई जे म्हणाली फसवणूक, विश्वासघात हे सगळं नक्की काय आहे ?
असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असणार ना. कथेत पुढे काय होते याची उत्सुकता सुद्धा लागली असणार,
तर ही उत्सुकता अशीच कायम ठेवा. दोघांच्या नात्याविषयी जाणून घेऊया पुढच्या म्हणजेच अंतिम भागात.

पुढचा भाग लवकरच.

हा भाग कसा वाटला ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा.

मी लिहीलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही. नावाशिवाय कथा शेअर करणे हा कॉपीराइट भंग केल्याप्रकरणी गुन्हा ठरू शकतो.

© अश्विनी कपाळे गोळे

  
 
  

Comments are closed