स्वप्नातील चांदवा ( प्रेमकथा )

Love Stories-Relations

     मीरा खिडकीतून बाहेर लुकलुकणारे चांदणे बघत होती. माधवला यायला उशीर झाला त्यामुळे त्याची वाट बघत खिडकीतून डोकावून बघताना नकळत चांदण्यात रमली. जरा वेळ तो चांदण्यांचा लपाछपीचा खेळ बघून भरकन खोलीत गेली, एक कोरा करकरीत कागद आणि बॅगेतून काढलेले काही रंग, ब्रश घेऊन खिडकीजवळ स्थिरावली. समोरचे डौलदार कडूनिंबाचे झाड, त्या झाडांच्या फांद्यांमधून डोकावणारा चंद्र, आकाशात लुकलुकणारे चांदणे अगदी हुबेहूब दृश्य तिने त्या कागदावर उतरवले. जणू त्या बाहेर दिसणार्‍या दृश्याचा फोटो काढला असंच सुरेख चित्र तिने अगदी सहजपणे रेखाटले.

त्या चित्राकडे बघत मनोमन आनंदी होत ती तिच्याच विश्वात रमली तितक्यात दारावरची बेल वाजली आणि ती भानावर आली. माधव घरी आलेला बघून तिला अजूनच आनंद झाला. तो घरात येताच त्याच्या हातातली बॅग बाजूला ठेवून ती त्याला बिलगली आणि म्हणाली, “किती उशीर केलास यायला. कधीपासून वाट बघते आहे मी.. फोन तरी करायचा उशीर होत असेल तर..”
त्याचं लक्ष मात्र समोर ठेवलेल्या त्या चित्राकडे गेले, तिला मिठीतून बाजुला करत तो म्हणाला, “मीरा, हे चित्र तू काढले ?”
तिने चेहऱ्यावर हास्य आणून मानेनेच होकार दिला.
तो त्यावर आश्र्चर्यचकित होऊन म्हणाला,

“व्वा …किती सुंदर…अगदी हुबेहूब दृश्य रेखाटले आहे तू…माझी बायको इतकी छान कलाकार आहे हे मला तर पहिल्यांदाच कळते आहे..”

ती लाजतच त्या चित्राकडे बघत मनोमन आनंदी होत म्हणाली, “खूप आवडते रे मला लहानपणापासूनच असे बोलके चित्र रेखाटायला. आश्चर्य वाटेल तुला पण तू मला बघायला आलेला ना त्यानंतर मी तुझा चेहरा आठवून आठवून एका कागदावर उतरवला. दाखवते तुला ते,  माझ्या बॅगेत आहे सगळे माझे आवडते चित्र. हे घे पाणी पी आधी, नुकताच आलास ना..दमला असशील..”

पाण्याचा ग्लास हातात घेत तो म्हणाला,
“अगं तू इतकं छान सरप्राइज दिलं की सगळा थकवा क्षणात दूर झाला. पण तू मला तुझ्यातल्या या कलेविषयी कधी बोलली नाहीस.”

ती  बॅगेतून काही चित्र काढलेले कागद हातात घेऊन येत म्हणाली “चित्र, रांगोळी काढणे माझा छंद आहे असं सांगितलं होतं मी तुला आपल्या पहिल्या भेटीतच पण तुलाच लक्षात नसावं..”

तो मनात विचार करू लागला,  छंद आहे असं म्हणाली होती मीरा पण इतकी सुंदर कला हिच्या हातात आहे असं स्वप्नातही वाटलं नव्हतं मला. म्हणूनच कदाचित फार काही मनावर घेतलं नसावं मी.

तिने रेखाटलेले त्याच्या चेहऱ्याचे चित्र बघून तर तो अजूनच चकित झाला. कांदेपोहे कार्यक्रमात पंधरा मिनिटे समोर बघितलेला माझा चेहरा हिने कसा काय इतका अप्रतिम रेखाटला याचे त्याला खूप आश्चर्य वाटले. तिने रेखाटलेले एकापेक्षा एक अप्रतिम चित्रे बघून तो त्यात अगदी रमून गेला.
इतक्या कौतुकाने ते सगळे चित्र निरखत असताना त्याला बघून तिला अजूनच आनंद झाला. पहिल्यांदा कुणीतरी तिच्या कलेची वाहवा करत होते.

तो तिचं भरभरून कौतुक करत तिला मिठी मारत म्हणाला, ” मीरा, उद्या सकाळी आपल्याला बाहेर जायचे आहे. कुठे, कशासाठी ते तुझ्यासाठी सरप्राइज आहे. ”

ती मानेनेच होकार देत त्याच्या मिठीत सामावली.

मीरा आणि माधवचे काही दिवसांपूर्वी लग्न झालेले.
माधव दिसायला साधारण, सावळा वर्ण, उंच पुरा, अतिशय प्रेमळ स्वभावाचा, समजुतदार हुशार मुलगा. मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचा मोठा
झालेला. नोकरी निमित्त शहरात एकटाच राहायचा.

मीरा दिसायला सुंदर, सडपातळ, उंच बांधा, रेशमी केस, नितळ कांती, चाफेकळी नाक, गव्हाळ वर्ण, बोलके डोळे अगदी प्रसन्न चेहरा. लहानपणी आजारपणात आईचे निधन झाले आणि तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. मीराच्या मामा मामींनी तिचा सांभाळ केला. ते एका गावातच राहायला होते. मामा मामी तिला खूप जीव लावायचे. मीराच्या अंगात छान कला होती, सहजपणे ती सुंदर चित्र रेखाटायची पण इतर कुणी त्याची फारशी दक्षता घेत नव्हते. मामा शेतीच्या कामात गुंतलेला तर मामी घरकाम, मुलंबाळं यांच्यात आणि कलेच्या जोरावर आपण खूप पुढे जाऊ शकतो हे गावात राहून असल्याने तिला फारसं माहिती नव्हतं. कधी तिने मनावर सुद्धा घेतलं नव्हतं.

पदवी अभ्यासक्रमाला शेवटच्या वर्षाला होती तसेच तिला माधवचे स्थळ आले, पहिल्या भेटीतच त्याला ती खूप आवडली आणि दोघांचे लग्न झाले.

आज माधवने केलेल्या तिच्या कलेचे कौतुक बघून ती खूप आनंदात होती. सकाळी माधव काय सरप्राइज देणार आहे हाच विचार तिच्या मनात रात्रभर सुरू होता.

सकाळ झाली तशीच ती उठून भराभर आवरू लागली. शनिवार असल्याने माधवला सुट्टी होती त्यामुळे तो अजूनही गाढ झोपेत होता. तो उठून बघतो तर मॅडम आंघोळ करून छान फ्रेश होऊन तयार. ती छान गुलाबी रंगाचा कुर्ता घालून नुकतेच धुतलेले ओले मोकळे केस वाळवत असताना तिला तो निरखत होता. तिचं ते नैसर्गिक सौंदर्य बघून त्याची नजर तिच्यावर स्थिरावली. तिच्या गोड आवाजात गुड मॉर्निंग शब्द ऐकून तो भानावर आला. तिला गुड मॉर्निंग म्हणत बेडवरून उठला. फ्रेश होऊन हॉलमध्ये आला तर ती नाश्त्याची तयारी करत होती. गरमागरम चहा, नाश्ता करून दोघेही घराबाहेर पडले. माधव मीराला एका प्रख्यात चित्रकाराचे प्रदर्शन बघायला घेऊन गेला. तिच्या आवडत्या कलेचे प्रदर्शन बघण्यात ती अगदी रममाण झाली. एकापेक्षा एक अप्रतिम चित्रे, लोकांकडून होणारे त्या चित्रकाराचे कौतुक बघत ती विचारांमध्ये हरवली. जणू स्वतःचे भविष्य ती त्या चित्रकारात बघत होती.

  प्रदर्शन बघून झाल्यावर दोघेही एका मोठ्या हॉटेलमध्ये लंच करायला गेले. लंच करताना माधव मीराला म्हणाला, “मीरा, तुझ्या कलेचे असेच भरभरून कौतुक सगळ्यांनी करावे असे मला वाटते. तुला माहित आहे आजच्या या प्रदर्शनात ठेवलेल्या पेंटिंग्जची किंमत लाखो रूपये आहे. खूप मागणी आहे या कलेला. केवळ पैशासाठी म्हणून म्हणत नाही मी तुला पण तुझ्या या कलेमुळे तुला एक नवी ओळख मिळावी म्हणून सांगतोय तू या क्षेत्रात खूप यशस्वी होशील. माझा पूर्ण पाठिंबा आहे तुला. छोट्या स्तरावर का होईना पण तू याची सुरुवात कर असं वाटतंय मला.”

मीरा माधवच्या बोलण्याने खूप आनंदी झाली, त्याला म्हणाली, ” माधव, अरे माझ्यातली ही कला तुझ्यामुळे जगासमोर येत असेल तर मी अगदी एका पायावर तयार आहे. मुळात या कलेच्या क्षेत्रात करीअर करता येते याविषयी फारसं माहीत नव्हतं रे मला. आपण आजच तयारीला लागूया. आजचा दिवस माझ्यासाठी खरच खूप खास आहे. तू दिलेलं सरप्राइज तर आयुष्यातील सर्वात सुंदर भेट.”

मीराला पेंटिंग साठी लागणारी सगळी सामग्रीची खरेदी दोघांनी केली. मीरा ने वेळ न घालवता सहजपणे अगदी सुंदर अशा पेंटिंग्ज बनवायला सुरुवात केली. माधवने तिला काही ऑनलाईन साइट वर पेंटिंग्ज टाकायला सांगितले, कसे करायचे सगळे शिकविले. भराभर तिच्या कलेला ओळख मिळायला सुरुवात झाली, भरपूर मागणी येऊ लागली. हे सगळं करताना, अनुभवताना मीरा खूप आनंदी असायची. माधवला तिचं खूप कौतुक वाटत होतं.

आता तर मोठमोठ्या ऑर्डर सोबतच पेंटिंग्ज वर्कशॉप्स सुरू केले. तिच्या आवडत्या क्षेत्रात मन लावून काम करत मीराने लवकरच छान प्रगती केली. या सगळ्यात माधव अगदी तिच्या पाठीशी उभा राहिला त्यामुळे तिच्यात एक आत्मविश्वास निर्माण झाला.

आज तर तिच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस होता. गेली तीन वर्षे अप्रतिम कलाकुसर करून नाव कमावलेल्या मीराचे पेंटींग्ज एका मोठ्या प्रदर्शनात बर्‍याच कलाकारांच्या पेंटिंग्ज सोबत लावलेले होते. तिथे बघायला येणार्‍या गर्दीतून तिचे पेंटींग्जचे होणारे कौतुक ऐकताना मीराला एक मोठे स्वप्न पूर्ण झाल्याचे समाधान मिळाले. माधवची इच्छा आपण पूर्ण केली याचा आनंद सोबतच कलेच्या माध्यमातून मिळालेली ओळख याचा जणू आज दुग्धशर्करा योग जुळून आला होता.
माधवला मीराचा खूप अभिमान वाटत होता.

घरी परतताना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज जाणवतं होतं. त्याच्या हात हातात घेत त्याच्या डोळ्यात बघत ती म्हणाली, “माधव, तुझ्यामुळे मला हे यश मिळाले. आय लव्ह यू..”

त्यानेही तिला अलगद मिठीत घेत आय लव्ह यू टू म्हंटले.

मीरा मनोमन एकच गाणे गुणगुणत होती,

“जीवनात ही घडी अशीच राहू दे…
प्रीतिच्या फुलावरी वसंत नाचु दे….

रंगविले मी मनात चित्र देखणे
आवडले वेडीला स्वप्न खेळणे
स्वप्नातिल चांदवा….जिवास लाभु दे…

जीवनात ही घडी अशीच राहू दे….”

अशी ही मीरा आणि माधवची प्रेरणादायी प्रेमकथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

तुमच्या प्रतिक्रिया मिळाल्या की लिखाणाचा हुरूप वाढतो तेव्हा कमेंट करायला विसरू नका ?

मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

© अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed