विश्वासघात की फसवणूक? गोष्ट एका लग्नाची- भाग दुसरा ( अंतिम )

Relations-Social issues

   लग्नानंतर ठरल्याप्रमाणे मोनिका आणि मयंक हनीमून साठी मलेशिया जाण्याचा दिवस उजाडला. मोनिका मोठ्या उत्साहात होती, लग्नानंतर दोघांना‌ छान एकांत मिळेल आणि आता पर्यंत जरा अबोल, लाजरा वाटणारा, नात्यात जरा वेळ हवा आहे म्हणणारा मयंक आपसुकच मोकळ्या मनाने आपल्याला त्याच्या आयुष्यात समावून घेईल अशी गोड आशा मोनिकाला लागली होती.

    दोघेही मलेशियाला पोहोचले, स्पेशल हनीमून पॅकेज घेतले असल्याने दोघे हॉटेल मध्ये त्यांच्या खोलीत पोहोचले तसंच त्यांना एक गोड सरप्राइज मिळाले. खोली गुलाबांच्या फुलांनी, पाकळ्यांनी छान सजविली होती. सगळीकडे मंद सुवास दरवळत होता. लाईटच्या मंद प्रकाशात अतिशय रोमांचक वातावरण निर्माण झाले होते. ते बघताच मोनिका आपसूकच पुटपुटली,  
“व्वा..किती रोमॅंटिक वाटतंय ना सगळं..”

    मयंकच्या चेहऱ्यावर मात्र जराही आनंद दिसत नव्हता. तिच्या बोलण्याला काही एक उत्तर न देता तो बॅग ठेवून आंघोळीला निघून गेला. तो बाहेर आला तसंच मोनिकाने त्याला मिठी मारली. तिच्या स्पर्शाने तो दचकून तिला दूर करत म्हणाला, “चला भूक लागली आहे, पटकन फ्रेश हो आपण खाली जरा काही खाऊन येऊ आणि फेरफटका मारून येऊ.

     त्याच्या अशा प्रतिक्रियेमुळे मोनिकाला फार वाईट वाटले, अशा प्रकारे दूर का लोटले असावे मयंक ने. त्याला मी असं जवळ आलेलं आवडलं नसेल का, की मी फार उतावीळ झाले असं काही वाटत असेल. पण मिठी मारण्यात काही वावगं तर नाही शिवाय आता आम्ही नवरा बायको आहोत मग असा का वागतोय मयंक लग्नापासून. जराही प्रेमाने बोलला नाही की जवळही घेतले नाही. अजून त्याला वेळ हवा असेल का? अशा अनेक प्रश्नांचा विचार करत मोनिका आंघोळ करताना करत होती. फ्रेश होऊन बाहेर आली आणि दोघेही खाली गेले. रात्री उशिरापर्यंत दोघेही खाली फेरफटका मारत होते. खोलीवर परतले तेव्हा मयंक म्हणाला , आज प्रवासामुळे थकवा वाटतोय, उद्या सकाळीच फिरायला निघायचं आहे. लवकर झोपा. इतकं बोलून तो अंगावर चादर ओढून झोपी गेला. मोनिकाला मात्र त्याच हे वागणं अजूनच खटकलं.
     

     त्याने प्रेमाने छान रोमॅंटिक काही तरी बोलावं, हळूहळू या नात्याला बहरायला एक पाऊल पुढे घ्यावं इतकीच तर अपेक्षा होती तिची पण मयंक ने तिचा हिरमोड केला. लग्न झालेल्या प्रत्येक मुलीला आपल्या साथीदाराकडून प्रेमाची अपेक्षा ही असतेच पण मयंक मात्र फारच वेगळा वागत होता. विचार करत तिचे डोळे पाणावले.

 
   पुढे आठवडाभर एकाच खोलीत दोघेच असूनही तो तिला जराही जवळ घेत नव्हता. दिवसा बाहेर फिरायचे आणि हॉटेल मध्ये येऊन आराम करायचा असाच काय तो त्यांचा हनीमून साजरा झाला. मोनिका त्याच्या कुशीत शिरण्याचा, त्याला मिठी मारण्याचा अलगद प्रयत्न करत होती पण तो मात्र तिला दूर करत तिला टाळायचा प्रयत्न करत होता. आता दोघांच्या नात्यात या नाजुक विषयावर बोलायचं म्हणजे मुलीसाठी कठीणच तेव्हा नक्की काय करावे तिला काही सुचेना.

   दोघेही हनीमून वरून परत आले. मयंक ची सुट्टी संपली होती आणि तो नोकरीला रूजू झाला. मोनिका सुद्धा वडीलांच्या व्यवसायात पूर्वीप्रमाणेच लक्ष द्यायला सुरु झाली. ती सतत काही तरी विचारात दिसते आहे हे तिच्या आई वडिलांनी ओळखले, “मोना , सगळं ठीक आहे ना..कशाच्या विचारात आहेस..” असही आईने तिला विचारले.
नवरा बायको यांच्या मिलनाच्या विषयावर आई सोबत तरी कसं बोलावं तिला कळेना‌ त्यामुळे “काही नाही..मी ठिक आहे..” इतकंच ती बोलली.
     
    मोनिकाला आता मयंक विषयी जरा वेगवेगळ्या शंका मनात येत होत्या. मयंक रोज उशीरा घरी यायचा, सकाळी उशीरापर्यंत झोपून रहायचा. मोनिका दिवसभर प्रवास , काम यामुळे थकून त्याची वाट बघत झोपी जायची. त्याला तर तेच हवे होते. शक्य त्या प्रकारे तिला टाळण्याचा प्रयत्न तो करत होता. आता आपणच पुढाकार घ्यावा असं मनोमन ठरवून मोनिका तो येत पर्यंत झोपली नाही. उगाच झोपण्याचे नाटक  करत ती बेडवर पडून होती.

रात्री १२:३० च्या सुमारास तो घरी आला. बराच वेळ बाथरूम मधे फ्रेश होत होता. बाहेर आला तर मोनिका मस्त तयार होऊन छान आकर्षक नाइट ड्रेस घालून त्याच्या समोर उभी राहिली. तिला बघताच त्याला धक्काच बसला. आपल्याला असं छान तयार झालेलं बघून मयंक आपल्याकडे आकर्षित होईल असे तिला वाटलेले पण तशी काहीही भावना त्याच्या चेहऱ्यावर नव्हती. तिचा सुडौल बांधा, सेक्सी नाइट ड्रेस कडे दुर्लक्ष करत तो म्हणाला , “झोपली नाही अजून..”
आता तिला त्याचा फार राग आलेला. लग्नाला तीन आठवडे होत आले होते पण मयंक तिला जराही स्पर्श करत नव्हता, जराही प्रेमाने छान काही बोलत नव्हता.

  ती आपला राग आवरत त्याला जाऊन बिलगली तसंच त्याने तिला जोरात दूर लोटले. “मोनिका, काय करतेय, खूप उशीर झाला आहे झोप आता” असं चिडक्या सुरात बोलून तो झोपला. ती रात्रभर रडत होती, विचार करत होती.
  आता त्याच्या विषयी अजूनच शंका तिला आल्या. मनात काही तरी ठरवून तिने पुढच्या काही दिवसांत त्याच्या मित्रपरिवारात त्याच्या विषयी चौकशी सुरू केली. मयंकच्या आयुष्यात कुणी दुसरी मुलगी तर नाही ना हाच संशय आता पर्यंत तिला होता. त्याच्या मित्रांकडून याविषयी असंच कळालं की आमच्या माहिती नुसार तरी त्याच्या आयुष्यात दुसरी कुणी नव्हती, ना आहे. त्याच्या कंपनीत तर त्याच्या विषयी सगळ्यांनी त्याच्या कामाबाबत फारच कौतुकास्पद प्रतिक्रिया दिली. हुशार, मनमिळाऊ, वेळेत काम पूर्ण करणारा सगळ्यांचा लाडका मयंक असंच तिला कळालं.

    मग मयंक असं का वागतोय तिला काही कळत नव्हते. तिने एका मैत्रिणीला याविषयी सांगितले तेव्हा याविषयी स्पष्ट बोलून दोघांनी हा प्रश्न सोडवलेला बरा असं तिने सांगितलं.
   मयंकच्या जवळ जाण्यासाठी मोनिका अनेकदा पुढाकार घेत होती पण तो तिला टाळत ,दूर करत होता आणि तिच्या पदरात प्रेम नाही तर निराशाच येते होती.
   लग्नाला जवळपास दोन महिने झालेले होते. सगळ्यांसमोर आपल्याशी अगदी छान वागणारा हा मयंक काही तरी नक्कीच लपवितो आहे याची मोनिकाला खात्री पटली होती. आज मयंक सोबत स्पष्ट बोलून हा मनातला गोंधळ कमी करावा असं तिने ठरवलं.

    रविवार असल्याने दोघेही घरी होते. मयंक नाश्ता करून टिव्ही बघत बसला‌ होता. मोनिका हळूच त्याच्या पाठीमागून आली आणि तिने परत एकदा पुढाकार घेत त्याला मिठी मारत त्याच्या गालावर चुंबन केले. तिच्या या कृतीमुळे तो ताडकन उठून उभा झाला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि तो चिडून म्हणाला, “मोनिका कितीदा सांगितलं तुला मला नाही आवडत तुझं असं वागणं…का करतेस तू असं…”

मोनिका त्यावर उत्तरली “का रे…काय प्रोब्लेम आहे..आपण नवरा बायको आहोत ना..मग इतका अधिकार तर नक्कीच आहे मला..तुला आवडत नाही का मी..का टाळतोय मला सतत.. कुणी दुसरी असेल तुझ्या आयुष्यात तर तसं तरी सांग..का वागतोय असा तू..बोल मयंक बोल..”

तो चिडून म्हणाला, “दुसरं कुणी आयुष्यात असण्याचा काही प्रश्नच नाही….मला नाही आवडत तू अशी मला चिपकलेली…मला‌ या सगळ्यात काही एक रस नाहीये… लैंगिक संबंध ठेवण्यात अजिबात इंटरेस्ट नाही मला..मी शारिरीक दृष्ट्या सक्षम नाही ह्या सगळ्यासाठी…झालं आता समाधान…हेच ऐकायचं होतं ना‌ तुला..कळालं आता…आता परत माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस..”

हातातलं रिमोट जमिनीवर आपटत तो तिथून निघून गेला. त्याचं बोलणं ऐकताच मोनिकाला मोठा धक्का बसला. डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला, शरीर त्याच्या शब्दांनी थरथरू लागले. स्वतः ला सावरत ती सोफ्यावर बसून रडत होती. मयंक ने इतकी मोठी गोष्ट आपल्यापासून लपविली, आपली फसवणूक केली या गोष्टीचा तिला विश्र्वासच होत नव्हता.

    किती तरी वेळ विचार करत , रडत ती तिथेच बसून राहीली. मयंक ने तिचा मोठा विश्वासघात केला होता याचा जाब विचारण्यासाठी ती त्याच्या समोर गेली. त्याला विचारले, ” मयंक लग्नापूर्वी का नाही सांगितलं हे सगळं…का केला इतका मोठा विश्वासघात..किती प्रेम करते मी तुझ्यावर माहीत होतं ना तुला..अरे मला लग्नानंतर सुद्धा एकदा कधी तू विश्वासात घेऊन सांगितलं असतं, तर काही तरी उपचार केले असते.. काही तरी मार्ग काढला असता..पण तू फक्त माझ्या भावनांशी खेळला..मला‌ अंधारात ठेवले..प्रेमाचे दोन शब्द कधी बोलला नाही तू.. फसवणूक केली मयंक तू माझी..याची शिक्षा तुला मिळणारच..”

  त्यावर तो म्हणाला, “कर आता माझी बदनामी करत..सांग सगळ्यांना मी खरा पुरुष नाही.. लैंगिक संबंध ठेवण्यास सक्षम नाही..नाहीये मी सक्षम.. माहीत आहे मला…लग्न का केलं म्हणतेस ना…लग्न न करण्याचे हे कारण नव्हतो सांगू शकत मी कुणाला..सगळ्यांचा सतत तगादा..काय सांगू त्यांना मी.. म्हणून केलं लग्न…”

“अरे‌ पण तुझी अवस्था तुला माहीत होती ना… इतरांना दोष देण्यात काय अर्थ आहे…माझं आयुष्य उध्वस्त केलं मयंक तू…कळतंय का तुला… विश्वासाने. सांगितलं जरी असतं ना तर सहनही केलं असतं मी..मार्ग काढला असता यातून आपण..पण आता नाही… विश्वासघात केला तू…नाही राहू शकत मी तुझ्यासोबत..”

इतकं बोलून कशीबशी पर्स उचलून मोनिका आई वडीलांकडे निघून आली. मोनिका अशी रडत रडत अचानक असं घरी आल्याने आई बाबा गोंधळले. तिने घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला तसाच त्यांनाही मोठा धक्का बसला. या सगळ्याचा मोनिकाच्या आरोग्यावर चांगलाच परिणाम झाला. तिला मोठा मानसिक धक्का बसला होता त्यामुळे तिची तब्येत चांगलीच खालावली.

सत्य कळताच मोनिकाच्या आई वडीलांनी मयंकचया घरच्यांना‌ फोन केला तर त्यांनाही हे ऐकून धक्काच बसला. ते दुसऱ्या दिवशी मुंबईत आले मयंकला जाब विचारला तर त्याने सगळं खरं असल्याचं सांगितलं. त्याच्या आई वडिलांना सुद्धा ही गोष्ट पहिल्यांदाच कळाली होती. मोनिकाला भेटायला आले असता तिची माफी मागत ते इतकंच म्हणाले, ” मोना, आम्हाला हे सगळं माहीत असतं तर त्याच लग्न केलच नसतं गं..पण आम्हाला याविषयी खरंच काही कल्पना नव्हती. आमच्या मुलामुळे तुझ्यावर ही वेळ आली याचा आम्हालाही खूप त्रास होतोय..आम्ही सुद्धा कधीच स्वतः ला माफ करू शकणार नाही….”

सतत तोच विषय, इतका मोठा मानसिक धक्का यामुळे मोनिका ची तब्येत जरा जास्त बिघडली आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या दिवसात मयंक एकदाही तिला भेटला नाही, फोन नाही.

मोनिका तुझ्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल आहे असे त्याचे वडील त्याला ओरडून बोलले तेव्हा तिला भेटायला तो हॉस्पिटलमध्ये आला‌ पण मोनिकाच्या आईने त्याला तिथून निघून जायला सांगितले.
  काही दिवसांनी मोनिका बरी झाली. मयंकला घटस्फोट देण्याचं तिने ठरवलं. या सगळ्या प्रकारातून बाहेर पडायला तिला खूप वेळ लागला. लग्न, प्रेम या सगळयां वरून आता तिचा विश्वास उडाला होता.

    एक सुंदर, आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेली आत्मविश्वासाने व्यवसाय सांभाळणारी मोनिका आयुष्याच्या जोडीदाराला ओळखण्यात चुकली होती. लग्नापूर्वी कधीच तिला भेटायला पुढाकार मयंक का घेत नव्हता, लग्नापूर्वी कधीच रोमॅंटिक का बोलत नव्हता यांचं उत्तर तिला आता मिळालं होतं. आपण त्याला ओळखण्यात खूप मोठी चूक केली, त्याच्या शांत स्वभावाचा दोष समजून त्याच्या वागण्या कडे, त्याला आपल्यात रस आहे की नाही हे जाणून घेण्याकडे दुर्लक्ष केले याची मनापासून तिला खंत वाटली. 

    मयंक मध्ये शारीरिक दोष असताना त्याने ही गोष्ट सगळ्यांपासून लपवून मोनिका ची फसवणूक केली. तिची काहीही चूक नसताना तिच्या भावना, तिच्या आयुष्याशी तो खेळला. असंच हल्ली समाजात बरेच ठिकाणी होताना दिसते आहे.

अशाच एका सत्य घटनेवर आधारित मी ही कथा लिहिली आहे.

  मुलांमध्ये शारिरीक दोष असतील, ते लैंगिक संबंध ठेवण्यास सक्षम नसतुल तर याविषयी त्यांच्या आई वडिलांना तरी कसे कळणार ना. पण मुळात अशा वेळी स्वतः ची परिस्थिती माहीत असताना एखाद्या मुलीच्या आयुष्याशी असं खेळणे म्हणजे गुन्हाच म्हणावा‌ लागेल. लग्नानंतरही हे सत्य इतरांना कळणारच ना त्यापेक्षा असा प्रोब्लेम असल्यास आधीच विचार करून निर्णय घेतला तर अशी बिकट परिस्थिती येणार नाही.

याविषयी तुमचं मत नक्की कळवा.

मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.
नावाशिवाय कथा शेअर करणे हा कॉपीराइट भंग केल्याप्रकरणी गुन्हा ठरू शकतो.

© अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed