होम मिनिस्टर तू या घरची…

Inspirational-Relations

        गौरव घरी आला तसंच त्याचा उदास चेहरा बघून प्रियाने ओळखले की आज नक्कीच काहीतरी बिघडलंय. ऑफिसमधून घरी येताच नेहमी तो सोफ्यावर बॅग फेकत दोन्ही मुलांसोबत अगदी लहान होऊन खेळायला लागतो पण आज मात्र हातातली बॅग अगदी व्यवस्थित जागेवर ठेवून बाथरूममध्ये गेला. फ्रेश होऊन बाहेर आला तोच दोन्ही मुले बाबांना आपले कारनामे दाखवायला बाथरूमच्या दारापाशी जाऊन तयार.
    लहान मुलगा चिन्मय त्याने काढलेले पहिलेच चित्र आपल्या बाबांना मोठ्या उत्साहाने दाखवत होता. मुलगी साक्षी विज्ञान प्रदर्शनात मिळालेली ट्राॅफी दाखवत प्रदर्शनातील गमतीजमती सांगण्यात तल्लीन झाली होती. मुलांचं कौतुक,अभिनंदन करत त्यांच्या कलेची वाहवा करतानाही त्याच्या चेहऱ्यावरची निराशा प्रियाला स्पष्ट दिसत होती.  सदैव हसतमुख गौरवचा निराश चेहरा आज प्रियाला बघवत नव्हता. नक्की काय झाले हे आताच नको विचारायला म्हणून तिने आधी जेवणाची तयारी केली. चौघांनी एकत्र बसून जेवण केले, मुलांचा अभ्यास झाल्यावर मुले झोपी गेली तेव्हा प्रियाने गौरवच्या पाठीवर हात फिरवत विचारले, “काय झालंय? इतका का निराश आहेस आज?”

त्यावर गौरव म्हणाला, “प्रिया अगं माझी नोकरी गेली. इतके वर्ष कंपनीसाठी मेहनत घेतली पण नविन बॉस ज्याला मी सुरवातीपासूनच आवडत नव्हतो का तर मी स्पष्टवक्ता, ज्याचं जिथे चुकलं तिथे त्याला बोलायचं, प्रामाणिकपणे काम करायचं पण यामुळे बॉसच्या विरोधात मी आहे असा गैरसमज करून घेतलेला त्यांनी, पॉलिटिक्स तर बघायलाच नको या कॉर्पोरेट क्षेत्रात यांमुळे माझ्या उत्तम कामाची जराही दखल न घेता मला काढून टाकलं आज कंपनीतून. तसं मंदीमुळे सगळीकडे अशीच परिस्थिती आहेच त्यात मेहनत, काम यापेक्षा पॉलिटिक्स जास्त आहे, त्यात माझ्यासारख्या विरोध करणाऱ्या लोकांचे हमखास नुकसान होते. आता सगळं मार्केट डाऊन तेव्हा लगेच दुसरी नोकरी मिळणेही जरा अवघड वाटत आहे गं… घराचं लोन, मुलांचा वाढता खर्च, घरखर्च सगळं कसं मॅनेज होणार आहे देव जाणे.. त्याचंच टेन्शन आलंय मला..”

प्रिया त्यावर म्हणाली, “अरे इतकंच ना.. नको टेन्शन घेऊ. तुझ्याजवळ उत्तम ज्ञान आहे, आत्मविश्वास आहे शिवाय कामाचा अनुभव आहे. दुसरी नोकरी नक्कीच मिळेल. दोन महिने घरी राहिलास तरी काही अडचण येणार नाही आपल्याला घरखर्च चालवायला. राहीला प्रश्न घराच्या लोन चा तर जे काही थोड फार सेव्हींग आहे त्यातून करूया मॅनेज काळजी करू नकोस. ”

गौरव प्रश्नार्थक नजरेने प्रियाला बघत होता. त्याला वाटलेले प्रियाला ही बातमी ऐकून टेन्शन येईल पण झालं उलटच. तो तिला म्हणाला, “घरखर्च कसा मॅनेज होईल म्हणालीस. मला कळाल नाही तू काय म्हणते आहेस. ”

प्रिया त्याला धीर देत म्हणाली, “अरे दर महिन्याला घरखर्च करायला तू जे पैसे देतोस ना त्यातले शिल्लक राहीलेले पैसे मी तसेच जपून ठेवते. मुलांना खाऊ म्हणून मिळालेले, मला ओवाळणी म्हणून मिळालेले अशे सगळे पैसे माझ्याजवळ जमा असतात अगदी सुरक्षित. इतक्या वर्षांचा संसार आपला त्यात मी माझ्या जवळचे क्वचितच पैसे खर्च केले असतील बाकी सगळे आहेत. सगळे मी माझ्या खात्यात जमा करते दर महिन्याला. हे बघ पासबुक.”

गौरव ते पासबुक बघताच त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला, तिने पै पै साठवून सत्तर हजार रुपये जमवले होते. तो ते बघताच म्हणाला, “तू तर खरंच लक्ष्मी आहेस.”
ती त्यावर म्हणाली, “आता चेहऱ्यावरचे भाव जरा बदला. असं उदास नाही बघवत रे तुला आणि अजून एक दुसरी नोकरी मिळेपर्यंत तू क्लासेस घ्यायला सुरु कर.  घरात बसून तोच तो विचार करत असं निराश राहिल्या पेक्षा क्लासेस घेतले तर तुझं मन फ्रेश राहील शिवाय जरा पैसा सुद्धा मिळेल.”

गौरव ते ऐकताच विचार करू लागला, किती समजुतदार बायको आहे आपली. अचानक नोकरी गेल्याने किती टेन्शन मध्ये आलेलो मी. वाटलं होतं ही गोष्ट ऐकून प्रियाला सुद्धा टेन्शन येईल पण हिने पाच मिनिटांत मध्ये सगळं टेन्शन कमी केलं. किती भाग्यवान आहे मी, मला प्रिया सारखी अर्धांगिनी मिळाली.

दुसऱ्या दिवशी सकाळीच गौरव जवळच्या एका इन्स्टिट्यूट मध्ये गेला. आयटी क्षेत्रात लागणारे बर्‍याच टेक्नॉलॉजी चे क्लासेस देणारे हे इन्स्टिट्यूट, त्यांना उत्तम ज्ञान असलेल्या ट्रेनर ची गरज होतीच त्यामुळे गौरवला लगेच तिथे नोकरी मिळाली. चांगल्या कंपनीत पूर्वीच्या पदाला साजेशी नोकरी मिळेपर्यंत दररोज क्लासेस घ्यायचे आणि नोकरी मिळाली की शनिवार रविवारी या इन्स्टिट्यूट मध्ये ट्रेनर म्हणून यायचे असं ठरलं. घरी येताच मोठ्या आनंदाने त्याने सगळं प्रियाला सांगितले आणि अशा अचानक ओढावलेल्या आर्थिक संकटातून पटकन मार्ग काढण्यासाठी खंबीरपणे पाठीशी उभ्या प्रियाचे त्याने मनोमन कौतुक केले.

प्रिया आणि गौरव यांचा पंधरा वर्षांचा संसार.  त्यांच्या या संसाराच्या वेलीवर पाच वर्षांचा चिन्मय आणि अकरा वर्षांची साक्षी अशी दोन गोड मुले.
गौरव आयटी क्षेत्रात चांगल्या पदावर नोकरीला. पूर्वी प्रिया सुद्धा त्याच क्षेत्रात नोकरी करायची पण चिन्मय झाल्यावर तिने नोकरी सोडली. या संसाराच्या वाटेवर अनेक संकटे आली, चिन्मयच्या जन्मापूर्वी अचानक गौरवच्या आई बाबांचा अपघातात मृत्यू झाला‌. त्या घटनेने गौरव पार हादरला होता, त्यावेळी सुद्धा प्रियाने गौरवला खूप हिंमत दिली. असेच अनेक चढ-उतार झेलत दोघेही आनंदाने नांदत होते.

गौरव एक परखडपणे मत मांडणारा, हुशार , आत्मविश्वासू पण तितकाच भाऊक स्वभावाचा. गरीब परिस्थितीतून वर येत यशस्वी झालेला पण कुठलेही संकट आले की लगेच निराश व्हायचा. अशा वेळी प्रिया मात्र खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी असायची त्यामुळेच गौरवला प्रियाचा खूप अभिमान वाटायचा. आजही तिच्यामुळे निराश न होता दुसरी चांगली नोकरी मिळविण्यासाठी तो नव्याने सज्ज झाला.

त्याला असलेले उत्तम सखोल ज्ञान आणि समजून सांगण्याची पद्धत यामुळे महिनाभरात त्याची उत्तम ट्रेनर म्हणून प्रसिध्दी झाली. त्यातून मिळणारा पैसा वाढतच गेला. आता तर नोकरी न करता नोकरी करणार्‍यांना, फ्रेशर्स ला टेक्निकल ट्रेनिंग देत तो पगाराएवढा पैसा क्लासेस मधूनच मिळवू लागला.
अख्ख्या शहरात त्याचे नाव झाले. टेक्निकल विषयांवर व्हिडिओ बनवून स्वतःचे युट्यूब चॅनल सुरू केले. त्याचे नाव भराभर प्रसिद्ध झाले. या सगळ्यांचे श्रेय तो प्रियाला देतो. तिचा पाठींबा असल्याने मी यशस्वी झालो असं अभिमानाने सांगतो.

ते म्हणतात ना यशस्वी पुरुषाच्या मागे खंबीरपणे उभी राहणारी एक स्त्री असते त्याचे हे जिवंत उदाहरण. 

अशा बर्‍याच स्त्रिया आपल्या आजूबाजूला दिसतात. पै पै अगदी जपून ठेवतात, संसारात अडीअडचणीला तो साठवून ठेवलेला पैसा कामी पडतो. पतीच्या , मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतात. संसारात येणाऱ्या अनेक संकटांचा मोठ्या हिमतीने सामना करत त्यातून या शोधतात. अशा समस्त गृहलक्ष्मींना मानाचा मुजरा ☺️

मी लिहिलेला हा लेख कसा वाटला ते नक्की कळवा ?

मी लिहिलेला हा लेख माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

© अश्विनी कपाळे गोळे

फोटो गूगल साभार

Tags:

Comments are closed